Thursday, July 5, 2012

ओळख पेटंट कायद्याची

भारतामध्ये पेटंटचा कालावधी हा 20 वर्षापर्यंत मर्यादित आहे, ज्या तारखेस आपण पेटंटसाठी अर्ज करतो, त्या तारखेपासून हा कालावधी गृहीत धरतात. जर एखाद्या संशोधकाने केलेला शोध त्याने पेटंटसाठी केलेल्या अर्जाआधीचा प्रसिद्ध झाला असेल, तर असा शोध वा संशोधन पेटंटसाठी अपात्र ठरते. म्हणजेच संशोधकाने केलेल्या संशोधनाबद्दल वा शोधाबद्दल विशेषाधिकाराच्या अर्जापूर्वीच ते कुठेही प्रसारित करू नये. ज्या तारखेस आपण पेटंटसाठी अर्ज करतो, त्याच तारखेपासून पेटंट मिळाल्याची तारीख ग्राह्य धरण्यात येते. 

जागतिकीकरणाच्या युगात बुद्धिमत्तेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण आपल्या स्थावर मालमत्तेचे संरक्षण करतो, त्याचप्रमाणे बौद्धिक संपदा अधिकारान्वये बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करणे आवश्‍यक आहे. बुद्धीचे रूपांतर संपत्तीत करणे म्हणजेच बौद्धिक स्वामित्वाचा अधिकार. या अधिकारासाठी जागतिक व्यापार परिषदेने नियम तयार केले आहेत. यामध्ये जीआय, कॉपीराइट, औद्योगिक आरेखन, गुपित माहितीबाबत संरक्षण व पेटंट यांचा अंतर्भाव होते. संशोधक विविध बाबींवर संशोधन करीत असतात. त्याचा फायदा देशाला आणि पर्यायाने समाजातील सर्व घटकांना होत असतो. संशोधकाने केलेल्या संशोधनाचे अधिकार संशोधकाकडेच राहावेत हे अभिप्रेत आहे. यासाठी बौद्धिक स्वामित्व हक्कात योग्य वेळेत पेटंट मिळविण्यास अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. 

पेटंट म्हणजेच एखाद्या वस्तूचा वा शोधाच्या विशेषाधिकार शासनातर्फे काही विशिष्ट कालावधीपुरता एखाद्या संशोधकास वा संस्थेला दिला जातो. या विशेषाधिकारात एखादी वस्तू तयार करण्यासाठी, तिचा वापर करण्यासाठी किंवा विक्रीसाठी काही अधिकार संबंधित देशाद्वारे दिले जातात. परंतु हे अधिकार मिळविण्यासाठी काही विशिष्ट गोष्टीची प्रतिपूर्तता करावी लागते. या अधिकारान्वये इतर व्यक्ती विशेषाधिकार मिळालेल्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय पेटंटचा वापर वा विक्री करू शकत नाही. परंतु असा विशेषाधिकार काही कालावधीपुरताच मर्यादित असतो. कायद्यान्वये विशेषाधिकाराचा हक्क हा संपत्ती हक्कासारखाच आहे. त्यामुळे तो इतर व्यक्तींना भेट म्हणून देता येऊ शकतो किंवा त्याचा अधिकृत परवानाही संबंधित व्यक्ती इतरांना देऊ शकतो. कायद्यान्वये एखाद्या वस्तूसाठी मिळालेला विशेषाधिकार हा प्रादेशिक असतो, त्यामुळे तो संबंधित देशापुरताच मर्यादित असतो. 

पेटंट कायदा ः 
ब्रिटिश राजवटीपासून भारतात पेटंट कायदा अस्तित्वात आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर न्यायमूर्ती राजगोपाल अय्यंगार यांच्या अध्यक्षतेखाली 1957 मध्ये समिती स्थापन झाली. या समितीने सप्टेंबर 1959 मध्ये सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने पेटंट कायदा 1970 अस्तित्वात आला. त्यामध्ये जागतिकीकरणाच्या अनुषंगाने वेळोवेळी बदल करण्यात आले. 

भारतातील पेटंटचे कार्यालयाचे मुख्य कार्यालय पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकता येथे आहे. कार्यालयीन शाखा चेन्नई, नवी दिल्ली, मुंबई येथे कार्यान्वित आहेत. पेटंट बाबतची माहितीचे कार्यालय (Patent information system) नागपूर येथे आहे. भारतातील विविध पेटंट कार्यालयांनी 2009-10 मध्ये 36812 पेटंटला मान्यता दिली. भारतीयांमध्ये पेटंट मिळविण्याच्या बाबतीत जागरूकता निर्माण झालेली आहे. 

विशेष अधिकाराचा 1970 चा कायदा हा एखादी कला, पद्धती किंवा तयार केलेली यंत्रे व उपकरणे या बाबीशी निगडित आहे. सन 1970 पासून या पेटंटच्या कायद्यात मार्च 1999, जून 2002, 2003, 2005 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. या नवीन सुधारणेची विशेष महत्त्वाची बाब म्हणजे मूळ शुल्कामध्ये करण्यात आलेली वाढ, पेटंट मिळवण्यासाठीची कालमर्यादा आणि शुल्क पद्धती जी "क्‍लेम'च्या संख्येवरती अवलंबून आहे. "क्‍लेम' म्हणजेच आपण जे संशोधन केले आहे, त्या संशोधनात नेमके आपणास कोणत्या बाबतीत अधिकार हवे आहेत किंवा संरक्षित करावयाचे आहेत, त्यास पेटंट असे म्हणतात. 

भारतामध्ये पेटंटचा कालावधी हा 20 वर्षांपर्यंत मर्यादित आहे, हा कालावधी ज्या तारखेस आपण पेटंटसाठी अर्ज करतो, त्या तारखेपासून गृहीत धरतात. जर एखाद्या संशोधकाने केलेला शोध त्याने पेटंटसाठी केलेल्या अर्जाआधीचा प्रसिद्ध झाला असेल, तर असा शोध वा संशोधन पेटंटसाठी अपात्र ठरते. म्हणजेच संशोधकाने केलेल्या संशोधनाबद्दल वा शोधाबद्दल विशेषाधिकाराच्या अर्जापूर्वीच ते कुठेही प्रसारित करू नये. ज्या तारखेस आपण पेटंटसाठी अर्ज करतो, त्याच तारखेपासून पेटंट मिळाल्याची तारीख ग्राह्य धरण्यात येते. पेटंट कायद्याचा फायदा नावीन्यपूर्ण वस्तू उत्पादनास होणार आहे. त्याचबरोबरीने संशोधनातील गुंतवणूक वाढून दर्जेदार संशोधन होईल. संशोधकाला संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी हा कायदा फायदेशीर आहे. 

