Friday, January 13, 2012

सुरवात नवीन द्राक्ष लागवडीची...

मध्यम व हलक्‍या जमिनीत द्राक्ष वेलीची वाढ चांगली होते. जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा आणि क्षारता कमी असणे या गोष्टी द्राक्ष उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. जमिनीचे भौतिक गुणधर्म उदा. मातीचा पोत, मातीची रचना, खोली व पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्याचबरोबर रासायनिक गुणधर्म (मातीचा सामू व क्षारता इ. घटक) तपासूनच द्राक्ष लागवडीचा विचार करावा. 

नवीन द्राक्ष लागवडीचा कालावधी सुरू होत आहे. हे लक्षात घेऊन आतापासूनच नवीन लागवडीची पूर्वतयारी सुरू करायला हरकत नाही. पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आताची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. द्राक्ष पिकातून चांगला नफा मिळवायचा असेल, तर लागवडीच्या नियोजनापासूनच योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे असते. द्राक्ष बाग उभारणीमध्ये हवामानाच्या परिस्थितीची महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे द्राक्ष लागवड करताना हवामानातील घटकांचा विशेषतः तापमान, सूर्यप्रकाश, पर्जन्यमान व सापेक्ष आर्द्रता या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. 

1) तापमान ः 
द्राक्षवेलीच्या वाढीकरिता उष्ण व कोरड्या हवामानाची आवश्‍यकता असते. घडाच्या पक्वतेच्या काळात येणारा पाऊस हानिकारक असतो. वेलीच्या वाढीच्या काळामध्ये तापमान 40 अंश से.पेक्षा जास्त वाढल्यास फलधारणेवर विपरीत परिणाम होतो, उत्पादनात घट येते. त्याचप्रमाणे फळछाटणीनंतर कमीत कमी तापमान 15 अंश से.च्या खाली आल्यास डोळे फुटण्यास अडचणी येतात. 

2) पर्जन्यमान ः 
अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये द्राक्ष लागवड अयोग्य ठरते. कारण खरड छाटणीनंतर सूक्ष्म घडनिर्मितीच्या काळात जास्त पाऊस असल्यास घडनिर्मिती होत नाही. फळ छाटणीनंतर जर बागेत जास्त पाऊस आला, तर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन बागेत नुकसान होते. फळपक्वतेच्या कालावधीमध्ये जर पाऊस झाला, तर मणी तडकण्याची विकृतीसुद्धा जास्त दिसून येते. 

3) सापेक्ष आर्द्रता ः 
बागेमध्ये पाण्याचा कमी - अधिक वापर व पाऊस यावर त्या वातावरणातील आर्द्रता अवलंबून असते. बागेत जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणी विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो, त्यामुळे द्राक्ष लागवडीकरिता जागेची निवड करताना सापेक्ष आर्द्रतेचा विचार करणे आवश्‍यक असते. बागेत हवा खेळती राहिल्यास आर्द्रता वाढणार नाही. 

मातीसंदर्भातील घटक ः 
द्राक्षबाग लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये शक्‍य होत असली, तरी मध्यम व हलक्‍या जमिनीत वेलीची वाढ चांगली होते. जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा आणि क्षारता कमी असणे या गोष्टी द्राक्ष उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. जमिनीचा भौतिक गुणधर्म उदा. मातीचा पोत, मातीची रचना, खोली व पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्याचबरोबर रासायनिक गुणधर्म (मातीचा सामू व क्षारता इ. घटक) इत्यादी बाबींचा द्राक्षवेलीसाठी जमिनीची निवड करताना विचार करावा. 

