Sunday, March 18, 2012

बदलत्या वातावरणाचा आंबा मोहोरावर परिणाम

डॉ. एस. के. गोडसे, डॉ. ए. एल. नरंगलकर

या आठवड्याच्या सुरवातीपासून किमान तापमानात वाढ झालेली असल्यामुळे आंब्यावरील तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील फलोद्यान विभागाच्या प्रक्षेत्राची पाहणी केली असता नुकताच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या वर्षी लांबलेला पावसाळा, उशिरा आलेली पालवी, तसेच थंडीचे वाढलेले प्रमाण यामुळे आंब्यामध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झालेली आहे. दक्षिण कोकण विभागामध्ये चांगला मोहोर आलेला आहे; परंतु वाढलेल्या थंडीच्या कालावधीमुळे फळधारणेचे प्रमाण बरेच कमी आहे. चिपळूण, दापोली परिसरासह उत्तर कोकण विभागामध्ये थंडी कमी होताच मोहोर येण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी सुरू झालेली आहे. या आठवड्याच्या सुरवातीपासून किमान तापमानात वाढ झालेली असल्यामुळे आंब्यावरील तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील फलोद्यान विभागाच्या प्रक्षेत्राची पाहणी केली असता नुकताच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सर्वसाधारण आंबा मोहोरावर तुडतुडे प्रथम व द्वितीय अवस्थेत आहेत, तेव्हा तुडतुड्यांच्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून बागेच्या अवस्थेनुसार दुसरी अथवा तिसरी फवारणी आंब्याच्या खाली दिलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार देणे गरजेचे आहे. तसेच, गेले तीन दिवस अचानक तापमानामध्ये वाढ झालेली असल्यामुळे ज्या बागेत फळधारणा झालेली आहे, अशा बागेतील फळांची गळ होण्याची शक्‍यता आहे. तरी, अशा बागांमध्ये शक्‍य असल्यास पाणी देण्याची सोय करावी.

आंबा मोहोर संरक्षणाचे सुधारित वेळापत्रक
अ.क्र. + फवारणीचा कालावधी + कीटकनाशक + 10 लिटर पाण्यासाठी प्रमाण + शेरा
1 +कीटकनाशकाची पहिली फवारणी +सायपरमेथ्रीन 25 टक्के प्रवाही किंवा फेनव्हॅलरेट 20 टक्के प्रवाही किंवा डेकॅमेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही +3 मि.लि. 5 मि.लि. 9 मि.लि. +या फवाऱ्यामुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते. कोवळी पालवी व तुडतुडे असल्यासच फवारणी करावी
2 +कीटकनाशकाची दुसरी फवारणी (बोंगे फुटत असताना) +क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही कार्बारील 50 टक्के (पामी) +20 मि.लि. 20 मि.लि. +या फवारणीसोबत भुरी आणि करपा रोगांच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा हेक्‍झाकोनॅझोल 5 मि.लि. किंवा थायोफनिटमेथिल 10 ग्रॅम किंवा प्रॉपिनेब 20 ग्रॅम मिसळावे
3 +कीटकनाशकांची तिसरी फवारणी (दुसऱ्या फवारणीनंतर मोहोर फुलण्यापूर्वी दोन आठवड्यांनी) +इमिडाक्‍लोप्रिड 17.8 टक्के प्रवाही किंवा क्‍लोथियानिडीन 50 टक्के (WDG) +3 मि.लि. 1.2 ग्रॅ. +तिसऱ्या, चौथ्या फवारणीसाठी कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्‍झाकोनॅझोल 5 मि.लि. किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम मिसळावे
4 +चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी) +थायोमेथॉक्‍झाम 25 टक्के दाणेदार +1.0 ग्रॅ.
5 +पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी ) +फेन्थोएट 50 टक्के प्रवाही किंवा डायमेथाएट 30 टक्के प्रवाही +20 मि.लि. 10 मि.लि.
6 +सहावी फवारणी (पाचव्या फवारणीनंतर गरज असल्यास दोन आठवड्यांनी) +पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकापैकी न वापरलेले + +गरजच असल्यासच फवारणी करावी

डॉ. एस. के. गोडसे ः 9423804578
(लेखक कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत आहेत.)

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120228/5700868582075048876.htm

नदीकाठच्या जमिनीचे व्यवस्थापन

डॉ. अनिल दुरगडे, डॉ. अजितकुमार देशपांडे

नदी काठ व कालवा सिंचन क्षेत्रातील जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात उसाखाली आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर, उसानंतर वारंवार ऊस घेण्याची पीक पद्धती, सेंद्रिय खतांचा वापर कमी वापर, फेरपालटीचा अभाव, निचऱ्याचा अभाव, सपाट जमिनी आणि रासायनिक खतांचा असमतोल वापर यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

सद्यःस्थितीत नदीकाठच्या क्षेत्रातील 50 टक्केपेक्षा जास्त क्षेत्र मध्यम ते जास्त क्षारपड झाले आहे. या क्षेत्रातील विहीर व कूपनलिकेचे पाणीसुद्धा क्षारयुक्त झाले आहे. या पाण्याने केवळ जमिनीचेच नव्हे तर मानवी तसेच जनावरांचेसुद्धा आरोग्य धोक्‍यात आले आहे.

सिंचन क्षेत्रात 3.36 टक्के ऊस क्षेत्रासाठी 60 ते 70 टक्के पाण्याचा वापर होतो. अतिरिक्त पाण्याच्या वापराने जमिनी क्षारपड होत आहेत. दुसरीकडे 84 टक्के कोरडवाहू पिकांचे क्षेत्र सिंचनाअभावी दुर्लक्षित आहे. याचा विचार करता सिंचन क्षेत्रातील ऊस पीक हे संपूर्णपणे ठिबकवर आणल्यास 50 टक्के पाण्याची बचत होईल, जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. उसाचे बचत केलेले 50 टक्के पाणी हे कोरडवाहू क्षेत्रातील अन्नधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यास उपयोगी होईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याच्या काटेकोर वापराकडे लक्ष द्यावे. म्हणजे ऊस उत्पादनाबरोबर जमिनीचे आरोग्य पूर्वपदावर आणता येईल.

माती परीक्षण महत्त्वाचे ः
1) क्षारपड जमिनीचे माती परीक्षण करून सदर जमिनी क्षारयुक्त आहे का? क्षारयुक्त चोपण आहे का? चोपण आहे का? यांचे वर्गीकरण करून घ्यावे. ढोबळमानाने फक्त क्षारपड आहे असे समजून उपाययोजना केल्या तर जमिनी आणखी क्षारपड होतील. उदा. क्षारयुक्त व क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये सेंद्रिय भूसुधारक म्हणून मळी-कंपोस्ट, स्पेंटवॉश मिसळू नये. क्षारपड जमिनीमध्ये गंधक व जिप्सम मिसळू नये. माती परीक्षणाने क्षारपड जमिनीचे वर्गीकरण ओळखून सेंद्रिय व रासायनिक भूसुधारकांचा वापर करावा.
2) चोपण जमिनीमध्येच जिप्सम माती परीक्षणानुसार शेणखतात मिसळावे. ज्या चोपण जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे तिथे जिप्समऐवजी गंधकाचा वापर करणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निचरा प्रणालीची व्यवस्था करावी.
3) शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निचरा प्रणालीसाठी योजना तयार केली आहे. ही योजना सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांतील 28 गावांत 4,145 हेक्‍टरवर राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे जवळ जवळ 50 टक्के क्षारपड जमिनीचे क्षेत्र सुधारणार आहे. या योजनेअंतर्गत क्षारांचा निचरा होण्यासाठी सामूहिक पद्धतीने शेतातून चरास जागा देऊन नैसर्गिकरीत्या ओढ्यांना किंवा नदीस अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यास मदत करावी.

पीक नियोजन ः
1) प्रथमतः कमी पाणी लागणाऱ्या व क्षार प्रतिकारक पिकांची निवड करावी. चारा गवत पिकांची निवड करून सिंचनाचे पाणी सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीने किंवा ठिबक पद्धतीने करून पाण्याचे व्यवस्थापन करावे. अतिरिक्त पाण्याचा वापर टाळावा, पाणी क्षारयुक्त असल्यास चांगले पाणी एकत्र करून ठिबक किंवा सूक्ष्म तुषार सिंचनाने पाणी द्यावे.
2) क्षारपड जमिनीच्या व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा. दोन वर्षांतून एकदा धैंचा फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावा. पिकांना शेण + जनावराचे मूत्र यासारख्या सेंद्रिय पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करावा. क्षारपड जमिनीमध्ये स्थिर झालेले भरपूर मूलद्रव्ये उपलब्ध स्थितीत आणण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. उदा. रासायनिक खताबरोबर निंबोळीचा वापर वाढवावा, उपलब्ध असलेले शेण + चिपाडापासून अर्धवट कुजवून त्यापासून गांडूळ खत बनवावे. तसेच जैविक किंवा जिवाणूखतांचा वापर वाढवावा. जमिनीचे जैविक गुणधर्म चांगले ठेवावेत.
3) वेळीच उपाययोजनांचा अवलंब न केल्यास याच क्षेत्रात पावसाळ्यात क्षारपड जमिनीत गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढून पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे विलायत बाभळींची संख्या वाढून बेटे तयार होतील. चिबड जमिनी तयार होतील. हा धोका लक्षात घेऊन वेळीच सामूहिक पद्धतीने जमिनीचे व्यवस्थापन करावे.

संपर्क - (लेखक मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

Ref. link: http://www.agrowon.com/Agrowon/20120229/5383454706260986743.htm

उशिरा तुटलेल्या उसाच्या खोडव्याचे व्यवस्थापन

संदेश देशमुख, डॉ. देवेंद्र इंडी, डॉ. सुरेश पवार

ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या उसाइतकेच खोडवा पिकास महत्त्व देणे आवश्‍यक आहे. एक हेक्‍टर क्षेत्रापासून आठ ते दहा टन पाचट मिळते. त्यापासून 40 ते 50 किलो नत्र, 20 ते 30 किलो स्फुरद, 75 ते 100 किलो पालाश मिळते. तसेच तीन ते चार हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत मिसळले जाते. खोडवा पिकाची जोपासना सुधारित तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन लागणीच्या उसाएवढे, किंबहुना त्यापेक्षा जास्त येऊ शकते.

सर्वसाधारणपणे 15 फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा घेतल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यासाठी खोडव्याचे सुधारित तंत्राने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ज्या ऊस लागवडीच्या उसाचे उत्पादन हेक्‍टरी 100 टन आणि ऊस संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे असा उसाचा खोडवा ठेवावा. ऊस पीक विरळ झाल्यास नांग्या भराव्यात. नांग्या भरण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवी तयार केलेले रोपे वापरावीत. खोडव्यासाठी शिफारशीत केलेल्या को. 86032, कोएम. 0265, कोएम. 88121, को. 740 आणि को. 8014 या जातींचा खोडवा चांगला येतो.

खोडवा राखण्याची योग्य वेळ ः
उसाची तोडणी ऑक्‍टोबरपासून एप्रिल, मेपर्यंत केले जाते. याच उसाचा खोडवा ठेवला जातो. जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो, त्या प्रमाणात खोडव्याचे उत्पादन खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कमी होत जाते. साधारणपणे 15 फेब्रुवारीनंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये. खोडवा ठेवायचाच असेल तर त्यासाठी खोडव्याचे सुधारित तंत्राने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

खोडवा उसात पाचटाचा वापर ः
ऊस तोडणीच्या वेळी पाचट जागच्या जागी ठेवावी. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत. जेणेकरून, त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतील. उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते. जमिनी खालून येणारे कोंब जोमदार असतात. बुडख्यांची छाटणी न केल्यास जमिनीच्या वरील कांडीपासून डोळे फुटतात. असे येणारे फुटवे कमजोर असतात. क्वचितच त्यांचे उसात रूपांतर होते. बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेचच 0.1 टक्का कार्बेन्डाझिमची (100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम) फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो. शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्‍टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि दहा किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक टाकावेत. पाचट हळूहळू कुजविण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंची गरज असते. त्यानंतर उसास पाणी द्यावे. पाचटामुळे सुरवातीस पाणी पोचण्यास वेळ लागतो. तरी पाचटाचा मातीशी संबंध येऊन हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते. पाचट वापराचे तंत्र योग्य प्रकारे अमलात आणण्यासाठी त्याची तयारी ऊस लागणीपासूनच करायला हवी. यासाठी उसाच्या दोन सऱ्यांमधील अंतर कमीत कमी 1.20 मीटर (चार फूट) असावेत. त्यामुळे सरीत पाचट चांगले बसते, फूट चांगली होते. ऊस तोडणी यंत्राने उसाची तोडणी केली असल्यास बुडख्यांवरील पाचट बाजूला करणे किंवा बुडखे छाटणे ही कामे करण्याची गरज नाही. कारण यंत्राने पाचटाचे आपोआपच लहान तुकडे होतात. जमिनीवर सारख्या प्रमाणात हलकासा पाचटाचा थर तयार होतो. तोडणी जमिनीलगतच होत असल्याने पुन्हा बुडखे छाटण्याची गरज नाही. यंत्राने ऊस तोडणी केल्यास खोडव्याची फूट चांगली होत असल्याचे दिसून आली आहे.

खत व्यवस्थापन ः
खोडव्याला पाणी दिल्यानंतर तीन ते चार दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावे. खते देण्यासाठी पाडेगाव येथे विकसित केलेल्या पहारीच्या केलेल्या पहारीच्या तंत्राचा अवलंब करावा. सदर पद्धतीनुसार रासायनिक खतांची मात्रा (तक्ता-1) दोन समान हप्त्यांत जमिनीत वाफसा असताना द्यावी. पहारीने बुडख्यापासून 10 ते 15 सें.मी. अंतरावर, 10 ते 15 सें.मी. खोल छिद्रे घेऊन सरीच्या एका बाजूला पहिली खत मात्रा द्यावी. दोन छिद्रांमधील अंतर 30 सें.मी. ठेवावे. दुसरी खत मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर ः
माती परीक्षणानुसार खोडवा पिकात ज्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर प्रति हेक्‍टरी 1) झिंक सल्फेट 20 किलो, 2) फेरस सल्फेट - 25 किलो, 3) मॅंगेनीज सल्फेट - दहा किलो 4) बोरॅक्‍स - पाच किलो वापरावे. कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर दोन हप्त्यांमध्ये करावा.

जैविक खतांचा वापर ः
रासायनिक खतांना पूरक म्हणून जैविक खतांचा वापर केल्यास रासायनिक खतात बचत करून फायदा मिळविता येतो.
ऍझोटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरीलम, ऍसीटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांचा प्रत्येकी 1.25 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात एकूण पाच किलो जिवाणू खतांचा वापर करावा. त्यासाठी ही जिवाणू खते 25 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकत्र करून उसाच्या ओळीच्या बाजूने टाकावीत किंवा पाण्यामध्ये किंवा शेणाच्या स्लरीमध्ये एकत्र करून वापरावीत.

पाणी नियोजन ः
खोडवा व्यवस्थापनासाठी नेहमीच्या पद्धतीने पाण्याच्या 26 ते 48 पाळ्या लागतात; परंतु नवीन तंत्रामध्ये पाण्याच्या फक्त 13 ते 14 पाळ्या असल्या तरी उत्पादन चांगले मिळते. उन्हाळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये पाण्याचा तुटवडा भासल्यास उत्पादनात फार मोठी घट येते; परंतु नवीन पद्धतीत पाचटाचा आच्छादनासाठी वापर केल्यामुळे 40 ते 45 दिवस पाणी नसले तरी पीक तग धरू शकते. पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यामुळे शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे पाण्याच्या पाळ्यांतील अंतर वाढले तरी उसाची वाढ चांगली होते. शेतात गांडुळांची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यांच्याकडून जमीन भुसभुशीत केली जाते. खते पहारीच्या अवजाराच्या साह्याने दिली जात असल्याने गांडुळांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. जमिनीचे तापमान थंड राहिल्यामुळे मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. उन्हाळ्यातही पिकास जास्त उन्हाचा त्रास होत नाही.

कीड, रोगनियंत्रण ः
खोडवा पिकात काणी, गवताळ वाढ यांचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी काणीग्रस्त बेटे व गवताळ वाढीचे बेटे उपटून नांग्या भराव्यात. उशिरा तुटलेल्या (मार्च/ एप्रिल) उसाचा खोडवा ठेवल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. खोड कीडनियंत्रणासाठी फोरेट दहा टक्के दाणेदार 15 ते 20 किलो प्रति हेक्‍टर वापरावे. काणी व गवताळ वाढ या रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी उसाची लागण करताना ऊस बेण्यास उष्ण बाष्प प्रक्रिया करावी किंवा बेणे 0.1 टक्का कार्बेन्डाझिम (100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम) द्रावणात दहा मिनिटे बुडवावीत.

ऊस खोडवा व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे ः
पूर्वीच्या पिकाची जमिनीलगत तोडणी करावी. पाचट सरीत लोटावे, बुडखे मोकळे करावेत. छाटलेल्या बुडख्यांवर 0.1 टक्का कार्बेन्डाझिमची फवारणी करावी. पाचट कुजण्यासाठी जिवाणू खतांचा वापर करावा. तोडणीनंतर 15 दिवसांच्या आत पाणी द्यावे. पहारीच्या साह्याने मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची अर्धी मात्रा सरीच्या एका बाजूने द्यावी. सेंद्रिय खतांचा वापर करावा. रासायनिक खतांची अर्धी मात्रा 135 दिवसांनी पहारीच्या साह्याने द्यावी. पाण्याचा योग्य प्रमाणातच वापर करावा.
या गोष्टी कटाक्षाने टाळा
* पाचट जाळणे. बुडख्यांवर पाचट ठेवणे.
* पाण्याचा अतिवापर करणे. रासायनिक खतांचा फोकून वापर करणे.

संपर्क ः 02169-265333
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Ref. link: http://www.agrowon.com/Agrowon/20120305/4978796511203394160.htm

द्राक्षातील कमी साखरेची कारणे आणि उपाय

डॉ. एस. डी. रामटेके, आशिष राजूरकर, रवींद्र कोर

द्राक्षवेलींचे विस्तारामुळे बहुतांशी पाने उन्हात असतील तर द्राक्षाची पक्वता वेगाने होईल. पाने सावलीत राहून घडही सावलीत राहिले तर सावलीतील घडांची पक्वता उशिरा येते. साखर भरण्याच्या क्रियेत अडथळे येतात. उन्हातील घडांमध्ये साखर भरण्याची क्रिया वेगाने होते. पाने काढण्यानेसुद्धा गोडीवर परिणाम होतो. मण्यांच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यात मोठ्या प्रमाणात पाने काढली तर प्रत तसेच उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटते.

द्राक्ष उत्पादनात वाढत होत असताना या वर्षी बऱ्याच द्राक्ष बागायतदारांपुढे समस्या दिसून आली ती म्हणजे कमी गोडीची द्राक्षे तयार होणे. यामुळे द्राक्ष बागातदारांना द्राक्ष काढणीस विलंब करावा लागत आहे. तरीसुद्धा पाहिजे तेवढी साखर मण्यात उतरलेली दिसत नाही. द्राक्षाची गोडी कमी आहे म्हणजेच टी.एस.एस. (साखर) कमी आहे, असे म्हणता येईल. मण्यात कमी साखर असणे ही बाब खालील गोष्टींवर अवलंबून असते.