पेटंट मिळविण्यासाठी महत्त्वाच्या बाबी ः 

1) नावीन्यपूर्णता : एखादा शोध जर पेटंट अर्ज करण्यापूर्वीच तो प्रसिद्ध केला असेल तर त्यास पेटंट मिळत नाही. त्यामुळे एखादा शोध हा मूलतःच नावीन्यपूर्ण असावा. 
2) नवीन शोध ः एखादा साधा शोध ही विशेषाधिकारासाठी पात्र ठरतो, क्‍लिष्ट किंवा साधेपणाशी त्या शोधाचा काहीही संबंध येत नाही, फक्त तो शोध नवीन असायला हवा. 
3) उपयुक्तता : एखाद्या लावलेल्या शोधाची उपयुक्तता ही विशेषाधिकार प्राप्त करण्यासाठी आवश्‍यक असते. त्या शोधाची व्यावसायिक उपयुक्तता असायला हवी, तसे नसेल तर त्या शोधास पेटंट मिळत नाही. 

आपल्या देशात 1) अणु ऊर्जाबाबतचे संशोधन वा शोध, 2) प्राणी किंवा वनस्पती पूर्णत: वा अंश रूपाने, 3) एखाद्या माहितीचे सादरीकरण, 4) एखादे संशोधन जे नैसर्गिक तत्त्वाच्या विरुद्ध आहे, 5) कृषी किंवा उद्यान विद्या पद्धती या बाबींसाठी पेटंट मिळत नाहीत. 

भौगोलिक मर्यादा ः 
पेटंट संदर्भात काही भौगोलिक मर्यादा आहेत. एखाद्या शोधाचे जागतिक पेटंट मिळू शकत नाही. पेटंटचे अधिकार हे सर्वस्वी प्रादेशिक असतात, जे एखाद्या देशातर्फे संरक्षित केलेले असतात. परंतु विविध देशांत पेटंटसाठी अर्ज करून ते आपण मिळवू शकतो किंवा पेटंट को-ऑपरेशन ट्रीटी (पीसीटी) अंतर्गत आपण पीसीटी समूहातील देशामध्ये पेटंट मिळवू शकतो, यात आपला वेळेचा अपव्यय कमी होतो, पैशाचीही बचत होते. प्रत्येक देशाला पेटंट देण्याचा किंवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार आहे; परंतु एखाद्या देशात एखाद्या शोधाबद्दल पेटंट मिळाले असेल तर इतर देशांत ते पेटंट मिळेलच असे काहीही किंवा एखाद्या देशाने पेटंट नाकारले तर इतर देशांत ते नाकारले जाऊ शकते असेही काही नाही. 

पेटंट मिळविण्याची कार्यपद्धती : 
1) पेटंटसाठी हिंदी/ इंग्रजीमध्ये अ-4 आकाराच्या पांढऱ्या कागदावर एका बाजूने टंकलिखित करून अर्ज संबंधित कार्यालयात तीन प्रतींमध्ये योग्य शुल्कासह सादर करावा लागतो. 
2) पेटंटसाठी अर्ज करताना त्या शोधाबद्दल प्राथमिक खुलासेवार नोंदी वा पूर्ण खुलासेवार नोंदी अर्ज सादर करावा लागतो. 
3) आपण केलेल्या अर्जाची छाननी/ तपासणी पेटंट कार्यालयाकडून करवून घ्यावी.
4) सादर केलेला अर्ज पेटंट तपासणीसाठी शासकीय गॅझेटमध्ये प्रसिद्ध करावा. 
5) आपण केलेला अर्ज ग्राह्य आहे व तो ग्राह्य असल्याची प्रसिद्धी शासकीय गॅझेटमध्ये करून घ्यावी. 
6) जर त्या पेटंटला कोणाची हरकत असेल तर त्याबाबतचा पूर्ण पाठपुरावा करावा. 
7) आपण पेटंट मिळविण्यासाठी अर्ज केला असेल तर तो आपणास परत घ्यावयाचा असेल तर त्यासाठीही पेटंट कायद्यात सोय करण्यात आली आहे. 

पेटंट अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ः 
1) प्राथमिक नोंदी असलेला अर्ज : 
प्राथमिक नोंदी किंवा टिपण हे जर संशोधन शेवटच्या टप्प्यात आले असेल तर व पूर्ण खुलासेवार नोंदी करण्यासाठी काही कालावधी लागणार असेल तर प्राथमिक नोंदीचा अर्ज पेटंट मिळविण्यासाठी कायदेशीररीत्या ग्राह्य धरला जातोच असेही काही नाही. परंतु आपला मालकी हक्क अबाधित ठेवण्यासाठी हे आवश्‍यक आहे. परंतु एक बाब लक्षात घ्यायला हवी की प्राथमिक अर्जावर कोणालाही पेटंट मिळू शकत नाही. 
2) पूर्ण खुलासेवार नोंदी असलेला अर्ज : 
पेटंट मिळविण्यासाठी खुलासेवार नोंदी असलेला अर्ज करणे अत्यंत आवश्‍यक आहे. खुलासेवार अंतिम नोंदणी अर्जात खालील बाबींचा समावेश असायला हवा. 1) शोधाचे नाव, 2) शोध कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, 3) शोधाची पार्श्‍वभूमी, 4) शोधाचा हेतू, उद्दिष्ट व 5) शोधाची संपूर्ण माहिती. पूर्ण खुलासेवार नोंदीचा अर्ज तात्पुरता अर्ज सादर केल्यापासून बारा महिन्यांच्या आत करायला हवा. परंतु प्राथमिक खुलासेवार नोंदीचा अर्ज हा अंतिम अर्ज करण्याच्या अगोदर करणे आवश्‍यक आहे असे काहीही नाही. 

