Sunday, March 18, 2012

रेशीम शेतीचे वाढतेय जागतिक महत्त्व

डॉ. ए. डी. जाधव

थायलंड येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय रेशीम परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर तुती लागवड, तुतीचे विविध वाण, त्यांची उत्पादकता या अनुषंगाने यामध्ये चर्चेची देवाण-घेवाण झाली. जैवतंत्रज्ञान, जनुकीय शास्त्र यांच्या वापराद्वारे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढणे, मूल्यवर्धित उत्पादने, जैविक तसेच आरोग्यवर्धक उत्पादने वाढण्यासाठी तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाचे रेशीम उत्पादन व्हावे यासाठी शास्त्रज्ञांचे या वेळी एकमत झाले.

थायलंड येथे अलीकडेच 22 वी आंतरराष्ट्रीय रेशीम परिषद झाली. फ्रान्स आणि कृषी व सहकार मंत्रालय, थायलंड यांनी संयुक्तरीत्या या परिषदेचे आयोजन केले. परिषदेमध्ये सुमारे 247 आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, व्यापारी यांनी सहभाग घेतला. ही परिषद दर तीन वर्षांनी घेतली जाते. या परिषदेची सुरवात इटलीमध्ये 1870 मध्ये झाली. जागतिक स्तरावर रेशीम उत्पादक व रेशमाचा वापर करणाऱ्या देशांमधील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व संशोधकांसाठी चर्चात्मक व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने परिषदेचे आयोजन केले जाते. परिषदेत प्रामुख्याने जागतिक स्तरावर तुती लागवड, तुतीचे विविध वाण, त्यांची उत्पादकता आणि विविध वातावरणात त्यांची उत्पादन क्षमता कशी वाढेल या दृष्टीने विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.

परिषद आणि त्याअनुषंगाने रेशीम विषयाचे महत्त्व
रेशीम अळ्यांचे विविध वाण, त्यांची जागतिक स्तरावर गरज व त्यातून उत्पादित होणारे जागतिक दर्जाचे रेशीम या अनुषंगाने परिषदेत चर्चेची देवाण-घेवाण झाली. भारत, जपान, ब्राझील, फ्रान्स, बल्गेरिया, थायलंड, इंडोनेशिया, क्‍यूबा या देशांतील शास्त्रज्ञांची या वेळी संयुक्तीक चर्चा होऊन जागतिक स्तरावर विविध वातावरणात वाढणारे रेशीम अळ्यांचे वाण शोधावेत, त्यांच्या विविध भागांत चाचण्या घ्याव्यात या दृष्टीने विचार झाला, वन्य रेशीम उदा. टसर, एरी, मुगा या रेशीम जातींच्या अनुषंगाने विविध बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. वन्य रेशीम उत्पादन जागतिक स्तरावर तुती रेशीमच्या तुलनेत दहा टक्केच आहे, मात्र तुलनेने मागणी भरपूर आहे. त्यानुसार या क्षेत्रातही नावीन्यपूर्ण संशोधनाचा विविध देशांत उपयोग व्हावा, नवीन संशोधनाच्या दिशा ठराव्यात या दृष्टीने चर्चा झाली. आजही जागतिक स्तरावर शेतकऱ्यांच्या शेतांवर रेशीम अळ्यांना होणारे विविध रोग आणि किडींमुळे 20 ते 25 टक्के नुकसान होते. हे नुकसान कमी होण्याच्या दृष्टीने आनुवंशिक, पेशीशास्त्र या स्तरावर नावीन्यपूर्ण संशोधन आणि त्यामध्ये काही रोगप्रतिबंधक जनुके वापरली जाऊ शकतात व रोगमुक्त रेशीम अळ्यांचे वाण निर्माण करता येऊ शकतात यादृष्टीनेही जगभरातील संशोधन पुढे येत आहे, त्याचा फायदा शेतकऱ्यांकडील कोषनिर्मिती वाढण्यावर होणार आहे. दर्जेदार कोष निर्माण झाल्यास स्थानिक, जागतिक बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय रेशीम उत्पादन करणे शक्‍य होणार आहे. जागतिक स्तरावर रेशीम कोषाला भाव चांगला मिळाला पाहिजे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुणवत्तापूर्ण रेशीम निर्माण व्हायला हवे. तुती लागवड ते धागा निर्मिती आणि कापड निर्मितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर खर्च कमी होऊन उत्पादन वाढावे व एकूणच रेशीम शेतीचे जागतिक स्तरावर आशादायी अर्थशास्त्र तयार होण्याची गरज आहे. या अनुषंगानेही विविध तंत्रज्ञानांबाबत चर्चा होऊन सकारात्मक बाबींचा विचार करण्यात आला.

