केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट, हैदराबाद येथे दूरस्थ शिक्षण पद्धतीसह उपलब्ध असणाऱ्या "स्थायी ग्रामीण विकास' विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी खालील प्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अभ्यासक्रमाचे स्वरूप ः हा अभ्यासक्रम हैदराबाद विद्यापीठातर्फे घेण्यात येतो. अभ्यासक्रम टपालाद्वारे उपलब्ध असून त्यासाठी काही निवडक शहरांमध्ये मार्गदर्शनपर केंद्र पण उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना हैदराबाद विद्यापीठ व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पदविका देण्यात येते. आवश्यक शैक्षणिक पात्रता ः अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान असायला हवे. अभ्यासक्रमाचा कालावधी व माध्यम ः अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असून तो इंग्रजी माध्यमातून उपलब्ध आहे. अभ्यासक्रमाची सुरवात जानेवारी 2012 पासून होईल. निवड प्रक्रिया ः अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांमधून त्यांची गुणवत्ता व गुणांकाच्या आधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल. अभ्यासक्रमाचे शुल्क ः निवड झालेल्या उमेदवारांना ते सर्वसाधारण गटातील असल्यास 16,000 रुपये (राखीव गटातील विद्यार्थ्यांना 15,000 रुपये) परीक्षा शुल्क म्हणून भरावे लागेल व त्यामध्ये अभ्यासक्रम मार्गदर्शन साहित्य घरपोच मिळू शकेल. अर्ज व माहितीपत्रक ः अर्ज व माहितीपत्रकासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंटच्या www.nird.ong.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा 500 रु.चा "एनआयआरडी- डीईसी- पीडीडी- एसआरडी' यांच्या नावे असणारा व हैदराबाद येथे देय असणारा डिमांड ड्रॉफट संस्थेच्या कार्यालयात विनंती अर्जासह पाठवावा. याशिवाय अधिक माहिती हवी असल्यास दूरध्वनी क्र. 040-248008585 वर संपर्क साधावा. अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद 500 020 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर अशी आहे.
Source Link; http://www.agrowon.com/Agrowon/20111129/5515850937155594759.htm
डॉ. आर. जी. सोमकुंवर:
सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत रोगांची समस्या नाही, परंतु किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्याने जाणवते. आता थंडीसुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे बागेत पुढील काळात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी योग्य व्यवस्थापन ठेवणे गरजेचे आहे. कलम केलेल्या बागेत वेलीची वाढ झपाट्याने सुरू आहे. कलम केल्यानंतर डाऊनीचा प्रादुर्भाव बागेत होता. अशा बागेत कलम काडीची वाढ अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. या बागेत बोदावर पाणी दिल्यानंतर कलम जोडा जवळ पुन्हा आर्द्रता निर्माण होत असल्यामुळे रोगाचा प्रसार पुन्हा वाढण्याची समस्या उद्भवते, अशा बागेत शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करून रोग नियंत्रणात ठेवावा. बागेत कलम यशस्वी झाल्यानंतर काही काळ निघून गेलेला असतो, अशा ठिकाणी कलम जोड मजबूत होत आहे. याचसोबत कलम जोड फुगलेला दिसून येईल म्हणजेच कलम करण्याकरिता वापरण्यात आलेली प्लॅस्टिकची पट्टी कलम जोडाच्या आत गुंतल्यासारखी दिसून येईल ही परिस्थिती बोगस कलम केल्याच्या 30 ते 35 दिवसांनंतर आढळून येते, ही प्लॅस्टिकची पट्टी ढिली करून पुन्हा आवळून घ्यावी किंवा ज्या ठिकाणी कलम जोड यशस्वी झाला असे दिसून येते अशा ठिकाणी सुतळीने कलमजोड पुन्हा बांधून घ्यावा. अन्यथा उन्हामुळे कलमजोड सुकत जातो. तसेच सायन काडी आणि स्टॉकमध्ये चिरल्यासारखी परिस्थिती दिसून येते. सुतळीने बांधल्यामुळे अशी परिस्थिती येणार नाही. ज्या ठिकाणी कलम यशस्वी होऊन वाढ समाधानकारक होत आहे अशा ठिकाणी आता थंडी सुरू झाल्यामुळे फारशी वाढ होणार नाही थंडी संपल्यानंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यात रिकट घ्यायचा राहील, अशावेळी कलम जोडाच्या चार ते पाच