पेटंट अधिकारासाठी नामनिर्देश ः 
- शोधकाच्या नावाच्या अधिकारासाठी खालील बाबींचा अवलंब करावा. 
- संबंधित शोधासाठी ज्या ज्या व्यक्तींनी योगदान दिले आहे, त्या सर्वांची नावे शोधक म्हणून द्यावीत. 
- संबंधित शोधासाठी ज्या व्यक्तींचे बौद्धिक योगदान लाभले, त्यांचेही नाव शोधक म्हणून घ्यावे. 
- ज्या व्यक्ती एखाद्या शोधाच्या बाबतीत काहीही बौद्धिक योगदान देत नाहीत, परंतु शोधाची संबंधित इतर कामे उदा. प्रयोग घेणे, ड्रॉइंग काढणे इत्यादी करतात त्याचे नाव शोधक म्हणून घेता येणार नाही. 
पेटंट कार्यालयाचे संकेतस्थळ ः http://www.ipindia.nic.in 

पेटंटला विरोध करता येतो का? 

पेटंट कायदा 1970 अन्वये पेटंटला विरोध करता येतो. पेटंट कार्यालयाने पेटंटसाठी आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर ते पेटंट देण्यायोग्य असेल तर त्या शोधाचे नाव, शोधकाचे नाव व अर्जदाराचे नाव, शोधाची संक्षिप्त माहिती, आकृती व इतर बाबी गॅझेटमध्ये भाग 3, उपभाग 2 मध्ये हितसंबंधी लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाते. मिळालेल्या पेटंटला विरोध करण्यासाठी संबंधित पेटंट कार्यालयात चार महिन्यांच्या आत अर्ज करता येतो. परंतु चार महिन्यांनंतर अजून एक महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळू शकते. परंतु मुदतवाढीसाठी चार महिन्यांच्या कालावधीतच अर्ज करता येतो. 

पेटंटचा अर्ज भरण्यासाठी मूळ संशोधकास (भारतीय व्यक्तीस) शासकीय शुल्क म्हणून 1000 रुपये भरावे लागतात, तर त्या संशोधकाने कायदेशीररीत्या नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस 4000 रुपये भरावे लागतात. नंतर अर्जदाराने संबंधित अर्जाची तपासणी करण्यासाठी 48 महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्‍यक आहे. 


Ref. link : http://www.agrowon.com/Agrowon/20120227/5516959739650561483.htm

(इफेक्‍टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स) 'ईएम'

"ईएम' (इफेक्‍टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स) हे एक परिणामकारक नैसर्गिक, सजीव जिवाणूंचा समावेश असलेले द्रावण आहे. याचा वापर शेती, कुक्कुटपालन, पशुपालन, घन कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, सेंद्रिय खतनिर्मितीमध्ये फायदेशीर दिसून आला आहे. 

ज्या जमिनीचा सामू वाढलेला आहे अशा ठिकाणी ईएम-2 या द्रावणाच्या वापरामुळे विशेषतः ऊस या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीची झाल्याचे दिसून येते. मुळांची वाढ, पेरांची संख्या, फुटव्यांची संख्या, तसेच पेऱ्यातील अंतर वाढल्याचे दिसून आले. याचे द्रावण आम्लधर्मी असल्यामुळे ठिबक सिंचन संचामध्ये अडकणारे क्षार विरघळून जातात. शेवाळ वाढत नाही. जिवाणू खतांचा ईएम-2 सोबत केलेला वापर जास्त परिणामकारक दिसून येतो. याच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये चांगल्या पद्धतीचा परिणाम दिसून येतो. रोपवाटिकेमध्ये ईएम-2 चा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते, रोपे तजेलदार होतात. 

एक लिटर ईएम-2 द्रावण प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून याचा वापर शेतीसाठी तसेच रोपवाटिकेसाठी करावा. आम्ही आमच्या केंद्राच्या रोपवाटिकेत याची फवारणी तसेच आळवणी देतो. 

फळझाडांसाठी आठवड्यातून एकदा ठिबक सिंचनातून ईएम-2 दिले जाते. यासाठी एक लिटर ईएम-2 प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून व्हेंचुरीच्या माध्यमातून द्यावे, ईएमचा वापर करताना विद्राव्य खत त्याच वेळी पिकांना देऊ नये. मोसंबी, संत्रा या पिकाला ईएमचा वापर केल्याने फुले लागण्याचे प्रमाण वाढले, फळधारणा चांगली झाली. या द्रावणाच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. सेंद्रिय घटकांच्या वाढीमुळे पांढऱ्या मुळ्या वाढतात. झाडाची अन्नद्रव्य ग्रहणाची शक्ती वाढते. पिकाची चांगली वाढ होते. फळांची गुणवत्ता वाढलेली दिसून आली आहे. काही शेतकरी केळी पिकासाठी ठिबक सिंचनातून याचा वापर करतात, त्यामुळे पिकाची एकसारखी वाढ झाल्याचे दिसून आले. 

ईएमचा वापर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर करण्यात येत आहे. यांचे चांगले फायदे दिसून आले आहेत. काही शेतकरी चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, द्राक्ष, ऊस, केळी या पिकांसाठी वापर करताहेत. 

काही शेतकरी गोठा स्वच्छता, गांडूळ खतनिर्मितीमध्ये याचा वापर करताहेत. साधारणपणे 100 लिटर पाण्यात एक लिटर ईएम-2 हे द्रावण मिसळून गोठ्यात फवारणी केली असता गोठ्यातील दुर्गंधी कमी होते. जनावरांना माश्‍या, चिलटांचा त्रास कमी होतो. गांडूळ खताच्या वाफ्यावर याची फवारणी केली असता लवकर खत तयार होण्यास मदत होते. पालापाचोळा लवकर कुजतो. 


