Sunday, March 18, 2012

व्यवस्थापन पेरू बागेचे...

डॉ. विकास खैरे

पेरूच्या झाडाला योग्य आकार देण्यासाठी सुरवातीच्या काळात हलकी छाटणी करावी. झाडांची उंची मर्यादित ठेवावी. छाटणीमुळे नवीन फुटवा येऊन चांगले उत्पादन मिळते. सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते. रोग, किडीचा उपद्रवदेखील पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी प्रमाणात होतो.

पश्‍चिम महाराष्ट्रातील मैदानी प्रदेशात पेरूच्या हस्त बहरापासून अधिक आर्थिक फायदा मिळण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अंतर्गत प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे विकसित केलेली सरदार (लखनौ-49) ही जात दर्जेदार उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या जातीची फळे मोठी व गोल आकाराची असतात. गर पांढरा असून, गोड असतो. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असते. या जातीची झाडे उंच न वाढता आडवी वाढतात व उंची नियंत्रित ठेवता येते. या जातीच्या बरोबरीने अलाहाबाद सफेदा, गुलाबी गराचा पेरू, सीडलेस बस्ती, बस्ती रेड, ललित, पंतप्रभात, धारीदार, संगम, श्‍वेता या जाती लागवडीसाठी चांगल्या आहेत. दाबकलम, भेटकलम, छाटकलम आणि गुटीकलम पद्धतीने पेरूची कलमे तयार करता येतात. महाराष्ट्रात सर्वत्र "दाबकलम' पद्धतीने पेरूची कलमे केली जातात.

चांगल्या उत्पादनासाठी आणि झाडाच्या योग्य वाढीसाठी पेरूची लागवड 6 x 6 मीटर अंतरावर करावी. झाडाला योग्य आकार देण्यासाठी सुरवातीच्या काळात त्याची छाटणी करावी, झाडांची उंची मर्यादित ठेवावी. छाटणीमुळे नवीन फुटवा येऊन चांगले उत्पादन येते, सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग, किडीचा उपद्रवदेखील पारंपरिक पद्धतीत कमी प्रमाणात होतो. पेरू बागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची बाब आहे. काही वेळा बागेत कीडग्रस्त व रोगग्रस्त फळे तशीच पडलेली असतात. त्यातूनच परत परत कीड व रोगांचा प्रसार होत असतो. त्याकरिता बागेतील व बागेवरील कीड व रोगग्रस्त फळे गोळा करून त्यांचा नायनाट करावा.

पेरू बागेवर प्रामुख्याने पांढरे ढेकूण (मिली बग), खवले कीड, फुलकिडे, फळमाशी, मावा, पांढरी माशी, खोडावर जाळी करणारी अळी व सूत्र कृमी या किडींचा उपद्रव सर्रास आढळून येतो. अयोग्य व्यवस्थापन असेल तर पेरूवर देवी, पानांवरील ठिपके, फळसड, फांदीमर इत्यादी रोगांचा उपद्रव दिसून येतो. त्याचे सामुदायिकरीत्या गाव पातळीवर बागेचे व्यवस्थापन करावे. बागेला आंतरमशागत करून स्वच्छता ठेवावी, तणनियंत्रण करावे त्यामुळे रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. कीड व रोगग्रस्त फांद्या बहर धरण्यापूर्वीच बागेतून बाहेर काढून त्यांचा नायनाट करावा. अति जुन्या बागांमधील बांडगूळदेखील नष्ट करावे.

खते व्यवस्थापन ः
झाडांची वाढ जलद व जोमदार होण्यासाठी खतांची योग्य मात्रा देणे आवश्‍यक असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी शिफारस केल्याप्रमाणे पेरूच्या प्रत्येक झाडास पुढीलप्रमाणे खते द्यावीत. नत्र तीन वेळेस समप्रमाणात विभागून जून-जुलै, ऑगस्ट - सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये द्यावे. पालाशदेखील जून-जुलै व ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये समप्रमाणात विभागून द्यावे. संपूर्ण स्फुरद जून-जुलैमध्येच द्यावे. फळ बहर घेणे सुरू झाल्यावर म्हणजे पाच वर्षांच्या पुढे प्रत्येक झाडास 25 ते 30 किलो शेणखत मे महिन्याच्या शेवटी आणि 450 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद व 400 ग्रॅम पालाश बहराच्या वेळी आणि उरलेले 450 ग्रॅम नत्र फळे धरल्यानंतर द्यावे.

