Sunday, March 18, 2012

मधमाशीपालन - पीक उत्पादनवाढ आणि उद्योगातील संधी

प्रख्यात शास्त्रज्ञ सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले आहे, की जर काही कारणांमुळे जगातील मधमाश्‍या नाश पावल्या, तर सबंध मानवजात फार तर चार वर्षंच जगू शकेल. कारण परागीभवन व अन्ननिर्मिती थांबून अन्नसुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. भारतात उत्तरेकडील व दक्षिणेकडील राज्यांत जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच व्यावसायिक मधमाशीपालन होते; मात्र बदलत्या परिस्थितीप्रमाणे मधमाशीपालन पद्धतीत बदल न केल्यामुळे त्याची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. पीक उत्पादन व दर्जा वाढणे, मध व अन्य उत्पादनांसाठी आज मधमाशीपालन उद्योगाचे महत्त्व वाढणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याला तसा वावही आहे. त्यावर आधारित ही मालिका "ऍग्रोवन'मधून आजपासून दर मंगळवारी.

मधमाशी हे मानव आणि संपूर्ण सजीवसृष्टीला एक सर्वोत्तम वरदान आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अन्य कीटक किंवा प्राण्यांप्रमाणे मधमाश्‍या एकट्या - दुकट्या राहत नाहीत, तर त्या समूहात राहतात. म्हणूनच मधमाश्‍यांच्या वसाहती असतात. मधमाश्‍या त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी फुलांतील मकरंद व पराग गोळा करतात. तेही इतक्‍या पद्धतशीरपणे, की त्या फुलांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. मधमाश्‍या एका फुलावरून दुसऱ्या फुलांवर परागकणांचे स्थानांतरण करतात, त्यामुळे फुलांची फलधारणा व बीजधारणा होत असते. यालाच "परागीभवन' असे म्हणतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या झाडांची वा वनस्पतींची वाढ होते व प्रसार होतो. अशा रीतीने फुलांचे काहीही नुकसान तर होत नाहीच, उलट चांगला उपयोगच होतो. अजूनही शेतकऱ्यांच्या व बऱ्याच लोकांच्या गैरसमजामुळे मधमाशीपालन करण्यास शेतकरी उत्सुक नसतात.

प्रख्यात शास्त्रज्ञ सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले आहे, की जर काही कारणांमुळे मधमाश्‍या नाश पावल्या, तर सबंध मानवजात फार तर चार वर्षंच जगू शकेल. कारण पुष्पधारी झाडे, वेली, वनस्पतींचे परागीभवन होणार नाही, त्यामुळे अन्न मिळणार नाही. त्यामुळे संपूर्ण सजीवसृष्टीच नाहीशी होण्याची भीती त्यांनी वर्तविली आहे. यावरून मधमाश्‍यांची गरज किती निकडीची आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

एका जर्मन अहवालानुसार जागतिक क्रमवारीत पशुधन उद्योगामध्ये त्यांच्या आर्थिक उलाढालीनुसार सर्वांत अग्रक्रमांकावर गुरेढोरे पशुपालन व डेअरी उद्योगाचा असून, द्वितीय क्रमांकावर वराह उद्योग आहे. मधमाशीपालनाचा क्रमांक तृतीय आहे, तर त्याच्या खालोखाल म्हणजे चतुर्थ क्रमांकावर कुक्कुटपालन उद्योग आहे. भारतात मात्र अजूनही मधमाशीपालनाबद्दल बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञता आहे. उत्तरेकडील व दक्षिणेकडील राज्यांत जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच व्यावसायिक मधमाशीपालन करीत आहेत. महाराष्ट्रात महाबळेश्‍वरला फार पूर्वीपासून पारंपरिक मधपाळ आहेत; पण बदलत्या परिस्थितीप्रमाणे मधमाशीपालन पद्धतीत बदल न केल्यामुळे म्हणावी तशी प्रगती व प्रसार झाला नाही.

मधमाशीपालन कशासाठी?
मधमाशीपालन हा उद्योग एकमेव अद्‌भुत असा आहे, की जो पूर्णपणे मकरंद व पराग - फुलांवर अवलंबून आहे. भारत हा आजही शेतीप्रधान देश आहे. जंगल भागातील आदिवासी लोक वनसंपत्ती, वनौषधी आदींवर अवलंबून आहेत. मधमाश्‍यांच्या वसाहतींपासून मध गोळा करण्याचे काम तर आपल्या पूर्वजांपासून अजूनही जंगल भागात चालू आहे. मधाचे महत्त्व आपल्या वेद - पुराणांत सापडते, तसेच पारंपरिक आयुर्वेदाप्रमाणे मधाचा आपण बहुगुणी औषध म्हणून उपयोग करतो. मध उत्पादनाशिवाय मधमाशीपासून मेण, पराग, राजान्न, प्रोपोलिस व दंश-विष अशी अत्यंत औषधी उपयोगी उत्पादने मिळतात. या सर्व घटकांना जागतिक बाजारपेठेत अत्यंत मागणी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मधमाश्‍यांमुळे परागीभवनाद्वारे पीक उत्पादन व त्याचा दर्जा अनेक पटींनी वाढतो. अशारीतीने वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा व सुरक्षा देण्यासाठी मधमाशीपालन एक सर्वोत्तम व्यवसाय आहे.

