एस. डी. जाधव, डॉ. व्ही. के. खर्चे, आर. डी. चौधरी
सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पिकाला सूक्ष्म तसेच दुय्यम अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म सुधारतात, सामूवर नियंत्रण राहून जमीन सुस्थितीत राहते. मातीच्या धूपीचे प्रमाण कमी होऊन पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. सोबतच अन्नद्रव्यांचा पिकांना संतुलित पुरवठा होतो.
दिवसेंदिवस जमिनींच्या समस्या वाढतच आहेत. उपलब्ध जमिनी सातत्याने लागवडीखाली असल्याने अन्नद्रव्यांचा सतत ऱ्हास होऊन त्यांची कमतरता जाणवू लागली आहे. मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होत आहे. सध्याच्या काळात रासायनिक खतांची टंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत पीक पोषणासाठी खतांच्या विविध स्रोतांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी शेतावरच उपलब्ध संसाधनांमधून सेंद्रिय घटकांचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, धसकटे यात बऱ्याच प्रमाणात अन्नद्रव्ये असतात. त्यांचा जमीन व्यवस्थापनासाठी वापर करून सुपीकता टिकवणे महत्त्वाचे आहे. एक तर ती जमिनीत गाडून नांगरणी करावी किंवा सर्व सेंद्रिय घटक एकत्रित करून खड्ड्यात कुजविण्यासाठी ठेवावीत.
सेंद्रिय घटकांचे विघटन होण्यासाठी साधारणतः 110 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष तसेच धसकटे इत्यादी कुजविण्यासाठी जानेवारी ते मार्च हा कालावधी उपयुक्त असतो. कारण या कालावधीत बहुतेक खरीप तसेच रब्बी पिकांची काढणी आटोपते. पिकांच्या अवशेषांपैकी सोयाबीनच्या कुटाराचा पशुखाद्य म्हणून उपयोग होतो. कापसाच्या अवशेषांचा वापर इंधन म्हणून वगळता, ज्वारीचे फणकट तसेच गव्हांड्याचा पशुखाद्य म्हणून पाहिजे तेवढा उपयोग होत नाही. कापूस व ज्वारी या पिकांचे अवशेष यंत्राद्वारे बारीक करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करावे. साधारणतः 110 ते 120 दिवसांत चांगले कुजलेले खत तयार होते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात गव्हांड्याचे कंपोस्ट खत तयार करावे. अशा कुजलेल्या सेंद्रिय घटकांमुळे जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म टिकविण्यास मदत होते. तसेच जमिनीची घडण सुधारून जलधारणा शक्तीत वाढ होते, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते. शेतावरच गांडूळ खत तयार करून त्याचा योग्य पद्धतीने व कार्यक्षम वापर करावा.
सध्याच्या काळात शेणखत तसेच नत्र, स्फुरद, गंधकयुक्त खते इत्यादींना पर्याय म्हणून फॉस्फोकंपोस्ट, नायट्रो- फॉस्फो- सल्फो- कंपोस्ट इत्यादी संकल्पना पुढे येत आहेत. रॉक फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, आयर्न पायराईट इत्यादी खनिज पदार्थांचा वापर करून असे खत तयार करता येतात. शेतातील पालापाचोळा, धसकटे, पिकांचे अवशेष इ. सेंद्रिय घटकांचा यात वापर होतो. या खतांमध्ये नत्र, स्फुरद, गंधक इत्यादी अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवून शेणखताला उत्तम असा पर्याय उपलब्ध करून देता येईल. सेंद्रिय खतांचा शेतीमध्ये वापर वाढविण्यास मदत होईल. कारण अशा प्रकारची खते नत्र, स्फुरद, पालाश तसेच गंधकाचे उत्तम स्रोत होऊ शकतात आणि रासायनिक खतांचा होणारा अनाठायी खर्च निश्चितच कमी करता येतो. ही खते दुर्मिळ व महाग होत चाललेल्या शेणखताला चांगला पर्याय ठरू शकतात.
हिरवळीच्या पिकांची लागवड ः
सतत लागवडीमुळे जमिनीतील सेंद्रिय घटकाचे प्रमाण कमी होत आहे. अशा परिस्थितीत हिरवळीची पिके म्हणजेच धैंचा, बोरू व ग्लिरिसिडीया यांचा वापर करावा. धैंचा व बोरू या हिरवळीच्या पिकांची साधारणतः एप्रिल- मे महिन्यांत पेरणी करून सहा आठवड्यात नांगरणी करून गाडावीत. ग्लिरिसिडीया या बहुवर्षीय पिकांची बियांपासून किंवा फांद्यांपासून बांधावर लागवड करून हिरवा पाला पीक फुलोऱ्यावर असताना किंवा जोमदार वाढीच्या काळात दोन ओळींत गाडून टाकावे. हिरवळीच्या पिकांच्या नियमित वापरामुळे हळूहळू जमीन सुपीक होऊन बाहेरून वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांच्या मात्रेत कपात करता येऊन खर्चात बचत करता येईल.
जैविक खतांचा वापर ः
रासायनिक खताची तसेच जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर केल्यामुळे पीक उत्पादनात जवळ जवळ दहा टक्क्यांनी वाढ होते. यामध्ये हवेतील नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू व स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांचा समावेश होतो. द्विदल पिकांना रायझोबियम व पीएसबी हे जिवाणू संवर्धक वापरावे. एकदल पिकांसाठी ऍझोस्पायरिलम व पीएसबी हे जिवाणू संवर्धक वापरावे. जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया पेरणी पूर्वी करावी. दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम जिवाणू खतांची मात्रा पुरेशी होते. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा जैविक खते हा महत्त्वाचा घटक असून इतर निविष्ठांची कार्यक्षमता वाढविणे आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवून पिकांच्या उत्पादकतेत त्यांचा मोठा सहभाग असतो.
संपर्क ः डॉ. खर्चे ः 9657725787
(लेखक मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहे.)
Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120319/5028304310486443534.htm