डोळे काडी परिपक्व असणे गरजेचे असते. तेव्हा या बागेत पोटॅशची पूर्तता करून काडी परिपक्व करून घ्यावी. ज्या बागेत कलम केल्यानंतर कलम यशस्वी झाले, परंतु पाऊस किंवा रोगांचा प्रादुर्भाव यामुळे वाढ अपेक्षित नाही अशा बागेत पुढील काळात रिकट घेण्याकरिता कलम जोडाच्या वर काडी पाहिजे तशी अपेक्षित वाढलेली नसेल. या ठिकाणी नत्र व स्फुरद असलेल्या ग्रेडचे खत वापरून थोडीफार वाढ पुन्हा करून घेता येईल. जुन्या बागेचे व्यवस्थापन ः जुन्या बागेत सध्या घडाची प्रीब्लूम ते मणी सेटिंगची अवस्था आढळून येईल. प्रीब्लूम अवस्थेतील द्राक्ष बागांमध्ये पुढील काळातील वातावरणाचा व घडाचा विकास होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या प्रकाशसंश्लेषणाचा विचार करता बागेत कॅनॉपीमधील असलेली गर्दी कमी करणे, तसेच घडांची संख्या निर्धारित करून इतर घड काढून टाकणे सध्या फार महत्त्वाचे आहे. उशिरा फेलफूट काढल्यास ओलांड्यातून बऱ्यापैकी अन्नद्रव्य वाया गेलेले असते. याकरिता वेळेवर फेलफूट काढून टाकल्यास कॅनॉपीमध्ये हवा खेळती राहील. प्रकाशसंश्लेषण होण्याकरिता कॅनॉपोवरील नवीन पानांना वाव मिळेल. सुरवातीच्या काळात पाने नवीन व कोवळी असल्यामुळे प्रकाशसंश्लेषण चांगले होते, म्हणजेच नवीन पाने आवश्यक असलेले खाद्यपदार्थ चांगल्या रीतीने तयार करतात. या वेळी मोकळी कॅनॉपी फार महत्त्वाची आहे. प्रत्येक वर्गफूट अंतरावर एक घड अशा प्रकारे स्थानिक बाजारपेठ आणि प्रत्येक दीड वर्गफूट अंतराकरिता एक घड निर्यातक्षम उत्पादनाच्या दृष्टीने विचार करून वेलीवरील इतर घड काढून टाकावेत. यामुळे शिल्लक राहिलेल्या वेलीवरील प्रत्येक घडाचा विकास चांगला होण्यास मदत होईल.
Source link: http://www.agrowon.com/Agrowon/20111126/4695985347009855570.htm
राज्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली जात आहे. मेंढ्यांमध्ये लोकर व मांसोत्पादनासाठी दख्खनी मेंढी आणि फक्त मांसासाठी मडग्याळ मेंढी या अत्यंत काटक जाती आहेत. या सर्व जाती राज्यातील दुष्काळप्रवण भागांत अत्यंत कमी व निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर तग धरून राहतातच, शिवाय त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही चांगली आहे. पैदाशीसाठी नराची निवड = नर हा कळपातील सुदृढ व त्या-त्या जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा. पैदाशीचा नर चपळ असावा. पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा म्हणजे पुढील पिढ्यांत जुळे व तिळे करडे देण्याचे प्रमाण वाढते. पैदाशीच्या नराची प्रजोत्पादनक्षमता चांगली असावी, जेणेकरून एका दिवशी जास्तीत जास्त माद्यांना गर्भधारणा करण्यास तो सक्षम ठरेल. पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा असावा. पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यापासून झालेला असावा. नर निवडताना दीड ते दोन वर्षांचा निवडावा. साधारणपणे दीड ते दोन वर्षांच्या नराला 30 शेळ्या - मेंढ्यांच्या पैदाशीला वापरावे. दर दोन वर्षांनी नर बदलावा व हा बदल करताना शक्यतो दुसरा नर लांब अंतरावरून आणावा म्हणजे सकुळ प्रजननास आळा बसून वाईट परिणाम होणार नाहीत. संपर्क फोन नं. - 02426 - 243455, अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
Source Link: http://www.agrowon.com/Agrowon/20111128/5433855174707094694.htm
हुरडा -रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत (सॉफ्ट डफ) असतात, त्या वेळेला भाजलेल्या (होरपळलेल्या) अवस्थेत अतिशय चवदार, मऊ आणि गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात. हिरव्या दाण्यांचा हुरडा अतिशय चांगला लागतो, कारण त्या वेळेला त्या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या उष्णतेवरती भाजले असता दाण्यांतील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन "कॅरमलायझेशन'मुळे दाण्यांस एक प्रकारची स्वादिष्ट चव प्राप्त होते. हुरड्यामध्ये लिंबू, मीठ, साखर, तिखट, मसाला यांसारखे पदार्थ वापरून त्याची चव द्विगुणित करता येते. खास