Saturday, December 24, 2011

भाज्या, फळे निर्जलीकरणासाठी "बायोमास फायर्ड ड्रायर' विकसित

नागालॅंडमध्ये फळे आणि भाज्यांचे उत्पादन वाढत आहे. हा शेतीमाल नाशिवंत असल्याने त्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी निर्जलीकरणाची आवश्‍यकता असते. निर्जलीकरण करण्यासाठी आवश्‍यक ड्रायर बाजारात उपलब्ध आहेत; मात्र त्यासाठी विजेची आवश्‍यकता आहे. नागालॅंडमध्ये डोंगराळ प्रदेशामुळे खेड्यापाड्यांत अद्यापही विजेची उपलब्धता हाच मोठा प्रश्‍न आहे. यावर नागालॅंडच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने उपाय शोधला आहे, त्यांनी टाकाऊ घटकांचा ऊर्जेसाठी वापर करणारा ड्रायर विकसित केला आहे. नुकतेच त्याचे प्रात्यक्षिक फेक जिल्ह्यातील साक्रबा या गावामध्ये करण्यात आले. 

ताज्या शेतीमालामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे भाज्या, फळे लवकर खराब होतात. शेतीमाल दूरच्या बाजारपेठेत पाठवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे निर्जलीकरणाची प्रक्रिया केल्यास शेतीमाल अनेक दिवसांपर्यंत टिकू शकतो, तसेच वजनही कमी होत असल्याने वाहतुकीच्या दृष्टीनेही ते सोयीचे ठरते. प्रक्रिया केंद्रावर महागड्या ड्रायरचा वापर केला जातो; मात्र हे ड्रायर विजेवर चालणारे असून, त्यांना मोठ्या प्रमाणात वीज लागते. ग्रामीण भागात विजेची कमतरता असल्याने अनेक अडचणी येतात. या गोष्टीचा विचार करून नागालॅंडच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने लाकडे आणि टाकाऊ घटकांचा इंधन म्हणून वापर करता येईल, असा ड्रायर विकसित केला आहे. हा विजेवर चालणाऱ्या ड्रायरइतकाच कार्यक्षम असून, कमी किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रक्रिया उद्योगांना चालना मिळू शकते. हा ड्रायर कोहिमा येथील टर्बो इंजिनिअरिंग यांच्याकडून बनवून घेण्यात आला आहे. त्याची प्रात्यक्षिक चाचणी नुकतीच साक्रबा येथे घेण्यात आली. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111215/4643771396134225087.htm

बिनबियांची मिरची विकसित

इंग्लंडमधील मेलरो सॅलेडस्‌ आणि सिंजेंटा बीज विकास प्रकल्पाच्या 15 वर्षांच्या एकत्रित संशोधनानंतर बिनबियांची मिरची विकसित केल्याचा दावा कंपनीने केला आहे. नैसर्गिक पैदास कार्यक्रमाच्या साह्याने पूर्णपणे बिनबियांची मिरची विकसित केली आहे. तिचे नाव "ऍजेलो' असे ठेवण्यात आले आहे. तिची चव इतर जातीच्या ढोबळी मिरचीपेक्षा 25 टक्के ब्रिक्‍सने गोड आहे. 

याबाबत बोलताना कंपनीचे प्रवक्‍ता ल्युसिनो फोरामोंटी यांनी सांगितले, की ऍजेलो मिरची विकसित करण्यासाठी नैसर्गिक पैदास पद्धतींचा वापर केला आहे. ही मिरची भाजीसाठी उत्तम असून, ती कच्च्या कोशिंबिरीसाठी देखील चांगली आहे. चव काहीशी गोड असल्याने तिचा वापर लहान मुलांच्या भाज्यांमध्ये करता येऊ शकतो.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111218/5025525602753487123.htm

सफरचंदाचा कुरकुरीतपणा, ताजेपणा मोजणारे उपकरण विकसित

प्रक्रिया उद्योगामध्ये वापरला जाणारा कच्चा माल चांगला आणि ताजा असल्यास तयार होणारे पदार्थ हे चांगल्या दर्जाचे होतात, त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये फळांची गोडी, त्यांचा ताजेपणा, कुरकुरीतपणा तपासण्यासाठी खास माणसांची नियुक्ती "बायटर' या पदावर केली जाते. या व्यक्ती फळाची चव घेऊन, त्यावरून त्याचे मूल्यमापन करतात. तरीही त्यामध्ये मानवी स्वभाव, सवयी यांच्यामुळे काही प्रमाणात वेगवेगळे निष्कर्ष येण्याचा धोका असतो. ही त्रुटी कमी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधकांनी संगणकाचा वापर करून "पेनिट्रोमीटर' विकसित केला आहे, त्यामुळे "ऍपल बायटर'च्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणणे शक्‍य होणार आहे. 

