डॉ. गुणाजी यादव, डॉ. अरविंद पाचपांडे
कासेला होणाऱ्या सुजेला कासदाह असे म्हणतात. या आजाराला दगडी किंवा काससुजी असेही म्हणतात. कासदाहासाठी कारणीभूत असणारे जिवाणू, विषाणू किंवा बुरशी सडांद्वारे कासेत प्रवेश करतात. वासराच्या दातांमुळे सडाला झालेल्या जखमा, दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ नसणे, दुधाची भांडी व गोठा स्वच्छ नसणे, अयोग्य पद्धतीने दूध काढणे, वेळच्या वेळी धारा न काढणे, कासेत दूध साठून राहणे, ही कासदाहाची कारणे आहेत. या आजारावर वेळीच पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
जनावरांच्या शरीरावर एक प्रकारचा ताण असतो. ताणाच्या काळात आरोग्याची अधिक काळजी घेणे जरुरीचे आहे. जनावरे जर निरोगी असतील, तर त्यांची उत्पादनक्षमता टिकून राहते. दुभती गाय, म्हैस आजारी पडली, तर पशुपालकांचे मोठे नुकसान होते.
दुधाळ गाय - म्हशीची गुणवत्ता तिच्या कासेवर अवलंबून असते. कास हा दूध उत्पादनाच्यादृष्टीने महत्त्वाचा अवयव आहे.
ज्या प्रमाणात गाई - म्हशीची दूध उत्पादन क्षमता वाढली, त्याच प्रमाणात कासेतील दुधाच्या ग्रंथींना इजा आणि आजार होण्याची शक्यता देखील वाढली. कासेला होणाऱ्या सुजेला कासदाह असे म्हणतात. या आजाराला दगडी किंवा काससुजी असेही म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे जिवाणू, विषाणू; तसेच विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे हा आजार होऊ शकतो. कासदाहासाठी कारणीभूत असणारे जिवाणू, विषाणू किंवा बुरशी सडांद्वारे कासेत प्रवेश करतात. कासेच्या सडांतून जंतुसंसर्ग होऊन कासदाह होतो. वासराच्या दातांमुळे सडाला झालेल्या जखमा, दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ नसणे, दुधाची भांडी व गोठा स्वच्छ नसणे, अयोग्य पद्धतीने दूध काढणे, वेळच्या वेळी धारा न काढणे, कासेत दूध साठून राहणे ही कासदाहाची कारणे आहेत.
लक्षणे ः
कासेला किंवा एखाद्या सडाला सूज येते. कासदाह झालेले सड टणक लागतात. सडाला स्पर्श केल्यास जनावराला वेदना होतात. जनावर कासेला हात लावू देत नाही. कासदाह झालेल्या सडातून अतिशय पातळ दूध किंवा पाणीच येते. काही वेळेला दुधाबरोबर पू किंवा रक्त येते, तर काही वेळेला दुधाच्या गुठळ्या येतात. दुधाचे प्रमाण कमी होते. जनावराला ताप येऊन त्याची अन्नावरची वासना उडते आणि ते अस्वस्थ होते. वेळीच उपचार न केल्यास संपूर्ण कास दगडासारखी कठीण होते. असे जनावर पुन्हा दुधावर आणणे कठीण होऊन बसते.
उपचार ः
प्रथम सडातील संपूर्ण दूध पशुवैद्यकाच्या साहाय्याने सडात खास नळी घालून काढून टाकावे. त्यानंतर सडात सोडावयाच्या प्रतिजैविकाच्या ट्यूब्ज प्रत्येक दिवशी प्रत्येक बाधित सडात एक याप्रमाणे चार ते पाच दिवस सोडाव्यात; तसेच प्रतिजैविकाचे इंजेक्शन तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून सलग तीन ते पाच दिवस द्यावे. कास घट्ट झाली असल्यास कासेला दररोज वेदनाशामक मलमाने मॉलिश करावे. दूध काढण्यापूर्वी पोटॅशियम परमॅंगनेटच्या सौम्य द्रावणाने कास धुवावी. सडावर काही जखमा असल्यास त्यांची योग्य ती देखभाल करावी. उपचार चालू असताना बाधित सडातील दूध वापरू नये; तसेच शेवटची ट्यूब सडात सोडल्यानंतर त्या सडाचे दूध साधारणतः 2.5 ते तीन दिवसांनंतर वापरण्यास घ्यावे.
रोगप्रतिबंधक उपाय ः
1) दूध काढणाऱ्या व्यक्तीने स्वतःची व कपड्यांची स्वच्छता ठेवावी. हाताची नखे कापलेली असावीत.
