Thursday, June 7, 2012

सुगंधाचा व्यवसाय जाणार दहा हजार कोटींवर

 देशातील पारंपरिक असलेला व सध्या आधुनिकतेचा साज ल्यालेला सुगंध व्यवसाय दरवर्षी 40 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. हा व्यवसाय या दराने वाढत राहिल्यास ते 2015पर्यंत दहा हजार कोटी रुपयांवर जाईल, असा विश्‍वास असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम) या संघटनेने व्यक्त केला आहे. 

यासंदर्भात असोचेमने प्रसिद्ध केलेल्या 'डोमेस्टिक फ्रॅगनन्स इंडस्ट्री ः दि वे अहेड' या अहवालात सध्या हा व्यवसाय तीन हजार 700 कोटींचा असल्याचे नमूद केले आहे. या अहवालानुसार सुगंध व्यवसायात डिओड्रंट, अत्तरे व रोलऑन यांचा समावेश होतो. भारतीय डिओड्रंट व रोलऑन यांची बाजारपेठ सध्या एक हजार 800 कोटी रुपये असून त्यात दरवर्षी 55 टक्के वाढ होत आहे. त्याचवेळी अत्तराची बाजारपेठ सध्या एक हजार 500 कोटी रुपयांची असून त्यात दरवर्षी 30 टक्के वाढ होत आहे. रोलऑनची बाजारपेठ सध्या 400 कोटी रुपयांची आहे. यामध्ये अत्यंत कमी ब्रॅंड बाजारात असल्यामुळे रोलऑनच्या बाजारपेठेची वाढ धीम्या गतीने होत आहे. 

दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या शहरांतून सुगंधांना असणारी वाढती मागणी हे देशातील सुगंधाचा हा व्यवसाय वेगाने फोफावण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे केवळ महानगरांतून सुगंधांचे नानाविध प्रकार विकणाऱ्या कंपन्यांनी आपले लक्ष दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या शहरांवर केंद्रित करण्यास सुरवात केली आहे. या क्षेत्रात 30 टक्के व्यवसाय हा असंघटित आहे. 
भारतीय सुगंध बाजारपेठेत 60 टक्के सुगंध हे पुरुषांसाठी आहेत असे आढळते. या गटात सतत नव्या सुगंधांची भर पडत असते. महागड्या सुगंधांचा व्यवसायही जोरात सुरू आहे. विशेषतः अशा सुगंधांना पुरुषांमध्ये अधिक मागणी असल्याचे हा अहवाल सांगतो. स्त्रियांसाठी तुलनेने कमी सुगंध बाजारात उपलब्ध असले तरी यामध्ये उत्तरोत्तर वाढ होताना दिसत आहे. युवा वर्गातील मुलामुलींकडूनही सुगंधांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होताना दिसत आहे. शहरांमध्ये 500 ते दोन हजार रुपये किमतीचे सुगंध ही पिढी विकत घेताना दिसते. यामध्ये डिओड्रंट व रोलऑनची संख्या अधिक आहे. विशेषत या दोन्ही प्रकारच्या सुगंधांची खरेदी मार्च ते सप्टेंबर या काळात अधिक होताना दिसते. Agriculture Information विशेषतः सागरी किनारपट्टीजवळच्या शहरांतून डिओड्रंटची विक्री जोरदार होते असेही निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.


Ref. Link: http://agrowon.com/Agrowon/20120522/5385183596195029522.htm

पाकिस्तानच्या बाजारपेठेत रावेरच्या केळीचा दबदबा

आखाती देशांतील केळी निर्यात अपयशी ठरल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील केळीला आता पाकिस्तानची बाजारपेठ मिळाली आहे. येथील बाजारपेठेत रावेरच्या केळीने दबदबा निर्माण केला आहे. रावेर व यावल तालुक्‍यांतील किमान 25 ट्रक केळीला पाकिस्तानातील लाहोर, कराची व इस्लामाबाद येथे मागणी वाढली आहे. अतिरिक्त जादा भाव मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. निर्यात सुरू झाली असली, तरी या आंतरराष्ट्रीय व्यापारात अजूनही काही अडचणी आहेत. त्या दूर झाल्यास रोज किमान शंभर ते दोनशे ट्रक केळी पाकिस्तानातील बाजारपेठेत जाऊ शकतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