सफरचंद फळाचा टणकपणा, घट्टपणा आणि पक्वता तपासण्यासाठी फळ प्रक्रिया उद्योगात "स्टॅण्डर्ड पेनिट्रोमीटर' आणि "ऍकॉस्टिक रेझोनन्स टेक्‍नॉलॉजी' या उपकरणांचा वापर केला जातो. याच उपकरणाची "मोहर डीजी टेस्ट' ही पुढची आवृत्ती असून, यात फळांचा कुरकुरीतपणाही तपासला जातो. हे उपकरण संगणकाशी जोडलेले असल्याने त्याचे मोजमाप नोंदवणे सोपे जाते. याबाबत माहिती देताना संशोधक केट इव्हान यांनी सांगितले, की सफरचंदाचा घट्टपणा, कुरकुरीतपणा मोजण्यासाठी मोहर डीजी टेस्ट या साधनाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. घट्टपणासाठी आवश्‍यक सर्व घटकांतील संबंधांची माहिती यावर उपलब्ध होऊ शकते, तसेच सेन्सरच्या साह्याने मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण केले जाते, त्यामुळे मिळालेल्या माहितीची अचूकता अधिक असते. या आधी वापरण्यात येणाऱ्या ऍकॉस्टिक रेझोनन्स किंवा स्टॅण्डर्ड पेनिट्रोमीटर या उपकरणापेक्षा मोहर डीजी टेस्टमधून अधिक माहिती मिळते. 

या उपकरणाच्या चाचण्या 16 जातीच्या सफरचंदांवर घेण्यात आल्या. त्या निष्कर्षांशी "ऍपल बायटर'च्या गटाने दिलेल्या निष्कर्षांची तुलना केली असता, दोन्ही निष्कर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य आढळून आले आहे. या उपकरणाद्वारे फळांची चव तपासता येत नाही. या संशोधनाचा वापर अन्य फळांसाठी करण्याबाबत संशोधन सुरू आहे. हे संशोधन अमेरिकन सोसायटीच्या "हॉर्ट टेक्‍नॉलॉजी इलेक्‍ट्रॉनिक' या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहे.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111221/5030859588172889179.htm

रोपावस्थेतच पपईतील नर, मादी झाडे ओळखणे शक्‍य

पपईमध्ये नर आणि मादी रोपे अशी दोन प्रकारची रोपे असतात. परागीभवन चांगले होण्यासाठी नर आणि मादी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असावी लागते, अन्यथा उत्पादनावर परिणाम होतो. मात्र पपईची रोपे लहान असताना त्यातील नर आणि मादी रोप ओळखता येत नाही. आगामी नुकसान टाळण्यासाठी एका खड्ड्यात तीन रोपे लावली जातात. तरीही अशा लागवडीतून 50 टक्‍क्‍यांपर्यंत नर झाडे येण्याची शक्‍यता असते. नर झाडांपासून उत्पादन मिळत नसल्याने नुकसान होते. हे नुकसान टाळणे आता शक्‍य होणार आहे. पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी "डीएनए' मार्करद्वारे रोपावस्थेतच नर वा मादी रोप ओळखण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. त्याद्वारे पपई लागवडीवेळी योग्य प्रमाणात मादी रोपे लावता येणे शक्‍य होणार आहे. यामुळे परागीभवन योग्य प्रकारे झाल्याने फळधारणा अधिक होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल. 

शेतामध्ये पपईची लागवड ही बिया टोकून किंवा रोपे लावून केली जाते. एका खड्ड्यात दोन वा तीन रोपे किंवा बिया टोकाव्या लागतात. या परिस्थितीत खड्ड्यात उगवून आलेल्या किंवा लावलेल्या रोपांपैकी तीनही झाडे नर वा मादीही असू शकतात. मात्र रोपे सात ते आठ महिन्यांची होईपर्यंत ते ओळखता येत नाही. त्यामुळे त्यात अनेक वेळा 50 टक्‍क्‍यांपर्यंत नर झाडे उगवून आलेली दिसतात. शास्त्रीयदृष्ट्या पपई शेतामध्ये परागीभवन होण्यासाठी फक्‍त पाच टक्के नर झाडांची आवश्‍यकता असते. त्यामुळे आवश्‍यक तेवढी नर झाडे ठेवून बाकी उपटून टाकावी लागतात; परंतु लागवडीपासून या झाडांना केलेला खते, कीडनाशकांचा खर्च वाया जातो. हे नुकसान टाळणे आता शक्‍य होणार आहे. 

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. विद्या गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. संशोधनात "पीसीआर' तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या या मॉलिक्‍यूलर मार्करमुळे रोपावस्थेत पपईतील नर वा मादी झाड ओळखता येते. तसेच नर झाडे ओळखण्यासाठी "एससीएआर' मार्करचा वापर करता येतो. या संशोधनामुळे रोपातील नर मादीची झाडे ओळखणे अतिशय सोपे झाले आहे. त्यामुळे अनावश्‍यक नर रोपांवर होणारा खत, कीडनाशकाचा खर्च कमी करणे शक्‍य आहे. या संशोधनाचा फायदा पपई उत्पादक, बियाणे कंपन्या, पेपेन उत्पादक आणि रोपवाटिकाधारकांना होणार आहे. पपई या पिकाबरोबरच जायफळ, पिस्ता, किवी, जोजोबा या पिकांच्या लागवडीतही हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते. या पिकांतही पपईसारखेच नर झाडांच्या तुलनेत मादी झाडे अधिक असणे आवश्‍यक असते. या पिकातही या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन मिळवणे शक्‍य होईल. 