अ) हवामान ः 1) हवेतील तापमान, 2) मुळांच्या क्षेत्रातील तापमान, 3) मण्यांच्या वाढीतील तापमान
ब) व्यवस्थापनातील त्रुटी ः 1) जास्त उत्पादन, 2) वेलीचा विस्तार, 3) पानांची संख्या, 4) वेलीतील अन्नसाठा, 5) पाणी व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, 6) संजीवकांचा अतिरिक्त वापर.

अ) हवामान ः
1) हवेतील तापमान ः
हवामानातील तापमान हा घटक द्राक्षातील साखर भरण्याचे क्रियेत मोठा परिणाम करीत असतो.
सर्वसामान्यपणे आपला समज असा असतो की द्राक्षमण्याच्या वाढीचे एकूण तीन टप्प्यांपैकी पहिल्या दोन टप्प्यांमधील अवस्थांमध्ये जे तापमान द्राक्षास मिळाले असेल त्यांचाही परिणाम द्राक्षावरील टी.एस.एस.वर होत नसावा. पण ते खरे नाही त्याचाही परिणाम गोडीवर होतो. द्राक्षाची पक्वता सुरू झाल्यावर 15 अंश से. ते 30 अंश से.पर्यंत तापमान जसजसे वाढत जाते तसतसे साखरेचे प्रमाण हळूहळू वाढत जाते. 33 अंश से. किंवा त्यापेक्षा अधिक तापमान वाढत गेल्यास साखरेचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे मण्यांची वाढही कमी होते. तापमान जसजसे जास्त त्या प्रमाणात आम्लता कमी होत जाते, आम्लामध्ये प्रामुख्याने मॅलेट ऍसिड कमी होते, तापमान जसजसे जास्त त्या प्रमाणात आम्लता कमी होत जाते, आम्लामध्ये प्रामुख्याने मॅलेट ऍसिड कमी होते, टारटारेट ऍसिड विशेष परिणाम होत नाही. अमिनो आम्लांपैकी प्रामुख्याने प्रोलीन वाढत्या तापमानाबरोबर वाढत जाते. अर्जिनाईन हे अमिनो आम्लही गोडी वाढेल तसतसे वाढत जाते.

2) मुळांच्या सान्निध्यातील तापमान ः
द्राक्षमण्यांतील साखर भरण्याचे वेळेपासून पुढे द्राक्षवेलींचे मुळांचे सान्निध्यातील जमिनीच्या तापमानाचा साखर वाढण्यावर विशेष परिणाम होतो. जमिनीचे तापमान जर कमी असेल, द्राक्षमण्यांमध्ये साखर व पोटॅशिअम कमी झाले तर आम्लता वाढल्याचे निदर्शनास येते. पक्वता सुरू असताना जमिनीचे तापमान 30 अंश से. ते 32 अंश से.च्या दरम्यान असेल तर ब्रीक्‍स कमी झाले असल्याचे निदर्शनास येते.

3) वाढीच्या कालावधीतील एकूण तापमान ः
मण्यांच्या वाढीव कालावधीत एकूण तापमान जर थंड असेल तर द्राक्षे पिकण्याची क्रिया फार सावकाश चालते. याउलट तापमान उष्ण असेल तर द्राक्षे पिकण्याची क्रिया वेगाने वाढते.

4) प्रकाश ः
प्रकाशाचा प्रत्यक्षात द्राक्षाची गोडी वाढण्यावर काही परिणाम होत नसला तरी प्रकाशाचा तापमानाशी प्रत्यक्ष संबंध असतो. यामुळे प्रकाशात वाढ झाली तर द्राक्षातील गोडी वाढत जाते.

ब) व्यवस्थापनातील मुद्दे ः
1) उत्पादन ः
द्राक्षाचे उत्पादन जसजसे वेलींच्या क्षमतेपेक्षा जास्त वाढते तसतसे साखरेचे प्रमाण फार सावकाश वाढते. द्राक्षाच्या घडांची संख्या जास्त असेल तर फुटींची वाढ कमी होते. विस्तार मर्यादित राहतो त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढण्यावर मर्यादा येतात.

2) विस्तार ः
द्राक्षवेलींचे विस्तारामुळे बहुतांशी पाने उन्हात असतील तर द्राक्षाची पक्वता वेगाने होईल. पाने सावलीत राहून घडही सावलीत राहिले तर सावलीतील घडांची पक्वता उशिरा येते. साखर भरण्याचे क्रियेत अडथळे येतात. उन्हातील घडांमध्ये साखर भरण्याची क्रिया वेगाने होते.

3) पाने काढणे ः
पाने काढण्यानेसुद्धा गोडीवर परिणाम होतो. मण्यांच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यात मोठ्या प्रमाणात पाने काढली तर प्रत तसेच उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटते. वाढीचे उशिराचे टप्प्यात (तिसरा टप्पा) घडांचे भोवतीची पाने काढली असता घडांचा रंग सुधारतो. साखरेचे प्रमाण वाढते आणि आम्लता कमी होते. फळकुजीचे प्रमाणही कमी होते. फुलोऱ्यापूर्वी पाने काढणे योग्य नाही. पक्वता सुरू झाल्यावर घडावर सूर्यप्रकाश पडला तर त्याच्यात साखरेचे प्रमाण वाढते आणि मॅलिक आम्लाचे प्रमाण घटते.

4) अन्नसाठा ः
वेलीतील अन्नसाठा आणि साखर भरण्याचे वेळेपासून पक्वता पुढे वाढत जाणे हे वेलीतील कर्बोदकांचे साठ्यावरही प्रामुख्याने अवलंबून असते. तोडणीचे वेळी घडांमध्ये असणाऱ्या एकूण साखरेपैकी 40 टक्के शर्करा वेलीचे साठवणीचे कर्बोदकांमधून आलेली असते. त्यामुळे खरड छाटणीनंतर शेवटच्या टप्प्यामध्ये वेलीमध्ये भरपूर अन्नसाठा होणे आवश्‍यक असते. या दृष्टीने पानांचे आरोग्य शेवटपर्यंत चांगले राहणे आवश्‍यक असते. सातत्याने उत्पादन जास्त घेणे, अयोग्य हवामान, रोगराई किंवा तत्सम कारणामुळे वेलींचा अन्नसाठा कमी होतो. हे लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादन व्यवस्थापन केल्याने वेलीतील अन्नसाठा भरून निघेल. वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत तर मात्र हा अन्नसाठा अधिकाधिक कमी होत जातो.पर्यायाने द्राक्षाची अपेक्षित गोडी (टी.एस.एस.) वाढत नाही.

5) पाणी व्यवस्थापन ः
पक्वतेचे काळात पाणी व्यवस्थापन आणि द्राक्षाच्या तोडणीच्या वेळेची गोडी यांचा जवळचा संबंध आहे. बाजारपेठेतील परिस्थितीनुरूप तोडणी जर लांबवावयाची असेल तर द्राक्ष बागाईतदार बागेस पाणी देतात किंवा वाढवितात. ठिबकने पाणी देणे पुरेसे झाले नाही तर पाट पाणी देतात. गोडी वाढण्याचा वेग मंदावून शेवटी तोडणी कालावधी लांबतो किंवा याउलट जर तोडणी लवकर करावयाची असेल तर पाण्याचा मोठा ताण देतात. हा ताण एवढा मोठा होतो की तोडणी नंतर छाटणीनंतरच्या फुटीवरही त्याचे दुष्परिणाम दिसतात. गोडी वाढविण्यासाठी अशा पद्धतीचे पाणी नियोजन योग्य नाही.
द्राक्ष बागेचे पाणी तोडल्यानंतर टी.एस.एस. वाढतो हे प्रामुख्याने कॅनॉपीतील तापमान वाढणे, घड उन्हात येणे या प्रत्यक्ष आणि काडीचे शेंड्या आणि घड यांच्यात स्पर्धा वाढणे आणि पाणी कमी झाल्याने सौम्य परिणाम तत्त्वाप्रमाणे टी.एस.एस.वर अप्रत्यक्ष परिणाम होतो. शिवाय हरितद्रव्यनिर्मिती आणि अन्न व पाण्याचे वहन यावरही अयोग्य परिणाम होतो.

पाण्यामुळे एकूण आम्लता वाढते. हे प्रामुख्याने मॅलीक आम्लात वाढ झाल्याने होते. टारटारिक आम्लावर फारसा परिणाम होत नाही.

अन्नद्रव्ये ः
द्राक्षाच्या टी.एस.एस.मध्ये वाढ व्हावी यासाठी पोटॅशचा वापर करणे आणि नत्रयुक्त खतांचा वापर कमी करणे असे प्रयत्न द्राक्ष बागाईतदार करीत असतात. प्रामुख्याने हे दोन्हीही उपाय हे ज्या वेळी टी.एस.एस. वाढत नाही त्या वेळी केले जातात. म्हणजे सुमारे 15 ते 16 ब्रिक्‍स असताना केले जातात. त्यापूर्वीच जर नत्र द्राक्षात (काड्या, देठ, ओलांडे) वाढला असेल तर कॅनॉपीवर त्याचे परिणाम होऊन विस्तार वाढून गेलेला असतो, त्यामुळे त्याचे पक्वतेवर परिणामही होऊन टी.एस.एस. वाढत नाही. शेवटी गोडी येत नाही. त्यासाठी सुरवातीचे काळापासून नत्राचे वापरावर नियंत्रण असणे आवश्‍यक आहे.

गोडी वाढावी यासाठी पाण्याचा ताण दिला तर घडातील पोटॅशचे प्रमाण आणखी कमी होते. जसे नत्र उशिरा देणे थांबविले तर त्याचा टी.एस.एस.च्या संदर्भात अपेक्षित परिणाम साधत नाही. त्याचप्रमाणे पोटॅशही उशिरा देऊन टी.एस.एस. वाढविण्याचे प्रयत्न बरेच द्राक्ष बागायतदार करीत असतात. त्याचाही अपेक्षित परिणाम साधत नाही. वस्तुतः जमिनीत उपलब्ध पोटॅशचे प्रमाण पुरेसे अथवा भरपूर असताना आणि पानाचे देठांमध्ये पोटॅशचे प्रमाण भरपूर असताना पक्वतेसाठी गोडी उतरावयास सुरवात झाल्यानंतर पोटॅश पुरविण्याची काही आवश्‍यकता नाही. वरील सर्व कारणे द्राक्षाची गोडी वाढविण्याचे दृष्टीने महत्त्वाची असली तरीसुद्धा मागील दोन- तीन वर्षांत द्राक्षाची गोडी पक्वतेपर्यंत अपेक्षित न येण्याची बागांमधून आढळून आलेली कारणे पुढीलप्रमाणे संभवतात.

1) नत्रयुक्त खतांचा अधिक वापर (विस्तार मिळविण्यासाठी शेंडे वाढ मिळावी म्हणून सुरवातीपासून नत्रयुक्त खते विशेषतः युरिया अधिक वापरण्याचा कल द्राक्ष बागायतदारांमध्ये रूढ होत आहे. घड सावलीत राहिल्यास पिंक बेरीजही कमी येतील या दृष्टीनेही विस्तार मिळविण्याचा प्रयत्न केला जातो)
2) युरिया अमोनिअम नायट्रेट अथवा युरिया फॉस्फेटसारख्या कृषी रसायनांचा फवारणीद्वारे कायम वापर (शेंडा)
2) युरिया, अमोनिअम नायट्रेट अथवा युरिया फॉस्फेटसारख्या कृषी रसायनांचा फवारणीद्वारे कायम वापर (शेंडा वाढ व विस्तार मिळविणे, उन्हाची इजा, गुलाबी मणी, स्कॉर्चिंग यांचा त्रास कमीत कमी व्हावा यासाठी कॅनॉपी मिळविण्याचा प्रयत्न असतो.
3) जीएसारख्या संजीवकांचे जास्तीचे फवारे घेतले जातात.
4) फवारणीद्वारे अथवा घड बुडविण्यासाठी जी.ए.चा अधिक प्रमाणात उशिरा वापर, तसेच अलीकडे ब्रेसिनोस्टिरोईड वर्गातील रसायनाचा अतिशय जास्त प्रमाणातील वापर.
5) सायटोकायनीन विभागातील संजीवकांचे फवारणीत अथवा घड बुडवणीत वापर विशेषतः उशिरा.
6) अधिक घनदाट विस्तार.
7) मुळांमध्ये तसेच खोड, ओलांडे या अवयवांमध्ये कमी अन्नसाठा.

याशिवाय सी.पी.पी.यू. आणि ब्रासीनोस्टेरॉईड सारख्या अतिशय शक्तिशाली संजीवकांचा अतिरेक वापर झाल्यास साखर न भरण्याबरोबरच इतर दुष्परिणाम दिसून येतात.

यामधील द्राक्षमण्यांवरचा परिणाम म्हणजे द्राक्षमणी खूप टणक होणे, गळ कमी होणे, द्राक्षात तुरटपणा येणे आणि पाठोपाठ कडवटपणा येणे, गर पाणीदार न तयार होता घट्ट तयार होणे, द्राक्षात आम्लतेचे प्रमाण कमी असले तरी मोडीचे प्रमाण मात्र अतिशय कमी असणे या प्रकारचे परिणाम सी.पी.पी.यू. व ब्रासीनोस्टोराईडच्या वापराने दिसून आले आहेत. वरील संजीवके वापरावयाचे असल्यास जी.ए.चा वापर कमी करावा लागतो. जी.ए. पुन्हा पुन्हा वापरावयास लागू नये, कमी प्रमाणात वापरून तोच परिणाम साधता यावा यासाठी वरील संजीवकांचा वापर सुरू झाला. परंतु जी.ए.चा वापरही तोच ठेवून वरील संजीवके अतिशय जास्त प्रमाणात वाढविल्याने दोन्हींच्या परिणामाने पक्वतेस खूपच उशीर होऊ लागला. कित्येकदा जी.ए.चा वापरही या संजीवकांबरोबर केला जातो. त्यामुळे काढणीचा कालावधी हा बराच पुढे ढकलला जातो.

कॅनॉपी खूप असेल, आर्द्रता खूप असेल आणि थंडी उशिरापर्यंत टिकून असेल तर मात्र पक्वता खूपच उशिरा येते. द्राक्ष तोडणीस खूपच म्हणजे तीन आठवड्यापासून ते दोन महिन्यांपर्यंत उशीर होतो. कमी गोडीची द्राक्ष तोडली तर त्याचे वाहतूक आणि साठवणीत खूपच नुकसान होत असते.
मागच काही वर्षांआधी कमी तापमान ही समस्या बऱ्याच वेळा व बऱ्याच काळासाठी मुख्यतः नाशिक विभागात होती, इतर विभागात त्यांची तीव्रता कमी होती. याचा परिणाम असा झाला की अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावली, असे असले तरी वेलीचे श्‍वसन हे सुरूच असते. त्यामुळे मण्यात साखर साठण्याऐवजी वेलीला लागणाऱ्या इतर कार्यासाठी ही ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे मण्यातील साखर फारशी वाढली नाही. ज्या वेळी साखर कमी असते अशावेळी आम्लाचे प्रमाण मण्यात जास्त असते. परंतु द्राक्षमण्यात आम्लाचे प्रमाण जास्त नसल्याचे दिसून येते. याचाच परिणाम असा होतोय की जरी साखरेचे प्रमाण मण्यात कमी आहे तरीसुद्धा मण्यातील साखर व आम्ल यांचे गुणोत्तर हे 21 पेक्षा जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष पाठविण्यासाठी द्राक्षाची पक्वता निर्देशित करण्यासाठी हे गुणोत्तर 20 एवढे असावे अशी अट आहे. 20 पेक्षा जास्त गुणोत्तर असल्यामुळे जरी साखर मण्यात कमी होती तरी हे द्राक्ष एक्‍स्पोर्ट करण्यासाठी पात्र आहेत असे म्हणता येईल. यावर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात काही विभागातून द्राक्ष आणण्यात आली त्यांच्यात साखरेचे वेगवेगळे प्रमाण होते यामुळे त्याचे तीन गट तयार करण्यात आले जसे साखरेचे प्रमाण 15-16 B, 17-18 B व 19-20 B (ब्रिक्‍स) असे वर्गीकरण करून ही द्राक्षे शीतगृहात ठेवण्यात आली. 30 दिवसांनंतर पाच दिवसांसाठी सामान्य तापमानात ठेवण्यात आली व नंतर साठवणुकीत काळाचा अभ्यास घेण्यात आला. यात असे दिसून आले, की कोणत्याही गटातील द्राक्षे ही खराब झालेली नव्हती. तसेच या तिन्ही गटामध्ये साठवणुकीत काळाचा अभ्यासाच्या दृष्टीने फारशी तफावत आढळली नाही. साठवणुकीत साखरेशिवाय आणखी कशावर अवलंबून असते हे तपासण्यासाठी त्यातील आम्लतेचे प्रमाण कशावर अवलंबून असते हे पाहण्यासाठी त्यातील आम्लतेचे प्रमाण काढण्यात आले. त्यावरून साखर / आम्ल हे गुणोत्तर काढले असता ते 20 पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. यावरून असे सिद्ध होते, की परिपक्वता ठरविण्यासाठी साखरेचे प्रमाण हेच अंतिम निकष न मानता त्यातील आम्लाचे प्रमाणसुद्धा तपासणे महत्त्वाचे ठरते. साखर/ आम्ल यांचे गुणोत्तर काढावे म्हणजेच द्राक्षनिर्यातीसाठी पात्र आहेत किंवा नाही हे ठरविता येईल.
वरील समस्या ही वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेली आहे. परंतु प्रत्येक वर्षी असेच वातावरण असेल असे नाही, परंतु अलीकडे ही समस्या ही अधिकच गंभीर होऊ पाहत आहे. यासाठी संजीवकांच्या अतिरिक्त वापरासोबतच हवामानानुसार विस्तार नियोजन, पाणी व अन्नद्रव्यांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे उशिरा काढणी करण्याचे टाळले जाऊ शकेल.

Ref, Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120307/5680890219128035719.htm

व्यवस्थापन पेरू बागेचे...

डॉ. विकास खैरे

पेरूच्या झाडाला योग्य आकार देण्यासाठी सुरवातीच्या काळात हलकी छाटणी करावी. झाडांची उंची मर्यादित ठेवावी. छाटणीमुळे नवीन फुटवा येऊन चांगले उत्पादन मिळते. सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते. रोग, किडीचा उपद्रवदेखील पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी प्रमाणात होतो.

पश्‍चिम महाराष्ट्रातील मैदानी प्रदेशात पेरूच्या हस्त बहरापासून अधिक आर्थिक फायदा मिळण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अंतर्गत प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे विकसित केलेली सरदार (लखनौ-49) ही जात दर्जेदार उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या जातीची फळे मोठी व गोल आकाराची असतात. गर पांढरा असून, गोड असतो. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असते. या जातीची झाडे उंच न वाढता आडवी वाढतात व उंची नियंत्रित ठेवता येते. या जातीच्या बरोबरीने अलाहाबाद सफेदा, गुलाबी गराचा पेरू, सीडलेस बस्ती, बस्ती रेड, ललित, पंतप्रभात, धारीदार, संगम, श्‍वेता या जाती लागवडीसाठी चांगल्या आहेत. दाबकलम, भेटकलम, छाटकलम आणि गुटीकलम पद्धतीने पेरूची कलमे तयार करता येतात. महाराष्ट्रात सर्वत्र "दाबकलम' पद्धतीने पेरूची कलमे केली जातात.