1) मातीचा पोत ः 
मातीचा पोत ठरवताना त्यामध्ये वाळू व चिकनमातीच्या कणांचे प्रमाण विचारात घेतले जाते. त्यावरून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, कॅटायन विनिमय दर, निचरा व पाण्याचा जमिनीतील शिरकाव निश्‍चित होतो. वाळूच्या कणांचे जेवढे प्रमाण जास्त, तेवढे मातीमधील हवा खेळण्याचे प्रमाण, तसेच पाण्याचे वहन चांगले होते, निचरा चांगला होतो; परंतु या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. याउलट काळ्या चिकणमातीमध्ये पाणी चांगल्याप्रकारे धरून ठेवले जाते; परंतु पाण्याचा निचरा चांगला होत नाही, त्यामुळे द्राक्ष लागवडीसाठी या दोन्हींचा मध्य साधून मध्यम प्रकारच्या जमिनीची निवड योग्य ठरते. 

2) मातीची रचना ः 
मातीमधील कणांची रचना जमिनीची प्रतवारी (भारी, मध्यम व हलकी) या प्रकारामध्ये मोडते. भारी जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्याने इतर समस्या उद्‌भवतात, तर खूप हलक्‍या जमिनीत पाण्याच्या दुर्भिक्षाचे परिणाम जाणवतात, त्यामुळे द्राक्ष लागवडीसाठी मध्यम प्रकारच्या जमिनीची निवड करावी. या जमिनीत मुळांची वाढ अतिशय चांगल्याप्रकारे होते; तसेच पाण्याचा निचरा झाल्याने क्षारतेची समस्या लवकर उद्‌भवत नाही व उपचारांनी टाळता येते. 

3) जमिनीची खोली ः 
वेलीच्या मुळांचा विस्तार व वाढ यावर जमिनीच्या खोलीचा परिणाम होतो. खुंटांची मुळे जास्त खोलवर आणि लांबवर पसरत असल्याने कोणत्याही प्रकारच्या जमिनीत लागवड करता येणे शक्‍य असते. भारी जमिनीत देखील खुंटाची मुळे पाच फुटांपर्यंत चांगल्या प्रकारे वाढलेली आढळून येतात; परंतु स्वमुळावरील वेलींच्या बाबतीत मुळांचा मुख्य विस्तार प्रामुख्याने दोन फुटांपर्यंत आढळून येतो. यामुळे जमिनीच्या खोलीचा विचार लागवडीच्या दृष्टीने आवश्‍यक असतो. कमी खोलीच्या किंवा वरच्या थरात कठीण खडक असलेल्या ठिकाणी चर घेऊन किंवा रिपिंग करून मुळांच्या विस्तारासाठी अनुकूल वातावरण तयार करणे शक्‍य असते.

जमिनीचा सामू ः 
द्राक्षाची लागवड साधारणतः 6.5 ते 8.0 सामू असलेल्या जमिनीत आढळून येते. कमी किंवा जास्त सामुळे उपलब्ध होणाऱ्या अपायकारक घटकांचा परिणाम वेलीच्या वाढीवर होत असतो. 

4) जमिनीची क्षारता ः 
क्षारता ही मातीमध्ये उपलब्ध क्षारांच्या प्रमाणानुसार ठरविली जाते. यासाठी "विद्युत वाहकता' या प्रमाणाचा वापर केला जातो. विद्युत वाहकता ही मिली मोज प्रति सेंटिमीटर या एककाने मोजली जाते. जमिनीत जेवढे क्षार जास्त, तेवढी विद्युतवाहकता वाढत जाते. चार मिली मोज प्रति सेंटिमीटरपेक्षा अधिक क्षार असलेल्या जमिनीस खार जमीन म्हणून संबोधले जाते. अशा प्रकारची जमीन द्राक्ष लागवडीसाठी पूर्णपणे अयोग्य असते. अधिक क्षारतेमुळे वेलीची वाढ खुंटते व पानांवर जळल्यासारख्या खुणा दिसून येतात. 

या सर्व गोष्टींचा विचार करूनच नवीन द्राक्ष बाग लागवडीचे नियोजन आणि आखणीस सुरवात करावी. 