गरज संशोधनाच्या विस्ताराची - 
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत शेतीशी निगडित अनेक प्रकारचे संशोधन होत असते. त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होण्यासाठी त्याच्या विस्ताराचे काम होणे आवश्‍यक आहे. पपईसंदर्भातील या संशोधनाचा वापर शेतकरी स्वतः थेट आपल्या शेतात करू शकत नाहीत. परंतु तांत्रिक सल्लागारांच्या मदतीने ते शक्‍य आहे. राज्याचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे किंवा संशोधन संस्थांच्या माध्यमातून तांत्रिक लोकांच्या मदतीने शेतकऱ्यांना हे संशोधन विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111221/5281702528747139989.htm

फवारण्या कमी ठेवून मित्रकीटक वाचवा

पांढरी माशीचा प्रादुर्भाव अनेक पिकांत आढळून येतो. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध कीडनाशकांची फवारणी करतात. त्यातही अमेरिकेतील कापूस उत्पादक शेतकरी व्यापक क्षमतेच्या कीडनाशकाचा वापर अधिक प्रमाणात करत असल्याने शेतातील मित्रकीटकांची संख्या कमी होते. त्यामुळे कीडनाशकांवर जास्तीत जास्त अवलंबून राहावे लागते. यासाठी अमेरिकेतील कृषी संशोधन संस्थेच्या संशोधकांनी हे कीडनाशकांवरील अवलंबन कमी करण्यासाठी अभ्यास प्रकल्प राबवला होता. नैसर्गिक पद्धतीने पांढरी माशीचे नियंत्रण करण्यासंदर्भातील या संशोधनाचे निष्कर्ष "ऍग्रिकल्चरल रिसर्च मॅगझीन'च्या नोव्हेंबर - डिसेंबरच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहेत. 

अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी पांढरी माशीसाठी सर्वसाधारणपणे व्यापक क्षमतेच्या कीडनाशकाची फवारणी करतात, त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होते, त्याचबरोबर मित्रकीटकांचीही मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे पांढरी माशीचे नियंत्रण करण्यासाठी योग्य कीडनाशकाची वेळीच फवारणी करावी. वारंवार फवारण्या केल्यामुळे मित्रकीटकांच्या संख्येत घट होते. हे टाळण्यासाठी सातत्याने व्यापक क्षमतेच्या कीडनाशकांच्या फवारण्या टाळाव्यात, असे मारीकोपा येथील संशोधन संचालक नारान्जो यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा संशोधन प्रकल्प राबवण्यात आला होता. 

...असे आहे संशोधन 
प्रकल्पाच्या तीन प्रक्षेत्रापैकी एका प्रक्षेत्रावर पांढरी माशीसाठी विशेष कीडनाशके, दुसऱ्या प्रक्षेत्रावर व्यापक क्षमतेची कीडनाशके यांच्या फवारण्या करण्यात आल्या. तिसऱ्या प्रक्षेत्रावर कोणतीही फवारणी केली नाही. त्यात दोन्ही कीडनाशकांच्या फवारण्यांनंतर सुरवातीला पांढरी माशी आटोक्‍यात येत होती; मात्र व्यापक क्षमतेच्या कीडनाशकांच्या प्रक्षेत्रावर वारंवार फवारणी करावी लागत असल्याचे आढळले आहे. त्या तुलनेत विशेष पांढरी माशीसाठी फवारणीच्या प्रक्षेत्रात कमी फवारण्या कराव्या लागतात. त्या प्रक्षेत्रामध्ये मित्रकीटकांची संख्या वाढल्याचे आढळून आले आहे. या मित्रकीटकांमुळे पांढऱ्या माशीचे जैविक पद्धतीने नियंत्रण करणे शक्‍य होते. फवारण्यांची संख्याही त्यामुळे कमी राहते. तसेच, संशोधक नारान्जो आणि एल्सवर्थ यांनी पांढरी माशीचे दुसऱ्या पिकांपासून कपाशीकडे वळण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले. ऍरिझोनामध्ये जुलै महिन्यामध्ये कॉन्टालूप पिकांच्या काढणीनंतर कपाशी पिकावर पांढरी माशीचे प्रमाण वाढत असल्याचे आढळले होते. त्या कालावधीत पांढरी माशीसाठी असणाऱ्या विशेष कीडनाशकाची एक फवारणी केल्यास पांढऱ्या माशीपासून पिकांचा बचाव करणे शक्‍य होते. फवारण्याची संख्या कमी राहिल्याने मित्रकीटकांची संख्या वाढते. त्यातून जैविक पद्धतीने अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकते. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111221/5514386808276223694.htm

वनस्पतीतील शर्करेच्या वहनाचे गूढ उलगडले

कोणताही अवयव असत नाही. मग वनस्पतीमध्ये एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत शर्करेचे वहन कशा प्रकारे होते, याबाबत अमेरिकेतील स्टॅनफोर्ड येथील कार्नेजी संस्थेमध्ये संशोधन करण्यात येत आहे. प्रकाश संश्‍लेषणाच्या प्रक्रियेने तयार होणारी शर्करा वनस्पतीच्या फूल, फळे व अन्य घटकांना पाठवले जाते. मात्र ही वहनाची प्रक्रिया कशा प्रकारे घडते, यावर वोल्फ फ्रॉमर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाश टाकला आहे. हे संशोधन "सायन्स एक्‍स्प्रेस' या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहे. 