चांगल्या उत्पादनासाठी आणि झाडाच्या योग्य वाढीसाठी पेरूची लागवड 6 x 6 मीटर अंतरावर करावी. झाडाला योग्य आकार देण्यासाठी सुरवातीच्या काळात त्याची छाटणी करावी, झाडांची उंची मर्यादित ठेवावी. छाटणीमुळे नवीन फुटवा येऊन चांगले उत्पादन येते, सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग, किडीचा उपद्रवदेखील पारंपरिक पद्धतीत कमी प्रमाणात होतो. पेरू बागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची बाब आहे. काही वेळा बागेत कीडग्रस्त व रोगग्रस्त फळे तशीच पडलेली असतात. त्यातूनच परत परत कीड व रोगांचा प्रसार होत असतो. त्याकरिता बागेतील व बागेवरील कीड व रोगग्रस्त फळे गोळा करून त्यांचा नायनाट करावा.

पेरू बागेवर प्रामुख्याने पांढरे ढेकूण (मिली बग), खवले कीड, फुलकिडे, फळमाशी, मावा, पांढरी माशी, खोडावर जाळी करणारी अळी व सूत्र कृमी या किडींचा उपद्रव सर्रास आढळून येतो. अयोग्य व्यवस्थापन असेल तर पेरूवर देवी, पानांवरील ठिपके, फळसड, फांदीमर इत्यादी रोगांचा उपद्रव दिसून येतो. त्याचे सामुदायिकरीत्या गाव पातळीवर बागेचे व्यवस्थापन करावे. बागेला आंतरमशागत करून स्वच्छता ठेवावी, तणनियंत्रण करावे त्यामुळे रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. कीड व रोगग्रस्त फांद्या बहर धरण्यापूर्वीच बागेतून बाहेर काढून त्यांचा नायनाट करावा. अति जुन्या बागांमधील बांडगूळदेखील नष्ट करावे.

खते व्यवस्थापन ः
झाडांची वाढ जलद व जोमदार होण्यासाठी खतांची योग्य मात्रा देणे आवश्‍यक असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी शिफारस केल्याप्रमाणे पेरूच्या प्रत्येक झाडास पुढीलप्रमाणे खते द्यावीत. नत्र तीन वेळेस समप्रमाणात विभागून जून-जुलै, ऑगस्ट - सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये द्यावे. पालाशदेखील जून-जुलै व ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये समप्रमाणात विभागून द्यावे. संपूर्ण स्फुरद जून-जुलैमध्येच द्यावे. फळ बहर घेणे सुरू झाल्यावर म्हणजे पाच वर्षांच्या पुढे प्रत्येक झाडास 25 ते 30 किलो शेणखत मे महिन्याच्या शेवटी आणि 450 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद व 400 ग्रॅम पालाश बहराच्या वेळी आणि उरलेले 450 ग्रॅम नत्र फळे धरल्यानंतर द्यावे.

पेरू बागेस जस्त, लोह, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसू शकते. कारण जमिनीमधील कर्बाचे कमी झालेले प्रमाण, वाढलेल्या चुनखडीचे प्रमाण व मुख्य अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता येऊन थंडीच्या हंगामात फळवाढीच्या अवस्थेत पाने लालसर रंगाची होऊन फळवाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी विशेषतः नत्र, स्फुरद तसेच जस्त हे अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार संतुलित वापर केल्यास व अति पाण्याचा वापर टाळल्यास पाने लाल होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

माती परीक्षणानुसार जस्ताची कमतरता मातीमध्ये (0.6 मिलिग्रॅम प्रति किलोपेक्षा कमी) असल्यास बहराच्या वेळी शेणखत व रासायनिक खताबरोबर 70 ग्रॅम झिंक सल्फेट प्रति झाड याप्रमाणे द्यावे. लोहाची कमतरता असल्यास (4.5 मिलिग्रॅम प्रति किलोपेक्षा कमी) असल्यास बहराच्या वेळी शेणखत व रासायनिक खताबरोबर 80 ग्रॅम फेरस सल्फेटचा प्रति झाड वापर करावा.

बोरॉनचीसुद्धा कमतरता येऊ शकते (0.5 मिलिग्रॅम प्रति किलोपेक्षा कमी). त्यासाठी 15 ग्रॅम बोरॅक्‍स प्रति झाड याप्रमाणे बहराच्या वेळी द्यावे.
फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कमतरतेनुसार केल्यास फायदेशीर ठरते. त्यासाठी 0.2 टक्का चिलेटेड झिंक याची (दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी फुले येण्यापूर्वी 15 दिवसांच्या अंतराने दोनदा करावी, तसेच लोहाची कमतरता पडून पिवळी पडल्यास 0.1 टक्का चिलेटेड लोहाची (एक ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. ही फवारणी फुलोऱ्यापूर्वी 15 दिवसांच्या अंतराने दोनदा करावी. तसेच बोरॉनची कमतरता असल्यास 0.2 ते 0.3 टक्का बोरीक ऍसिड (दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी फुले येण्यापूर्वी 15 दिवसांच्या अंतराने दोनदा करावी.

फळमाशीच्या नियंत्रणासाठी मिथाईल युजेनॉल वापरून बनविलेल्या रक्षक सापळ्यांचा प्रति एकरी पाच या प्रमाणात वापर करावा व किडीचे सर्वेक्षण आणि नियंत्रण करावे. नियंत्रणासाठी दोन मि.लि. मॅलेथिऑन प्रति लिटर पाण्यात मिसळून फळांवर फवारावे. पेरूची फळे सुपारीएवढी लहान असल्यापासून शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा दहा ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 25 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणी दर 15 दिवसांनी पाच ते सहा वेळा रोगाच्या तीव्रतेनुसार करावी.
पांढरे ढेकूण (मिली बग) व खवले कीड या किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी 20 ते 25 ग्रॅम दहा लिटर पाण्यातून फवारावे. तसेच क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरी हे परोपजीवी कीटक हेक्‍टरी 1000 ते 1500 भुंगेरे सायंकाळी सहानंतर झाडावर सोडावेत. गरजेनुसार परत 15 ते 20 दिवसांनी हेक्‍टरी 1000 ते 1500 भुंगेरे सोडावेत. पेरू बागेत मित्र कीटकांना अपायकारक कीटकनाशके फवारू नयेत.

आरोग्यदायी पेरू
लिंबूवर्गीय फळांपेक्षा तीन ते चार पट जीवनसत्त्वे पेरूमध्ये आहेत. आहारदृष्ट्या पेरूमध्ये व्हिटॅमिन "सी'ची अधिक प्रमाणात उपलब्धता दिसून येते. आयुर्वेदातही या फळाला विशेष असे स्थान आहे. पेरू हे एक उत्तम, कणखर विशेष म्हणजे कमी पाण्यावर येणारे व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर फळझाड आहे. पेरूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ उदा. पल्प, जेली, जॅम, ज्यूस, सॅलेड, पुडिंग, आइस्क्रीम पावडर, नेक्‍टर, बर्फी अशी दर्जेदार उत्पादने बनविली जातात. इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोहाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात दिसून येते.
--------------------------------------------------
संपर्क ः डॉ. खैरे ः 9371015927
(लेखक कृषी महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.)

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120306/4981111811095360851.htm

मधमाशीपालन - पीक उत्पादनवाढ आणि उद्योगातील संधी

प्रख्यात शास्त्रज्ञ सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले आहे, की जर काही कारणांमुळे जगातील मधमाश्‍या नाश पावल्या, तर सबंध मानवजात फार तर चार वर्षंच जगू शकेल. कारण परागीभवन व अन्ननिर्मिती थांबून अन्नसुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. भारतात उत्तरेकडील व दक्षिणेकडील राज्यांत जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच व्यावसायिक मधमाशीपालन होते; मात्र बदलत्या परिस्थितीप्रमाणे मधमाशीपालन पद्धतीत बदल न केल्यामुळे त्याची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. पीक उत्पादन व दर्जा वाढणे, मध व अन्य उत्पादनांसाठी आज मधमाशीपालन उद्योगाचे महत्त्व वाढणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याला तसा वावही आहे. त्यावर आधारित ही मालिका "ऍग्रोवन'मधून आजपासून दर मंगळवारी.

मधमाशी हे मानव आणि संपूर्ण सजीवसृष्टीला एक सर्वोत्तम वरदान आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अन्य कीटक किंवा प्राण्यांप्रमाणे मधमाश्‍या एकट्या - दुकट्या राहत नाहीत, तर त्या समूहात राहतात. म्हणूनच मधमाश्‍यांच्या वसाहती असतात. मधमाश्‍या त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी फुलांतील मकरंद व पराग गोळा करतात. तेही इतक्‍या पद्धतशीरपणे, की त्या फुलांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. मधमाश्‍या एका फुलावरून दुसऱ्या फुलांवर परागकणांचे स्थानांतरण करतात, त्यामुळे फुलांची फलधारणा व बीजधारणा होत असते. यालाच "परागीभवन' असे म्हणतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या झाडांची वा वनस्पतींची वाढ होते व प्रसार होतो. अशा रीतीने फुलांचे काहीही नुकसान तर होत नाहीच, उलट चांगला उपयोगच होतो. अजूनही शेतकऱ्यांच्या व बऱ्याच लोकांच्या गैरसमजामुळे मधमाशीपालन करण्यास शेतकरी उत्सुक नसतात.

प्रख्यात शास्त्रज्ञ सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले आहे, की जर काही कारणांमुळे मधमाश्‍या नाश पावल्या, तर सबंध मानवजात फार तर चार वर्षंच जगू शकेल. कारण पुष्पधारी झाडे, वेली, वनस्पतींचे परागीभवन होणार नाही, त्यामुळे अन्न मिळणार नाही. त्यामुळे संपूर्ण सजीवसृष्टीच नाहीशी होण्याची भीती त्यांनी वर्तविली आहे. यावरून मधमाश्‍यांची गरज किती निकडीची आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

एका जर्मन अहवालानुसार जागतिक क्रमवारीत पशुधन उद्योगामध्ये त्यांच्या आर्थिक उलाढालीनुसार सर्वांत अग्रक्रमांकावर गुरेढोरे पशुपालन व डेअरी उद्योगाचा असून, द्वितीय क्रमांकावर वराह उद्योग आहे. मधमाशीपालनाचा क्रमांक तृतीय आहे, तर त्याच्या खालोखाल म्हणजे चतुर्थ क्रमांकावर कुक्कुटपालन उद्योग आहे. भारतात मात्र अजूनही मधमाशीपालनाबद्दल बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञता आहे. उत्तरेकडील व दक्षिणेकडील राज्यांत जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच व्यावसायिक मधमाशीपालन करीत आहेत. महाराष्ट्रात महाबळेश्‍वरला फार पूर्वीपासून पारंपरिक मधपाळ आहेत; पण बदलत्या परिस्थितीप्रमाणे मधमाशीपालन पद्धतीत बदल न केल्यामुळे म्हणावी तशी प्रगती व प्रसार झाला नाही.

मधमाशीपालन कशासाठी?
मधमाशीपालन हा उद्योग एकमेव अद्‌भुत असा आहे, की जो पूर्णपणे मकरंद व पराग - फुलांवर अवलंबून आहे. भारत हा आजही शेतीप्रधान देश आहे. जंगल भागातील आदिवासी लोक वनसंपत्ती, वनौषधी आदींवर अवलंबून आहेत. मधमाश्‍यांच्या वसाहतींपासून मध गोळा करण्याचे काम तर आपल्या पूर्वजांपासून अजूनही जंगल भागात चालू आहे. मधाचे महत्त्व आपल्या वेद - पुराणांत सापडते, तसेच पारंपरिक आयुर्वेदाप्रमाणे मधाचा आपण बहुगुणी औषध म्हणून उपयोग करतो. मध उत्पादनाशिवाय मधमाशीपासून मेण, पराग, राजान्न, प्रोपोलिस व दंश-विष अशी अत्यंत औषधी उपयोगी उत्पादने मिळतात. या सर्व घटकांना जागतिक बाजारपेठेत अत्यंत मागणी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मधमाश्‍यांमुळे परागीभवनाद्वारे पीक उत्पादन व त्याचा दर्जा अनेक पटींनी वाढतो. अशारीतीने वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा व सुरक्षा देण्यासाठी मधमाशीपालन एक सर्वोत्तम व्यवसाय आहे.

मधमाशीपालनाचे फायदे ः
1) जगातील बहुतेक देशांत एकाच जातीच्या मधमाश्‍या आहेत; मात्र भारत हा एकमेव देश असा आहे, की ज्याच्या वातावरणात चार - पाच जातींच्या मधमाश्‍यांच्या वसाहती नैसर्गिकरीत्या आढळतात. त्याचे संवर्धन व संगोपन करून व्यावसायिक उत्पादन करता येऊ शकते.
2) आपल्याकडे मधमाश्‍यांना आवश्‍यक फुले, झाडे, वनस्पती व वातावरण अत्यंत पोषक आहे, त्यामुळे मध, मेण व इतर उत्पादनपण भरपूर मिळू शकते.
3) सर्वांत प्रमुख म्हणजे मधमाशीपालनाद्वारे शेतीपीक व फळपिकांचे उत्पादन व प्रजनन अनेक पटींनी वाढते, त्यामुळे शेती व शेतकरी कुटुंबांचेही सामाजिक व आर्थिक सबलीकरण होते.
4) परागीभवनामुळे शेतीप्रमाणेच औषधी वनस्पती, जंगली वृक्ष - वेलींचे संवर्धन होते. पर्यायाने जंगल भागातील आदिवासींचे उत्पन्न वाढून त्यांचे शहरी भागात स्थलांतर थांबू शकते.
5) मधमाशीपालन हा बहुआयामी उद्योग असल्यामुळे त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ व मजुरांची गरज आहे. उदा. मधमाश्‍यांसाठी लागणाऱ्या वसाहती, त्यासाठी विशिष्ट पेट्यांचे उत्पादन व पुरवठा, वसाहतींचे संगोपन व वाढ करण्यासाठी प्रशिक्षित मधपाळ, वसाहतींचे स्थानांतरण व वाहतूक व्यवस्था, मध उत्पादन, साठवण तसेच मधाचा दर्जा परीक्षण, वेष्टनीकरण व विपणन व्यवस्था आदी.
6) मधमाशीपालन, मध व अन्य उत्पादन निर्मितीसाठी स्त्री - पुरुष, लहान - मोठे असा भेद नाही. कोणीही हा व्यवसाय सहज करू शकतात. लहान- मध्यम- मोठ्या प्रमाणावरही मधमाशीपालनास सुरवात करता येते.
7) मधमाशीपालनाकरिता आवश्‍यक असलेले मकरंद व पराग जवळपास विनामूल्य मिळते. मधमाशीपालनाकरिता कमीत कमी जागा, भागभांडवल, वेळ, कष्ट द्यावे लागतात.

प्रस्तावना ः
मधमाशीपालन म्हटले, की सर्वसामान्य लोक आधी भुवया वर करून "आ' वासून प्रश्‍नार्थक मुद्रेने बघतात, कारण मधमाश्‍यांच्या मधापेक्षा लोकांना मधमाश्‍यांच्या डंखाची, त्यांच्या चावण्याची खूप भीती मनात बसलेली आहे. मुळात हाच सगळ्यात मोठा गुण म्हणा किंवा वरदान म्हणा, की मधमाश्‍यांना चांगली समज असते. मधमाश्‍या त्यांचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगले ओळखू शकतात. मधमाश्‍यांचे मित्र म्हणजे मधपाळ. अगदी सहजपणे ते मधमाश्‍यांच्या पोळ्यात हात घालतात, तरीही त्यांना मधमाश्‍या चावत नाहीत किंवा डंख मारत नाहीत. त्यांच्या अंगा-खांद्यावर मधमाश्‍या वावरतात आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे भरपूर मध देतात. या उलट जर एखाद्याने मधमाश्‍यांच्या पोळ्याला त्रास देण्याचा विचार जरी मनात आणला, तरी मधमाश्‍यांना ते अचूक समजते. कारण विशिष्ट फेरोमोनद्वारे संदेश किंवा संवेदना मधमाश्‍यांना लगेच कळतात. अशा व्यक्तीला, प्राण्याला किंवा कोणालाही शत्रू ठरवून सगळ्या मधमाश्‍या त्याच्यावर हल्ला करतात आणि डंख मारतात. याचे साधे उदाहरणच द्यायचे झाले, तर एखाद्याने जर सहज झाडावरील किंवा इमारतीवरील मोहोळाला जर दगड भिरकावला तर 10-12 माणसांच्या गर्दीतूनही त्या व्यक्तीला ओळखून त्यालाच मधमाश्‍या डंख मारतात, कारण दगड भिरकावून मारलेल्या व्यक्तीच्या हाताला किंवा बोटांना विशिष्ट संप्रेरक (फेरोमोन)चा गंध असतो, तो मधमाश्‍या ओळखतात आणि सर्व मधमाश्‍या त्याचाच पाठलाग करतात.

साधारण 15-20 हजार वर्षांपूर्वीपासून मधमाश्‍यांपासून मध मिळविण्याचे तंत्र आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. याचे दाखले भीमबेटकाच्या (पंचमढी, मध्य प्रदेश) जंगलातील डोंगर कपाऱ्यांवरील भित्तीचित्रांवरून स्पष्ट मिळतात. त्याकाळी देखील मध गोळा करून त्याचे अन्न म्हणूनच सेवन केले जायचे. मधाची औषध म्हणून उपयोगिता आयुर्वेदातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक चरक आणि सुश्रुत यांनी त्यांच्या संहितेत लिहून ठेवली आहे. त्यांचाच आता सर्रास संदर्भ घेऊन औषधे तयार केली जातात. यापैकी प्रमुख उपचार म्हणजे अंगावरील जखम; कापल्यावर किंवा भाजल्यावर त्या जागी मधाचा लेप दिल्यास ती जखम लवकर बरी होते. मधातील एंटीबॅक्‍टेरियल एक्‍टिव्हिटीमुळे मधाचे औषधी गुणधर्म वाढतात.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120313/4757374416807462264.htm

द्राक्षनिर्यातीसाठी गुणवत्ता महत्त्वाची....

खाण्याच्या द्राक्षाबाबत चवीच्या गुणाबरोबरच घडाची ठेवण चांगली असावी लागते. निर्यातक्षम द्राक्षामध्ये या सर्व गुणधर्मांबरोबरच जास्त दिवस साठवणूकक्षमता आवश्‍यक असते. साठवणूकक्षमता वाढण्यासाठीच्या उपाययोजनेविषयी माहिती आपण मागील लेखात घेतली होती. त्याचबरोबरीने जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी निर्यातक्षम द्राक्षामधील गुणवत्ता आणि दर्जा यांची माहिती आपल्या बागायतदारांना असणे आवश्‍यक आहे.

डॉ. एस. डी. रामटेके, आशिष राजूरकर

द्राक्ष हे भारतातील प्रमुख निर्यातक्षम पीक आहे. असे असले तरीही भारतातून फक्त दीड ते दोन टक्के एवढीच द्राक्ष परदेशात पाठवली जातात. कमी निर्यात होण्याची कारणे अनेक आहेत. अभ्यासाअंती आढळून आलेली प्रमुख कारणे म्हणजेच उच्च दर्जाची निर्यातक्षम गुणवत्ता असलेली द्राक्षे कमी तयार होणे, जागतिकीकरणाने आणि मुक्त व्यापार पद्धतीमुळे निर्माण झालेल्या स्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध न होणे हीदेखील महत्त्वाची कारणे आहेत.