हुरड्यासाठी गोडसर, रसाळ आणि भरपूर दाणे असणाऱ्या फुले उत्तरा या वाणाची शिफारस संशोधन केंद्रामार्फत करण्यात आलेली आहे. सध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे, त्यामुळे हुरडा भाजण्याची शास्त्रीय पद्धत विकसित करणे, त्याचा साठवण कालावधी वाढविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. त्यामुळे हुरड्याची उपलब्धता वर्षभर होईल. लाह्या - ज्वारीपासून लाह्या बनविण्यासाठी प्रामुख्याने त्या ज्वारीच्या दाण्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे. कारण अशा प्रकारचे दाणे अति उच्च तापमानात एकदम गरम केले असता दाण्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते दाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे दाण्यातील स्टार्च फुलला जाऊन त्याचा बस्ट होतो व पुढे त्याची लाही तयार होते. जेवढ्या प्रमाणात स्टार्च दाण्यामध्ये अधिक असेल, त्या प्रमाणात लाहीचे आकारमान होते, त्यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता असते. ज्वारीच्या लाह्या सध्या "लो कॅलरी हाय फायबर स्नॅक फूड' म्हणून लोकप्रिय आहेत. आपल्याकडे विकसित केलेल्या ज्वारीच्या जातीमध्ये "आर.पी.ओ.एस.व्ही.-3' या जातीपासून 98 टक्के लाह्या मिळाल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे; तसेच या लाह्या अधिक चवदार होण्यासाठी विविध मसाल्याचे पदार्थ वापरून चविष्ट लाह्या तयार करणे, तसेच या लाह्या अधिक काळ चांगल्या कुरकुरीत चवदार राहण्यासाठी व्हॅक्यूम पॅकेजिंग तंत्राचा वापर करण्याचे प्रयोग चालू आहेत. बिस्कीट आणि कुकीज - बिस्कीट आणि कुकीजची निर्मिती प्रामुख्याने गव्हाच्या मैद्यापासून केली जाते; परंतु काही प्रयोगाअंती असे दिसून आले आहे, की मैद्यामध्ये साधारणतः 20 टक्क्यांपर्यंत आपण ज्वारीचे पीठ वापरून बिस्किटे व कुकीज चांगल्या प्रतीची करू शकतो. लो कॅलरीज बिस्कीट किंवा कुकीज बनविण्यासाठी साखरविरहित, क्रीमविरहित, प्रथिनयुक्त असे घटक पदार्थ वापरता येतील, तसेच त्याची पौष्टिक मूल्ये वाढविण्यासाठी नाचणी, सोयाबीन, ज्वारीच्या माल्ट पिठाचा वापर करता येईल. संपर्क ः डॉ. उत्तम चव्हाण, मो. नं. ः 9657214838 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
Source link: http://www.agrowon.com/Agrowon/20111128/5433855174707094694.htm
ेनिशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. उथळ आणि हलक्या जमिनीत फुलदांडे आणि फुले लहान राहतात आणि हंगामही लवकर संपतो. भारी, काळ्या जमिनीत मर आणि कूज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. लागवड शक्यतो एप्रिल - मे महिन्यांत करावी. लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद मागील वर्षीच्या पिकापासून निवडावेत. 15 ग्रॅम वजनापेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीस वापरल्यास फुले येण्यास सहा ते सात महिने लागतात. निवडलेले कंद लागवडीपूर्वी 0.2 टक्का तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात 15 मिनिटे बुडवून सावलीत वाळवावेत. त्यानंतर लागवडीसाठी वापरावेत. लागवडीपूर्वी जमिनीची उभी-आडवी, खोल नांगरट करून, कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. सरी वरंब्यावर 30 सें.मी. x 30 सें.मी. अंतरावर कंदाची लागवड करावी. कंद जमिनीत पाच ते सात सें.मी. खोल पुरावा. हेक्टरी साधारणपणे 60 ते 70 हजार कंद पुरेसे होतात. निशिगंध कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद देते. जमिनीची पूर्वमशागत करताना हेक्टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी 200 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी संपूर्ण स्फुरद व पालाश आणि 50 किलो नत्राचा हप्ता द्यावा. राहिलेले नत्र तीन समान हप्त्यांत लागवडीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी द्यावे. लागवडीनंतर दहा दिवसांनी दहा किलो ऍझोटोबॅक्टर 100 किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावा. याच पद्धतीने दहा किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक आणि दहा किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी 100 किलो ओलसर शेणखतात मिसळून हे ढीग आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र करून हे खत एक हेक्टर पिकाला द्यावे. लागवडीनंतर लगेच पहिले पाणी व दुसरे पाच ते सात दिवसांनी द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. फुलांचे दांडे सुरू झाल्यावर नियमित पाणी द्यावे. लागवड केल्यापासून पहिल्या तीन-चार महिन्यांत वेळोवेळी तण काढून जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवली, तर पिकाची वाढ जोमाने होते. जाती : 1) सिंगल ः या प्रकारातील फुले पांढरीशुभ्र असून, अत्यंत सुवासिक असतात. या प्रकारामध्ये स्थानिक सिंगल, शृंगार, फुले रजनी, प्रज्वल या जाती आहेत. 2) डबल ः या प्रकारामध्ये स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव या जाती आहेत. या जातीची फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात. सेमी डबल या प्रकारच्या जातीची फुले फुलदाणीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. 3) व्हेरिगेटेड ः या प्रकारामध्ये सुवर्णरेखा व रजतरेखा या जाती आहेत. या जाती बागेत, कुंडीमध्ये शोभेसाठी लावण्यासाठी चांगल्या आहेत. संपर्क : 020 - 25693750 राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
Source link: http://www.agrowon.com/Agrowon/20111128/5433855174707094694.htm
1) मृग बहर ः 1) पीक व्यवस्थापनात बागेला 17 ते 20 लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे पाणी द्यावे. 2) बाग तणमुक्त ठेवावी व बागेतील पानफुटवे काढत राहावे. 3) बागेतील रोगट फळे काढून नष्ट करावीत. पीक संरक्षण ः 1) तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास रोगट फळे काढून झाल्यावर लगेच बोर्डेक्स (0.5 टक्के)ची फवारणी करून घ्यावी. 2) रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास वरील फवारणीच्या सात दिवसांनंतर थायामेथोक्झाम (25 टक्के डब्ल्यू.जी.) 0.25 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. ब) हस्त बहर - 1) बागेला 17 ते 20 लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे पाणी द्यावे. 2) बागेतील पानफुटवे काढावेत व बाग तणमुक्त ठेवावी. पीक संरक्षण ः 1) बागेतील पानफुटवे काढून झाल्यावर, झाडाच्या मुख्य खोडांवर (10 टक्के) बोर्डेक्सचे मिश्रण + क्लोरोपायरिफॉस दोन मि.लि. प्रति लिटर याप्रमाणे झाडाच्या वयानुसार जमिनीपासून 30 ते 45 सें.मी.पर्यंत पेस्ट लावावी. 2) पानांवर ठिपके दिसून आल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड (50 टक्के डब्ल्यू.पी.) 2.5 ग्रॅम प्रति लिटर + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम प्रति लिटर तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास थायामेथोक्झाम (25 टक्के डब्ल्यू.जी.) 0.3 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. क) आंबिया बहर ः 1) बाग ताणावर असू द्यावी. 2) धारदार कात्रीने बागेची छाटणी करण्यापूर्वी कात्री सोडिअम हायपोक्लोराईडच्या द्रावणात बुडवून निर्जंतुक करून घ्यावी. 3) छाटणी करताना झाडाचा आकार, फांद्यांची घनता विचारात घेऊनच छाटणी करावी. 4) पेन्सिलच्या आकाराच्या फांद्या तशाच ठेवून उपफांद्यांचे शेंडे छाटावेत. 5) मुख्य झाडावरील / फांदीवरील एक ते दोन इंच लांबीचे एकेरी काटे व सोटफाटे काढून टाकावेत. 6) छाटणी करताना रोगट / तेलकट डागग्रस्त बाग छाटून आलेले मजूर किंवा कात्री निरोगी बागेत वापरू नये. 7) छाटणी झाल्यानंतर सर्व कचरा लगेचच उचलून बागेच्या बाहेर नेऊन जाळावा. 8) बागेतील ठिबक सिंचनाची स्वच्छता करून घ्यावी. पीक संरक्षण ः 1) छाटणी झालेल्या प्रत्येक फांदीवर, छाटलेल्या जागी (10 टक्के) बोर्डो मिश्रणाची पेस्ट करून लावावी, पेस्टचा सामू उदासीन करून घ्यावा. 2) सोडिअम हायपोक्लोराईट 2.5 मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे निर्जंतुक द्रावण बनवावे.
Source link: http://www.agrowon.com/Agrowon/20111128/5433855174707094694.htm