Ref. link: http://www.agrowon.com/Agrowon/20120229/4742729865648037900.htm

औषधी अडुळसा लागवड

अडुळसा हे अकॅन्थॅसी कुळामधील झुडूप असून, त्याचे शास्त्रीय नाव Justicia Adhatoda आहे. ही सदाहरित असणारी दोन ते तीन मीटर वाढणारी प्रजाती काही ठिकाणी कुंपणासाठी लागवड केलेली आढळते. पाने हिरवी, लांबट, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. मध्यम आकाराच्या या झुडपाचे सोटमूळ लांब वाढते. खोडाला पाने समोरासमोर येतात. पेरे फुगलेली असतात. फुले पांढरी असतात व फुलांना देठ नसते. 

ही वनस्पती उष्ण व दमट हवामानात चांगली वाढते. कमी पावसाच्या प्रदेशात या वनस्पतीची लागवड करता येते. जमीन निचरा होणारी, हलकी, मध्यम लागवडीसाठी उत्तम असते. पोयटा, गाळाची, वाळूमिश्रित जमीनही लागवडीसाठी चालते. समशीतोष्ण प्रदेशात ज्या ठिकाणी पाऊस भरपूर पडतो, त्या ठिकाणी वाढ चांगली आढळून येते. किनारपट्टी प्रदेशात कुंपणाला याची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील कोकणपट्टी, ओरिसा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू व बंगाल तसेच समुद्रकाठच्या प्रदेशात या वनस्पतीची लागवड दिसून येते. 

लागवड तंत्र ः 
खोडाच्या छाटापासून रोपे तयार करून लागवड करता येते. कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर एक मीटर दोन झाडांतील अंतराने लागवड करावी. शेतजमिनीत सलग लागवड करावयाची झाल्यास दोन झाडांत 1 x 1 मी. अंतर ठेवावे. परिपक्व खोडाचे छाट काढून ते 12 ते 15 सें.मी. आकाराचे तयार करावेत. जमिनीकडील भाग तिरका कापून लागवड प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये करावी. छाट फुटण्यास सुरवात झाल्यानंतर रोपांची लागवड जून, जुलै महिन्यांत पाऊस पडल्यानंतर करावी. जमिनीत पाणी भरून राहणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर मूळकूज रोग येण्याची शक्‍यता असते. त्यासाठी वेळीच रोगनियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. 

काढणी ः 
लागवडीनंतर वाढीनुसार पाने तोडणी सुरू करावी. साधारणतः चांगली झाडे वाढल्यास सहा महिन्यांपासून पाने तोडणीयोग्य होतात. परिपक्व गर्द हिरवी पाने काढून मागणीप्रमाणे तयार करावीत. काही वेळा वाळलेल्या स्वरूपात, तर काही वेळा ताज्या स्वरूपात औषध निर्मितीसाठी लागतात. अपरिपक्व व पिकलेली पाने औषधासाठी वापरू नयेत. पहिल्या तोडणीनंतर तीन महिन्यांच्या अंतराने तोडे करावेत. पाण्याचे व खताचे उत्तम नियोजन केल्यास पानांचे उत्पादन चांगले येते. दोन वर्षे वयाच्या प्रति झाडापासून सरासरी प्रत्येक तोड्यास एक किलो ताजी पाने मिळतात. 

औषधी उपयोग ः 
अडुळसा वनस्पतीच्या पानात व्हॅसिसीन अल्कीलॉईज असते. क्षयरोग, कफ, दमा, अस्थमा, खोकला या विकारांसाठी अडुळसा रामबाण म्हणून वापरला जातो. कफावर ज्यात फार दिवस खोकला येतो, बारीक ताप येतो तेव्हा दहा ग्रॅम म्हणजे चार चमचे रस व तितकाच मध व चिमूटभर पिंपळीचे चूर्ण एकत्र करून हे चाटण वरचेवर घेत राहावे. कफ मोकळा होतो व बरे वाटते. धाप लागणे, दमा यावरदेखील अडुळसा वापरला जातो. नाकातून, तोंडातून रक्त येत असेल तर पानांचा रस समभाग खडीसाखर घालून देतात. अडुळशाच्या फुलांचा अवलेह रक्त पित्त कमी करण्यासाठी वापरतात. पानांचा रस किंवा काढा मधाबरोबर आवाज बसला असता उपयुक्त असतो. आम्लपित्त, तापामध्ये आणि त्वचारोगामध्ये पंचतिक्ताचा (अडुळसा, काटेरिंगणी, कडुनिंब साल, गुळवेल, कडूपडवळ) काढा आणि सिद्धघृत दोन वेळा देतात. घरगुती वापर होताना तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे. 


Ref.Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120313/5478629246599291387.htm

बहुपयोगी वाळा लागवड

भारतामध्ये उत्तर प्रदेशात जंगलांमधून व तमिळनाडू, केरळ इ. राज्यांत वाळा लागवड करून तेलनिर्मिती केली जाते. या गवताची लागवड मृद, जल संधारणासाठी उत्कृष्ट समजली जाते. पडीक माळराने, नापिक जमिनी, जास्त धूप होणाऱ्या जमिनी इ. ठिकाणी लागवडीसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. या बहुवर्षायू, सुंदर दिसणाऱ्या गवताची मुळे काहीशी कंदवर्गीय असतात, त्यांची वाढ माती, हवामान यांच्या अनुकूलतेप्रमाणे 10-35 सें.मी.पर्यंत होते. हे गवत दोन मीटरपर्यंत वाढते. पाने अरुंद, चपटी, चकचकीत, तेलकट असतात. अनेक ताटे झुबक्‍याने एकत्र वाढतात व त्यामुळे या गवताचे बोंधे तयार होते. लागवडीनंतर झाडे एक-दोन वर्षांची झाल्यानंतर त्यांस पुष्पगुच्छ येतात. 