तंत्र मधुमका लागवडीचे

मधुमक्‍यापासून आर्थिकदृष्ट्या चांगला नफा मिळावा, तसेच मागणीप्रमाणे सतत पुरवठा होण्यासाठी मधुमक्‍याच्या दोन पिकांमध्ये ठराविक अंतर ठेवून लागण करावी. स्वीटकॉर्नच्या शेतात सतत ओलावा असावा. विशेषतः कणसाला केसर येण्यापासून ते दाणे भरेपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. काढणीनंतर प्रतवारी व पूर्वशीतकरणाचे योग्य प्रकारे नियोजन करावे. 

स्वीटकॉर्न म्हणजेच मधुमका, याचा उपयोग प्रामुख्याने हिरवी कणसे भाजून अथवा उकडून खाण्यासाठी आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांसाठी केला जातो. साध्या मक्‍यामध्ये साखरेचे प्रमाण दोन ते तीन टक्के एवढे असते, तुलनेने स्वीटकॉर्नमध्ये साखरेचे प्रमाण पाच ते 11 टक्के असते. यातील साखरेचे हे प्रमाण एका विशिष्ट कालावधीसाठी राहते. हा कालावधी शेतामध्ये पीक असताना दोन दिवस असतो आणि जसजसे तापमान वाढत जाईल, तसे हे प्रमाण कमी होते. हळूहळू यातील साखरेचे रूपांतर स्टार्चमध्ये होते. स्वीटकॉर्नची कणसे पिवळी, पांढरी किंवा पिवळे व पांढरे दाणे एकत्र असलेली असतात. 

हवामान - 
मका हे उष्ण हंगामी पीक आहे. मक्‍याची चांगली उगवण आणि जोमदार वाढ होण्यासाठी उबदार हवामानाची गरज असते. म्हणून पेरणीच्या वेळी जमिनीचे तापमान 25 ते 27 अंश से. असणे अधिक चांगले. सर्वसाधारण प्रजातींच्या (स्टॅंडर्ड) स्वीटकॉर्नसाठी पेरणी वेळी जमिनीचे तापमान 10 अंश से.पेक्षा आणि सुपर स्वीटकॉर्नसाठी 16 अंश से.पेक्षा खाली नसावे. स्वीटकॉर्नच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुक्‍याचा विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे जास्त काळ थंड हवामान किंवा सुरवातीलाच उष्ण हवामान असणे अपायकारक ठरते. अशा प्रकारच्या हवामानामुळे तुऱ्याच्या ठिकाणी कणसे, तसेच कणसांच्या ठिकाणी तुरे येऊ शकतात आणि नुकसान होते. स्वीटकॉर्नच्या शेतामध्ये सतत ओलावा असावा. विशेषतः कणसाला केसर येण्यापासून ते दाणे भरेपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. कमी ओलाव्याचे लक्षण म्हणजे पाने गुंडाळली जातात. कणसे भरण्याच्या वेळेस पाणी कमी पडल्यास परागीभवन नीट होत नाही, त्यामुळे कणसांमध्ये दाणे कमी भरतात. अशा कणसांना बाजारात चांगला दर मिळत नाही. त्याचप्रमाणे ज्या वेळी तापमान कडक म्हणजे 35 अंश से.च्या वर असते आणि उष्ण वारे वाहतात, अशा वेळी स्वीटकॉर्नच्या कणसांच्या टोकाकडे दाणे भरत नाहीत, पर्यायाने बाजारभाव चांगला मिळत नाही. याशिवाय पावसाळ्यात किंवा दमट हवामानात परागकण तुऱ्यातच अडकून राहिल्यामुळे परागीभवन कमी होऊन दाणे भरण्याचे प्रमाण कमी राहते. मागणीप्रमाणे सतत पुरवठा होण्यासाठी मधुमक्‍याच्या दोन पिकांमध्ये ठराविक अंतर ठेवून लागण करावी. 