कापड निर्मितीच्याही पलीकडे गेले देश
रेशीम शेतीत नुसते कोष उत्पादन व त्यापासून कापड निर्मिती या टप्प्यापर्यंतच विकास झाला तर फायदा मर्यादित राहणार आहे व त्यामुळे रेशीमच्या अर्थशास्त्रात फारसा फरक पडणार नाही; मात्र दक्षिण कोरिया, थायलंड व इतर अनेक देशांनी रेशीम धागानिर्मिती व कापड निर्मितीच्या पलीकडे जाऊन रेशीम व तुतीपासून अनेक मूल्यवर्धित उत्पादने निर्मिती व विविध संस्था, विद्यापीठांमधून संशोधन सुरू केले आहे. तुतीचा चहा, तुती फळांची वाइन, जॅम, जेली, तुतीपासून चॉकलेट्‌स, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यांच्या अनुषंगाने उत्पादने व्यापारीदृष्ट्या या देशांमध्ये उत्पादित केली जात आहेत. हजारो कोटी रुपयांचा व्यापार त्यातून जगभर सुरू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने थायलंड येथील अनेक खासगी तसेच शासकीय स्तरावरील संशोधन संस्था, विद्यापीठे, कृषी मंत्रालये अग्रेसर आहेत.

दक्षिण कोरियामध्येही कोषांमधील विविध प्रथिनांचा अनेक उत्पादनांसाठी प्रामुख्याने साबण, सौंदर्य प्रसाधने, आरोग्यवर्धक टॉनिक, नॅनो सिल्की टूथपेस्ट अशा मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे रेशीम शेतीतली उत्पादकता, उत्पन्न व एकूणच अर्थशास्त्र बदलण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन सुरू आहे.

रेशीम कापड व धागानिर्मितीत आणि एकूणच तुती लागवड व कोषनिर्मितीत सेंद्रिय शेतीचा पर्यायही जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विचाराधीन आहे. सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यास तुती व रेशीमच्या विविध प्रथिनांचा सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्यवर्धक उत्पादने निर्मितीसाठी मोठा उपयोग होऊ शकतो. यातूनच रेशीम शेतीचे जागतिक स्तरावर चित्र आणि अर्थशास्त्र बदलू शकते.

वैद्यकीय शास्त्रात फ्लुरोसन्ट रेशीम आणि रेशीमच्या प्रथिनांमधील नॅनो (अत्यंत सूक्ष्म) घटकांना फार मोठे महत्त्व आहे. यानुसार जपानमधील विविध शास्त्रज्ञांनी फ्लुरोसन्ट रेशीम कापडाची निर्मिती केली आहे.
रेशीम उत्पादनातील खर्च कमी होऊन उत्पादकता वाढावी यासाठी जागतिक स्तरावर शेतकऱ्यांना विविध योजना आणि अनुदान या दृष्टीने एकात्मिक योजना राबविल्या जाव्यात, यासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांमध्ये विचारांची व संशोधनाची देवाण-घेवाण व्हावी, विविध तंत्रज्ञानांचा स्थानिक स्तरावर उपयोग न होता जगभरात जे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्याचा जगभरातील शेतकऱ्यांना उपयोग व्हावा, ही विचारधारणा रुजू होऊ पाहत आहे. रेशीम शेतीत एकात्मिक कीडनियंत्रण व जैविक कीडनियंत्रण यांचा वापर प्राधान्याने करावा, कीडनाशके व विविध रसायनांचाही कमीत कमी वापर व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नैसर्गिक रेशीमचा कृत्रिम धाग्यांच्या तुलनेत वापर वाढावा यादृष्टीने जागतिक स्तरावर अनेक संस्था, सरकारी यंत्रणा पुढे आल्या आहेत.
जैवतंत्रज्ञान, जनुकीय शास्त्र यांच्या वापराद्वारे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढणे, मूल्यवर्धित उत्पादने, जैविक तसेच आरोग्यवर्धक उत्पादने वाढण्यासाठी तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाचे रेशीम उत्पादन व्हावे यासाठी शास्त्रज्ञांचे या वेळी एकमत झाले.