2) गोठ्यात जनावरांची गर्दी नसावी. गर्दी असल्यास एका गाईचे शिंग दुसऱ्या गाईस लागते किंवा गाईच्या सडावर पाय दिल्यामुळे जखमा होऊन कासदाह नियमित होऊ शकतो.
3) गोठ्याची जमीन स्वच्छ व सपाट असावी. गोठ्यात टोकदार वस्तू असू नयेत. मलमूत्राची ताबडतोब विल्हेवाट लावावी.
4) वासरांची शिंगे वयाच्या आठ ते दहाव्या दिवशी जाळून टाकावीत, म्हणजे दूध काढण्याच्या वेळी गोठ्यात गाई मारामारी करणार नाहीत; परस्परांना आणि गवळ्यास दुखापत करणार नाहीत.
5) अंगठा आणि चारही बोटे यामध्ये सड दाबून दूध काढू नये, त्यामुळे सडास इजा पोचते.
6) धारा काढताना सडास चिकट पदार्थ लावू नये, त्यामुळे सडास जखमा व वेदना होण्याची शक्यता असते.
7) धारा काढते वेळी गवळ्याने धूम्रपान करू नये, तंबाखू खाऊ नये, कारण त्याचा दुधास वास लागतो.
8) जनावर शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा, मारझोड करू नये. दूध काढण्यापूर्वी जनावरास खरारा करावा, त्यामुळे अंगावरील सुटे केस निघून जातात. खराऱ्यामुळे रक्ताभिसरण क्रिया वाढते, जनावर तरतरीत दिसू लागते. गोचीड, माश्या, उवा, लिखा इत्यादी कीटक पडून जातात; त्यामुळे दूध काढते वेळी गाय - म्हैस बेचैन दिसत नाही. शरीरावर जखमा असल्यास लगेच उपचार करता येतो.
9) दूध काढण्यापूर्वी जनावर धुणे आवश्यक आहे. पाण्याची कमतरता असल्यास केवळ कास, सड, शेपटी व मागील भाग धुवावा; त्यामुळे घाण, शेण, माती, चिखल, केस दुधात पडत नाही. धुण्यासाठी जंतुनाशकाच्या सौम्य द्रावणाचा वापर करावा.
10) वासरू गाईस पिऊ देऊ नये म्हणजे सडास जखम होणार नाही.
11) दूध काढण्याची जागा भरपूर पाण्याने स्वच्छ धुवावी, त्यासाठी जंतुनाशकाचा वापर करावा.
12) दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर करीत असल्यास त्यात काहीही दोष नसावा. एका गाईचे दूध काढून झाल्यावर मशिनचे कप दुसऱ्या गाईच्या सडास लावण्यापूर्वी जंतुनाशक द्रावणात बुडवून मगच वापरावेत, नाही तर एका गाईचा कासदाह दुसऱ्या गाईस होतो.
13) निरोगी जनावरांच्या धारा अगोदर काढाव्यात. कासदाह असलेल्या गाईचे दूध वेगळे काढावे.
14) गाय पान्हावल्यावर कमीत कमी वेळात (सात ते आठ मिनिटांत) पिळावी. जास्त दूध देणाऱ्या गाईची धार दिवसातून तीन वेळा काढावी. दूध ठराविक वेळीच काढावे. जास्त दूध देणारी गाय दोन गवळ्यांनी पिळावी. गाय पूर्णपणे पिळावी. कासेत थोडेदेखील दूध ठेवू नये, अन्यथा कासदाह होण्याची शक्यता असते.
15) दूध काढल्यानंतर सडाचे छिद्र तत्काळ बंद होत नाही, म्हणून 25 ते 30 मिनिटे गाईस जमिनीवर बसू देऊ नये. त्याकरिता गव्हाण चाऱ्याने भरलेली असावी म्हणजे जनावर खात राहील, गोठ्यात बसणार नाही. दूध काढणे झाल्यावर चारही सड रोगजंतुनाशक द्रावणात बुडवावेत.
16) गाय आटत आल्यास हळूहळू भाकड करावी. शेवटच्या दिवशी प्रत्येक सडात एक याप्रमाणे प्रतिजैविकाच्या ट्यूब सोडाव्यात. गाय विण्याअगोदर, कमीत कमी 45 ते 60 दिवस अगोदर गाय भाकड करावी.
17) पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एक वेळा तरी दुधाची परीक्षा स्ट्रिपकप टेस्ट किंवा कॅलिफोर्निया मस्टायटीस टेस्टद्वारे करून घ्यावी. जनावर आजारी असल्यास ताबडतोब औषधोपचार करून घ्यावा.
18) नवीन गाय विकत घेताना कासेची पूर्ण वाढ झालेली व कासेचा कोणताही आजार नसलेल्या गाईची निवड करावी.
संपर्क ः डॉ. यादव ः 9657110381
(लेखक क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)
Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120319/5367863895764696903.htm