अ) द्राक्षासाठी गुणवत्ता, दर्जा ः
अधिक टिकाऊपणा, देखणे रूप व पाचकता या गोष्टी खाण्याची द्राक्षे निर्यात करण्यासाठी आवश्‍यक आहेत. थॉमसन सीडलेस या जातीकरिता इंग्लंडमध्ये निर्यात करण्यासाठी गुणवत्ता निकष ठरलेले आहेत. हेच निकष युरोपातील इतर देशांसाठी व दक्षिण पूर्व देशासाठीसुद्धा सारखेच आहेत. परंतु इंग्लंडमध्ये 17 ते 19 अंश ब्रिक्‍स असलेली हिरवट पोपटी रंगाची द्राक्षे अधिक मागणीत असतात. तर इतर बाजारपेठांत पिवळसर सोनेरी रंगाची 18 ते 21 अंश ब्रिक्‍स असलेली गोड द्राक्षे मागणीस आहेत.

1) किमान आवश्‍यकता
सर्व प्रकारच्या श्रेणीमध्ये फळे, घड व मण्यांच्या बाबतीत...
i) गुणवत्ता - खाण्याच्यादृष्टीने दर्जेदार द्राक्षे असावीत.
ii) स्वच्छता - स्वच्छ व इतर पदार्थांपासून किंवा धुळीचे कण यापासून मुक्त असावीत.
iii) कीड, रोगमुक्त व त्यांच्या इजांपासून मुक्त असावीत.
v) बाह्य दुर्गंधीयुक्त किंवा खराब चव नसावी.

याशिवाय मण्यांच्या बाबतीत - एकसंधता असावी, सुयोग्य वाढ असावी, सामान्य फुगवण असावी, उन्हाचे चट्टे नसावेत, घड काळजीपूर्वक तोडलेला असावा. घडाची वाढ पूर्ण झालेली असावी व मणी पूर्णतः पक्व झालेले असावेत. घडाची अवस्था अशी असावी, की त्यामुळे घड हाताळणी व वाहतुकीमध्ये चांगले राहावेत. ते ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोचले पाहिजेत.

2) वर्गीकरण
निर्यातक्षम द्राक्ष पाठविताना द्राक्ष बागायतदार किंवा निर्यातदार एकच दर्जा लिहिताना दिसून येतात. सर्वजण त्यांची द्राक्ष एक्‍स्ट्रा क्‍लास (सर्वोत्तम) दर्जाची आहेत, अशी नोंद करतात. त्यामुळेच वर्गीकरण हे द्राक्षाच्या प्रतीनुसार द्राक्षाचे पुढीलप्रमाणे तीन भाग पडतात म्हणून प्रत्येक वर्गाची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे.
i) विशिष्ट वर्ग (द्राक्षाचा सर्वोत्तम दर्जा)
आकार, वाढ, रंग या दृष्टीने घड हे त्याच्या जातीच्या गुणधर्माशी तंतोतंत असतात व त्यात कोणताही दोष नसतो. मणी घट्ट असावेत, घडाशी पक्के बांधलेले व एकसारखे सुटसुटीत असावेत.
आकारमानाच्या दृष्टीने घडाचे वजन 300 ग्रॅम असावे. प्रत विसंगतीमध्ये घडाच्या वजनाच्या पाच टक्‍क्‍यांपर्यंत फरक ग्राह्य धरण्यात येतो.
ii) वर्ग (द्राक्षाचा चांगला दर्जा)
मणी घट्ट व घडाशी मजबूत पकड असलेले असावेत. एकसारखे परंतु विशिष्ट वर्गाप्रमाणे सुटसुटीत असावेत. तसेच खालील काही गुणधर्मांमध्ये थोडे दोष असू शकतात.
आकारात किंचित कमी-जास्तपणा असणे, रंगात थोडे दोष असणे, थोड्या प्रमाणात फक्त सालीवर उन्हाचे चट्टे असणे, तसेच घडाच्या वजनात दहा टक्‍क्‍यांपर्यंत विसंगती ग्राह्य धरण्यात येते.
iii) वर्ग 2
या वर्गामध्ये द्राक्ष खूप चांगल्या दर्जाची नसली तरी किमान आवश्‍यक गुणवत्तेस पात्र ठरतात. घडाचा आकार, वाढ व रंग यामध्ये काही दोष असले तरी संबंधित गुणधर्माशी विसंगत नसतात. मण्यांची बांधणी गरजेप्रमाणे योग्य असते व बऱ्यापैकी सुटसुटीत असतात. घडामध्ये आकारातील दोष, रंगामध्ये दोष, थोड्या प्रमाणात सालीवर उन्हाचे चट्टे, मण्यांवर थोडी इजा इ. दोष दिसून येतात. वर्ग-i प्रमाणेच या वर्गातसुद्धा घडाच्या वजनात दहा टक्‍क्‍यांपर्यंत विसंगती ग्राह्य धरण्यात येते.

3) गुणवत्ता दर्जा मिळवण्यासाठी उपाय
निर्यातक्षम द्राक्षाची जी गुणवत्ता ठरविण्यात आलेली आहे ती गुणवत्ता मिळविण्यासाठी काही मशागतीची कामे तसेच योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यात एकसूत्रता नाही म्हणूनच निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात वाढ करण्यासाठी अजूनसुद्धा भरपूर वाव आहे.
द्राक्षाच्या प्रतीसाठी जातीपरत्वे घडाचा आकार, घडाची भरण/ घडातील मण्यांची रचना, मण्यांचा व्यास, मण्याच्या रंगातील व आकारातील एकसारखेपणा, मण्यांवर लव असणे किंवा नसणे, मण्यांवरील डाग किंवा त्यावरील उन्हाचे चट्टे या सर्व बाबी उपयोगी ठरतात.
त्याचप्रमाणे रासायनिक पदार्थांमध्ये एकूण विद्राव्य घटक (TSS) आम्लता, तसेच कीटकनाशकांचे अंश यासुद्धा महत्त्वाच्या ठरतात. तसेच मण्यांचा टिकाऊपणा, मण्यांतील गर, देठाची जाडी व घडाचा दांडा, मण्यांची देठासोबत असलेली पकड या गोष्टींसुद्धा साठवणुकीसाठी महत्त्वाच्या आहेत, म्हणूनच गुणवत्ता, दर्जा यावरही अवलंबून असतो.

Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120314/5409120724251659631.htm

रेशीम शेतीचे वाढतेय जागतिक महत्त्व

डॉ. ए. डी. जाधव

थायलंड येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय रेशीम परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर तुती लागवड, तुतीचे विविध वाण, त्यांची उत्पादकता या अनुषंगाने यामध्ये चर्चेची देवाण-घेवाण झाली. जैवतंत्रज्ञान, जनुकीय शास्त्र यांच्या वापराद्वारे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढणे, मूल्यवर्धित उत्पादने, जैविक तसेच आरोग्यवर्धक उत्पादने वाढण्यासाठी तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाचे रेशीम उत्पादन व्हावे यासाठी शास्त्रज्ञांचे या वेळी एकमत झाले.

थायलंड येथे अलीकडेच 22 वी आंतरराष्ट्रीय रेशीम परिषद झाली. फ्रान्स आणि कृषी व सहकार मंत्रालय, थायलंड यांनी संयुक्तरीत्या या परिषदेचे आयोजन केले. परिषदेमध्ये सुमारे 247 आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, व्यापारी यांनी सहभाग घेतला. ही परिषद दर तीन वर्षांनी घेतली जाते. या परिषदेची सुरवात इटलीमध्ये 1870 मध्ये झाली. जागतिक स्तरावर रेशीम उत्पादक व रेशमाचा वापर करणाऱ्या देशांमधील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व संशोधकांसाठी चर्चात्मक व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने परिषदेचे आयोजन केले जाते. परिषदेत प्रामुख्याने जागतिक स्तरावर तुती लागवड, तुतीचे विविध वाण, त्यांची उत्पादकता आणि विविध वातावरणात त्यांची उत्पादन क्षमता कशी वाढेल या दृष्टीने विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.

परिषद आणि त्याअनुषंगाने रेशीम विषयाचे महत्त्व
रेशीम अळ्यांचे विविध वाण, त्यांची जागतिक स्तरावर गरज व त्यातून उत्पादित होणारे जागतिक दर्जाचे रेशीम या अनुषंगाने परिषदेत चर्चेची देवाण-घेवाण झाली. भारत, जपान, ब्राझील, फ्रान्स, बल्गेरिया, थायलंड, इंडोनेशिया, क्‍यूबा या देशांतील शास्त्रज्ञांची या वेळी संयुक्तीक चर्चा होऊन जागतिक स्तरावर विविध वातावरणात वाढणारे रेशीम अळ्यांचे वाण शोधावेत, त्यांच्या विविध भागांत चाचण्या घ्याव्यात या दृष्टीने विचार झाला, वन्य रेशीम उदा. टसर, एरी, मुगा या रेशीम जातींच्या अनुषंगाने विविध बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. वन्य रेशीम उत्पादन जागतिक स्तरावर तुती रेशीमच्या तुलनेत दहा टक्केच आहे, मात्र तुलनेने मागणी भरपूर आहे. त्यानुसार या क्षेत्रातही नावीन्यपूर्ण संशोधनाचा विविध देशांत उपयोग व्हावा, नवीन संशोधनाच्या दिशा ठराव्यात या दृष्टीने चर्चा झाली. आजही जागतिक स्तरावर शेतकऱ्यांच्या शेतांवर रेशीम अळ्यांना होणारे विविध रोग आणि किडींमुळे 20 ते 25 टक्के नुकसान होते. हे नुकसान कमी होण्याच्या दृष्टीने आनुवंशिक, पेशीशास्त्र या स्तरावर नावीन्यपूर्ण संशोधन आणि त्यामध्ये काही रोगप्रतिबंधक जनुके वापरली जाऊ शकतात व रोगमुक्त रेशीम अळ्यांचे वाण निर्माण करता येऊ शकतात यादृष्टीनेही जगभरातील संशोधन पुढे येत आहे, त्याचा फायदा शेतकऱ्यांकडील कोषनिर्मिती वाढण्यावर होणार आहे. दर्जेदार कोष निर्माण झाल्यास स्थानिक, जागतिक बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय रेशीम उत्पादन करणे शक्‍य होणार आहे. जागतिक स्तरावर रेशीम कोषाला भाव चांगला मिळाला पाहिजे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुणवत्तापूर्ण रेशीम निर्माण व्हायला हवे. तुती लागवड ते धागा निर्मिती आणि कापड निर्मितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर खर्च कमी होऊन उत्पादन वाढावे व एकूणच रेशीम शेतीचे जागतिक स्तरावर आशादायी अर्थशास्त्र तयार होण्याची गरज आहे. या अनुषंगानेही विविध तंत्रज्ञानांबाबत चर्चा होऊन सकारात्मक बाबींचा विचार करण्यात आला.

कापड निर्मितीच्याही पलीकडे गेले देश
रेशीम शेतीत नुसते कोष उत्पादन व त्यापासून कापड निर्मिती या टप्प्यापर्यंतच विकास झाला तर फायदा मर्यादित राहणार आहे व त्यामुळे रेशीमच्या अर्थशास्त्रात फारसा फरक पडणार नाही; मात्र दक्षिण कोरिया, थायलंड व इतर अनेक देशांनी रेशीम धागानिर्मिती व कापड निर्मितीच्या पलीकडे जाऊन रेशीम व तुतीपासून अनेक मूल्यवर्धित उत्पादने निर्मिती व विविध संस्था, विद्यापीठांमधून संशोधन सुरू केले आहे. तुतीचा चहा, तुती फळांची वाइन, जॅम, जेली, तुतीपासून चॉकलेट्‌स, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यांच्या अनुषंगाने उत्पादने व्यापारीदृष्ट्या या देशांमध्ये उत्पादित केली जात आहेत. हजारो कोटी रुपयांचा व्यापार त्यातून जगभर सुरू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने थायलंड येथील अनेक खासगी तसेच शासकीय स्तरावरील संशोधन संस्था, विद्यापीठे, कृषी मंत्रालये अग्रेसर आहेत.

दक्षिण कोरियामध्येही कोषांमधील विविध प्रथिनांचा अनेक उत्पादनांसाठी प्रामुख्याने साबण, सौंदर्य प्रसाधने, आरोग्यवर्धक टॉनिक, नॅनो सिल्की टूथपेस्ट अशा मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे रेशीम शेतीतली उत्पादकता, उत्पन्न व एकूणच अर्थशास्त्र बदलण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन सुरू आहे.

रेशीम कापड व धागानिर्मितीत आणि एकूणच तुती लागवड व कोषनिर्मितीत सेंद्रिय शेतीचा पर्यायही जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विचाराधीन आहे. सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यास तुती व रेशीमच्या विविध प्रथिनांचा सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्यवर्धक उत्पादने निर्मितीसाठी मोठा उपयोग होऊ शकतो. यातूनच रेशीम शेतीचे जागतिक स्तरावर चित्र आणि अर्थशास्त्र बदलू शकते.

वैद्यकीय शास्त्रात फ्लुरोसन्ट रेशीम आणि रेशीमच्या प्रथिनांमधील नॅनो (अत्यंत सूक्ष्म) घटकांना फार मोठे महत्त्व आहे. यानुसार जपानमधील विविध शास्त्रज्ञांनी फ्लुरोसन्ट रेशीम कापडाची निर्मिती केली आहे.
रेशीम उत्पादनातील खर्च कमी होऊन उत्पादकता वाढावी यासाठी जागतिक स्तरावर शेतकऱ्यांना विविध योजना आणि अनुदान या दृष्टीने एकात्मिक योजना राबविल्या जाव्यात, यासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांमध्ये विचारांची व संशोधनाची देवाण-घेवाण व्हावी, विविध तंत्रज्ञानांचा स्थानिक स्तरावर उपयोग न होता जगभरात जे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्याचा जगभरातील शेतकऱ्यांना उपयोग व्हावा, ही विचारधारणा रुजू होऊ पाहत आहे. रेशीम शेतीत एकात्मिक कीडनियंत्रण व जैविक कीडनियंत्रण यांचा वापर प्राधान्याने करावा, कीडनाशके व विविध रसायनांचाही कमीत कमी वापर व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नैसर्गिक रेशीमचा कृत्रिम धाग्यांच्या तुलनेत वापर वाढावा यादृष्टीने जागतिक स्तरावर अनेक संस्था, सरकारी यंत्रणा पुढे आल्या आहेत.
जैवतंत्रज्ञान, जनुकीय शास्त्र यांच्या वापराद्वारे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढणे, मूल्यवर्धित उत्पादने, जैविक तसेच आरोग्यवर्धक उत्पादने वाढण्यासाठी तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाचे रेशीम उत्पादन व्हावे यासाठी शास्त्रज्ञांचे या वेळी एकमत झाले.

थायलंडची आघाडी
थायलंडसारख्या छोट्या देशात नैसर्गिक रेशीमला अति उच्च स्थान असून, खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या तुती लागवडीपासून जागतिक दर्जाची मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यात अग्रेसर आहेत. त्याद्वारे त्यांनी ग्रामीण भागात विविध मूल्यवर्धित उत्पादनांचे जणू जाळेच तयार केले आहे. त्याद्वारे रोजगाराच्या विविध ग्रामीण उद्योगांच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करून परकीय चलनासाठी, संशोधनासाठी विस्तृत यंत्रणा निर्माण केली आहे.

जागतिक स्तरावर सध्या एक लक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त रेशीम धाग्यांची निर्मिती होते; मात्र त्यामध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त सहभाग हा एकट्या चीन देशाचा आहे. भारताचा सहभाग 19 हजार 600 मेट्रिक टन एवढा आहे. मात्र, उत्पादनात आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. भारतातील हवामान, जमीन, नैसर्गिक स्रोत आणि मनुष्यबळ यांचा विचार करता चीनच्या बरोबरीत रेशीम उत्पादन वाढविणे सहज शक्‍य आहे. मात्र त्यास शासन, सार्वजनिक संस्था, खासगी उद्योग, बिगरसरकारी संस्था आणि एकूणच ग्रामीण स्तरावर जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून रेशीम चळवळ उभी राहिल्यास हजारो कोटी रुपयांचे परकीय चलन आपल्या देशात येऊ शकते. आपल्या देशाला रेशीम उत्पादनाची हजारो वर्षांची परंपरा आहे. बनारस सिल्क, पैठणी, गढवाल सिल्क, हिमरू शाल, कांजीवरम आदींना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे; तसेच भारत देश हा आयुर्वेदाचा देश म्हणून ओळखला जातो. तुतीपासूनही आपल्या देशात अनेक मूल्यवर्धित उत्पादने उत्पादित करून अनेक उद्योगधंदे सुरू करणे शक्‍य आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचा तांत्रिक प्रतिनिधी या नात्याने मी थायलंड कृषी मंत्रालय व अधिकाऱ्यांसमवेत विविध शेतकऱ्यांच्या रेशीम शेतांना भेटी दिल्या. तुती लागवड व रेशीम शेतीतील कमी खर्चातील तंत्रज्ञानाबाबत सविस्तर चर्चा केली. खासगी उद्योगातील चुलथाई सिल्क कंपनी लिमिटेड या कंपनीला भेट देऊन विविध मूल्यवर्धित उत्पादनांची माहिती घेतली. त्यांच्यासोबत विविध तंत्रज्ञान व सामंजस्य करार करण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा झाली. क्‍यूबा येथील राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेसोबतही रेशीम शेतीतील प्रशिक्षण संशोधन यादृष्टीने आमच्या विद्यापीठाशी तांत्रिक व सामंजस्य करार करण्याबाबत सकारात्मक बोलणी झाली आहेत.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120315/5317788203389813513.htm

द्राक्ष सल्ला

डॉ. एस. डी. सावंत


सर्व विभागांमध्ये वातावरणातील उष्णता हळूहळू वाढत चालली आहे; परंतु मोठ्या प्रमाणात द्राक्षाची काढणी अजून राहिली आहे. या वर्षीच्या थंडीच्या लाटेमुळे सर्व विभागांमध्ये मणी तयार होण्यासाठी दहा ते वीस दिवस जास्त लागलेले आहेत. घडांमध्येसुद्धा एकाच वेळी पक्वता दिसत नाही. बऱ्याच वर्षांनंतर बागेमध्ये लागलेले जास्त घड पीक नियंत्रित करण्यासाठी कमी केले नव्हते. वातावरणाने चांगली साथ दिली म्हणून दरवर्षीप्रमाणे घडवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कमी होणारे घड या वर्षी कमी झाले नाहीत. म्हणूनच सर्व बागांमध्ये दरवर्षीपेक्षा जास्त घड आहेत, त्यामुळेसुद्धा घड काढणीस तयार होण्यास वेळ होत आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये हवी तशी कर्बग्रहण क्रिया झालेली नाही, त्यातच अतिथंडीमुळे काही पाने कमी तयार झाली. म्हणून कमी पाने असल्यामुळे घड तयार होण्यास वेळ झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या तापमान वाढत आहे आणि पानांची कर्बग्रहण क्रिया करण्याची शक्तीसुद्धा वाढत आहे. या परिस्थितीमध्ये मण्यांमध्ये चांगल्या प्रकारे साखर वाढण्यासाठी पोटॅशची कमतरता न राहणे अत्यंत जरुरी आहे. म्हणून दोन ते तीन ग्रॅम मोनोपोटॅशिअम फॉस्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी) प्रति लिटर पाण्यात मिसळून पानांवर फवारल्यास मण्यांमध्ये चांगली साखर भरण्यास फायदा होऊ शकेल.
सध्याच्या परिस्थितीमध्ये घड उशिरा तयार झाले आहेत. त्याचा परिणाम पुढच्या छाटणीवरती होणार आहे. म्हणूनच जर फळांमध्ये ऍसिडिटी जास्त राहिली नसल्यास आणि 15 ते 16 च्यापुढे साखर गेलेली असल्यास, घडांची काढणी करावी. पानांवर लाल कोळी जर वाढत असेल आणि खरड छाटणीला वेळ असेल, तर पाने टिकवण्यासाठी पाण्याची किंवा एक ते दीड ग्रॅम सल्फर ( 80 डब्लूडीजी) प्रति लिटर पाण्यात मिसळून केलेली फवारणी अजूनही फायद्याची होऊ शकेल. पाने गळालेली असल्यास खरड छाटणी लवकर घेण्याचा निर्णय घ्यावा; परंतु पानगळ विशेषतः थंडीमुळे झाली असल्यास नवीन फुटी आलेल्या असतील तर त्या फुटी सक्रिय होईपर्यंत थांबून खरड छाटणी उशिरा घेतल्यास फायदा होऊ शकेल, याची नोंद घ्यावी.