या बहुवर्षायू गवतास वाढीसाठी उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. 1000 ते 2000 मि.मी. पाऊस आणि 21 ते 43 अंश से. तापमानाच्या ठिकाणी, हलक्‍या ते मध्यम जमिनीत हे गवत चांगले वाढते. त्याचप्रमाणे 9.5 ते 10.5 सामू असलेल्या व भारी जमिनीत, मोकळ्या पडलेल्या, खार, चढ - उताराच्या, नदीकाठच्या, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीतही याची लागवड होऊ शकते. गवताची लागवड "स्लिप्स'पासून केली जाते. यासाठी गवताची ताटे वेगवेगळी केली जातात, त्याची वरील पाने तोडून 10 ते 20 सें.मी.ची स्लिप्स लागवडीसाठी तयार केली जातात. दोन - तीन ताटे बरोबरीने असतात, ती वेगळी करणे आवश्‍यक असते. लागवड फेब्रुवारीपर्यंत केली जाते. लागवडीसाठी सरी - वरंबे 60 सें.मी. अंतराने तयार करून सरीमध्ये 60 x 60 सें.मी. अंतराने ओळीने लागवड करावी. शेतात कुजलेले शेणखत प्रति हेक्‍टरी दहा बैलगाड्या टाकून मातीत मिसळावे. लागवडीपूर्वी शेत चांगले नांगरून तणे, काडीकचरा वेचून तयार करणे आवश्‍यक असते. पावसाळ्यानंतर लागवड करावयाची झाल्यास लागवडीनंतर लगेचच पाणी देणे आवश्‍यक असते. या गवताच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्‍यकता असते. वणवा, थंडी इ.साठी हे गवत कणखर मानले जाते. 

काढणी -
लागवडीनंतर 18 ते 24 महिन्यांनंतर वाळ्याची मुळे काढणीयोग्य होतात. मुळे हाताने अथवा नांगराने काढली जातात. काढलेल्या मुळांची माती, काडी-कचरा काढून टाकण्यासाठी पाण्यात स्वच्छ धुवावी. ताज्या मुळांमध्ये तेल कमी मिळत असल्याने मुळे वाळवूनच तेल काढण्यासाठी वापरली जातात. मुळे वाळविण्यापूर्वी त्यांचे लहान लहान तुकडे करणे आवश्‍यक असते. मुळांची काढणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते. हवामान व पीक व्यवस्थापनानुसार प्रति हेक्‍टरी 10 ते 50 क्विंटल मुळांचे उत्पादन मिळते. सरासरी प्रति हेक्‍टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळते. यामध्ये खुशीमोल, व्हेटीसेलीनॉल, युडेसॅमॉल, खुशीलॉल, खुशीन, खुशेर, खुशीऑल, व्हीटीव्हेरी हे रासायनिक घटक असतात. 

उपयोग -
पाण्याची वाफ (स्टीम डिस्टिलेशन) वापरून ताज्या किंवा वाळलेल्या मुळांपासून तेल काढले जाते. साठवलेल्या मुळांपासून चांगल्या प्रतीचे तेल मिळते, त्यामुळे काढणीनंतर चार ते सहा महिने मुळे साठवून ठेवणे आवश्‍यक असते. 

तेल ः अत्तरे, सौंदर्यप्रसाधने, उटणे, साबण आणि अन्य तेलांच्या निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. तेलामधून व्हीटीव्हेरॉल, व्हीटीव्हेरॉन इत्यादी द्रव्ये काढली जातात. तंबाखू, पान मसाला, शीतपेये यांना सुवासिक स्वाद देण्यासाठीही तेलाचा वापर होतो. 

पाने ः कोवळ्या पानांचा गुरांना चारा म्हणून आणि घोड्यांना बसण्यासाठी वापर केला जातो. झाडू, टोपल्या इ. वस्तू पानांपासून बनविल्या जातात. जास्त तापमान असलेल्या प्रदेशात पानांचा वापर कुलरमध्ये अथवा कर्टन तयार करून घरातील तापमान कमी करण्यासाठी केला जातो. लिखाणाचे किंवा प्रिंटिंग पेपर निर्मितीसाठीही पानांचा वापर होतो. 

जल-मृद्‌संधारणासाठी वनीकरण गरजेचे 
आपल्या परिसरातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालले आहे; तसेच झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाचा परिणाम वनसंपदेवर होताना दिसतो. वनांच्या कमी झालेल्या क्षेत्रामुळे ऋतुमानात बदल होत आहेत. जंगलांच्या घटलेल्या प्रमाणामुळे मातीची धूप झाली आहे, जलस्रोतांवर परिणाम झालेला आहे; माती, पाणी इ.वर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. एक सें.मी. मातीचा थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. खडकांची झीज होऊन विविध सूक्ष्मजीव, शेवाळ, नेचेवर्गीय, अपुष्प, पुष्पवर्गीय वनस्पतींच्या सहयोगाने माती तयार होते. जंगलाचे जमिनीवरील आवरण कमी झाल्याने पर्यावरणात असमतोल निर्माण झाला आहे. अन्नसाखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. रस्ते दुतर्फा, नद्याकाठ, शेते इ. ठिकाणी धुपणासाठी संवेदनशील आहेत. 
मातीच्या संवर्धनासाठी नैसर्गिक स्थिती आपण जर पाहिली तर पहिल्या पावसानंतर लगेचच गवत येते. या गवतामुळे हजारो टन मातीचे संवर्धन होते; परंतु बऱ्याचशा भूभागावर गवतही आढळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठे नुकसान होते. शक्‍यतो यासाठी प्रदेशनिष्ठ किंवा त्याच प्रदेशात मिळणाऱ्या प्रजातींचा वापर करणे आवश्‍यक आहे. परदेशातील प्रजाती वापरल्याने त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवर विपरीत परिणाम होतात, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. म्हणून वनस्पतिशास्त्राच्या आधाराने निवडक प्रजातींचीच लागवड करणे आवश्‍यक आहे. 