वनस्पतीमध्ये अन्नद्रव्याच्या वहनाचा उलगडा करण्यासाठी कार्नेजी संस्थेमध्ये गेल्या वीस वर्षांपासून संशोधन केले जात आहे. वीस वर्षांपूर्वी फ्रॉमर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वहनासाठी कार्य करणारा एक महत्त्वाचा घटक मिळून आला होता. वनस्पतीच्या शर्करा वाहून नेण्यासाठी असलेल्या शिरेमध्ये फ्लोयम (phloem) नावाचा घटक आढळतो. तो शर्करेचे वहन करण्यात मदत करतो. या फ्लोयममध्ये शर्करा कशी येते, यावर अधिक संशोधन करण्यात आले. त्यात प्रकाशसंश्‍लेषण क्रियेने विकसित केलेली शर्करा अन्य भागांना पाठविण्यासाठी पानांच्या पेशीभित्तिकेत कार्यरत असणाऱ्या प्रथिनाला ओळखण्यात यश मिळाले आहे. या पंप यंत्रणेला संशोधक "मॉलेक्‍युअर पंप' असे नाव दिले आहे. 

या संशोधनाबाबत बोलताना फ्रॉमर म्हणाले, की शर्करा वहनातील मुख्य वाहक घटकाची माहिती झाल्याने मॉलेक्‍युअर पंपाची कार्यपद्धती समजून आली आहे. वनस्पतीच्या आपल्याला पाहिजे त्या भागाकडे शर्करेचे वहन करून अन्नधान्याचे, फळांचे उत्पादन वाढवणे शक्‍य होणार आहे. याचा उपयोग भविष्यात पिकांच्या उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे. 

...असे होतील संशोधनाचे भविष्यात फायदे 
- अन्नधान्याच्या उत्पादनवाढीसाठी मदत मिळणार आहे. 
- या संशोधनामुळे रोग व किडीच्या प्रादुर्भावाविषयी नवी दृष्टिकोनातून विचार करणे आवश्‍यक होणार आहे. या शर्करेच्या गरजेतून पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत असतो. 
- मानवामध्ये या प्रथिनाच्या योग्य वापरातून स्थौल्य, ह्रद्य रोग आणि मधुमेहासारख्या अनेक रोगांवर उपाय शोधण्यास मदत मिळणार आहे.


ताज्या लिंबू रसाचा स्प्रे

भाज्या आणि कोशिंबिरीमध्ये लिंबाच्या किंवा संत्र्याच्या रसाचा वापर केला जातो. तो प्रामुख्याने पिळून किंवा त्याचा रस काढून एकत्रितपणे बाटलीमध्ये भरला जातो. यामध्ये बराच वेळ खर्च होतो. तसेच पदार्थामध्ये लिंबाच्या रसाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकतो. जाम किर्की या कंपनीने नवे तंत्र विकसित केले असून, त्याचा वापर केल्यास ताज्या फळांचा रस सरळ पदार्थामध्ये टाकता येणे शक्‍य होणार आहे. 

लिंबू अथवा रसाळ फळापासून सरळ पदार्थामध्ये रस वापरता येण्याची कल्पनाच खूप चांगली आहे. या तंत्रामध्ये दाते असलेले टोकदार स्क्रू वजा रॉड असतो. तो फळांच्या आतमध्ये खोचायचा आणि त्याच्या वरील बाजूस असलेल्या स्प्रेमधून फवाऱ्यांच्या स्वरूपामध्ये रस बाहेर टाकला जातो. सध्या हे तंत्रज्ञान केवळ लिंबूवर्गीय फळांच्या रसासाठी विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी कंपनीने अर्ज केलेला आहे.


Ref. : http://www.agrowon.com/Agrowon/20111223/4831481091074640599.htm

क्षार पाण्यापासून बचाव करणारे यंत्र

पुणे - एसव्हीके कृषी नेचर केअर या कंपनीने इलेक्‍ट्रो-मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर बाजारात आणले आहे. या यंत्राचे वैशिष्ट्य सांगताना कंपनीचे संचालक विलास बगाटे यांनी सांगितले, की गार्ड-नीर वॉटर कंडिशनर या यंत्रातील कॅटेलिक तंत्रज्ञानाने पाण्यातील क्षारांचा संयोग होऊ न देण्याचा कालावधी 200 ते 225 तासांपर्यंतचा आहे. आमची कंपनी हे तंत्रज्ञान विकसित करणारी जगातील एकमेव कंपनी आहे. म्हैसपालन, कुक्कुटपालन उद्योगांमध्ये पाणी शुद्धतेसाठी या यंत्राचा वापर फायदेशीर आहे. या यंत्रामुळे पीक उत्पादनात 20 ते 25 टक्केपर्यंत वाढ होते, 30 ते 40 टक्केपर्यंत औषधांची बचत होते.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111117/5741951274910965629.htm

लागवड ऍस्टरची....