लागवड व्यवस्थापन - 
मधुमक्‍यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, 5.5 ते 7.0 सामू असणारी जमीन निवडावी. मधुमक्‍याची उगवणक्षमता वर्षभरातच कमी होते म्हणून प्रत्येक वर्षी नवीन बियाणे वापरावे. स्वीटकॉर्नच्या लागवडीसाठी हैदराबाद येथील मका संशोधन प्रकल्पाने विकसित केलेल्या "माधुरी' आणि "प्रिया' या संमिश्र जाती निवडाव्यात. या व्यतिरिक्त बाजारामध्ये संकरित जाती उपलब्ध आहेत. बियाणे मोठे आणि जोमदार असावे, त्यामुळे एकाच वेळी पक्वता आणि कणसांमध्ये सारखेपणा येतो. रोगापासून संरक्षण होण्यासाठी पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. मका हे परपरागीभवन होणारे पीक आहे म्हणून त्याची पेरणी एका ठिकाणी करावी. मधुमक्‍याच्या आसपास 250 फुटांपर्यंत इतर जातींचा मका पेरू नये, नाहीतर त्यावरील परागकण मधुमक्‍यावर पडून त्याची गुणवत्ता बिघडते. लागवडीसाठी एकरी चार किलो बियाणे वापरावे. दोन ओळींत 60 आणि दोन रोपांत 25 सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. एका एकरामध्ये साधारणपणे 18 ते 22 हजार ताटे बसतील, याची काळजी घ्यावी. बी पेरताना दीड इंच खोलीवर पेरावे. प्रति एकरी 48 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 16 किलो पालाशची मात्रा द्यावी. 

काढणी करताना... 
- स्वीटकॉर्नचा गोडपणा आणि ताजेपणा काढणीनंतर झपाट्याने कमी होतो आणि जसजसे तापमान वाढेल, तशी ही प्रक्रिया जलद होते. कणसे काढून त्यांचा ढीग केल्यास त्याचे तापमान वाढते. अशा अवस्थेत कणसे जास्त वेळ ठेवल्यास उष्णतेमुळे कणसांतील साखरेचे रूपांतर स्टार्चमध्ये जलदरीत्या होते, त्यामुळे स्वीटकॉर्नची गुणवत्ता कमी होते. म्हणून काढणीनंतर ते ताबडतोब पॅकिंग शेडमध्ये हलवावे, पॅक करावे आणि थंड करावे. 
- स्वीटकॉर्नची कणसे एकाच वेळी हाताने किंवा यंत्राने काढावीत. प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे स्वीटकॉर्न यांत्रिक पद्धतीनेच काढावे. ताज्या बाजारासाठी कणसांवरील आवरण आणि देठ काढणे महत्त्वाचे आहे. ताज्या मार्केटसाठी स्वीटकॉर्न वायरच्या क्रेटमध्ये किंवा कागदी खोक्‍यामध्ये पॅक करावे. 
- स्वीटकॉर्नची काढणी कणसांचे केसर वाळून तपकिरी रंगाचे झाल्यावर करावी. या वेळी कणसांतील दाणे मऊ, गोड, दुधाळ आणि टपोरे असतात. कणसांची काढणी जास्त लांबवू नये. काढणीचा कालावधी लांबल्यास जरी कणसाच्या पाल्यात (आवरणात) विशेष फरक दिसून आला नाही, तरी दाण्यांतील साखरेचे प्रमाण कमी होऊन स्टार्चचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने गुणवत्ता कमी होऊन बाजारभाव कमी मिळतो. 

प्रतवारी -
स्वीटकॉर्न कणसे काढल्यानंतर त्यांची प्रतवारी (ग्रेडिंग) करून पॅकिंग करणे महत्त्वाचे असते. आंतरराष्ट्रीय मान्यतेप्रमाणे ताज्या मार्केटसाठी कणसांची लांबी कमीतकमी सहा इंच असावी आणि ती पूर्णपणे निरोगी आणि स्वच्छ असावीत. सर्व कणसे एकसारख्या लांबीची असावीत. पॅकिंग करताना प्रत्येक खोक्‍यामध्ये कणसांची संख्या सारखी असावी. 