थायलंडची आघाडी
थायलंडसारख्या छोट्या देशात नैसर्गिक रेशीमला अति उच्च स्थान असून, खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या तुती लागवडीपासून जागतिक दर्जाची मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यात अग्रेसर आहेत. त्याद्वारे त्यांनी ग्रामीण भागात विविध मूल्यवर्धित उत्पादनांचे जणू जाळेच तयार केले आहे. त्याद्वारे रोजगाराच्या विविध ग्रामीण उद्योगांच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करून परकीय चलनासाठी, संशोधनासाठी विस्तृत यंत्रणा निर्माण केली आहे.

जागतिक स्तरावर सध्या एक लक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त रेशीम धाग्यांची निर्मिती होते; मात्र त्यामध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त सहभाग हा एकट्या चीन देशाचा आहे. भारताचा सहभाग 19 हजार 600 मेट्रिक टन एवढा आहे. मात्र, उत्पादनात आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. भारतातील हवामान, जमीन, नैसर्गिक स्रोत आणि मनुष्यबळ यांचा विचार करता चीनच्या बरोबरीत रेशीम उत्पादन वाढविणे सहज शक्‍य आहे. मात्र त्यास शासन, सार्वजनिक संस्था, खासगी उद्योग, बिगरसरकारी संस्था आणि एकूणच ग्रामीण स्तरावर जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून रेशीम चळवळ उभी राहिल्यास हजारो कोटी रुपयांचे परकीय चलन आपल्या देशात येऊ शकते. आपल्या देशाला रेशीम उत्पादनाची हजारो वर्षांची परंपरा आहे. बनारस सिल्क, पैठणी, गढवाल सिल्क, हिमरू शाल, कांजीवरम आदींना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे; तसेच भारत देश हा आयुर्वेदाचा देश म्हणून ओळखला जातो. तुतीपासूनही आपल्या देशात अनेक मूल्यवर्धित उत्पादने उत्पादित करून अनेक उद्योगधंदे सुरू करणे शक्‍य आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचा तांत्रिक प्रतिनिधी या नात्याने मी थायलंड कृषी मंत्रालय व अधिकाऱ्यांसमवेत विविध शेतकऱ्यांच्या रेशीम शेतांना भेटी दिल्या. तुती लागवड व रेशीम शेतीतील कमी खर्चातील तंत्रज्ञानाबाबत सविस्तर चर्चा केली. खासगी उद्योगातील चुलथाई सिल्क कंपनी लिमिटेड या कंपनीला भेट देऊन विविध मूल्यवर्धित उत्पादनांची माहिती घेतली. त्यांच्यासोबत विविध तंत्रज्ञान व सामंजस्य करार करण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा झाली. क्‍यूबा येथील राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेसोबतही रेशीम शेतीतील प्रशिक्षण संशोधन यादृष्टीने आमच्या विद्यापीठाशी तांत्रिक व सामंजस्य करार करण्याबाबत सकारात्मक बोलणी झाली आहेत.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120315/5317788203389813513.htm