ऍस्टरमधील विविध प्रकार, पाकळ्यांची रचना आणि रंग, तसेच फुलांचा टिकाऊपणा या गुणधर्मामुळे या फुलाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. इतर फुलझाडांच्या तुलनेने ऍस्टरची लागवड सोपी, कमी खर्चाची असते. शिवाय फुलांची उपलब्धता लागवडीपासून थोड्याच दिवसांत होते, त्यामुळे कमी कालावधीत चांगले उत्पन्न या फुलांपासून मिळू शकते. 

ऍस्टर पिकास फार कडक थंडी मानवत नाही, तसेच कडक ऊनही मानवत नाही. खानदेश, विदर्भातील उन्हाळ्याचा काळ आणि कोकणपट्टीत पावसाळ्याचा काळ वगळला तर राज्यात वर्षभर लागवड करता येते. लागवडीचे नियोजन करताना लागवडीचा हंगाम, मोजक्‍या जातींची निवड, लागवडीचे क्षेत्र, पाण्याची उपलब्धता या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. उपलब्ध जमीन आणि पाणीपुरवठा याच बरोबर किती काळ बाजारपेठेत पुरवठा करण्यात येईल या बाबींवर भर द्यावा. लागवड करताना सगळे क्षेत्र एकाच वेळी न लावता तीन अगर चार टप्प्यांत लावावे, म्हणजे फुले अधिक काळ बाजारात पाठविता येतील. मध्यम, उत्तम पाण्याचा निचरा होणारी आणि सेंद्रिय खतयुक्त जमीन या फुलपिकास आवश्‍यक असते. वरकस, हलक्‍या जमिनी तसेच चुनखडीयुक्त जमिनीत याची लागवड करू नये. 

प्रकार आणि जाती ः 
ऍस्टरमध्ये फुलांच्या आकारावरून, पाकळ्यांच्या रचनेवरून, दांड्याच्या लांबीनुसार आणि कालावधीनुसार अनेक प्रकार आणि जाती आढळतात. 

रामकाठी प्रकार ः 
या प्रकारात गुलाबी, पांढरा व जांभळा अशा रंगांची फुले येणाऱ्या जाती आहेत. यात फांद्यांची संख्या कमी असते. झाडे फारशी न पसरता उंच वाढतात. 

गरवा प्रकार ः 

यात विविध रंगांची फुले येणाऱ्या जाती आहेत. पिकांची वाढ उंच आणि पसरट होते. पीक तयार होऊन हंगाम संपण्यास 150 दिवसांचा कालावधी लागतो. 

निमगरवा प्रकार ः 

या प्रकारातील जातींची वाढ मध्यम स्वरूपाची 45 सें.मी. पासून 60 सें.मी.पर्यंत उंच वाढतात. फुलांचा हंगाम 100 ते 120 दिवसांत संपतो. 
पावडर पफ ः भरगच्च फुले निळ्या रंगाची आणि मोठ्या आकाराची असतात. 
आट्रीम फ्लम ः आकर्षक निळ्या रंगाची आणि मोठ्या आकाराची फुले असतात. 

जाती ः 
1) फुले गणेश व्हाइट ः ही जात लांब दांड्याची फुले मिळण्यासाठी उपयुक्त असून, फुले शुभ्र पांढऱ्या रंगाची असतात. हंगाम चार ते पाच महिन्यांचा असतो. फुलांचे चांगले उत्पादन मिळते. फुलदाणीमध्ये जास्त काळ फुले टिकतात. 
2) फुले गणेश पिंक ः फुलावर लवकर येणारी जात असून, निमपसरी, आकर्षक गुलाबी रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो. 
3) फुले गणेश व्हायलेट ः ही जात निमपसरी, फुलावर लवकर येणारी आणि गडद जांभळ्या रंगाची फुले मिळतात. हंगाम चार ते पाच महिने असतो. 
4) गणेश पर्पल ः फुले फिक्कट जांभळ्या रंगाची असतात. फुलांचे चांगले उत्पादन मिळते. 

लागवडीपूर्वी जमिनीची दोन वेळा खोल नांगरट करावी. धसकटे व हरळीच्या काशा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. हेक्‍टरी 12 टन शेणखत चांगले जमिनीत मिसळून घ्यावे. लागवडीपूर्वी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. रासायनिक खतांची मात्रा माती परीक्षणानुसार द्यावी. नंतर 60 सें. मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. ऍस्टरची लागवड 60 x 30 सें. मी. किंवा 45 x 30 सें.मी. 45 x 45 सें.मी. अंतरावर करतात. सरी-वरंबा पद्धतीने लागवड करताना वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी. लागवडीपूर्वी रोपांची मुळे शिफारशीत बुरशीनाशकांच्या द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपांची लागवड सायंकाळी करावी. लागवडीनंतर पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. 