योग्य प्रजातींची निवड ः 
एकदल प्रवर्गातील गवत म्हणजेच तण यात काही वर्षायू आहेत, तर काही बहुवर्षायू. या गवताची लागवड बियांपासून, खोडांच्या किंवा मुळांच्या छाटांपासून केली जाते. गवतांचे मृद्‌ व जलसंधारणासाठीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 
कुश गवत ः हे गवत बहुवार्षिक असल्याने खोड ताठ आणि दांडगे असते. भुईसरपट आडवे जाणारे, अनेक खोडे या प्रजातीस असतात, त्यापासून अनेक शाखा येतात आणि आजूबाजूला नवांकुर येऊन नवीन झाडे मुख्य झाडाभोवती तयार होतात. कमी पाण्यावर येणारे हे गवत खोडाच्या किंवा मुळांच्या छाटाने लागवड करतात. 
मुंज ः हे गवत चांगले वाढते. खोड ताठ, जोरदार कांडे असणारे असते. या बहुवर्षायू गवताची लागवड बिया किंवा खोडाच्या छाटांपासून केली जाते. 
मारवेल ः या गवताची उंची 15 ते 90 सें.मी.पर्यंत वाढते. लागवड बियांपासून केली जाते. 
वाळा (खस) ः यास "व्हेटीव्हर' असेही म्हणतात. या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले मानले जाते. लागवड "स्लिप्स'पासून केली जाते. 
कुंदा ः हे गवत तीन फुटांपर्यंत वाढते. हे गवत बहुवर्षायू असून, या गवताला आडवे खोड असते. त्यापासून धुमारे निघतात आणि बियांपासून याची लागवड होऊ शकते. 
पवना ः सुमारे तीन फुटांपर्यंत वाढणाऱ्या या बहुवर्षायू गवताचे खोड मुळाजवळ जाड, भक्कम व गुळगुळीत असते. लागवड बियांपासून होते. 
शेंडा ः हे बहुवर्षायू गवत दोन फुटांपर्यंत वाढते. पवना गवतासारखे दिसणारे; मात्र खोड थोडे लवचिक असते. लागवड बियांपासून होते. 
मोशी ः डोंगर उतारावर 15 ते 50 सें.मी.पर्यंत वाढते. हे बहुवर्षायू गवत आहे. तामरट, दूर्वा, गवती चहा, सिझेनेला, जावा, बेर, कुशळी इ. गवतांचाही वापर करून मातीचे पावसाने होणारे नुकसान आपण टाळू शकतो. या गवताची लागवड बियाणे वापरून करावयाची झाल्यास भातासारखी धूळपेरणी मे महिन्यात करावी. 

पारंपरिक गवताबरोबरच गिन्नी, रोड्‌स, सिटारिया, पॅराग्रास इ. गवतांची लागवड मृद्‌संधारणाबरोबरच गुरांना चारा म्हणून केली जाते. नद्या, नाले, ओहोळ, रस्ते खचणे, ढासळणे इ.साठी बांबू फायदेशीर आहे. देशामध्ये बांबूच्या 140 प्रजाती आढळतात. यातील प्रामुख्याने आढळणाऱ्या आणि आपल्याकडे होऊ शकणाऱ्या बांबूंमध्ये कळक, मानवेल, चिवारी, मेस, कोंड्यामेस, मेसकाठी, पिवळाबांबू, बुद्धा बांबू इ.ची लागवड आपण नवीन येणारे फुटवे (कंद), बिया, खोडांचे छाट इ.पासून करू शकतो. 

गवताबरोबरच झुडपांचेही महत्त्व तेवढेच आहे. गवताच्या बरोबरीने झुडपांची लागवड केल्यास ती अधिक प्रभावी होऊन मृद्‌ व जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते. यासाठी करवंद, घायपात, निर्गुडी, अडुळसा, मेंदी, कडू मेंदी, चित्रक इ.ची लागवड आपण करू शकतो. गवत, झुडपे आणि झाडे यांच्या माध्यमातून मातीची धूप आपण थांबवू शकतो, यासाठी पूर्ण प्रजातींची निवड वनस्पती तज्ज्ञांच्या मदतीने करून घेणे आवश्‍यक असते. 

गवताची वैशिष्ट्ये ः 
गवत वर्षभर उपलब्ध होऊन वेगवेगळ्या हवामानांत गवताची वाढ होऊ शकते. जमिनीच्या वरच्या तसेच खालच्या थरात वाढ होत असल्याने माती धरून ठेवण्यास इतर वनस्पतींपेक्षा फारच मदत होऊ शकते. कमीत कमी पाण्यावर, कोणत्याही हवामानात तसेच जमिनीत गवताची वाढ चांगली होऊ शकते. फुटव्यांची संख्या खूप असते. लवकरात लवकर वाढ होते. गवताचा वाढलेला भाग जरी जनावराने खाल्ला तरी खालील भाग तसाच राहिल्याने पुढील गवताची वाढ चांगली व जोमाने होते, त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसून येते, त्यामुळे रानटी जनावरांसाठी वर्षभर खाद्य उपलब्ध होते. पर्यायाने रानटी जनावरांची वाढ चांगली होते. 


Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120325/5561109475309633307.htm

ग्रीन करिअर्स

नवसारी कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या ----ऍस्पी----- ऍग्रीबिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असणाऱ्या एमबीए ऍग्री-बिझनेस मॅनेजमेंट व एमएससी- आयसीटी इन ऍग्रिकल्चर या विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 2012-2014 या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी- संबंधित क्षेत्र वा माहिती तंत्रज्ञान विषयातील ज्या पदवीधरांना याच विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासह आपले करिअर कराचे असेल अशांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अवश्‍य विचार करावा. 

अभ्यासक्रम व आवश्‍यक शैक्षणिक पात्रता - एमबीए- ऍग्री बिझनेस या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी अर्जदारांनी कृषी वा संबंधित विषय अथवा ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट, बायोलॉजिकल सायन्सेस या विषयातील पदवी पात्रता कमीत कमी 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. 

एमएससी- आयसीटी इन ऍग्रिकल्चर - या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संगणक शास्त्र- संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान यासारख्या विषयातील पदवी कमीत कमी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. 

विशेष सूचना - पदवी-पात्रता परीक्षेच्या गुणांच्या टक्केवारीची अट अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातींच्या विद्यार्थी उमेदवारांसाठी पाच टक्‍क्‍यांनी शिथिलक्षम आहे. 

निवड प्रक्रिया - अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. 
निवड झालेल्या उमेदवारांना नवसारी कृषी विद्यापीठाच्या एमबीए- ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट अथवा एमएससी- आयसीटी ऍग्रिकल्चर या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 2012-2014 या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यात येईल. 