उत्पन्न - 
योग्य व्यवस्थापन ठेवल्यास स्वीटकॉर्नची प्रति एकरी 12,500 कणसे मिळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे एकरी ताटांची संख्या जास्त ठेवून कणसांची संख्या 24,000 प्रति एकरी मिळू शकते. कणसांना मिळणारा भाव पाहता एकरी कमीतकमी पंचवीस ते चाळीस हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळू शकते आणि तेही 75 ते 85 दिवसांत. याशिवाय कणसे काढल्यानंतर जनावरांना हिरवा चारा मिळतो. 

पूर्वशीतकरण (प्रिकूलिंग) पद्धती ः 
स्वीटकॉर्नमधील साखरेचे प्रमाण टिकून राहण्यासाठी, तसेच त्याचा स्वाद आणि मऊपणा टिकून राहण्यासाठी जी कणसे बाहेर पाठवावयाची असतात, त्यांचे पूर्वशीतकरण म्हणजेच प्रिकूलिंग करावे. यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला जातो.
1) पहिली पद्धत म्हणजे पाण्याचा वापर. या पद्धतीमध्ये कणसांचे शीतकरण थंड पाण्यामध्ये बुडवून किंवा थंड पाण्याचे फवारे मारून केले जाते. पाण्याचे तापमान सर्वसाधारण एक अंश सेल्सिअस असावे. अशा पाण्यामध्ये सुमारे 45 मिनिटे कणसे बुडवून ठेवावीत, यामुळे कणसांचे तापमान चार अंश से. या आवश्‍यक पातळीपर्यंत खाली आणता येते. 

2) दुसरी शीतकरणाची पद्धत म्हणजे बर्फाचा वापर. ही सर्वांत चांगली पद्धत आहे. स्थानिक बाजारासाठीसुद्धा ही पद्धत उपयुक्त आहे. जसे मासे बर्फामध्ये ठेवले जातात, त्याप्रमाणे खोल्यांमध्ये कणसांच्या भोवती बर्फ टाकावा. सर्वसाधारणपणे कणसे आणि बर्फाचे प्रमाण 5ः1 असे ठेवावे. 
प्रिकूलिंग केलेली कणसे शीतगृहामध्ये साठवून ठेवता येतात. शीतगृहाचे तापमान शून्य अंश से. आणि आर्द्रता 95 टक्के एवढी असावी. तथापि स्वीटकॉर्नची कणसे अधिक काळ शीतगृहामध्ये ठेवल्यास त्यांची गुणवत्ता कमी होते. म्हणून बाजाराच्या मागणीप्रमाणे विक्रीची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. स्वीटकॉर्नच्या गुणवत्तेच्या दृष्टीने एकच गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की स्वीटकॉर्नच्या काढणीनंतर ते ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत ते सतत थंड ठेवायला हवे. 

संपर्क ः डॉ. बेडीस, 9850778290 
(लेखक वनस्पतिशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.) 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120103/5621011031800854131.htm

द्राक्ष लागवडीसाठी खुंटाची निवड महत्त्वाची...