पेरू बागेस जस्त, लोह, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसू शकते. कारण जमिनीमधील कर्बाचे कमी झालेले प्रमाण, वाढलेल्या चुनखडीचे प्रमाण व मुख्य अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता येऊन थंडीच्या हंगामात फळवाढीच्या अवस्थेत पाने लालसर रंगाची होऊन फळवाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी विशेषतः नत्र, स्फुरद तसेच जस्त हे अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार संतुलित वापर केल्यास व अति पाण्याचा वापर टाळल्यास पाने लाल होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

माती परीक्षणानुसार जस्ताची कमतरता मातीमध्ये (0.6 मिलिग्रॅम प्रति किलोपेक्षा कमी) असल्यास बहराच्या वेळी शेणखत व रासायनिक खताबरोबर 70 ग्रॅम झिंक सल्फेट प्रति झाड याप्रमाणे द्यावे. लोहाची कमतरता असल्यास (4.5 मिलिग्रॅम प्रति किलोपेक्षा कमी) असल्यास बहराच्या वेळी शेणखत व रासायनिक खताबरोबर 80 ग्रॅम फेरस सल्फेटचा प्रति झाड वापर करावा.

बोरॉनचीसुद्धा कमतरता येऊ शकते (0.5 मिलिग्रॅम प्रति किलोपेक्षा कमी). त्यासाठी 15 ग्रॅम बोरॅक्‍स प्रति झाड याप्रमाणे बहराच्या वेळी द्यावे.
फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कमतरतेनुसार केल्यास फायदेशीर ठरते. त्यासाठी 0.2 टक्का चिलेटेड झिंक याची (दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी फुले येण्यापूर्वी 15 दिवसांच्या अंतराने दोनदा करावी, तसेच लोहाची कमतरता पडून पिवळी पडल्यास 0.1 टक्का चिलेटेड लोहाची (एक ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी. ही फवारणी फुलोऱ्यापूर्वी 15 दिवसांच्या अंतराने दोनदा करावी. तसेच बोरॉनची कमतरता असल्यास 0.2 ते 0.3 टक्का बोरीक ऍसिड (दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी फुले येण्यापूर्वी 15 दिवसांच्या अंतराने दोनदा करावी.

फळमाशीच्या नियंत्रणासाठी मिथाईल युजेनॉल वापरून बनविलेल्या रक्षक सापळ्यांचा प्रति एकरी पाच या प्रमाणात वापर करावा व किडीचे सर्वेक्षण आणि नियंत्रण करावे. नियंत्रणासाठी दोन मि.लि. मॅलेथिऑन प्रति लिटर पाण्यात मिसळून फळांवर फवारावे. पेरूची फळे सुपारीएवढी लहान असल्यापासून शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा दहा ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 25 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. फवारणी दर 15 दिवसांनी पाच ते सहा वेळा रोगाच्या तीव्रतेनुसार करावी.
पांढरे ढेकूण (मिली बग) व खवले कीड या किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी 20 ते 25 ग्रॅम दहा लिटर पाण्यातून फवारावे. तसेच क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरी हे परोपजीवी कीटक हेक्‍टरी 1000 ते 1500 भुंगेरे सायंकाळी सहानंतर झाडावर सोडावेत. गरजेनुसार परत 15 ते 20 दिवसांनी हेक्‍टरी 1000 ते 1500 भुंगेरे सोडावेत. पेरू बागेत मित्र कीटकांना अपायकारक कीटकनाशके फवारू नयेत.

आरोग्यदायी पेरू
लिंबूवर्गीय फळांपेक्षा तीन ते चार पट जीवनसत्त्वे पेरूमध्ये आहेत. आहारदृष्ट्या पेरूमध्ये व्हिटॅमिन "सी'ची अधिक प्रमाणात उपलब्धता दिसून येते. आयुर्वेदातही या फळाला विशेष असे स्थान आहे. पेरू हे एक उत्तम, कणखर विशेष म्हणजे कमी पाण्यावर येणारे व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर फळझाड आहे. पेरूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ उदा. पल्प, जेली, जॅम, ज्यूस, सॅलेड, पुडिंग, आइस्क्रीम पावडर, नेक्‍टर, बर्फी अशी दर्जेदार उत्पादने बनविली जातात. इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोहाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात दिसून येते.
--------------------------------------------------
संपर्क ः डॉ. खैरे ः 9371015927
(लेखक कृषी महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.)

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120306/4981111811095360851.htm