Wednesday, November 30, 2011

द्राक्षवेल वाढीचे व्यवस्थापन...

डॉ. आर. जी. सोमकुंवर:


सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत रोगांची समस्या नाही, परंतु किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्याने जाणवते. आता थंडीसुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे बागेत पुढील काळात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी योग्य व्यवस्थापन ठेवणे गरजेचे आहे. 

कलम केलेल्या बागेत वेलीची वाढ झपाट्याने सुरू आहे. कलम केल्यानंतर डाऊनीचा प्रादुर्भाव बागेत होता. अशा बागेत कलम काडीची वाढ अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. या बागेत बोदावर पाणी दिल्यानंतर कलम जोडा जवळ पुन्हा आर्द्रता निर्माण होत असल्यामुळे रोगाचा प्रसार पुन्हा वाढण्याची समस्या उद्‌भवते, अशा बागेत शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करून रोग नियंत्रणात ठेवावा. 

बागेत कलम यशस्वी झाल्यानंतर काही काळ निघून गेलेला असतो, अशा ठिकाणी कलम जोड मजबूत होत आहे. याचसोबत कलम जोड फुगलेला दिसून येईल म्हणजेच कलम करण्याकरिता वापरण्यात आलेली प्लॅस्टिकची पट्टी कलम जोडाच्या आत गुंतल्यासारखी दिसून येईल ही परिस्थिती बोगस कलम केल्याच्या 30 ते 35 दिवसांनंतर आढळून येते, ही प्लॅस्टिकची पट्टी ढिली करून पुन्हा आवळून घ्यावी किंवा ज्या ठिकाणी कलम जोड यशस्वी झाला असे दिसून येते अशा ठिकाणी सुतळीने कलमजोड पुन्हा बांधून घ्यावा. अन्यथा उन्हामुळे कलमजोड सुकत जातो. तसेच सायन काडी आणि स्टॉकमध्ये चिरल्यासारखी परिस्थिती दिसून येते. सुतळीने बांधल्यामुळे अशी परिस्थिती येणार नाही. 

ज्या ठिकाणी कलम यशस्वी होऊन वाढ समाधानकारक होत आहे अशा ठिकाणी आता थंडी सुरू झाल्यामुळे फारशी वाढ होणार नाही थंडी संपल्यानंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यात रिकट घ्यायचा राहील, अशावेळी कलम जोडाच्या चार ते पाच डोळे काडी परिपक्व असणे गरजेचे असते. तेव्हा या बागेत पोटॅशची पूर्तता करून काडी परिपक्व करून घ्यावी. 

ज्या बागेत कलम केल्यानंतर कलम यशस्वी झाले, परंतु पाऊस किंवा रोगांचा प्रादुर्भाव यामुळे वाढ अपेक्षित नाही अशा बागेत पुढील काळात रिकट घेण्याकरिता कलम जोडाच्या वर काडी पाहिजे तशी अपेक्षित वाढलेली नसेल. या ठिकाणी नत्र व स्फुरद असलेल्या ग्रेडचे खत वापरून थोडीफार वाढ पुन्हा करून घेता येईल. 

जुन्या बागेचे व्यवस्थापन ः 
जुन्या बागेत सध्या घडाची प्रीब्लूम ते मणी सेटिंगची अवस्था आढळून येईल. प्रीब्लूम अवस्थेतील द्राक्ष बागांमध्ये पुढील काळातील वातावरणाचा व घडाचा विकास होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या प्रकाशसंश्‍लेषणाचा विचार करता बागेत कॅनॉपीमधील असलेली गर्दी कमी करणे, तसेच घडांची संख्या निर्धारित करून इतर घड काढून टाकणे सध्या फार महत्त्वाचे आहे. उशिरा फेलफूट काढल्यास ओलांड्यातून बऱ्यापैकी अन्नद्रव्य वाया गेलेले असते. याकरिता वेळेवर फेलफूट काढून टाकल्यास कॅनॉपीमध्ये हवा खेळती राहील. प्रकाशसंश्‍लेषण होण्याकरिता कॅनॉपोवरील नवीन पानांना वाव मिळेल. सुरवातीच्या काळात पाने नवीन व कोवळी असल्यामुळे प्रकाशसंश्‍लेषण चांगले होते, म्हणजेच नवीन पाने आवश्‍यक असलेले खाद्यपदार्थ चांगल्या रीतीने तयार करतात. या वेळी मोकळी कॅनॉपी फार महत्त्वाची आहे. 

प्रत्येक वर्गफूट अंतरावर एक घड अशा प्रकारे स्थानिक बाजारपेठ आणि प्रत्येक दीड वर्गफूट अंतराकरिता एक घड निर्यातक्षम उत्पादनाच्या दृष्टीने विचार करून वेलीवरील इतर घड काढून टाकावेत. यामुळे शिल्लक राहिलेल्या वेलीवरील प्रत्येक घडाचा विकास चांगला होण्यास मदत होईल.


Source link: http://www.agrowon.com/Agrowon/20111126/4695985347009855570.htm