द्राक्ष बागेत खुंट रोपांचा वापर हा विषय आता नवीन राहिलेला नाही. प्रत्येक बागेत नवीन लागवड करताना खुंट रोपांची लागवड करूनच आपण पुढील नियोजन करतो. जमिनीत असलेली चुनखडी आणि क्षारांच्या प्रमाणामुळे द्राक्ष बागेत अपेक्षेप्रमाणे उत्पादन घेणे अशक्‍य होते. या समस्येवर उपाययोजना म्हणून खुंट रोपांची लागवड करणे सोईस्कर होते. डॉ. आर. जी. सोमकुंवर
डॉ. जे. सतीशा 

जागतिक पातळीवर द्राक्ष लागवडीचा विचार करता असे लक्षात येईल, की सूत्रकृमी व फायलोक्‍झेरा या दोन महत्त्वाच्या विकृती स्वमुळावरील वेलीवर आढळून आल्या आहेत. यामुळेच परदेशामध्ये खुंट रोपांचा वापर करून त्या परिस्थितीवर मात करण्यात आली. युरोपसारख्या देशात वाइननिर्मितीच्या द्राक्षाची जास्त लागवड होत असल्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या वाइननिर्मिती उत्पादनाकरिता कोणता खुंट चांगले काम करेल यावरसुद्धा फार मोठे संशोधन झाले आहे. आपल्याकडे जरी ही अडचण नसली तरी एकंदरीत राज्यातील द्राक्ष बाग लागवड असलेल्या जमिनीचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते, की या जमिनीत मातीच्या कणांचे प्रमाण जास्त आहे. त्यांचा सामू आठ किंवा त्यापेक्षा जास्त आहे. या जमिनी जास्त प्रमाणात पाणी साठवून ठेवतात आणि अत्यंत कमी प्रमाणात निचरा करतात. जमिनीत जास्त प्रमाणात पाणी साठून राहिल्यामुळे क्‍लोराईड, कार्बोनेट, बायकार्बोनेट इ. क्षारांचा संचय जास्त प्रमाणात होतो. हेच क्षार वेलीला पुढे हानिकारक ठरतात. हे क्षार पाण्यामध्ये जलदगतीने विरघळतात. त्यामुळे पूर्ण जमीन क्षारयुक्त होते. ज्या वेळी द्राक्षवेल जमिनीतील पाणी शोषते त्या वेळेस हेच क्षार पाण्याबरोबर द्राक्षवेलीत शिरतात. द्राक्षवेलीच्या वाढीवर, विस्तारावर व त्याचसोबत उत्पादनावर अनिष्ट परिणाम करून उत्पादनाच्या प्रत व दर्जावर परिणाम करतात. 

स्वमुळांच्या द्राक्ष बागेत मुळांची वाढ आणि विस्तार कमी प्रमाणात होतो. त्याचाच परिणाम म्हणजे पाण्याचे कमी प्रमाणात संवहन होते. पानांच्या उच्छ्वासामुळे पानातील पाणी लवकर उडून जाते. त्यामधील पाण्याचा साठा कमी होत जातो. मुळांचा विस्तार कमी असल्यामुळे कॅनॉपी पाहिजे तेवढी मिळत नाही. त्यामुळे उत्पादन व द्राक्षाच्या प्रतीवरसुद्धा विपरीत परिणाम होत असल्याचे आपण पाहतो. 

खुंट लागवडीचे फायदे : 1) द्राक्षवेलीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होत नाही. 
2) वेलीची प्रतिकारशक्ती वाढते. 
3) खुटांची मुळे जमिनीत खोलपर्यंत जास्त असल्यामुळे वेलीला कमी पाणी दिले तरी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळते. 
4) खुंटांची मुळे अपायकारक असलेल्या द्रव्यांचे शोषण करत नाही. 
5) सूत्रकृमीला जोरात प्रतिकार करते. 
6) उत्पादन स्वमुळावरील वेलीपेक्षा जास्त मिळते. 

स्वमुळावरील तसेच खुंटावरील वेलीच्या मुळांची तुलना गुणधर्म ---स्वमुळ -----खुंटावरील वेल 
1) मुळांची लांबी ---कमी असते--- जास्त असते 
2) मुळांचा विस्तार ---कमी असतो. खोडापासून फक्त 9 ते 10 इंचापर्यंतच. जास्त व खोलपर्यंत 4-5 फूट खोल मुळे आढळून येतात 
3) मुळांच्या व्यास कमी असतो. जास्त असतो. 
4) मूलद्रव्याचे शोषण सर्वच प्रकारची मूलद्रव्ये शोषून घेतल्या जातात (हानिकारक तसेच फायद्याची.) फक्त उपयोगी असणारी मूलद्रव्ये शोषली जातात. 