अर्ज व माहितीपत्रक - अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास नवसारी विद्यापीठात 1000 रु. रोखीने भरावेत किंवा 1100 रु.चा "नवसारी ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी- फंड अकांउट'च्या नावे असणारा व विनंती अर्जासह असणारा डिमांड ड्राफ्ट नवसारी विद्यापीठाला पाठवावा.
 
अधिक माहिती व तपशील - वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नवसारी विद्यापीठाच्या दूरध्वनी क्र. 02637-651437 वर संपर्क साधावा अथवा विद्यापीठाच्या www.nau.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख - विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्‍यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डीन- ऍस्पी ऍग्रीबिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, नवसारी कृषी विद्यापीठ- नवसारी (गुजरात) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2012 अशी आहे.


Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120626/5102261047594727576.htm

फायदेशीर अळिंबी उत्पादन तंत्र















 
अळिंबी ही विशिष्ट स्वाद व चवीसाठी फार पुरातन काळापासून सुपरिचित आहे. अळिंबीचा उपयोग प्राचीन काळापासून औषधीसाठी केला जातो. अन्नघटकांच्या पृथक्करणावरून अळिंबीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने व खनिजे असून भाजीपाल्यापेक्षा पौष्टिक असते, त्यामुळे युरोप व अमेरिकेत दररोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात अळिंबीचा वापर होऊ लागला आहे. 

महत्त्व अळिंबीचे 
अळिंबीतील उपलब्ध प्रथिनांमुळे या भाजीची चव ही मटणाच्या भाजीसारखी लागते; परंतु अळिंबी ही शाकाहारी आहे. पचनास सोपी, आहारात अतिशय सात्त्विक व पौष्टिक आहे. अळिंबीच्या प्रथिनांमध्ये लायसीन व ट्रिपटोफॅन ही महत्त्वाची अमायनो ऍसिड आहेत. तृणधान्यांत त्यांचा अभाव असल्याने अळिंबीचा वापर केल्यास हे आवश्‍यक अमायनो ऍसिड आपल्या आहारात येऊ शकतात. यात पिष्टमय पदार्थ नसतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना याचा आहार अतिशय उपयुक्त आहे. अळिंबीत प्रथिनांचे प्रमाण 2.7 ते 3.9 टक्के असून, हे भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत दुप्पट आहे. अळिंबीत शर्करायुक्त व स्निग्ध पदार्थांचे प्रमाण इतर भाजीपाला व डाळींपेक्षा फार कमी असल्याने शरीर काटक ठेवण्यास व वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे उत्तम अन्न आहे. 

ओळख 
अळिंबी ही वनस्पतीच्या राज्यातील बुरशीची एक जात आहे. इतर बुरशींप्रमाणे ती हरितद्रव्यविरहित असल्यामुळे ती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. अन्नासाठी तिला इतर सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. निसर्गामध्ये हा अन्नपुरवठा शेणखत, कंपोस्ट, कुजलेला काडीकचरा, पिकांचे अवशेष यामार्फत होतो. निसर्गात अनेक आकारांच्या व अनेक रंगाच्या अळिंबी आढळतात. यापैकी फारच थोड्या जाती खाण्यास योग्य आहेत. इतर सर्व जाती विषारी किंवा खाण्यास अयोग्य आहेत. खाण्यास योग्य जातींपैकी फक्त तीन ते चार जातींची व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यात येते. 
1) बटन अळिंबी 
2) धिंगरी अळिंबी 
3) भाताच्या काडावरील अळिंबी 
धिंगरी अळिंबी ही आपल्या हवामानाला योग्य आहे. तिच्या वाढीसाठी 22 ते 30 अंश से. तापमानाची आवश्‍यकता असते. आपणाकडे जून ते फेब्रुवारी या काळात असे तापमान असल्याने या जातीची लागवड करता येते. लागवडीसाठी कंपोस्ट, जमीन किंवा इतर कोणत्याही खास खताची आवश्‍यकता नसते. सर्वसामान्य माणसास धिंगरी अळिंबीची लागवड करणे सहज शक्‍य आहे. या अळिंबीच्या खूप जाती विकसित आहेत. पैकी राज्यात जास्त प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या जाती पुढीलप्रमाणे... 
1) प्ल्युरोट्‌स साजोर काजू 
2) प्ल्युरोट्‌स फ्लोरिडा 
3) प्ल्युरोट्‌स डवोस 
4) प्ल्युरोट्‌स प्लॅबीलॅट्‌स 
5) हिपसिझायगस अलमॅरीस 

लागवडीसाठी आवश्‍यक बाबी
लागवडीसाठी माध्यम -
 अळिंबी लागवडीसाठी तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असलेल्या वस्तू लागतात. व्यापारी तत्त्वावर अळिंबीची लागवड करण्यासाठी गव्हाचे काड किंवा भाताचे काड वापरले जाते. लागवडीच्या दृष्टीने पिकाची काढणी झाल्यास गव्हाचे काड किंवा भाताचे काड पावसात भिजू देऊ नये, ते सुरक्षित ठिकाणी साठवावे. 

जागेची निवड - अळिंबीची लागवड करण्यासाठी ............अन्न, वारा, पाऊस लागणार नाही, अशी विटांची किंवा साधी बांबूच्या तक्‍क्‍यांपासून तयार केलेली झोपडीसुद्धा वापरता येते. 

लागवडीसाठी आवश्‍यक वातावरण - लागवडीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी तापमान 22 ते 30 अंश से. व आर्द्रता 65 ते 75 टक्के असणे आवश्‍यक आहे. 
लागवडीसाठी साहित्य - चालू हंगामातील गव्हाचे किंवा भाताचे काड 
- 150 गेजच्या प्लॅस्टिक पिशव्या (35 x 55 सें.मी.) 
- अळिंबीचे बेड ठेवण्यासाठी लाकडी रॅक्‍स 
- अळिंबी स्पॉन 

लागवडीची पद्धत 
चालू हंगामातील पावसात न भिजलेले गव्हाचे काड लागवडीसाठी घ्यावे. गव्हाच्या काडाचे चार ते पाच सें.मी. लांबीचे तुकडे करावेत. गव्हाचे काड पाण्यात भिजवण्यासाठी प्रथम ते पोत्यात भरून पोते दहा तास पाण्यात भिजत ठेवावे. भाताचे काड असेल तर चार ते पाच तास भिजवावे. गव्हाच्या काडाचे पोते पाण्यातून काढून घेऊन पोत्यातील जास्तीचे पाणी निचऱ्याद्वारे काढून घ्यावे. हे भिजलेले गव्हाचे काड लागवडीसाठी वापरण्यापूर्वी निर्जंतुक करणे आवश्‍यक आहे. काड निर्जंतुक तीन पद्धतीद्वारे केले जाते. 