लागवडीनंतर दहा दिवसांनी पाच किलो ऍझोटोबॅक्‍टर किंवा ऍझोस्पिरीलम 50 किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. अशाच प्रकारे दहा किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक आणि पाच किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी 50 किलो शेणखतात मिसळून वेगवेगळे ढीग करून आठवडाभर झाकून ठेवावेत. एक आठवड्यानंतर तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्‍टर क्षेत्रातील पिकाला द्यावे. गरजेनुसार खुरपणी करावी. त्यामुळे रोपांच्या वाढीला तणांचा त्रास होणार नाही. लागवडीनंतर चार ते पाच आठवड्यांनी हेक्‍टरी 50 किलो नत्राचा हप्ता द्यावा. ऍस्टर पिकाच्या मुळ्या जास्त खोलवर जात नसल्यामुळे लागवड केलेले वरंबे नेहमी वाफसा अवस्थेत राहतील याची काळजी घेणे जरुरीचे आहे. साधारणपणे ऍस्टर पिकास आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे, ऍस्टर पिकास कळ्या येऊ लागल्यानंतर फुले येईपर्यंत पाण्याचा ताण देऊ नये. अन्यथा, फुलांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. साधारणपणे जातीनुसार अडीच ते चार महिन्यांत फुले येतात. फुलांची तोडणी दोन ते तीन दिवसांच्या अंतराने करावी. पूर्ण वाढ झालेली आणि उमललेली फुले 10 ते 20 सें.मी. दांड्यासह कापून घ्यावीत. बाजारपेठेच्या मागणीनुसार जुडी करून विक्रीसाठी पाठवावीत. 

संपर्क ः 020 - 25693750 
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेश खिंड, पुणे


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111225/5158998908432059131.htm

"एमपीएससी'त कृषी विषयाला प्राधान्य

नागपूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. आता 34 पैकी फक्त चार विषय ऐच्छिक ठेवण्यात आले आहेत. या चारही विषयांचा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा राहणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्कोअरिंगसाठी कृषिविषयक प्रश्‍नांना अधिकाधिक प्राधान्य द्यावे अशी विनंती आयोगाला करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमातून कृषिशास्त्र आणि फलोत्पादनशास्त्र हे विषय वगळण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची मुले तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याची लक्षवेधी सतीश चव्हाण यांनी मांडली होती. एक संपूर्ण पेपर कृषी विषयावरचा कायम ठेवावा अशी मागणी त्यांनी केली. डॉ. दीपक सावंत यांनी हा विषय स्कोअरिंगचा असल्याने तो कायम ठेवावा अशी सूचना केली तर भाई जगताप यांनी प्रश्‍न फक्त स्कोअरिंगचा नाही, तर कृषी हा भारताचा गाभा असल्याचे सांगितले. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले. "एमपीएससी'च्या अभ्यासक्रमात एकूण 34 ऐच्छिक विषय होते. प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ, पेपर तपासणीस मिळण्यास अडचणी येत होत्या. यामुळे काही महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यात कायदा, इतिहास, भूगोल, अर्थकारण व विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांचा समावेश करण्यात आला. याशिवाय परीक्षा पद्धतीतसुद्धा बदल करण्यात आला आहे. यानुसार मराठी आणि इंग्रजीचा शंभर गुणांचा पेपर राहील, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे दीडशे गुणांचे चार पेपर अशी एकूण परीक्षा आठशे गुणांची राहील तर मुलाखत शंभर गुणांची राहणार आहे. काही विषयांमध्ये स्कोअरिंग करता येत नाही. यामुळे सर्वच विषयांना समान दर्जा देण्यात आला आहे. शेवटी सर्वच विषय महत्त्वाचे आहेत. आता ग्रामीण भागातील शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी इंजिनिअर्स होत आहेत. विज्ञान शाखेत पदव्या घेत आहे. नव्या पद्धतीमुळे सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111224/4615877317869727051.htm

सोलापूर जिल्ह्यात चारा उत्पादनासाठी 98 गावे निश्‍चित

सोलापूर -चाराटंचाईच्या प्रश्‍नावर उपाय म्हणून चारा उत्पादन घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी सात तालुक्‍यांतील 98 गावांची निवड करण्यात आली आहे. यंदा पडलेल्या कमी पावसामुळे आगामी काळात टंचाईसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नुकतेच माढा तालुक्‍यातील भीमानगर येथे सांगोला व मंगळवेढा तालुक्‍यांतील टंचाई निवारणार्थ लोकप्रतिनिधी व प्रशासनाची बैठक घेतली होती. यंदा पाऊसमान कमी असून, येत्या जुलैपर्यंत पाऊस पडणार नसल्याचे गृहित धरून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी बैठकीत नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आता जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत पाचशे हेक्‍टरवर चारा उत्पादन करण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने याबाबत तयारी सुरू केली आहे. 