समस्येनुसार खुंट रोपांची लागवड : 
अ. क्र. अडचण खुंटाचे नाव 
1) पाण्याची कमतरता 1103 P, 140-Ru, 110-R, SO4, 99-R, St. George 
2) जमिनीमध्ये सोडिअमचे प्रमाण 15% पेक्षा जास्त असणे व पाण्याचा SAR आठपेक्षा जास्त 1613-C, रामसे, डॉगरीज 
3) पाण्यातील क्‍लोराईडचे प्रमाण 4 मि.इ./ लिटरपेक्षा जास्त रामसे, डॉगरीज, टेलेकि-SA 
4) जमिनीची विद्युत वाहकता 2 मिमोनपेक्षा जास्त, पाण्याची विद्युत वाहकता 2 पेक्षा जास्त असते. रामसे, डॉगरीज, 110-आर, 99-आर 
5) माती आणि पाणी चांगल्या प्रतीचे असताना वेलीची वाढ मर्यादित ठेवणे व डोळे फुटण्याचे प्रमाण वाढवणे डॉगरीज, सेंट जॉर्ज, रामसे, 1613-सी, 110-आर 

ओळख खुंटाची : 1) डॉगरीज : हा खुंट व्हिटीस चॅंपिनी या जातीच्या रोपापासून निवडलेला आहे. क्षारयुक्त जमीन तसेच सूत्रकृमीवर प्रतिकार असा हा खुंट आढळून येतो. या खुंटावर कलम केलेल्या द्राक्षवेलीची वाढ ही बाकी दुसऱ्या खुटांवरील वेलीच्या वाढीपेक्षा जास्त असते. वाढीचा जोम जास्त असल्यामुळे कलम केल्यानंतर पहिल्याच वर्षी वेलीचा सांगाडा म्हणजे ओलांडे व काड्या तयार करून घेता येतात. हा खुंट हलक्‍या तसेच रेताड जमिनीमध्ये चांगला उपयोगी असल्याचे आढळून येते. कारण भारी जमिनीमध्ये या खुंटावरील वेलीचा जोम जास्त असतो व घडनिर्मिती या परिस्थितीत कमी होत असल्याचे आढळते. कलम केल्यानंतर पहिल्या वर्षी या खुंटावरील वेलीवर फेरस तसेच मॅग्नेशिअमची कमतरता दाखवते. परंतु वेळीच या सूक्ष्मद्रव्याची पूर्तता केल्यास चांगले परिणाम पाहावयास मिळतात. 
2) रामसे : या खुंटाला ----साल्ट क्रिक या नावानेसुद्धा ओळखले जाते. हा खुंट सूत्रकृमीकरिता प्रतिकारक आहे. क्षारपट जमिनीत हा खुंट फायद्याचा ठरतो. यावर केलेले कलम लवकर म्हणजे डॉगरीजप्रमाणेच यशस्वी होते. या खुंटावरील द्राक्षवेलीची वाढ जोमाने होते व क्षारतेच्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळते. 
3) 1613-सी : हा खुंट व्हिटीस सोलोनीस आणि फळे येणाऱ्या ओथेला जातीच्या संकरातून निर्माण केलेला आहे. हा खुंट मध्यम, सुपीक आणि चुनखडीयुक्त जमिनीत चांगल्याप्रकारे येऊ शकतो. हा खुंट सूत्रकृमींना प्रतिकारक्षम आहे. या खुंटाची पाने मध्यम ते मोठी आणि वरून लवविरहित असून जाड असतात. आपल्या परिस्थितीत या खुंटावर डॉगरीज व साल्ट क्रिकच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. 
4) सेंट जॉर्ज : या खुंट्यास रुपेस्ट्रिस सेंट जॉर्ज किंवा रुपेस्ट्रिज असेही म्हणतात. व्हिटीस रुपेस्ट्रिज या रानटी जातीच्या रोपापासून या खुंटाची निवड केली आहे. द्राक्ष पिकविणाऱ्या बहुतांशी देशांमध्ये या खुंटांचा उपयोग केला जातो. कॅलिफोर्नियामध्ये या खुंटांची सूत्रकृमीप्रतिकारक म्हणून शिफारस केलेली आहे. आपल्या परिस्थितीमध्ये या खुंटावर उत्पादन पाहिजे तसे मिळत नसल्याचे आढळून आले. 
5) 110 आर : हा खुंट रुपेस्ट्रिस रिपेरिया या जातीच्या संकरणातून तयार केलेला आहे. डॉगरीज खुंटाच्या पानांचा रंग गडद असून पाने जाड आहेत, तर या खुंटाच्या पानांचा रंग हलका, पाने पातळ असून, हृदयासारखा आकार पाहावयास मिळतो. या खुंटावर कलम यशस्वी होते. वेलीचा वाढीचा जोम मध्यम प्रकारचा (डॉगरीजच्या तुलनेत कमी) असून, घडनिर्मितीवर दिलेल्या सर्व खुंटांपेक्षा जास्त आहे. भारी जमिनीमध्ये डॉगरीज खुंटावर जोम जास्त असल्यामुळे अशा प्रकारच्या परिस्थितीत हा खुंट फायदेशीर ठरू शकतो. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120113/5427691256048451602.htm