या वर्षी पाकिस्तानमध्ये केळी उत्पादनाला फटका बसला आहे, त्यामुळे पश्‍चिम व उत्तर भारतातील केळीची मागणी पाकिस्तानातून होत आहे. सावदा येथील हितेंद्र नारंग यांची डी. के. ऍण्ड सन्स ही फर्म थेट पाकिस्तानला केळी पाठवीत आहे, तर सावदा व फैजपूर येथील आणखी किमान चार फर्म पाकिस्तानला अन्य व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने केळी निर्यात करीत आहेत. 1960 ते 70च्या काळात रावेर येथून देवनदास ऍण्ड पारूमल कं.तर्फे पाकिस्तानात केळी निर्यात होत होती. आता सुमारे 45 वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील केळी पाकिस्तानच्या बाजारपेठेत पोचली आहे. 

...अशी होते पॅकिंग पाकिस्तानातही दर्जेदार केळीला चांगली मागणी आहे. रावेर तालुक्‍यातील चिनावल, कुंभारखेडा; तर यावल तालुक्‍यातील न्हावी, भालोद, सांगवी आणि हिंगोणा या गावांतील केळी बाजारभावापेक्षा 250 ते 500 रुपये प्रति क्विंटल जास्त देऊन खरेदी केली जात आहेत. कापणीनंतर पूर्ण काळजी घेत फण्या करून, स्वच्छ धुऊन मग ती कागदी खोक्‍यात भरली जातात. एका खोक्‍यात 16 किलो केळी भरली जातात. भारतातून पाकिस्तानमध्ये तीन विविध मार्गांनी केळी निर्यात केली जाते. जळगाव जिल्ह्यातून मुंबईपर्यंत ट्रकने, तेथून जहाजातून वातानुकूलित कंटेनरमधून केळीची निर्यात होते. याचबरोबरीने अमृतसर जवळील वाघा बॉर्डर व श्रीनगरमार्गे ट्रकच्या माध्यमातून केळीची निर्यात होते. 

दक्षिण भारतातील केळीबाबत खबरदारी 
1960-70च्या दशकात जेव्हा केळी भारतातून पाकिस्तानात निर्यात होत होती, तेव्हा दक्षिण भारतातून विषाणूजन्य केळी पाठविली गेली होती. म्हणून आता पाठविण्यात आलेली केळी दक्षिण भारतातील नसल्याचे व केळी विषाणू रोगमुक्त असल्याचे प्रमाणपत्र येथील व्यापाऱ्यांना पाकिस्तानच्या शासनास द्यावे लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी विषाणू रोगमुक्त आहेत; मात्र तसे प्रमाणपत्र कोण देणार, अशी अडचण व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. सध्या रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ही केळी दक्षिण भारतातील नसल्याचे व जळगाव जिल्ह्यातील असल्याचे प्रमाणपत्र व्यापारी घेत आहेत. राज्य शासन, कृषी विभाग, महा बनाना किंवा दक्षिण भारतीय केळी उत्पादक महासंघ यापैकी कोणीही पुढाकार घेऊन विषाणूमुक्त केळीचे प्रमाणपत्र मिळवून दिले, तर येथील केळीला पाकिस्तानात आणखी मोठी बाजारपेठ खुली होणार आहे. या कामी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. सध्या सावदा व फैजपूर येथील भरत सुपे, तोलाराम कुंदनदास, जय मातादी फ्रूट कंपनी, भगवानदास लक्ष्मणदास ऍण्ड कं. व बऱ्हाणपूर मधील एक फर्म अन्य व्यापाऱ्यांच्या मदतीने केळी निर्यात करीत आहे. 

शेतकऱ्यांचा फायदा 
केळी पाकिस्तानला पाठविणारे सावदा येथील व्यापारी हितेंद्र नारंग यांनी सांगितले, की या निर्यातीत जादा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा आहे; तसेच या निर्यातीमुळे सुमारे सहाशे ते सातशे मजुरांना काम मिळाले आहे. आपल्याकडे सध्या 22 कंटेनर केळीची मागणी पाकिस्तानातून आहे. मात्र, वातानुकूलित कंटेनर उपलब्ध नसल्याने निर्यातीत अडचण येत आहे. 


Ref. Link: http://agrowon.com/Agrowon/20120606/5567840243232648437.htmAgriculture Information