अशी करा खरड छाटणीची पूर्वतयारी

डॉ. आर. जी. सोमकुंवर


सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागांच्या परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ होत असली, तरी रात्रीच्या तापमानात फारसा फरक पडला नाही. किमान तापमानामध्ये अजून बदल नाही. काही बागांमध्ये सध्या फळकाढणी सुरू आहे, तर काही ठिकाणी बेदाणा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्याच्या वेगवेगळ्या परिस्थितीतील बागांमध्ये परिस्थितीप्रमाणे उपाययोजना करावी लागणार आहे.

सध्या ज्या बागेत काळी द्राक्षे होती, त्या बागेतील फळकाढणी बऱ्याच दिवसांपूर्वी झाली. विश्रांतीचा कालावधीसुद्धा त्या बागेत संपत आला. कारण आपण फळछाटणी जर लवकर घेत असू, तर खरड छाटणीसुद्धा तितक्‍याच लवकर घेणे महत्त्वाचे असते. दोन छाटणींमधील अंतर साधारणतः पाच महिने असावे. या कालावधीमध्ये बाग फुटून फळकाडी तयार होणे, परिपक्व होणे इ. गोष्टी यामध्ये गरजेच्या असतात. ही गरज पूर्ण होण्याकरिता पाच महिन्यांचा कालावधी लागतो.
ज्या बागेत एवढ्यातच फळकाढणी झाली, अशा ठिकाणी विश्रांती देणे गरजेचे आहे. या वेळी बागेत थोड्याफार प्रमाणात पाणी व अन्नद्रव्ये दिल्यास वेलीची झालेली झीज भरून निघेल व पुन्हा खरड छाटणीनंतर बाग फुटण्यास मदत होईल. कारण या वेलीमध्ये असलेले स्टोअरेज खरड छाटणीनंतर बाग फुटण्यास मदत करते.
खरड छाटणी घेण्यापूर्वी बागेत पूर्वतयारी करणे गरजेचे असते. ही तयारी दोन्ही छाटणीपूर्वी केल्यास त्याचा चांगला फायदा होतो; परंतु फळछाटणीपूर्वी असलेला पाऊस, मजुरांची व शेणखताची उपलब्धता इ. अडचणीच्या गोष्टींमुळे आपण त्यावेळेस पाहिजे तितकी पूर्वतयारी करत नाही. म्हणूनच या वेळी बोद फोडून त्यामध्ये शेणखत आणि शिफारशीत रासायनिक खतांचा वापर करून बागेची मशागत आपण करतो.

खरड छाटणीची पूर्वतयारी ः
खरड छाटणीपूर्वी पूर्वतयारी करणे म्हणजे दोन वेलींमध्ये खोडापासून आठ - नऊ इंच जागा सोडून जवळपास दोन फूट रुंद व तीन - चार इंच खोल अशी चारी घ्यावी. ही चारी घेताना यापूर्वीच्या बऱ्याच मुळ्या तुटतील. या वेळी 30 ते 35 टक्के मुळ्या तुटण्याची शक्‍यता असेल; परंतु या सर्व मुळ्या जुन्या व काळ्या झालेल्या दिसतील. या मुळ्या तुटल्या तरी चालेल. याचा चांगला फायदा एक महिन्यानंतर बागेत दिसून येईल. दोन वेलींमध्ये चारी घेतल्यानंतर त्या चारीमध्ये दोन पाटी शेणखत, 500 ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. याचसोबत एक बॅग डीएपी प्रति एकर आणि 15 किलो फेरस सल्फेट शेणखतावर पसरवून टाकावे, त्यावर हलका मातीचा थर चढवावा. यामुळे बागेत बोद तयार होईल. या बोदामध्ये हवा खेळती राहून नवीन मुळी वाढल्यास पोषक असे वातावरण तयार होईल. तुटलेल्या मुळीपासून नवीन पांढरी मुळी तयार होईल. ही कार्यवाही खरड छाटणीच्या 12 ते 15 दिवसांपूर्वी सुरू करावी. म्हणजेच, खरड छाटणी झाल्यानंतर बाग फुटून चार ते पाच पानांची अवस्था होईपर्यंत ही मुळी तयार होईल. ही कार्यक्षम अशी पांढरी मुळी या अवस्थेमध्ये आपण बोदामध्ये टाकलेले अन्नद्रव्य व्यवस्थितरीत्या ओढून वेलीला पुरवठा करते, त्यामुळेच वेलीची आवश्‍यक असलेली वाढ आपल्याला करून घेता येते.
ज्या बागेत पाण्यामध्ये क्षार आहेत, अशा ठिकाणी बोद पूर्ण पांढरे दिसतील किंवा ज्या ठिकाणी आपण पाणी देतो, अशा ठिकाणी जवळपास एक फूट गोलाकृती पांढरी जागा दिसेल. पाण्यात असलेले क्षार वेलीच्या वाढीस हानिकारक ठरतात, त्यामुळे पानांवर स्कॉर्चिंगसुद्धा आलेले आढळून येते. अशा वेळी बोद फोडून चारी घेतल्यानंतर तळात शिफारशीत मात्रेमध्ये गंधक मातीत मिसळावे. यामुळे बऱ्यापैकी फायदा होतो. त्याचसोबत काडी परिपक्वतेच्या काळात बागेत पाणी जेव्हा मुबलक असते किंवा पाऊस येत असल्यास बोद वरून सपाट जर असेल, तर त्या बोदामध्ये गोळा झालेले क्षार लिचिंग होऊन निघून जातील. बोदावर पाणी सोडल्यानंतरसुद्धा हे क्षार बोदाच्या बाहेर पडण्यास मदत होते.

री-कट घेतलेली बाग :
या बागेत री-कट घेऊन बराच उशीर झाला असून, वाढत्या तापमानात नवीन फूट जोमाने वाढताना दिसून येईल. तेव्हा निघत असलेल्या नवीन फुटीचा पुरेपूर फायदा घेऊन खोड ओलांडे तयार करून घ्यावे. नवीन निघत असलेल्या फुटीच्या वाढीचा जोम जास्त असल्यास खोड तयार करते वेळी आठ - नऊ पानांची फूट होताच पाच - सहा पानांवर खुडून घ्यावी. यानंतर निघालेल्या बगलाफुटीस तीन ते चार पानांवर खुडावे. वरची फूट सुतळीने बांबूला बांधावी. अशाप्रकारे वेलीचा खोड तयार करण्याकरिता दुसरा टप्पा तयार होईल, यामुळे खोड लवकर जाड होण्यास मदत होईल. बगलफुटींवर ठेवलेली तीन ते चार पाने सूर्यप्रकाशाचा फायदा घेऊन प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे खाद्यपदार्थ तयार करून त्या काडीमध्ये साठवतील व त्याचा फायदा पुढील काळात होईल. यालाच आपण खोडातील किंवा काडीतील स्टोअरेज वाढले असे म्हणतो.
वेलीची जोमदार वाढ होण्याच्या दृष्टीने या वेळी पाणी व नत्र फार महत्त्वाचे आहे. तेव्हा, बागेत या वेळी पाणी भरपूर असल्याची खात्री करून घ्यावी. जमिनीचा प्रकार पाहूनच वेलीला पाणी उपलब्ध करून द्यावे. हलकी जमीन असल्यास कमी प्रमाणात; परंतु जास्त वेळा पाणी दिल्यास त्याचा फायदा होईल.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120316/4740042484264728918.htm

जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन

एस. डी. जाधव, डॉ. व्ही. के. खर्चे, आर. डी. चौधरी

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पिकाला सूक्ष्म तसेच दुय्यम अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म सुधारतात, सामूवर नियंत्रण राहून जमीन सुस्थितीत राहते. मातीच्या धूपीचे प्रमाण कमी होऊन पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. सोबतच अन्नद्रव्यांचा पिकांना संतुलित पुरवठा होतो.

दिवसेंदिवस जमिनींच्या समस्या वाढतच आहेत. उपलब्ध जमिनी सातत्याने लागवडीखाली असल्याने अन्नद्रव्यांचा सतत ऱ्हास होऊन त्यांची कमतरता जाणवू लागली आहे. मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होत आहे. सध्याच्या काळात रासायनिक खतांची टंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत पीक पोषणासाठी खतांच्या विविध स्रोतांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी शेतावरच उपलब्ध संसाधनांमधून सेंद्रिय घटकांचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, धसकटे यात बऱ्याच प्रमाणात अन्नद्रव्ये असतात. त्यांचा जमीन व्यवस्थापनासाठी वापर करून सुपीकता टिकवणे महत्त्वाचे आहे. एक तर ती जमिनीत गाडून नांगरणी करावी किंवा सर्व सेंद्रिय घटक एकत्रित करून खड्ड्यात कुजविण्यासाठी ठेवावीत.
सेंद्रिय घटकांचे विघटन होण्यासाठी साधारणतः 110 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष तसेच धसकटे इत्यादी कुजविण्यासाठी जानेवारी ते मार्च हा कालावधी उपयुक्त असतो. कारण या कालावधीत बहुतेक खरीप तसेच रब्बी पिकांची काढणी आटोपते. पिकांच्या अवशेषांपैकी सोयाबीनच्या कुटाराचा पशुखाद्य म्हणून उपयोग होतो. कापसाच्या अवशेषांचा वापर इंधन म्हणून वगळता, ज्वारीचे फणकट तसेच गव्हांड्याचा पशुखाद्य म्हणून पाहिजे तेवढा उपयोग होत नाही. कापूस व ज्वारी या पिकांचे अवशेष यंत्राद्वारे बारीक करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करावे. साधारणतः 110 ते 120 दिवसांत चांगले कुजलेले खत तयार होते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात गव्हांड्याचे कंपोस्ट खत तयार करावे. अशा कुजलेल्या सेंद्रिय घटकांमुळे जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म टिकविण्यास मदत होते. तसेच जमिनीची घडण सुधारून जलधारणा शक्तीत वाढ होते, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते. शेतावरच गांडूळ खत तयार करून त्याचा योग्य पद्धतीने व कार्यक्षम वापर करावा.
सध्याच्या काळात शेणखत तसेच नत्र, स्फुरद, गंधकयुक्त खते इत्यादींना पर्याय म्हणून फॉस्फोकंपोस्ट, नायट्रो- फॉस्फो- सल्फो- कंपोस्ट इत्यादी संकल्पना पुढे येत आहेत. रॉक फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, आयर्न पायराईट इत्यादी खनिज पदार्थांचा वापर करून असे खत तयार करता येतात. शेतातील पालापाचोळा, धसकटे, पिकांचे अवशेष इ. सेंद्रिय घटकांचा यात वापर होतो. या खतांमध्ये नत्र, स्फुरद, गंधक इत्यादी अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवून शेणखताला उत्तम असा पर्याय उपलब्ध करून देता येईल. सेंद्रिय खतांचा शेतीमध्ये वापर वाढविण्यास मदत होईल. कारण अशा प्रकारची खते नत्र, स्फुरद, पालाश तसेच गंधकाचे उत्तम स्रोत होऊ शकतात आणि रासायनिक खतांचा होणारा अनाठायी खर्च निश्‍चितच कमी करता येतो. ही खते दुर्मिळ व महाग होत चाललेल्या शेणखताला चांगला पर्याय ठरू शकतात.

हिरवळीच्या पिकांची लागवड ः
सतत लागवडीमुळे जमिनीतील सेंद्रिय घटकाचे प्रमाण कमी होत आहे. अशा परिस्थितीत हिरवळीची पिके म्हणजेच धैंचा, बोरू व ग्लिरिसिडीया यांचा वापर करावा. धैंचा व बोरू या हिरवळीच्या पिकांची साधारणतः एप्रिल- मे महिन्यांत पेरणी करून सहा आठवड्यात नांगरणी करून गाडावीत. ग्लिरिसिडीया या बहुवर्षीय पिकांची बियांपासून किंवा फांद्यांपासून बांधावर लागवड करून हिरवा पाला पीक फुलोऱ्यावर असताना किंवा जोमदार वाढीच्या काळात दोन ओळींत गाडून टाकावे. हिरवळीच्या पिकांच्या नियमित वापरामुळे हळूहळू जमीन सुपीक होऊन बाहेरून वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांच्या मात्रेत कपात करता येऊन खर्चात बचत करता येईल.

जैविक खतांचा वापर ः
रासायनिक खताची तसेच जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर केल्यामुळे पीक उत्पादनात जवळ जवळ दहा टक्‍क्‍यांनी वाढ होते. यामध्ये हवेतील नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू व स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांचा समावेश होतो. द्विदल पिकांना रायझोबियम व पीएसबी हे जिवाणू संवर्धक वापरावे. एकदल पिकांसाठी ऍझोस्पायरिलम व पीएसबी हे जिवाणू संवर्धक वापरावे. जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया पेरणी पूर्वी करावी. दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम जिवाणू खतांची मात्रा पुरेशी होते. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा जैविक खते हा महत्त्वाचा घटक असून इतर निविष्ठांची कार्यक्षमता वाढविणे आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवून पिकांच्या उत्पादकतेत त्यांचा मोठा सहभाग असतो.

संपर्क ः डॉ. खर्चे ः 9657725787
(लेखक मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहे.)

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120319/5028304310486443534.htm

वनरोपवाटिका व्यवस्थापन

वनांचे वाढते महत्त्व व कमी होत चाललेली वृक्षसंपदा यावर वृक्ष लागवड हाच पर्याय असल्याने कृत्रिम वने निर्माण केल्याशिवाय गत्यंतर नाही. यासाठी वनरोपवाटिका मोठ्या प्रमाणात निर्माण करून वनवृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्टे साध्य करणे सोपे होईल.

वनरोपवाटिकेमध्ये प्रत्यक्ष बी रोपण, छाटांपासून आणि तयार रोपांचे स्थानांतर करून रोपेनिर्मिती केली जाते. शुष्क वनरोपवाटिकेमध्ये पाण्याचा वापर कमीत कमी केला जातो. शक्‍यतो पावसाचे आगमन होण्यापूर्वी बियाणे वाफ्यावरती पेरले जाते. पाण्याची उपलब्धता असलेल्या रोपवाटिकेत कृत्रिमरीत्या पाणीपुरवठा आणि पाणी व्यवस्थापन करून रोपे तयार केली जातात. या रोपवाटिकेत चांगल्या दर्जाची रोपे होतात. पाण्याच्या नियोजनामुळे खत, तण व्यवस्थापन करणेही सोपे होते.

रोपवाटिका करण्यापूर्वी आपणास बियाणे मिळण्याचा हंगाम, प्रति किलोमागे असणारे एकूण बियाणे, बियाणे संस्करण करण्याची पद्धत, उगवणक्षमता इत्यादीची माहिती असणे गरजेचे असते. आवश्‍यक असलेल्या प्रजातीचे बियाणे जमा केल्यानंतर ते चांगले वाळवून त्यास शिफारशीत बुरशीनाशकांद्वारे संस्करण करून साठविल्यास बुरशी-रोगापासून बचाव होऊ शकतो. काही वनस्पतींचे बियाणे उदा. नीम, सीता अशोक, जांभूळ, आंबा आपण जास्त दिवस साठवून ठेवू शकत नाही. बियाणे संस्करण पद्धतीचा अभ्यास करूनच त्या त्या प्रजातीची पेरणी केल्यास आपणास उगवणीची टक्केवारी निश्‍चित जास्त मिळून येईल. बियाणे उगवल्यानंतर रोपांचे ऊन, पाऊस, वारा, थंडी, धुके इ. गोष्टींपासून बचाव होण्यासाठी निवारा किंवा सावली करणे आवश्‍यक असते. सावलीसाठी गवत, बांबूच्या पट्ट्या, नारळाच्या झावळ्या, झाडांचा पाला, प्लॅस्टिक, पॉलिथिन, शेडनेट इत्यादी गोष्टी वापरतात. सद्यःस्थितीत शेडनेट काळ्या-हिरव्या रंगात उपलब्ध आहे. 50-100 टक्के प्रकाश देणाऱ्या जाळ्या आपणास प्रजातीनुसार वापरता येतात.

दर्जेदार रोपांसाठी मातीची सुपीकता वाढविणे रोपवाटिकेत आवश्‍यक असते. त्यासाठी मातीत कुजलेले शेणखत, जंगलामधील जमिनीच्या वरच्या थरातील कुजलेला पालापाचोळा, हिरवळीचे खत, गांडूळ खत इ. गोष्टींचा अंतर्भाव करणे आवश्‍यक असते. त्यासाठी रोपवाटिकेबरोबरच नैसर्गिक खतनिर्मिती प्रकल्प उभारणी केल्यास रोपवाटिकेमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. रोपेनिर्मितीवेळी एकदाच खते देऊ नयेत. खते आवश्‍यकतेनुसार द्यावीत. चांगली दर्जेदार रोपेनिर्मितीचा उद्देश ठेवून लागवड क्षेत्रासाठी रोपे बनविली जातात. तथापि, रोग, किडी इ. गोष्टींमुळे रोपे दर्जेदार होऊ शकत नाहीत. यासाठी रोग, किडी व्यवस्थापन हा घटक रोपवाटिकेत फार महत्त्वाचा असतो. वाळवी, पाने कुरतडणाऱ्या अळ्या, अन्नद्रव्य शोषणाऱ्या किडी, खोडकिडी, मुंग्या इ. मुळे रोपवाटिकेत मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी रोपवाटिकेत स्वच्छता असणे आवश्‍यक असते. मूळकूज, भुरी, कवड्या, कॉलर रॉट इ. बुरशीजन्य रोग मुख्यत्वेकरून रोपवाटिकेत आढळून येतात. रोग-किडी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड-रोग पद्धती रोपवाटिकेत चांगली ठरते.