दक्षिण सोलापूर, मोहोळ, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माढा या सात तालुक्‍यांतील 98 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातून पाचशे हेक्‍टरवर चारा उत्पादन केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर चारा उपलब्ध केला जाणार आहे. त्यांना जिल्हा परिषदेकडून बियाणे व खते तसेच सिंचन विभागाकडून पाणी उपलब्ध केले जाणार असून, प्रति टनाला तीन हजार रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. चारा उत्पादन झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी गरजूंना जनावरांसाठी हा चारा उपलब्ध करून द्यावयाचा आहे. हा चारा गरजू शेतकऱ्यांनी कसा विकत घ्यावयाचा, याचे दर अद्याप निश्‍चित नाहीत. तर पन्नास टक्‍के संबंधित शेतकरी व पन्नास टक्‍के शासन अनुदान असे नियोजन आहे. परंतु केंद्रीय कृषिमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांचा हिस्सा पन्नास टक्‍क्‍यांऐवजी पंचवीस टक्‍के करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे हा निर्णय होणेही अपेक्षित आहे.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111220/5613273486469600026.htm

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत चारा उत्पादनासाठी विशेष कार्यक्रम

कोल्हापूर - पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत जनावरांसाठी चारा उत्पादनाचा विशेष कार्यक्रम पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या कामासाठी दहा कोटी अनुदान मिळाले आहेत. शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी तीन हजार रुपये अनुदान देऊन त्यांच्याकडून चारा उत्पादन करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला असून, यासंदर्भातील कार्यशाळा पुढील महिन्यात घेण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. 

विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर श्री. देशमुख गुरुवारी (ता.22) प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, परिवीक्षाधीन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, सौ. नीलिमा धायगुडे आदी उपस्थित होते. 
श्री. देशमुख म्हणाले, ""मार्च, एप्रिल महिन्यांत उद्‌भवणाऱ्या संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या पाचही जिल्ह्यांत 

शेतकऱ्यांकडून अनुदान तत्त्वावर चाऱ्याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. प्रति हेक्‍टर तीन हजार अनुदानावर किमान 20 प्रकल्पातून पाच लाख टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या फंडातून बियाण्यांसाठी अनुदान दिले जाईल. 15 जानेवारी रोजी चारा लागवड करून मार्च किंवा एप्रिलमध्ये तो उपलब्ध होईल असे नियोजन आहे. सांगली, सातारा जिल्ह्यात चारा डेपो सुरू करण्यात येतील.'' 

ते म्हणाले, ""सर्व शिक्षा अभियानातून ग्रामीण भागातील शाळांत भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या, पण गुणवत्तेत वाढ झाली का याविषयी चिंता वाटावा अशी स्थिती आहे. म्हणूनच प्राथमिक शिक्षणाच्या दर्जात गुणवत्ता वाढीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, यासंदर्भातील कार्यशाळा जानेवारी महिन्यात घेण्यात येईल.'' प्रशासन गतिमान व पारदर्शी करणाऱ्यांवर आपला भर राहील असे सांगून श्री. देशमुख म्हणाले, ""यासाठी दैनंदिन कामकाजात इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीचा वापर करण्यावर भर देण्यात येईल. पुणे विभागात अजून तरी पाणीटंचाईची समस्या नाही. सप्टेंबरअखेरच्या अहवालानुसार पाच जिल्ह्यांत 59 टॅंकरने 48 गावांत पाणी पुरवले जाते. यापैकी 32 टॅंकर सातारा जिल्ह्यात, सांगलीत 20 तर उर्वरित पुणे जिल्ह्यात आहेत. 31 तारखेपर्यंत सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.'' 

ते म्हणाले, ""जातीचे त्याचबरोबर उत्पन्नासह नागरिकांना आवश्‍यक ते दाखले त्यांच्या गावांतच देतात येतील यासाठी प्रयत्न केले जातील. अशा दाखल्यांसाठीची नियमावली तयार केली जाईल, कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती प्रसिद्ध केली जातील, जेणेकरून कागदपत्रांची पूर्तता गावांतच करून दिल्यानंतर संबंधितांना तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांच्याकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत.'' 

तलाठी वाचणार लेखाजोखा 
सहा महिन्यांत आपल्याकडे किती कामे आली, त्यापैकी किती पूर्ण झाली व किती प्रलंबित राहिली इथपासून ते इतर कोणकोणती कामे केली याचा लेखाजोखा तलाठी ग्रामसभेत मांडतील. 15 ऑगस्ट व 26 जानेवारीच्या ग्रामसभेत तलाठ्यांनी आपण केलेल्या कामाची माहिती गावाला द्यावी, असे आदेश दिले असून 26 जानेवारी 2012 पासून त्याची अंमलबजावणी होईल, असेही श्री. देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111224/5394280095264773446.htm

"समृद्ध जीवन फाउंडेशन'ची शेतकऱ्यांसाठी "समृद्धी किसान योजना'

पुणे  - अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पुण्यातील समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने समृद्धी किसान योजनेची आखणी करण्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला म्हैस भाकड झाल्यावर तिच्या चाऱ्याचा खर्च परवडत नाही आणि मग त्याचा दूध व्यवसाय तोट्यात जातो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी "समृद्ध जीवन फाउंडेशन'च्या वतीने शेतकऱ्यांना म्हैस दिली जाईल आणि ती भाकड होईल तेव्हा ती परत घेऊन दुसरी म्हैस दिली जाईल. यामुळे त्याच्या दूध संकलनात खंड पडणार नाही. या म्हशीचे दूध फाउंडेशनच्या वतीने खरेदी केले जाणार आहे. या दुधासाठी सरकारी दरापेक्षा प्रत्येक फॅटला पन्नास पैसै कमी दर असेल, तरीही शेतकऱ्याला चांगला दर मिळू शकेल व त्याला या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकेल, असे समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. येत्या एक जानेवारीपासून राज्यात ही योजना चाळीसगाव व सांगोल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. 

