पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर परिसरात ऊस कारखानदारी आणि त्याचबरोबर गुऱ्हाळ व्यवसाय विकसित पावला आहे. येथील गुळाची गुणवत्ताही चांगली असते. येथील अनेक शेतकरी गूळनिर्मितीत कुशल असून चांगली बाजारपेठही मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. कोल्हापूरला त्या पार्श्वभूमीवर गूळ संघही कार्यरत आहे. हे झाले पश्चिम महाराष्ट्राचे चित्र. राज्याच्या अन्य भागात मात्र हवामान किंवा पाण्याच्या उपलब्धतेनुसार गूळ व्यवसाय तुलनेने रुजलेला नाही. मात्र काही शेतकरी आपल्या प्रयत्नाने या व्यवसायाला गती देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक उदाहरण त्यासाठी घेता येईल.
साळवे यांचे गुऱ्हाळघर
ब्रिटिशकालीन अवर्षणग्रस्त असूनही नाशिक जिल्ह्यातील येवलेकरांनी शेतीतील प्रयोगशीलतेची चळवळ प्रभावीपणे अवलंबिली आहे. याचमुळे विहिरींच्या पाण्यावर गावोगावी 1970 ते 1990 च्या काळात उसाचे पीक आणि या उसावर आधारित गुऱ्हाळे चालायची. कालौघात पाण्याचा प्रश्न बिकट होत गेला अन् पीकपद्धती बदलत गेली. सर्वदूर हे परिवर्तन होत असताना चांदगावच्या साखरचंद साळवे यांनी गुऱ्हाळ बंद होऊ दिले नाही. तब्बल चाळीस वर्षांपासून साळवेंच्या शेताला गुऱ्हाळाची गोडी लागली आहे. त्यांची दुसरी पिढीही एकीकडे प्रयोगशीलता शेतीत आणत असताना; दुसऱ्या बाजूने गुऱ्हाळासारख्या पारंपरिक प्रकारांतूनही दमदार उत्पन्न घेत आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे तालुक्यात उसाचे क्षेत्र अभावानेच आहे. परिणामी, साखर कारखान्यांचा अभाव असल्याने ऊस शेजारील जिल्ह्यातील कारखान्यांना द्यावा लागतो. त्यातही आलेल्या अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत असल्याने रवींद्र साळवे या सुशिक्षित शेतकऱ्यानेही आपल्या शेतात पिकविलेल्या उसापासून गूळनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. या यशस्वितेतही सातत्य आहे हे विशेष!
...असा राबविला प्रयोग
साळवे यांनी वडिलोपार्जित असलेला गुऱ्हाळ व्यवसाय टिकवून धरला आहे. त्यांच्या व्यवसायातील प्रातिनिधिक उदाहरण यंदाचे द्यायचे झाल्यास आपल्या तीन एकर क्षेत्रात त्यांनी को- 86032, तर सात एकरात फुले-265 या वाणाची अशी एकूण 10 एकरांत ऊस लागवड केली. मात्र साखर कारखाना देत असलेला दर तसेच वेळेवर छाटणी होण्यात येत असलेली अडचण ध्यानात घेऊन त्यांनी पारंपरिक गुऱ्हाळावरच अधिक लक्ष केंद्रित केले. त्यांचे वडील साखरचंद ------यांनी त्यांना प्रेरणा देऊन मार्गदर्शनही केले. गुऱ्हाळासाठी लागणारी साधनसामग्री तसेच कढई, जाणकार मजूर बाहेरून आणले. ऊस तोडणी मजुरांना दोनशे रुपये प्रति टन मजुरी दिली जाते. तर गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजुरांना ------45----- रुपये प्रति क्विंटल गुळासाठी देण्यात येतात. या सर्व कामांसाठी 18 मजुरांची आवश्यकता भासली. ऊस तोडणीसाठीच मजूर नंदूरबार जिल्ह्यातून आणले जातात. तर गूळनिर्मितीसाठी उत्तर प्रदेशातून मजूर आणले आहेत. गूळनिर्मिती प्रक्रियेत गुळव्याची जबाबदारी महत्त्वाची असते. त्याला प्रति क्विंटल गुळास ------45----- रुपये मजुरी देण्यात येते. को 86032 वाणाचे तीन एकरात 195 टन उत्पादन मिळाले. या वाणाच्या एक टन उत्पादनापासून सुमारे दीड क्विंटल गूळनिर्मिती होते. त्या हिशेबाने सुमारे 292 क्विंटल गूळ तयार झाला. फुले- 265 वाणाचे सात एकर क्षेत्र होते. एकरी 70 टन उत्पादन मिळाले. या वाणापासून गूळनिर्मिती तुलनेने कमी होत असल्याचा साळवे यांचा अनुभव आहे. या वाणाच्या एक टन उत्पादनापासून सुमारे सव्वा क्विंटल गूळ मिळतो. त्याप्रमाणे सुमारे 612 क्विंटल गूळ एकूण क्षेत्रातून मिळाला. संपूर्ण प्रक्रियेनंतर दोन हजार लिटर काकवीही उत्पादित झाली.