मधमाशीपालनाचे फायदे ः
1) जगातील बहुतेक देशांत एकाच जातीच्या मधमाश्‍या आहेत; मात्र भारत हा एकमेव देश असा आहे, की ज्याच्या वातावरणात चार - पाच जातींच्या मधमाश्‍यांच्या वसाहती नैसर्गिकरीत्या आढळतात. त्याचे संवर्धन व संगोपन करून व्यावसायिक उत्पादन करता येऊ शकते.
2) आपल्याकडे मधमाश्‍यांना आवश्‍यक फुले, झाडे, वनस्पती व वातावरण अत्यंत पोषक आहे, त्यामुळे मध, मेण व इतर उत्पादनपण भरपूर मिळू शकते.
3) सर्वांत प्रमुख म्हणजे मधमाशीपालनाद्वारे शेतीपीक व फळपिकांचे उत्पादन व प्रजनन अनेक पटींनी वाढते, त्यामुळे शेती व शेतकरी कुटुंबांचेही सामाजिक व आर्थिक सबलीकरण होते.
4) परागीभवनामुळे शेतीप्रमाणेच औषधी वनस्पती, जंगली वृक्ष - वेलींचे संवर्धन होते. पर्यायाने जंगल भागातील आदिवासींचे उत्पन्न वाढून त्यांचे शहरी भागात स्थलांतर थांबू शकते.
5) मधमाशीपालन हा बहुआयामी उद्योग असल्यामुळे त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ व मजुरांची गरज आहे. उदा. मधमाश्‍यांसाठी लागणाऱ्या वसाहती, त्यासाठी विशिष्ट पेट्यांचे उत्पादन व पुरवठा, वसाहतींचे संगोपन व वाढ करण्यासाठी प्रशिक्षित मधपाळ, वसाहतींचे स्थानांतरण व वाहतूक व्यवस्था, मध उत्पादन, साठवण तसेच मधाचा दर्जा परीक्षण, वेष्टनीकरण व विपणन व्यवस्था आदी.
6) मधमाशीपालन, मध व अन्य उत्पादन निर्मितीसाठी स्त्री - पुरुष, लहान - मोठे असा भेद नाही. कोणीही हा व्यवसाय सहज करू शकतात. लहान- मध्यम- मोठ्या प्रमाणावरही मधमाशीपालनास सुरवात करता येते.
7) मधमाशीपालनाकरिता आवश्‍यक असलेले मकरंद व पराग जवळपास विनामूल्य मिळते. मधमाशीपालनाकरिता कमीत कमी जागा, भागभांडवल, वेळ, कष्ट द्यावे लागतात.

प्रस्तावना ः
मधमाशीपालन म्हटले, की सर्वसामान्य लोक आधी भुवया वर करून "आ' वासून प्रश्‍नार्थक मुद्रेने बघतात, कारण मधमाश्‍यांच्या मधापेक्षा लोकांना मधमाश्‍यांच्या डंखाची, त्यांच्या चावण्याची खूप भीती मनात बसलेली आहे. मुळात हाच सगळ्यात मोठा गुण म्हणा किंवा वरदान म्हणा, की मधमाश्‍यांना चांगली समज असते. मधमाश्‍या त्यांचे मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगले ओळखू शकतात. मधमाश्‍यांचे मित्र म्हणजे मधपाळ. अगदी सहजपणे ते मधमाश्‍यांच्या पोळ्यात हात घालतात, तरीही त्यांना मधमाश्‍या चावत नाहीत किंवा डंख मारत नाहीत. त्यांच्या अंगा-खांद्यावर मधमाश्‍या वावरतात आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे भरपूर मध देतात. या उलट जर एखाद्याने मधमाश्‍यांच्या पोळ्याला त्रास देण्याचा विचार जरी मनात आणला, तरी मधमाश्‍यांना ते अचूक समजते. कारण विशिष्ट फेरोमोनद्वारे संदेश किंवा संवेदना मधमाश्‍यांना लगेच कळतात. अशा व्यक्तीला, प्राण्याला किंवा कोणालाही शत्रू ठरवून सगळ्या मधमाश्‍या त्याच्यावर हल्ला करतात आणि डंख मारतात. याचे साधे उदाहरणच द्यायचे झाले, तर एखाद्याने जर सहज झाडावरील किंवा इमारतीवरील मोहोळाला जर दगड भिरकावला तर 10-12 माणसांच्या गर्दीतूनही त्या व्यक्तीला ओळखून त्यालाच मधमाश्‍या डंख मारतात, कारण दगड भिरकावून मारलेल्या व्यक्तीच्या हाताला किंवा बोटांना विशिष्ट संप्रेरक (फेरोमोन)चा गंध असतो, तो मधमाश्‍या ओळखतात आणि सर्व मधमाश्‍या त्याचाच पाठलाग करतात.

साधारण 15-20 हजार वर्षांपूर्वीपासून मधमाश्‍यांपासून मध मिळविण्याचे तंत्र आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. याचे दाखले भीमबेटकाच्या (पंचमढी, मध्य प्रदेश) जंगलातील डोंगर कपाऱ्यांवरील भित्तीचित्रांवरून स्पष्ट मिळतात. त्याकाळी देखील मध गोळा करून त्याचे अन्न म्हणूनच सेवन केले जायचे. मधाची औषध म्हणून उपयोगिता आयुर्वेदातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक चरक आणि सुश्रुत यांनी त्यांच्या संहितेत लिहून ठेवली आहे. त्यांचाच आता सर्रास संदर्भ घेऊन औषधे तयार केली जातात. यापैकी प्रमुख उपचार म्हणजे अंगावरील जखम; कापल्यावर किंवा भाजल्यावर त्या जागी मधाचा लेप दिल्यास ती जखम लवकर बरी होते. मधातील एंटीबॅक्‍टेरियल एक्‍टिव्हिटीमुळे मधाचे औषधी गुणधर्म वाढतात.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120313/4757374416807462264.htm