संस्थेचे अध्यक्ष महेश मोतेवार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की या योजनेत शेतकरी दूध व्यवसायात स्थिर होणार आहे. त्याला आम्ही म्हैस विकणार नसून, सांभाळण्यासाठी देणार आहोत, त्यासाठी काही अल्प रक्कम किंवा काही तारण घेतले जाईल. सामाजिक बांधिलकीच्यादृष्टीने आम्ही या प्रकल्पाची आखणी केली आहे. व्यवस्थापन कौशल्य आणि शेतकऱ्यांचे सहकार्य यातून प्रायोगिक स्वरूपाचा प्रकल्प आम्ही पाच राज्यांत राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात पंचवीस हजार म्हशींचे वितरण करण्यात येईल, तर संपूर्ण वर्षात एक लाख म्हशींचे वितरण करण्याचा आमचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क दत्ता यादव - 9552579527 


Ref. : http://www.agrowon.com/Agrowon/20111225/5341824166582774837.htm

फुलोत्पादनासाठी 50 टक्के अनुदान योजना

वालसावंगी, जि. जालना : राज्यात फुलपिकांखालील क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी राज्य शासनातर्फे फुलोत्पादन विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खर्च मर्यादेच्या 50 टक्के अथवा कमाल 35 हजार रुपये प्रति हेक्‍टरपर्यंत अनुदान दिले जात आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. 

राज्यातील हवामान व भौगोलिक परिस्थिती फुलांच्या उत्पादनासाठी अतिशय अनुकूल आहे. राज्यात पारंपरिक फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून, फुलपिकाखालील क्षेत्रवाढीचा दर 11 टक्के आहे. 

योजनेअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात भोकरदन तालुक्‍यातील वालसावंगी, पिंपळगाव, रेणुकाई, वडोदतांगडा, पळसखेडा ठोंबरे या चार गावांनी सहभाग नोंदवा आहे. येथील 48 शेतकऱ्यांनी 20.10 हेक्‍टरवर फूल लागवड केली आहे. यासाठीचे दोन लाख 55 हजार रुपयांचे अनुदान नुकतेच भोकरदन तालुका कृषी अधिकारी एम. एस. बोईनवाड यांच्या हस्ते देण्यात आले. 

...असा आहे फुलोत्पादन विकास कार्यक्रमाचा उद्देश 
- राज्यातील शेतकऱ्याचा कल फुलशेतीकडे वाढवणे 
- फुलशेतीतून सामान्य शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावणे 
- नियमित, पारंपरिक फुलांसह आधुनिक फूल जातींच्या लागवडीस प्रोत्साहन देणे 
- फूल शेतीखालील क्षेत्र वाढवणे 
- मोठ्या शहरांलगत हरितगृह, तसेच खुल्या वातावरणातील फूल शेतीला चालना देणे 
- फुलांची निर्यात वाढविणे 
- फूल उत्पादकता, फुलांचा दर्जा वाढवणे 
- आधुनिक, उच्चतंत्र लागवड पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे 

-------------- 
फुलोत्पादन विकास कार्यक्रमातील : 
- शेतकऱ्यांमध्ये फुलपिकांबाबत आवड निर्माण करणे 
- योजनेच्या लाभासाठी नवीन लागवड करणे आवश्‍यक 
- समूह पद्धतीने फुलांची लागवड करणे आवश्‍यक 
- लागवडीत कट फ्लॉवर्स, कंदवर्गीय फुले तसेच सुटी फुले यांचा अंतर्भाव असावा 
- जिल्ह्यातील एकूण फुलोत्पादन प्रकल्पास जिल्हा अभियान समिती मंजुरी देईल 
- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैयक्तिक लाभार्थ्यास अनुदान मंजूर करतील 

फूल लागवडीसाठी अनुदान निकष 
फूल प्रकार - शेतकरी स्तर - खर्च मर्यादा (रुपये प्रति हेक्‍टर) - अनुदान मर्यादा (रुपये प्रति हेक्‍टर) - क्षेत्र मर्यादा (हेक्‍टर) 
कट फ्लॉवर - अल्पभूधारक - 70,000 - 50 टक्के, कमाल 35,000 - 2 
कट फ्लॉवर - इतर - 70,000 - 33 टक्के, कमाल 23,100 - 2 
कंदवर्गीय फुले - अल्पभूधारक - 90,000 - 50 टक्के, कमाल 45,000 - 2 
कंदवर्गीय फुले - इतर - 90, 000 - 33 टक्के, कमाल 29,700 - 2 
सुटी फुले - अल्पभूधारक - 24,000 - 50 टक्के, कमाल 12,000 - 2 
सुटी फुले - इतर - 24,000 - 33 टक्के, कमाल 7,920 - 2 



सुनील तेलंग्रे
Sunday, December 25, 2011 AT 03:45 AM (IST)
Tags: flower,   agrowon