1) गरम पाण्याद्वारे, 2) वाफेद्वारे, 3) रसायनाद्वारे. 
काड निर्जंतुकीकरणासाठी कुठल्याही एका पद्धतीचा वापर करावा. गरम पाण्यातून काड निर्जंतुक करण्यासाठी काडाचे पोते 80 अंश से. तापमानाच्या गरम पाण्यात एक तास बुडवावे व नंतर ते पोते थंड होऊ देऊन त्यातील जादा पाणी काढून घ्यावे. वाफेद्वारे काड निर्जंतुक करण्यासाठी ऑटोक्‍लोव्हचा वापर करावा. रासायनिक पद्धतीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कार्बेन्डाझिम व फॉर्म्यालीनचा वापर करतात. रासायनिक पद्धतीद्वारे निर्जंतुकीकरणाची पद्धत सोपी व सहज करता येण्यासारखी आहे; परंतु या पद्धतीमध्ये शिफारशीप्रमाणे रसायनाचा वापर करावा. रासायनिक पद्धतीमध्ये 100 लिटर पाण्यात 7.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम व 50 मि.लि. फॉर्म्यालीन टाकून द्रावण तयार करावे. या द्रावणात काडाचे पोते 12 ते 14 तास भिजू घालावे. त्यानंतर पोते काढून यातून जादा पाणी निचऱ्याद्वारे काढावे व दुसऱ्या दिवशी बेड भरावेत. बेड भरण्यापूर्वी वापरावयाची प्लॅस्टिक पिशवी (150 गेज - 35 x 55 सें.मी.) दोन टक्के फॉर्म्यालीनच्या द्रावणात निर्जंतुक करून घ्यावी. अळिंबीचे बेड भरताना निर्जंतुक केलेल्या काडाचा थर प्लॅस्टिक पिशवीमध्ये दोन ते तीन इंच द्यावा व यावर स्पॉन बेड रिंग पद्धतीने टाकावे. यानंतर यावर परत दोन ते तीन इंच जाडीचा थर द्यावा व परत यावर अळिंबीच्या स्पॉनची रिंग करावी. अशा प्रकारे चार ते पाच थर अळिंबीच्या स्पॉनचे द्यावे. एका बॅगसाठी गव्हाच्या काडाच्या दोन टक्के अळिंबी स्पॉन वापरावा व एक टक्का डाळीचे पीठ वापरावे. मशरूम स्पॉन व डाळीचे पीठ एकत्र मिसळून वापरावे. पिशवी भरल्यानंतर दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे. या पिशवीला निर्जंतुक केलेल्या टाचणीने वा सुईने छिद्रे पाडावीत. पिशवी भरल्यानंतर पिशव्या खोलीत रॅकवर ठेवाव्यात. खोलीतील तापमान 22 ते 30 अंश से. व आर्द्रता 65 ते 75 टक्के राहील, यासाठी जरुरीप्रमाणे हवेत व जमिनीवर पाणी फवारावे. मशरूम बॅग भरून ठेवल्यानंतर 12 ते 14 दिवसांनंतर बॅगमध्ये अळिंबीची पांढरट वाढ दिसून येते. ही वाढ दिसल्यानंतर बेडची प्लॅस्टिक पिशवी काढून घ्यावी व बेड रॅकमध्ये तसाच ठेवावा. या बेडवर दुसऱ्या दिवसापासून सकाळ, दुपार व संध्याकाळ पाण्याची फवारणी करावी. बेडवरील प्लॅस्टिक पिशवी काढल्यानंतर चार ते पाच दिवसांत बेडवर कोंब दिसून येतात व नंतर तीन ते चार दिवसांत पूर्ण अळिंबी दिसून येते. 

काढणी 
अळिंबीचा पहिला बहर येण्यासाठी 24 ते 25 दिवस लागतात. अळिंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी छाटणी करावी. काढणीअगोदर एक दिवस पाणी बंद करावे व काढणी करून बेडवरील पातळ थर खरडून काढावा व नंतर बेडवर सकाळ - संध्याकाळी पाणी फवारावे. पहिल्या काढणीनंतर आठ ते दहा दिवसांनी दुसरी काढणी सुरू होते. दुसरी काढणी झाल्यावर आठ ते दहा दिवसांनी तिसरी मशरूमची काढणी येते. अशा प्रकारे 40 ते 45 दिवसांत मशरूमची काढणी तीन वेळेस होते व अशा प्रकारे भरलेल्या एका बेडपासून एक ते 1.25 किलो ओली अळिंबी मिळते. काढलेली 
अळिंबी स्वच्छ करून 100 ग्रॅम, 200 ग्रॅम वजन करून छिद्रे असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांत भरून ती विक्रीसाठी पाठवावी. 

असे तयार होतात विविध खाद्यपदार्थ  
धिंगरी अळिंबी रेफ्रिजिरेटरमध्ये तीन ते चार दिवस चांगल्या स्थितीत राहू शकते. उन्हात किंवा ड्रायरमध्ये वाळवून हवाबंद पिशवीत ठेवता येते. वाळल्यामुळे वाळलेली अळिंबी खाण्यासाठी वापरताना कोमट पाण्यात 15 मिनिटे भिजत ठेवावी. भिजल्यानंतर वजनात पाच ते सहा पट वाढ होते. यापासून पुलाव, सूप, करी, भजी, ऑम्लेट इ. खाद्यपदार्थ तयार करता येतात. 

संपर्क -7350013147
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, जालना येथे विषय विशेषज्ञ आहेत.)
 


Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120505/5044815957409018415.htm