संपर्क ः (02358) 283655
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120307/5461905968484580346.htm

पर्जन्य जलसंवर्धन ही काळाची गरज

पावसाचे पाणी योग्य पद्धतीने साठवून त्याचा काटेकोर वापर करणे येत्या काळात महत्त्वाचे आहे. उपलब्ध पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी, कारखानदारीसाठी करून विकास साधणे आवश्‍यक आहे. जलसंधारणाच्या योग्य पद्धतीने पावसाचे पाणी साठवल्याने ते जमिनीत मुरेल. त्याचा पाणीपुरवठ्यासाठी वापर करता येईल. काही भागांत पावसाचे पाणी हेच जीवनमानासाठी उपयुक्त आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि दररोजच्या पाण्याच्या गरजा भागवणारी प्रणाली आहे. छतावरून आणि छपरावरून गोळा केलेले पाणी पिण्यासाठी योग्य असेलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही, त्यामुळे अशा पाण्याला प्रक्रिया करून वापरणे आवश्‍यक ठरते. जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. तेथे ही प्रणाली उपयुक्त ठरते. पावसाचे पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्ये एखाद्या घरगुती वापरापासून ते चांगल्या पद्धतीचे संपूर्ण गावाचे विकासासाठी आखणी आणि नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्याचा पाठपुरावा दरवर्षी करून ते करणे शक्‍य होते. या पद्धतीत त्या भागात होणारे वार्षिक पाऊसमान मिलिमीटर x क्षेत्र चौरस मीटर = लिटर पाणी प्रति वर्षी असा हिशोब तयार करून ते करावे लागते. उदा. 200 चौरस मीटर छपरावरून वाहणारे पाणी x 1000 मिलिमीटर सरासरी पाऊसमान = 22 किलो लिटर प्रति वर्षी पाणी साठवणे शक्‍य असते.

पाणी साठवण टाक्‍यांमध्ये पाण्याची साठवण करावयाची झाल्यास अशा टाक्‍यांना झाकण असणे गरजेचे असते. तसेच शेवाळाची वाढ थांबवणे आणि पाणी दूषित होण्याचा धोका कमी करणे शक्‍य असते.

घराशेजारी मोठा खड्डा घेऊन तो आतून प्लॅस्टर करावा लागतो. त्यामुळे त्या खड्ड्यात निचऱ्याचे पाणी शिरण्यास प्रतिबंध होतो. तसेच बाहेरून वाहून येणाऱ्या पाण्यासही प्रतिबंध करता येतो. केरळमधील कन्नूर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये टाक्‍यांमध्ये पाणी साठवून वापर करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. पावसाचे पाणी भूगर्भात साठवून भूगर्भाची पाणीपातळी वाढविली जाते. ही पद्धती अमेरिकेत आणि युरोपमध्ये आता प्रचलित झाली आहे. हे काम करणाऱ्या कंपन्याही जगभर स्थापन झाल्या आहेत. जेव्हा पाणी कपातीचे प्रश्‍न निर्माण होतात. तेव्हा शहरी भागासाठी ही पद्धती अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या पद्धतीने जेथे पाणी वापरावयाचे आहे तेथेच ते साठवून त्याचा उपयोग करणे शक्‍य आहे.

पावसाचे पाणी साठविण्यासाठी कायदे :
(1) अमेरिकेसारख्या संघ राज्यात काही राज्यांचे कायदे हे जमीन मालकांच्या बाजूने आहेत. तर काही राज्यांचे कायदे हे राज्याची पाणी उत्पादन या दिशेने केले आहेत. अशा राज्यात पाणी साठवणाऱ्यांचा हक्क फक्त साठवण्यापुरताच मर्यादित आहे. मात्र ते पाणी साठविण्यासाठी राज्यातील सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज असते. उदाहरणार्थ, अमेरिकेतील कोलेरोडो राज्यात घराच्या छताचे वरून वाहणारे पाणी तुम्ही परवानगी घेतल्याशिवाय साठवू शकत नाही.
(2) ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियामध्ये पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली आहे. तेथे घर मालकांना अशा प्रकारे पाणी साठवण करून वापरण्याची मुक्तता आहे.
(3) श्रीलंका : श्रीलंकेत शहरी विकास प्राधिकरण हे पावसाचे पाणी साठविण्यास प्रोत्साहन देत आहे.

पावसाच्या साठवलेल्या पाण्याची प्रत :
पावसाचे पाणी हे हवेतील, छतांवरील धुळीमुळे दूषित होते, त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी योग्य ठरतेच असे नाही. अशा पाण्यात जंतूंचे प्रमाणही अधिक असते; परंतु अशा पाण्याची प्रत चांगली असल्यास ते सर्व कारणासाठी वापरले जाते. अशा पाण्यात चुना, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅश, क्‍लोरिन, सल्फेट यांचे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे कार्बन-डाय-ऑक्‍साईड, नाट्रस ऑक्‍साईड याचेही प्रमाण अधिक असते. ते प्रमुख्याने पहिल्या पावसाचे पाणी गोळा केले जाते. त्यात अधिक प्रमाणात असते. त्यासाठी पहिल्या पावसाचे पाणी वेगळ्या पद्धतीने प्रथम इतरत्र सोडून देऊन त्यानंतरचे पाणी साठविण्याची त्यांची पद्धत आहे. त्यासाठी पाणी तपासणी करणेही गरजेचे असते आणि ते चांगले असल्यास ते पाणी वापरण्यास योग्य असते. काही ठिकाणी सोलर कुकरद्वारे ते प्रथम उकळून नंतर ते साठवले जाते. ब्राझीलमध्ये अशा पाण्यात क्‍लोरिन मिसळून ते जंतूरहित करून वापरले जाते. त्यामुळे सोलर कुकरही स्वस्तात पाणी शुद्ध करण्याची प्रणाली जगभर वापरली जाते.

प्राचीन काळातील संकल्पना :
पॅलेस्टाईन, ग्रीस, रोम येथे इ.स. पूर्व 300 वर्षांपासून ही संकल्पना वापरली जाते. बलुचिस्तान आणि कच्छ भागात शेतकरीवर्ग पाणीसाठे करून शेतीसाठी वापरीत असत. तमिळनाडूमध्ये चोल राज्याने तशाच प्रकारच्या योजना प्रथम अस्तित्वात आणल्या. भारतातील एलिफंटा गुहेमध्ये अशा प्रकारे पाणी साठवण्याची सोय आहे. तसेच ब्रिहदेश्‍वर मंदिर परिसरातही शिवगंगा तळ्यात पाणी साठवण करून वापरले जाई.

सद्यःस्थिती :
(1) चीन, ब्राझीलमध्ये छतावरील वाहून जाणारे पाणी साठवून वापरले जाते आहे. त्याच प्रकारे साठवलेल्या पाण्यावर जनावरांचे संगोपन करण्याचे काम केले जाते. अशा प्रकारचे प्रकल्प सध्या मोठ्या प्रमाणात आखले जात आहेत.
(2) बरमुडामध्ये घरामध्ये पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी कायदा आहे. सिनेगल आणि गिआनामध्ये अशाच प्रकारे काम चालू आहे.
(4) युरोपमध्ये प्रत्येक बगीच्यामध्ये पाणी साठवण व्यवस्था केली जाते. त्या त्या बागेतील झाडे त्याच पाण्यावर जगवली जातात.
(5) ब्रिटिश शासनाने पावसाचे पाणी टाक्‍यांमध्ये साठवून स्वच्छतेच्या कामासाठी वापरण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे 50 टक्के पाण्याची गरज अशा प्रकारे भागवली जाते.
(6) म्यानमारमध्ये भूगर्भातील पाणी खारवट असल्याने पावसाचे पाणी साठवण्यावर त्याचाच वापर केला जात आहे.
(7) मेक्‍सिकोमध्ये पावसाचे पाणी साठवणे सक्तीचे केले आहे.
(8) बीजिंगमध्ये काही गृहरचना संस्था अशा प्रकारे पाणी साठवण करून सभासदांना पुरवठा करीत आहेत.
भारतातील स्थिती
(1) तमिळनाडू : प्रत्येक इमारत बांधकामांना पावसाचे पाणी साठवण्याची सक्ती आहे. तेथील गेल्या पाच वर्षांचे अभ्यासात भूगर्भाचा पाणीसाठा वाढल्याचे लक्षात आले आहे.
(2) राजस्थान : फार प्राचीन काळापासून पावसाचे पाणी साठवून वापरले जाते आहे.
(3) केरळ ः पावसाचे पाणी साठवून वापरण्याचे प्रकल्प आकार घेत आहेत.
(4) महाराष्ट्र ः किल्ल्यावर खास पाणी साठवणुकीसाठी टाके आढळतात. पूर्वी या पाण्याचा वापर होत होता. आता विदर्भात काही प्रकल्प आकार घेत असून, जेथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तेथे तळी आणि तलावाचे बांधकाम होत आहे.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120308/4753423128981250651.htm

ग्रीन करिअर्स- कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका

द. वा. आंबुलकर


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चरल एक्‍स्टेंशन मॅनेजमेंट, हैदराबाद येथे उपलब्ध असणाऱ्या कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्‍यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदारांनी कृषी, कृषी विपणन, सहकार, कृषी अभियांत्रिकी, बायोटेक्‍नॉलॉजी, दुग्धोत्पादन, मत्स्यपालन, अन्नप्रक्रिया, वन व्यवस्थापन, फलोत्पादन, पशुचिकित्सा, ह्युमॅनिटीज, विज्ञान, समाजशास्त्र, इंजिनिअरिंग, वाणिज्य वा अर्थशास्त्र यांसारख्या विषयांतील पदवी कमीत कमी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

याशिवाय त्यांनी 2011 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकतातर्फे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विविध शाखांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात आलेल्या सीएटी-2011 ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

निवड प्रक्रिया ः
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता, गुणांची टक्केवारी व "कॅट'मधील गुणांकांच्या आधारे त्यांना दोन वर्षे कालावधीच्या कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.

अर्जाचा नमुना व तपशील ः
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चरल एक्‍स्टेंशन मॅनेजमेंट, हैदराबादच्या www.manage.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 200 रुपयांचा "एमएएनएजीई'च्या नावे असणारा व हैदराबाद येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 040 - 24016704 अथवा 24001260 वर संपर्क साधावा.

अर्जासह पाठवायचे शुल्क ः
अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून 1200 रुपयांचा (राखीव गटातील उमेदवारांनी 600 रुपयांचा) "एमएएनएजीई'च्या नावे असणारा व हैदराबाद येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्‍यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख ः
संपूर्णपणे भरलेले व आवश्‍यक ती कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चरल एक्‍स्टेंशन मॅनेजमेंट, कृषी विभाग, राजेंद्रनगर, हैदराबाद 500 030 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2012.

ज्या पदवीधरांना कृषी व्यवस्थापन क्षेत्रात पुढील करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा जरूर विचार करावा.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120313/4929125655456620470.htm

औषधी अडुळसा

डॉ. दिगंबर मोकाट, कु. वैशाली चोगले

अडुळशाच्या खोडाच्या छाटापासून रोपे तयार करून लागवड करता येते. कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर एक मीटर दोन झाडांतील अंतराने रोपांची लागवड जून, जुलै महिन्यांत पाऊस पडल्यानंतर करावी. विविध आजारांवर उपयुक्त असलेले हे झुडूप प्रत्येकाच्या घरी असलेच पाहिजे.

अडुळसा हे अकॅन्थॅसी कुळामधील झुडूप असून, त्याचे शास्त्रीय नाव Justicia Adhatoda आहे. ही सदाहरित असणारी दोन ते तीन मीटर वाढणारी प्रजाती काही ठिकाणी कुंपणासाठी लागवड केलेली आढळते. पाने हिरवी, लांबट, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. मध्यम आकाराच्या या झुडपाचे सोटमूळ लांब वाढते. खोडाला पाने समोरासमोर येतात. पेरे फुगलेली असतात. फुले पांढरी असतात व फुलांना देठ नसते.

ही वनस्पती उष्ण व दमट हवामानात चांगली वाढते. कमी पावसाच्या प्रदेशात या वनस्पतीची लागवड करता येते. जमीन निचरा होणारी, हलकी, मध्यम लागवडीसाठी उत्तम असते. पोयटा, गाळाची, वाळूमिश्रित जमीनही लागवडीसाठी चालते. समशीतोष्ण प्रदेशात ज्या ठिकाणी पाऊस भरपूर पडतो, त्या ठिकाणी वाढ चांगली आढळून येते. किनारपट्टी प्रदेशात कुंपणाला याची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील कोकणपट्टी, ओरिसा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू व बंगाल तसेच समुद्रकाठच्या प्रदेशात या वनस्पतीची लागवड दिसून येते.

लागवड तंत्र ः
खोडाच्या छाटापासून रोपे तयार करून लागवड करता येते. कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर एक मीटर दोन झाडांतील अंतराने लागवड करावी. शेतजमिनीत सलग लागवड करावयाची झाल्यास दोन झाडांत 1 x 1 मी. अंतर ठेवावे. परिपक्व खोडाचे छाट काढून ते 12 ते 15 सें.मी. आकाराचे तयार करावेत. जमिनीकडील भाग तिरका कापून लागवड प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये करावी. छाट फुटण्यास सुरवात झाल्यानंतर रोपांची लागवड जून, जुलै महिन्यांत पाऊस पडल्यानंतर करावी. जमिनीत पाणी भरून राहणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर मूळकूज रोग येण्याची शक्‍यता असते. त्यासाठी वेळीच रोगनियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

काढणी ः
लागवडीनंतर वाढीनुसार पाने तोडणी सुरू करावी. साधारणतः चांगली झाडे वाढल्यास सहा महिन्यांपासून पाने तोडणीयोग्य होतात. परिपक्व गर्द हिरवी पाने काढून मागणीप्रमाणे तयार करावीत. काही वेळा वाळलेल्या स्वरूपात, तर काही वेळा ताज्या स्वरूपात औषध निर्मितीसाठी लागतात. अपरिपक्व व पिकलेली पाने औषधासाठी वापरू नयेत. पहिल्या तोडणीनंतर तीन महिन्यांच्या अंतराने तोडे करावेत. पाण्याचे व खताचे उत्तम नियोजन केल्यास पानांचे उत्पादन चांगले येते. दोन वर्षे वयाच्या प्रति झाडापासून सरासरी प्रत्येक तोड्यास एक किलो ताजी पाने मिळतात.

औषधी उपयोग ः
अडुळसा वनस्पतीच्या पानात व्हॅसिसीन अल्कीलॉईज असते. क्षयरोग, कफ, दमा, अस्थमा, खोकला या विकारांसाठी अडुळसा रामबाण म्हणून वापरला जातो. कफावर ज्यात फार दिवस खोकला येतो, बारीक ताप येतो तेव्हा दहा ग्रॅम म्हणजे चार चमचे रस व तितकाच मध व चिमूटभर पिंपळीचे चूर्ण एकत्र करून हे चाटण वरचेवर घेत राहावे. कफ मोकळा होतो व बरे वाटते. धाप लागणे, दमा यावरदेखील अडुळसा वापरला जातो. नाकातून, तोंडातून रक्त येत असेल तर पानांचा रस समभाग खडीसाखर घालून देतात. अडुळशाच्या फुलांचा अवलेह रक्त पित्त कमी करण्यासाठी वापरतात. पानांचा रस किंवा काढा मधाबरोबर आवाज बसला असता उपयुक्त असतो. आम्लपित्त, तापामध्ये आणि त्वचारोगामध्ये पंचतिक्ताचा (अडुळसा, काटेरिंगणी, कडुनिंब साल, गुळवेल, कडूपडवळ) काढा आणि सिद्धघृत दोन वेळा देतात. घरगुती वापर होताना तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे.

संपर्क ः डॉ. मोकाट - 9420907098
(लेखक वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.)

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120313/5478629246599291387.htm

ब्रॉयलर पक्ष्यांचे फार्मवरील व्यवस्थापन

डॉ. व्ही. डी. लोणकर, डॉ. ए. एस. कदम

पिल्लांना शेडमध्ये आणल्यानंतर प्रथम त्यांचे सरासरी वजन करून रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवावी. शिफारशीत मात्रेमध्ये औषधीयुक्त पिण्याचे पाणी पिल्लांना द्यावे. प्रत्येक पिल्लाची चोच पाण्यामध्ये बुडवून अलगद ब्रुडरखाली सोडावे. पिल्लाची चोच पाण्यात बुडवल्याने ते पाणी पिण्यास आपोआप शिकते.

एकदिवसीय पिल्लांच्या पोटात बलक आतड्यास जोडलेल्या अवस्थेत असतो. त्याचा पिल्लास खाद्य म्हणून उपयोग होतो. त्यात प्रतिबंधक द्रव्ये असल्याने पिल्लांचे पहिल्या आठवड्यात रोगापासून संरक्षणही होते. पूर्वीच्या संशोधनानुसार असे म्हटले जायचे, की पहिले 48 तास पिल्लांना खाद्य - पाणी दिले नाही, तरीसुद्धा पिल्ले त्यांच्या पोटात असलेल्या बलकाचा खाद्य म्हणून वापर करतात; परंतु सध्याच्या नवीन संशोधनानुसार असे आढळून आले आहे, की पक्ष्यांना जेवढे लवकर आपण खाद्य व पाणी देऊ, तेवढ्या गतीने बलकाचा वापर खाद्य म्हणून केला जातो. एवढेच नव्हे, तर पिल्लांना लवकर खाद्य व पाणी दिल्याने त्यांच्या वजनात वाढ होते, त्यांच्या आतड्यांची वाढ गतीने होऊन त्यांची पचनक्रिया जलद होते.

पिल्ले फार्मवर येण्याअगोदर लिटर (गादी), ब्रुडर, चीक गार्ड यांची रचना योग्य पद्धतीने करावी. याबाबतची माहिती मागील भागात दिली होती. तसेच, ब्रॉयलर प्रीस्टार्टर हे खाद्य पेपरवरती पसरून द्यावे. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याची व्यवस्था करून ठेवावी. पिल्ले आल्यानंतर प्रथम त्यांचे सरासरी वजन करून रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवावी. मागील भागामध्ये सांगितल्याप्रमाणे औषधीयुक्त पिण्याचे पाणी पिलांना द्यावे. प्रत्येक पिल्लाची चोच पाण्यामध्ये बुडवून अलगद ब्रुडरखाली सोडावे. पिल्लांची चोच पाण्यात बुडवल्याने ती पाणी पिण्यास आपोआप शिकतात.