विक्री मनमाड, येवल्यालाच -
गुळाची मागणी लक्षात घेऊन साळवे येवला, मनमाड व लासलगाव येथील व्यापारी तसेच थेट ग्राहकांना गूळ व काकवीची विक्री करतात. गुळाला क्विंटलला 2500 रुपये, तर काकवीला 25 रुपये लिटरचा भाव मिळतो.
म्हणजेच प्रति टन ऊस, त्यापासून होणारी गूळनिर्मिती, त्याला मिळणारा दर या गोष्टी लक्षात घेतल्या, तर ढोबळ मानाने असे म्हणता येईल, की गूळनिर्मिती प्रक्रियेतून उसाला दर हा प्रति टन चार हजार रुपयांपर्यंत मिळतो. गुऱ्हाळनिर्मितीतील खर्च वजा जाता हाच दर तीन हजार रुपयांपर्यंत मिळतो. हाच ऊस जर स्थानिक साखर कारखान्याला दिला तर तो 1800 ते 2000 रुपये असा मिळतो. म्हणजेच साळवे यांना ऊस कारखान्यांपेक्षा गूळनिर्मिती व्यवसायच अधिक परवडला आहे असे म्हणता येईल. शिवाय कारखान्यांकडे सतत चकरा मारण्याचा त्रास व वेळ वाचला आहे तो वेगळाच!
गूळनिर्मिती परवडतेय
साळवे आपल्या अनेक वर्षांच्या गूळनिर्मिती व्यवसायाबाबत बोलताना म्हणाले, की आमच्या भागात पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे विविध पिके घेण्यावर मर्यादा येतात. वडिलोपार्जित असा अनेक वर्षांपासून असलेला गुऱ्हाळ व्यवसाय मी पुढे चालवीत आहे. माझी ऊसशेती कॅनॉलच्या भागात असल्याने पाणी उपलब्ध होते. त्यामुळे ऊसशेती करणे शक्य होते. सध्या ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जात आहे.
आमच्या जिल्ह्यात नियमित स्वरूपाचे आमचेच गुऱ्हाळ आहे. साहजिकच आमच्या गुळाला सतत मागणी असते. जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनाच सर्व माल विकला जातो. बाहेर माल पाठवायचा म्हटले तरी तेवढा ऊस उपलब्ध नाही. आम्ही बाहेरून ऊस खरेदी करीत नाही. मात्र येत्या काळात गूळ व्यवसाय वाढवायचे ठरवले असल्याने तसे नियोजन करण्याच्या प्रयत्नात आहे. येत्या काळात आधुनिक पद्धतीचा वापर गूळनिर्मितीत करण्याचा विचार आहे. गुऱ्हाळ चालविणे जिकिरीचे असले तरी प्रक्रियेनंतर सरासरी मिळणारे उत्पन्न कारखान्याला ऊस देण्याच्या तुलनेत परवडते. त्यामुळे गुऱ्हाळाचा प्रयोग आम्ही राबवितो. आता गुळासाठी गोडाऊनची व्यवस्थाही उभारली आहे. तसेच येत्या काळात चिक्की गूळ तयार करण्याचाही विचार आहे. अलीकडील वर्षांमध्ये आमच्या भागाचा विचार केला तर गुळाला किमान दर 2500 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. 10 किलोची ढेप साधारण 250 ते 275 रुपये दराने विकली जाते. याशिवाय पाच किलो व एक किलो ढेपाही तयार केल्या जातात.
गूळनिर्मितीत रसायनांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यापाऱ्यांना ज्या किमतीत विकतो त्याच किमतीत ग्राहकांनाही गुळाची विक्री होते. काही व्यापारी जागेवर येऊनही माल खरेदी करतात असे साळवे यांनी सांगितले. या व्यवसायात मजुरांची समस्याही भेडसावत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र समस्यांतून मार्ग काढून पुढे जात असल्याचेही साळवे यांनी सांगितले.
संपर्क - रवींद्र साळवे, 9765230730