Wednesday, November 30, 2011

पूरक व्यवसायासाठी शेळ्या - मेंढ्यांच्या कोणत्या जाती निवडाव्यात? पैदाशीसाठी नरांची निवड कशी करावी?

राज्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली जात आहे. मेंढ्यांमध्ये लोकर व मांसोत्पादनासाठी दख्खनी मेंढी आणि फक्त मांसासाठी मडग्याळ मेंढी या अत्यंत काटक जाती आहेत. या सर्व जाती राज्यातील दुष्काळप्रवण भागांत अत्यंत कमी व निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर तग धरून राहतातच, शिवाय त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही चांगली आहे. 
पैदाशीसाठी नराची निवड = 
नर हा कळपातील सुदृढ व त्या-त्या जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा. पैदाशीचा नर चपळ असावा. पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा म्हणजे पुढील पिढ्यांत जुळे व तिळे करडे देण्याचे प्रमाण वाढते. पैदाशीच्या नराची प्रजोत्पादनक्षमता चांगली असावी, जेणेकरून एका दिवशी जास्तीत जास्त माद्यांना गर्भधारणा करण्यास तो सक्षम ठरेल. पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा असावा. पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यापासून झालेला असावा. नर निवडताना दीड ते दोन वर्षांचा निवडावा. साधारणपणे दीड ते दोन वर्षांच्या नराला 30 शेळ्या - मेंढ्यांच्या पैदाशीला वापरावे. दर दोन वर्षांनी नर बदलावा व हा बदल करताना शक्‍यतो दुसरा नर लांब अंतरावरून आणावा म्हणजे सकुळ प्रजननास आळा बसून वाईट परिणाम होणार नाहीत. 
संपर्क फोन नं. - 02426 - 243455, 
अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर 


Source Link: http://www.agrowon.com/Agrowon/20111128/5433855174707094694.htm