ब्रुडर्समध्ये पिल्लांना वाढविण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी ः
1) पिल्लांना कृत्रिम दायीमार्फत त्यांच्या वाढीसाठी योग्य प्रकारे ऊब द्यावी लागते. साधारणतः दोन आठवडे उन्हाळ्यामध्ये व तीन आठवडे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पिल्लांना ऊब द्यावी, त्यानंतर ब्रुडर्स काढून टाकावेत. पिल्लांना उष्णता देताना पहिल्या आठवड्यामध्ये तापमान 95 अंश फॅ. (35 अंश से.) एवढे ठेवावे. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला तीन अंश से. (पाच अंश फॅ.) याप्रमाणे तापमान कमी करत - करत ते 70 अंश फॅ. (21 अंश से.) वर स्थिर करावे.
2) पिल्लांना प्रकाश आकर्षित करतो. हवेशीर व चांगले वायुविजन असलेल्या घरट्यामध्ये पक्ष्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण सुधारते, वाढ चांगली होते. पक्ष्यांची घरे हवेशीर असावीत; परंतु जोराचा वारा पिल्लांवर येऊ नये याची काळजी घ्यावी लागते. उबवणुकीच्या घरट्यामध्ये हवा चांगली खेळती नसेल, तर घरट्यामधील कार्बन मोनॉक्‍साईड, कार्बन डाय- ऑक्‍साईड वायूचे प्रमाण वाढते, गादी ओली होते व पक्षी निरनिराळ्या रोगांना बळी पडतात. घरट्यामध्ये अमोनियाचे प्रमाण वाढल्यास पिल्लांचे डोळे चुरचुरतात. पिल्लांना श्‍वसनसंस्थेचे रोग होतात, त्यांची वाढ खुंटते.
3) आवश्‍यकतेनुसार वाढणाऱ्या पक्ष्यांना लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा विचार करता चीक गार्ड थोडे-थोडे सरकावून उबवणुकीची जागा वाढवावी.
4) उबवणुकीच्या घरट्यामध्ये 30 ते 75 टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रता असणे आवश्‍यक आहे. घरट्यामध्ये जास्त आर्द्रता झाल्यास गादी ओली होते व

कॉक्‍सिडीऑनीसचे आजार उद्‌भवतात.
5) उबवणुकीनंतरच्या काळामध्ये घरामध्ये रात्री मंद उजेड ठेवावा. अंधारामुळे पिल्लांना घबराट होऊन ती चेंगरून मरण्याचा संभव असतो.
6) ओल्या झालेल्या गादीमध्ये हायड्रेटेड लाइम (0.4 कि.ग्रॅ. प्रति 18 चौ. फूट या प्रमाणात) आणि सुपर फॉस्फेट (एक कि. ग्रॅ. प्रति 10 चौ. फूट या प्रमाणात) मिसळावे. यामुळे गादीमधील अतिरिक्त पाण्याचे शोषण होऊन तूस कोरडे होण्यास मदत होते.

ब्रॉयलर पक्ष्यांसाठी खाद्याची व पाण्याची भांडी ः
सध्या गोल उभी टांगता येण्यासारखी खाद्य भांडी (ट्यूब फीडर्स) उपलब्ध आहेत. साधारणतः एक ते चार आठवडे वयापर्यंत एक भांडे प्रति 40 ते 50 पक्षी या प्रमाणात, तर पाच ते सहा आठवडे वयापर्यंत एक भांडे प्रति 25 पक्षी या प्रमाणात ठेवावे. खाद्याच्या भांड्यांना वर जाळी बसवलेली असते, त्यामुळे खाद्याची नासाडी होत नाही. खाद्याचे भांडे काठोकाठ भरू नये, त्यामुळे खाद्य सांडून वाया जाण्याची शक्‍यता अधिक असते. खाद्याचे भांडे नेहमी अर्धे ते पाऊण भाग एवढे भरावे. खाद्याच्या भांड्याची उंची नेहमी पक्ष्याच्या पाठीच्या उंचीएवढी टांगती ठेवावी.

पाण्याचे भांडे खाद्याच्या दोन भांड्यामध्ये समान अंतरावर गाडीच्या चाकाच्या आरीप्रमाणे ठेवावे. दोन आठवडे वयापर्यंत 100 पक्ष्यांमागे दोन लिटर क्षमतेची दोन भांडी व तीन ते सहा आठवड्यापर्यंत चार लिटर क्षमतेची दोन भांडी ठेवावीत. सध्या बाजारामध्ये स्वयंचलित घंटेच्या आकाराची (बेल ड्रिंकर) भांडी उपलब्ध आहेत. त्यांचा वापर ब्रुडिंगनंतरच्या काळामध्ये अधिक चांगल्या प्रकारे होतो.

संपर्क ः डॉ. लोणकर ः 9420243895
(लेखक कुक्कुटपालनशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120313/5723068681543923964.htm

बहुपयोगी कदंब

डॉ. दिगंबर मोकाट

कदंबाची फळे खाण्यायोग्य पौष्टिक असतात, याची पाने गुरे आवडीने खातात. घरबांधणीसाठी या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो. सावली आणि परिसर सुशोभीकरणाला उपयुक्त असा हा वृक्ष आहे. कळम वृक्षांच्या सालीचे तंतू दोरनिर्मितीसाठी, लाकूड फर्निचर, शेती अवजारे व कोरीव कामासाठी आणि पेपरनिर्मितीसाठी वापरली जातात. दोन्ही वृक्षांचे महत्त्व लक्षात घेता याची लागवड वाढवणे गरजेचे आहे.

कदंब हा मूळचा मलेशियातील वृक्ष आहे. आर्द्र, दमट प्रदेशातील पर्णझडी, सदाहरित जंगलात हा वृक्ष आढळतो. हा देखणा वृक्ष 15 ते 20 मीटरपर्यंत वाढतो. सरळ गोलाकार मुख्य बुंधा आणि काहीशा 90 अंशाच्या कोनात येणाऱ्या फांद्या, त्यांची विशिष्ट मांडणी, आकाराने मोठी असलेली पाने या वृक्षाची ओळख पटवून देतात. पिवळ्या चेंडूसारखे दिसणारे गोलाकार पुष्पगुच्छ, सुवासिक असतात, पुष्पगुच्छाचे रूपांतर फळात होऊन फळांचा आकार संत्र्याएवढा होतो. नोव्हेंबरपासून या वृक्षांस फुले येण्यास सुरवात होते. परिपक्वतेनंतर यात बारीक आकाराच्या बिया तयार होतात. मध्यम वाढणारा सुंदर वृक्ष, विशिष्ट पद्धतीने वाढणाऱ्या फांद्या, मोठी पाने यामुळे शोभेसाठी बागांमध्ये याची मुद्दामहून लागवड केली जाते. झटपट वाढणारा हा वृक्ष वर्षाला सरासरी दहा फूट वाढतो.

कदंबाची परिपक्व फळे जमा करून सावलीत वाळवावीत. फळे सुकल्यानंतर त्यातून लहान आकाराचे बियाणे मिळते. बियाणे पेरणीसाठी कापडी पिशव्यांत साठवले जाते. चांगले सुकलेले बियाणे सहा महिन्यांपर्यंत टिकते. बियाणे गादीवाफ्यावर किंवा प्लॅस्टिक बॅगमध्ये रोपे निर्मितीसाठी पेरले जाते. बियाणे पेरतेवेळी माती, वाळू आणि शेणखत याचे प्रमाण 2ः1ः1 असे ठेवावे. मातीत निंबोळी किंवा करंज पेंड मिसळावी, गादीवाफे किंवा पिशव्या झाडांच्या सावलीत अथवा शेडनेट 50 टक्के सावलीसाठी वापरल्यास रुजवा चांगला मिळतो व रोपे चांगली तयार होतात. दोन ते तीन फूट वाढलेली रोपे लागवडीयोग्य असतात. मध्यम, हलकी, भारी निचऱ्याची जमीन लागवडीसाठी योग्य असते, या झाडास पाणी भरपूर लागते. खते, पाणी यांचे नियोजन केल्यास वाढ झपाट्याने होते. लागवड 5 x 5 मी. अंतराने केली जाते.

उपयोग ः
जनावरे याची पाने आवडीने खातात. लाकूड पांढरट पिवळसर, मऊ असते. दार्जिलिंग परिसरात चहाची खोकी बनविण्यासाठी याचे लाकूड वापरले जाते. घरबांधणीसाठी या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो. सावली आणि परिसर सुशोभीकरणाला उपयुक्त असा हा वृक्ष आहे. आगपेट्या, बुटाचे तळवे, पॅकिंगचे बॉक्‍स, पेपर इत्यादी निर्मितीसाठी वापर केला जातो.

औषधी उपयोग ः
साल, पाने, फळे वापरली जातात. खोडाची साल कफ, दुर्बलता, हगवण, ताप, जळजळ, अल्सर, ओकारी आणण्यासाठी आणि जखमा भरून आणण्यासाठी वापरतात. फळे तापावर गुणकारी मानली जातात. परंपरागत औषधीमध्ये सर्पदंश, ताप, गर्भनिरोधक म्हणून वापरले जाते.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120318/4762948773655244688.htm

कुक्कुटपालनातील व्यवस्थापन

डॉ. व्ही. डी. लोणकर, डॉ. ए. एस. कदम

ब्रॉयलर ब्रुडिंगमधील व्यवस्थापन

सुरवातीच्या काळामध्ये पिलांच्या पंखांची वाढ होण्यासाठी, तसेच त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी कृत्रिम उष्णतेची आवश्‍यकता असते. त्यालाच आपण ब्रुडिंग म्हणतो. पक्ष्यांचे व्यवस्थापन करताना कुक्कुटपालकांनी सुरवातीच्या काळामध्ये पिल्लांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

एक दिवसीय ब्रॉयलर पक्ष्यांची पिल्ले फार्मवर आणल्यापासून ते साधारणत: उन्हाळ्यात वयाच्या दोन आठवड्यांमध्ये व वयाच्या तीन आठवड्यांपर्यंत थंडीमध्ये त्यांना कृत्रिमरीत्या उष्णता देणे गरजेचे असते. सुरवातीच्या काळामध्ये पिलांच्या पंखांची वाढ होण्यासाठी व त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी कृत्रिम उष्णतेची आवश्‍यकता असते. त्यालाच आपण ब्रुडिंग असे संबोधितो. ही कृत्रिम उष्णता ज्या उपकरणाच्या साह्याने पिलांना दिली जाते. त्यास ब्रुडर किंवा कृत्रिमदायी असे म्हणतात.

सर्व कुक्कुटपालकांनी सुरवातीच्या काळामध्ये ब्रुडिंगची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

ब्रॉयलर पक्षी जोपासनेसाठी गादी (डीप लिटर) पद्धत सर्वांत जास्त लोकप्रिय सर्वत्र प्रचलित व सर्वसाधारण कुक्कुटपालकांना सहज करता येण्याजोगी आणि परवडणारी पद्धती आहे. ब्रुडिंग व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याकडे खालील साधने उपलब्ध असणे आवश्‍यक आहे.

1) गादीसाठी वापरण्यात येणारे तूस (साळीचा भुसा किंवा लाकडाचा भुसा किंवा सोयाबीनचे बारीक काड इ.).
2) 1.0 ते 1.5 फूट उंचीचे प्लॅस्टिकचे अथवा पत्र्याचे अथवा जाड पुठ्ठ्यांचे चीक गार्डस.
3) पिलांना कृत्रिम उष्णता देण्यासाठी ब्रुडर (कृत्रिमदायी)
4) इलेक्‍ट्रिक बल्ब (साधारणत: 250 पिलांसाठी 60 वॉटचे चार बल्ब)
5) प्रत्येकी 250 पिलांच्या ब्रुडिंग युनिटसाठी एक बांबूची टोपली.
साधारणत: 250 ते 300 पिलांसाठी एक ब्रुडिंग युनिट याप्रमाणे कुक्कुटपालकांनी तयारी करावी. कारण त्यामुळे ब्रुडिंग व्यवस्थापन सहज व सोपे जाते.

ब्रुडिंगची तयारी :
पक्षीगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे अत्यावश्‍यक आहे. पक्षीगृहाच्या मध्यभागी 250 ते 300 पिलांच्या युनिटसाठी 1.2 मीटर त्रिज्येचे वर्तुळ तयार होईल, अशा पद्धतीने चीक गार्डस उभे करून घ्यावेत. त्यांना स्टॅंडच्या साह्याने आधार द्यावा. चीक गार्डसचा वापर केल्यामुळे पिल्ले ब्रुडरपासून फार लांब जात नाहीत. त्यांना थंडीची बाधा होणार नाही किंवा एकमेकांवर पडून गुदमरणार नाहीत. चीक गार्डस उभे केल्यानंतर वर्तुळाकार जागेमध्ये पाच ते सहा इंच थर येईल अशा पद्धतीने स्वच्छ व कोरडे तूस पसरून घ्यावे. त्यानंतर तुसापासून साधारणत: आठ ते नऊ इंच उंचीवर बांबूची टोपली (ब्रुडर) उलटी टांगावी. टोपलीच्या आतील भागामध्ये चार होल्डर बसवून 60 वॉटचे बल्ब लावण्याची सुविधा करावी. अशा प्रकारचे ब्रुडर्स अथवा कृत्रिमदायी घरच्या घरी सहज बनवता येते. अथवा बाजारातून उपलब्ध करता येते. पसरलेल्या तुसावरती वर्तमानपत्राचे तीन ते चार थर अंथरून द्यावेत. जेणेकरून पिलांना पहिले दोन ते तीन दिवस खाद्य पेपरवरती पसरून देता येईल.

दोन लिटर क्षमतेची भांडी प्रत्येकी 100 पिलांना एक याप्रमाणे औषधी टाकलेल्या पाण्याने भरून ठेवावीत. कृत्रिमदायी चालू स्थितीत आहे का, याची खात्री करावी. पिल्ले फार्मवर येण्याअगोदर साधारणत: चार ते पाच तास कृत्रिमदायी चालू करून ठेवावी.
पहिल्या दिवशी ब्रॉयलर पिलांना देण्याचे औषधीयुक्त पाणी खालीलप्रमाणे तयार करावे.

1) पाणी निर्जंतुक करून वापरावे.
2) पक्ष्यांवरील ताण कमी करणाऱ्यासाठी जीवनसत्त्व अ, ड, इ, आणि क अशी असणारी औषधे शिफारशीत मात्रेमध्ये पाण्यातून द्यावीत.
3) आठ ग्रॅम ग्लुकोज प्रति लिटर पिण्याच्या पाण्यामधून पिल्लांना द्यावे.
4) इलेक्‍ट्रोलाईट पावडर 14 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून द्यावी.

वर नमूद केल्याप्रमाणे पिलांना औषधीयुक्त पाणी द्यावे. पिण्याच्या पाण्याची भांडी पेपरवरती ठेवताना भांड्यातील पाणी सांडून तूस व पेपर ओले होणार नाहीत, याची काळजीपूर्वक दखल घ्यावी.

पिल्ले फार्मवर येण्यापूर्वीची तयारी :
अ) ब्रुडर सुरू करावेत.
ब) औषधीयुक्त पाण्याची भांडी भरून ठेवलेली असावीत.
क) पेपरवरती खाद्य पसरवून ठेवलेले असावे.
ड) विजेची गैरसोय होत असल्यास त्याला पर्यायी व्यवस्था करून ठेवलेली असावी.

संपर्क : डॉ. व्ही. डी. लोणकर : 9420243895
(लेखक कुक्कुटपालन शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120313/5372708838033488895.htm

अभ्यास पाण्यातील घटकांचा...

डॉ. रामचंद्र साबळे

पृथ्वीचा 70 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. ते द्रव, बर्फ आणि वाफेच्या स्वरूपात असते. द्रवरूप ते वाफ किंवा बाष्परूप ते द्रवरूप होण्यासाठी तापमान आणि हवेचा दाब या दोन हवामान घटकांवर ते अवलंबून असते. धुके हे बाष्परूप पाण्यामुळे निर्माण होते. पाण्याला वास किंवा रंग नसतो किंवा एक विशिष्ट चव नसते. अनेक पदार्थ पाण्यात मिसळतात. पाण्यातील विशिष्ट पदार्थांच्या प्रमाणानुसार त्याची चव बदलते; किंवा काही पदार्थ पाण्यात मिसळतही नाहीत. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण 55 ते 78 टक्के इतके असते. एक ऑक्‍सिजन आणि दोन हैड्रोजन आयन मिळून पाणी तयार होते.
पृथ्वीच्या पोटात, पृष्ठभागावर आणि वातावरणात द्रवरूप पाण्याचे भाग आढळतात. बर्फाच्या रूपात कठीण प्रकारात काही भाग पृथ्वीवर पाण्याने व्यापलेला आहे. काही भागात बर्फाचे तुकडेही आढळतात. वाफेच्या स्वरूपात वातावरणात पाणी असते, ते प्रामुख्याने ढगांच्या स्वरूपात प्रकर्षाने दिसून येते. पाण्याचे अतिबारीक कण वातावरणातील हवेत तरंगते एकत्रितपणे राहतात, त्यासच आपण ढग म्हणतो. ढगातील पाण्याच्या प्रमाणानुसार आणि त्यांच्या पृथ्वीपासूनच्या उंचीनुसार ढगांचे वेगवेगळे प्रकार आढळतात.

जड पाणी : जड पाण्यात धातूंचे अतिबारीक कणांचे प्रमाण अधिक असते, त्यामुळेच ते शुद्ध पाणी नसते. जड पाणी हे प्राणिमात्रांना घातक ठरते.
हलके पाणी : कर्करोगासारख्या रोगाने आजारी व्यक्तींसाठी असे पाणी उपयुक्त असते. त्यात क्षारांचे प्रमाण आणि घातक धातूंच्या अतिबारीक कणांचे प्रमाण अत्यल्प असते. ते पचनास आणि जीविताच्या दृष्टीने उपयुक्त असते. केमोथेरपी उपचार घेणाऱ्यांसाठी ते उपयुक्त असते.

दोन हैड्रोजन अणू हे एका ऑक्‍सिजन अणूशी जोडले गेल्यानंतर पाणी तयार होते; तर हवेतील वाफ ही गॅसच्या स्वरूपासारखी वातावरणात मिसळून आर्द्रता म्हणून ओळखली जाते. दोन हैड्रोजन अणूंच्या ऑक्‍सिजन अणूबरोबरच्या संयोगामुळे अमोनियानंतर पाण्याचीच सर्वांत जास्त उष्णता साठवण करण्याची क्षमता आहे. पाण्याची वाफ होण्यासाठी उष्णतेची क्षमता ही अधिक आहे, ती जवळपास 40.65 किलो ज्वेल प्रति मोल किंवा 2257 किलो ज्वेल प्रति किलो पाणी इतकी आहे आणि ती पाणी उकळण्यास सुरवात झाल्याच्या वेळची असते. यामुळेच पृथ्वीचे तापमान योग्य राखण्यात पाण्याचा फार मोठा वाटा आहे, त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात जे बदल होतात, त्यांचे बॅलन्सिंग केले जाते. समुद्राचे पाणी 1000 पट उष्णता वातावरणापेक्षा अधिक साठवते, त्यामुळेच 80 ते 90 टक्के जागतिक तापमान समतोल राखण्यात पाण्याचा वाटा सर्वांत अधिक आहे. शून्य तापमान क्षेत्रात पाणी गोठवले जाते, त्याचे 333.55 किलो ज्वेल असे प्रमाण असते. त्यानुसार रेफ्रिजरेटरमध्ये बर्फ तयार होत असते. स्पेसिफिक हीट कपॅसिटी उणे 10 अंश सेल्सिअसला बर्फाची 2.05 ज्वेल प्रति किलोग्रॅम असते, तर तीच 100 अंश सेल्सिअसला उकळणाऱ्या पाण्याची 2.08 ज्वेल प्रति किलोग्रॅम असते.

पाण्याची आणि बर्फाची घनता :
पाण्याची घनता एक ग्रॅम प्रति घन सेंटिमीटर असते. ती तापमानावर अवलंबून असते. त्यात तापमानानुसार बदल होताना दिसून येतात. जेव्हा पाणी थंड असते, तेव्हा पाण्याची घनता अधिक असते. जेव्हा चार अंश सेल्सिअस किंवा 39 अंश फॅरनहिट तापमान असते, तेव्हा पाण्याची घनता अधिक असल्याचे आढळून येते. त्यानंतर जसे थंड वातावरण होत जाते, तसे पाणी प्रसरण पावते आणि त्याची घनता कमी होण्यास सुरवात होते. बर्फाची घनता मात्र द्रवरूपापेक्षा कमी असते, त्यामुळेच बर्फ पाण्यावर तरंगतो.

पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यानंतर त्याची घनता नऊ टक्के कमी होते. जेव्हा पाण्याचा बर्फ बनतो, तेव्हा हैड्रोजन आयन एकमेकांमध्ये बंदिस्त होतात; तसेच हैड्रोजन आयनचे आकारमान बर्फ झाल्यानंतर कमी होते. मात्र, द्रवरूप पाण्यात ते त्यापेक्षा अधिक असते. इतर जे पदार्थ थंडीमध्ये आकाराने मोठे होतात, त्यात सिलिकॉन, गॅलियम, ऍन्टीमोनी, बीसमथ, प्लुटोनियम यांचा समावेश होतो.

पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रसरण हे तापमान वाढल्यानंतरही होते. त्या वेळी पाण्याची घनता चार टक्के कमी होते. बर्फ शून्य अंश तापमानात किंवा 32 अंश फॅरनहिट तापमानात वितळण्यास सुरवात होते. मात्र, शुद्ध पाणी हे शून्य अंश तापमानानंतरही काही काळ द्रवरूपात राहू शकते, त्याची क्षमता 231 अंश केलव्हिन्स असू शकते किंवा उणे 42 अंश सेल्सिअसही असू शकते. मात्र, त्याचा संबंध हवेच्या दाबाशी संबंधित राहू शकतो. हवेच्या दाबाचा संबंध हा बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्यासाठीही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच सृष्टीच्या वातावरणात पाण्याचा महत्त्वाचा भाग आहे. पृथ्वीच्या काही भागातील जलाशये ही पूर्णपणे अतिथंड वातावरणात आणि त्यास अनुकूल हवेच्या दाबात पूर्णपणे बर्फाच्छादित असतात. अशा जलाशयांच्या तळाला पाण्याचे थर असतात आणि त्या पाण्याचे तापमान चार अंश सेल्सिअस इतके असते.

पाण्याची घनता ही पाण्यात विरघळलेल्या क्षारांच्या प्रमाणावर आणि तापमानावर अवलंबून असते. बर्फ हे पाण्यावर तरंगते आणि तळाला पाणी असण्याचे तेच मुख्य कारण असते. त्यामुळेच काही समुद्रांच्या बाबतीत असे प्रकार दिसून येतात. हिवाळ्यात अशी परिस्थिती आर्टिक समुद्राच्या भागात झालेली दिसून येते. उणे 1.9 अंश सेल्सिअसपासून समुद्राच्या पाण्याचे बर्फ होण्यास सुरवात होते, की जेव्हा समुद्राच्या पाण्याची क्षार क्षमता 3.5 टक्के असते.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120315/5675611890193095632.htm

जनावरांतील कासदाहावर वेळीच करा उपचार

डॉ. गुणाजी यादव, डॉ. अरविंद पाचपांडे


कासेला होणाऱ्या सुजेला कासदाह असे म्हणतात. या आजाराला दगडी किंवा काससुजी असेही म्हणतात. कासदाहासाठी कारणीभूत असणारे जिवाणू, विषाणू किंवा बुरशी सडांद्वारे कासेत प्रवेश करतात. वासराच्या दातांमुळे सडाला झालेल्या जखमा, दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ नसणे, दुधाची भांडी व गोठा स्वच्छ नसणे, अयोग्य पद्धतीने दूध काढणे, वेळच्या वेळी धारा न काढणे, कासेत दूध साठून राहणे, ही कासदाहाची कारणे आहेत. या आजारावर वेळीच पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

जनावरांच्या शरीरावर एक प्रकारचा ताण असतो. ताणाच्या काळात आरोग्याची अधिक काळजी घेणे जरुरीचे आहे. जनावरे जर निरोगी असतील, तर त्यांची उत्पादनक्षमता टिकून राहते. दुभती गाय, म्हैस आजारी पडली, तर पशुपालकांचे मोठे नुकसान होते.
दुधाळ गाय - म्हशीची गुणवत्ता तिच्या कासेवर अवलंबून असते. कास हा दूध उत्पादनाच्यादृष्टीने महत्त्वाचा अवयव आहे.

ज्या प्रमाणात गाई - म्हशीची दूध उत्पादन क्षमता वाढली, त्याच प्रमाणात कासेतील दुधाच्या ग्रंथींना इजा आणि आजार होण्याची शक्‍यता देखील वाढली. कासेला होणाऱ्या सुजेला कासदाह असे म्हणतात. या आजाराला दगडी किंवा काससुजी असेही म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे जिवाणू, विषाणू; तसेच विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे हा आजार होऊ शकतो. कासदाहासाठी कारणीभूत असणारे जिवाणू, विषाणू किंवा बुरशी सडांद्वारे कासेत प्रवेश करतात. कासेच्या सडांतून जंतुसंसर्ग होऊन कासदाह होतो. वासराच्या दातांमुळे सडाला झालेल्या जखमा, दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ नसणे, दुधाची भांडी व गोठा स्वच्छ नसणे, अयोग्य पद्धतीने दूध काढणे, वेळच्या वेळी धारा न काढणे, कासेत दूध साठून राहणे ही कासदाहाची कारणे आहेत.
लक्षणे ः
कासेला किंवा एखाद्या सडाला सूज येते. कासदाह झालेले सड टणक लागतात. सडाला स्पर्श केल्यास जनावराला वेदना होतात. जनावर कासेला हात लावू देत नाही. कासदाह झालेल्या सडातून अतिशय पातळ दूध किंवा पाणीच येते. काही वेळेला दुधाबरोबर पू किंवा रक्त येते, तर काही वेळेला दुधाच्या गुठळ्या येतात. दुधाचे प्रमाण कमी होते. जनावराला ताप येऊन त्याची अन्नावरची वासना उडते आणि ते अस्वस्थ होते. वेळीच उपचार न केल्यास संपूर्ण कास दगडासारखी कठीण होते. असे जनावर पुन्हा दुधावर आणणे कठीण होऊन बसते.

उपचार ः
प्रथम सडातील संपूर्ण दूध पशुवैद्यकाच्या साहाय्याने सडात खास नळी घालून काढून टाकावे. त्यानंतर सडात सोडावयाच्या प्रतिजैविकाच्या ट्यूब्ज प्रत्येक दिवशी प्रत्येक बाधित सडात एक याप्रमाणे चार ते पाच दिवस सोडाव्यात; तसेच प्रतिजैविकाचे इंजेक्‍शन तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून सलग तीन ते पाच दिवस द्यावे. कास घट्ट झाली असल्यास कासेला दररोज वेदनाशामक मलमाने मॉलिश करावे. दूध काढण्यापूर्वी पोटॅशियम परमॅंगनेटच्या सौम्य द्रावणाने कास धुवावी. सडावर काही जखमा असल्यास त्यांची योग्य ती देखभाल करावी. उपचार चालू असताना बाधित सडातील दूध वापरू नये; तसेच शेवटची ट्यूब सडात सोडल्यानंतर त्या सडाचे दूध साधारणतः 2.5 ते तीन दिवसांनंतर वापरण्यास घ्यावे.

रोगप्रतिबंधक उपाय ः
1) दूध काढणाऱ्या व्यक्तीने स्वतःची व कपड्यांची स्वच्छता ठेवावी. हाताची नखे कापलेली असावीत.
2) गोठ्यात जनावरांची गर्दी नसावी. गर्दी असल्यास एका गाईचे शिंग दुसऱ्या गाईस लागते किंवा गाईच्या सडावर पाय दिल्यामुळे जखमा होऊन कासदाह नियमित होऊ शकतो.
3) गोठ्याची जमीन स्वच्छ व सपाट असावी. गोठ्यात टोकदार वस्तू असू नयेत. मलमूत्राची ताबडतोब विल्हेवाट लावावी.
4) वासरांची शिंगे वयाच्या आठ ते दहाव्या दिवशी जाळून टाकावीत, म्हणजे दूध काढण्याच्या वेळी गोठ्यात गाई मारामारी करणार नाहीत; परस्परांना आणि गवळ्यास दुखापत करणार नाहीत.
5) अंगठा आणि चारही बोटे यामध्ये सड दाबून दूध काढू नये, त्यामुळे सडास इजा पोचते.
6) धारा काढताना सडास चिकट पदार्थ लावू नये, त्यामुळे सडास जखमा व वेदना होण्याची शक्‍यता असते.
7) धारा काढते वेळी गवळ्याने धूम्रपान करू नये, तंबाखू खाऊ नये, कारण त्याचा दुधास वास लागतो.
8) जनावर शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा, मारझोड करू नये. दूध काढण्यापूर्वी जनावरास खरारा करावा, त्यामुळे अंगावरील सुटे केस निघून जातात. खराऱ्यामुळे रक्ताभिसरण क्रिया वाढते, जनावर तरतरीत दिसू लागते. गोचीड, माश्‍या, उवा, लिखा इत्यादी कीटक पडून जातात; त्यामुळे दूध काढते वेळी गाय - म्हैस बेचैन दिसत नाही. शरीरावर जखमा असल्यास लगेच उपचार करता येतो.
9) दूध काढण्यापूर्वी जनावर धुणे आवश्‍यक आहे. पाण्याची कमतरता असल्यास केवळ कास, सड, शेपटी व मागील भाग धुवावा; त्यामुळे घाण, शेण, माती, चिखल, केस दुधात पडत नाही. धुण्यासाठी जंतुनाशकाच्या सौम्य द्रावणाचा वापर करावा.
10) वासरू गाईस पिऊ देऊ नये म्हणजे सडास जखम होणार नाही.
11) दूध काढण्याची जागा भरपूर पाण्याने स्वच्छ धुवावी, त्यासाठी जंतुनाशकाचा वापर करावा.
12) दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर करीत असल्यास त्यात काहीही दोष नसावा. एका गाईचे दूध काढून झाल्यावर मशिनचे कप दुसऱ्या गाईच्या सडास लावण्यापूर्वी जंतुनाशक द्रावणात बुडवून मगच वापरावेत, नाही तर एका गाईचा कासदाह दुसऱ्या गाईस होतो.
13) निरोगी जनावरांच्या धारा अगोदर काढाव्यात. कासदाह असलेल्या गाईचे दूध वेगळे काढावे.
14) गाय पान्हावल्यावर कमीत कमी वेळात (सात ते आठ मिनिटांत) पिळावी. जास्त दूध देणाऱ्या गाईची धार दिवसातून तीन वेळा काढावी. दूध ठराविक वेळीच काढावे. जास्त दूध देणारी गाय दोन गवळ्यांनी पिळावी. गाय पूर्णपणे पिळावी. कासेत थोडेदेखील दूध ठेवू नये, अन्यथा कासदाह होण्याची शक्‍यता असते.
15) दूध काढल्यानंतर सडाचे छिद्र तत्काळ बंद होत नाही, म्हणून 25 ते 30 मिनिटे गाईस जमिनीवर बसू देऊ नये. त्याकरिता गव्हाण चाऱ्याने भरलेली असावी म्हणजे जनावर खात राहील, गोठ्यात बसणार नाही. दूध काढणे झाल्यावर चारही सड रोगजंतुनाशक द्रावणात बुडवावेत.
16) गाय आटत आल्यास हळूहळू भाकड करावी. शेवटच्या दिवशी प्रत्येक सडात एक याप्रमाणे प्रतिजैविकाच्या ट्यूब सोडाव्यात. गाय विण्याअगोदर, कमीत कमी 45 ते 60 दिवस अगोदर गाय भाकड करावी.
17) पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एक वेळा तरी दुधाची परीक्षा स्ट्रिपकप टेस्ट किंवा कॅलिफोर्निया मस्टायटीस टेस्टद्वारे करून घ्यावी. जनावर आजारी असल्यास ताबडतोब औषधोपचार करून घ्यावा.
18) नवीन गाय विकत घेताना कासेची पूर्ण वाढ झालेली व कासेचा कोणताही आजार नसलेल्या गाईची निवड करावी.

संपर्क ः डॉ. यादव ः 9657110381
(लेखक क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)


Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120319/5367863895764696903.htm

उन्हाळ्यात सांभाळा जनावरांना...

अरुण देशमुख, डॉ. परशुराम ढोले

उन्हाळ्यामध्ये जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन त्यांची गरज भागविली जाते. बऱ्याच वेळेस निकृष्ट प्रतीचे खाद्य दिले जाते. त्याचा शरीरवाढीवर परिणाम होतो, तसेच उष्माघाताची लक्षणे दिसतात. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन येत्या काळात जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन ठेवावे.

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल होतो. उन्हाळ्यामध्ये जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन त्यांची गरज भागविणे यावरच भर दिला जातो, त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस निकृष्ट प्रतीचे खाद्य दिले जाते. जनावरे खाताना रवंथ करत नाहीत, त्यामुळे अपचनासारखे आजार होतात. त्या कारणाने ते चारा कमी खातात किंवा पूर्णपणे बंद करतात. म्हणून दूध उत्पादनात घट होते, प्रजनन क्षमता कमी होते, वजन घटते. अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे "तडक्‍या'सारखे कातडीचे आजार होतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांचे योग्य व्यवस्थापन करून, उष्णतेचा ताण कमी करून उत्पादन टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते.

जनावरांच्या शरीरामध्ये त्यांनी खाल्लेले अन्न, शरीरात साठविलेली चरबी व पोटामध्ये होणारी आंबवण क्रिया इत्यादी कारणांनी ऊर्जा निर्माण होते. शरीरात निर्माण झालेल्या ऊर्जेचा उपयोग शरीरक्रिया चालू ठेवण्यासाठी होत असतो, त्याशिवाय अतिरिक्त ऊर्जा जनावरांच्या शरीरवाढीसाठी व दूध उत्पादनवाढीसाठी उपयोगी असते. जनावरांच्या शरीरात एकूण उत्पादित ऊर्जेचा बराचसा भाग शेण, लघवी (मूत्र) किंवा वाफ वायुस्वरूपात आणि घामाद्वारे शरीराबाहेर टाकला जातो, त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते.

उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचेही तापमान वाढते. हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील उष्णता शरीरक्रियेचा वेग वाढवून शरीराबाहेर टाकावी लागते, त्यामुळे शरीरक्रियेवर ताण पडतो, त्याचा परिणाम म्हणून तापमान नियंत्रणासाठी जनावरे पाणी अधिक पितात, चारा किंवा खाद्य कमी खातात. साधारणतः जनावरांचे आरोग्य चांगले असते, अशावेळेस देशी गाईचे कमाल तापमान 95 अंश फॅ., तर म्हशीचे कमाल तापमान 100 अंश फॅ. असते.

उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या अति प्रखर किरणांच्या संपर्कामुळे किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता, तसेच पन्हाळी किंवा सिमेंटच्या (जीआय सीट) पत्र्याचा वापर केलेल्या एकाच गोठ्यात जास्त जनावरांची गर्दी केल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, म्हणून पत्र्यावर उसाचे पाचट किंवा इतर आच्छादन करणे गरजेचे असते.

उष्माघाताची लक्षणे ः
1) जनावर अस्वस्थ होते, जनावराची तहान - भूक मंद होते.
2) जनावराच्या शरीराचे तापमान 104 ते 106 अंश फॅ. इतके वाढून कातडी कोरडी पडते.
3) जनावराच्या श्‍वासोच्छ्वासाचा दर वाढून धाप लागल्यासारखे होते.
4) जनावरांचे डोळे लालसर होऊन डोळ्यांतून पाणी गळते.
5) जनावरांना आठ तासांनंतर अतिसार होतो.
6) जनावरांचे लघवीचे प्रमाण कमी होते.
7) ..............जनावरे बसून घेतात.
8) गाभण गाई गाभडण्याचे प्रमाण वाढते.
उपचार ः
1) जनावरास थंड पाण्याने स्वच्छ धुऊन काढावे. झाडाच्या सावलीत अथवा इतर थंड ठिकाणी बांधावे. हलके पाचक गूळमिश्रित खाद्य द्यावे.
2) जनावरांच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये पाण्याने ओले केलेले कापड ठेवून त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे.
3) जनावरास नियमित व वारंवार (साधारणतः तीन - चार वेळेस) भरपूर थंड पाणी पाजावे.
4) उष्माघात झालेल्या जनावरांना पशुतज्ज्ञांकडून डेक्‍स्ट्रोज सलाईन आवश्‍यकतेनुसार शिरेद्वारे द्यावे. ऍव्हिलचे इंजेक्‍शन 10 मि.लि. कातडीखाली द्यावे. या रोगावर कोणत्याही प्रकारच्या जुलाबरोधक औषधाचा उपयोग होत नाही.

उन्हाळ्यात घ्यावयाची विशेष काळजी ः
म्हशींचा निसर्गतःच रंग काळा असतो; तसेच कातडीसुद्धा जाड असते. उन्हाची तीव्रता वाढली की ती लगेच तापते. गाईपेक्षा म्हशींमध्ये घामग्रंथींची संख्या कमी असते, त्यामुळे घामावाटे फारशी उष्णता बाहेर पडत नाही म्हणून तापलेले शरीराचे तापमान कमी किंवा थंड ठेवण्यासाठी म्हशींना पाण्यात डुंबू देणे उपयुक्त ठरते. संकरित गाईंच्या बाबतीत तर उन्हाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
1) जनावरांना गोठ्यामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावे. गोठ्याच्या छपरावर गवत, पालापाचोळा टाकून पाणी शिंपडावे, त्यामुळे गोठा थंड राहतो.
2) उन्हाळ्यामध्ये जनावरांना तीन - चार वेळा थंड पाणी पाजावे.
3) आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा.
4) जनावरांना उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस चरण्यासाठी पाठवू नये.
5) गोठ्यामध्ये अधूनमधून पाणी फवारावे.
6) रात्री व पहाटेच्या वेळी वाळलेली वैरण भरपूर द्यावी. दुपारच्या प्रहरी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास यासारखी पोषक वैरण द्यावी, त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते, प्रजनन क्षमताही सुधारते.
7) उन्हाळ्यामध्ये माजाचा कालावधी कमी असतो, बऱ्याच वेळा मुका माज जाणवतो. म्हशींमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. त्यासाठी थंड प्रहरी जनावरांचे बारकाईने निरीक्षण करून माजाची लक्षणे पाहणे किंवा खच्चीकरण केलेला वळू जनावरामागे फिरवून माजावरील जनावरे ओळखता येतील. माजावर आलेली जनावरे दुपारच्या वेळेस न भरवता त्याऐवजी सकाळी किंवा उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर भरविल्यास गर्भधारणेचे प्रमाण वाढून जनावरे उन्हाळ्यातही गाभण राहतील.
8) खाद्यातून "अ' जीवनसत्त्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा द्यावा.
9) उन्हाळ्यात जनावरांना लाळ्या खुरकूत व फऱ्या यासारख्या रोगांची रोगप्रतिबंधक लस योग्य वेळी टोचून घ्यावी.
10) दुभत्या जनावरांप्रमाणे लहान वासरे, कालवडी, पारड्या, भाकड जनावरे व गाभण जनावरे यांचीही योग्य ती काळजी घ्यावी, त्यामुळे निश्‍चितच फायदा होईल.

संपर्क ः श्री. देशमुख ः 9422737089
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कार्यरत आहेत.)

Reff. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120319/5030366332808558980.htm