थंडीचा होतोय द्राक्षावर परिणाम


डॉ. एस. डी. रामटेके, आशिष राजूरकर
Wednesday, January 04, 2012 AT 03:00 AM (IST)
Tags: winter,   grapes,   agrowon
सद्यःस्थितीत बहुतांश बागा या मण्यांची वाढ किंवा मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. सध्याच्या हवामानाचा विचार केल्यास किमान तापमान 10 ते 15 अंश से. याच दरम्यान आहे. साधारणपणे या थंडीचा परिणाम द्राक्षवेलीवर दृश्‍य किंवा अदृश्‍य स्वरूपात दिसून येतो. 

द्राक्ष हे पीक प्रामुख्याने थंड हवामानाच्या प्रदेशातील आहे. साधारणपणे 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान झाल्यास द्राक्षांच्या वाढीवर परिणाम होतो, तसेच द्राक्षाच्या घडांवर पाऊस पडल्यास जास्त रोग व किडी येतात. काढणीनंतरही फळकूज वाढते, त्यामुळे द्राक्षाचे पीक उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात घेणे आपल्याकडे सोयीचे नसते. आपण उष्ण कटिबंधामध्ये आहोत. येथील हिवाळा थंड हवामानाच्या प्रदेशातील उन्हाळ्याप्रमाणे असतो म्हणूनच आपण द्राक्षाचे पीक हिवाळ्यात घेतो.

नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे या जिल्ह्यांमधील हिवाळ्यातील हवामान सर्वसाधारणपणे द्राक्षाच्या वाढीसाठी योग्य आहे. द्राक्षाच्या वाढीसाठी 15 ते 35 अंश तापमान योग्य मानले जाते; परंतु बऱ्याच वेळा आपण थंडीच्या लाटा अनुभवतो किंवा मागच्या आठवड्यातील तापमान पाहता किमान तापमान 10 अंश स. पेक्षा कमी होते. तापमान 10 अंश से.पेक्षा कमी झाल्यास द्राक्षाच्या वाढीवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा रात्रीचे तापमान 10 अंश से.पेक्षा कमी झाल्यानंतर दुपारचे तापमान 28 ते 30 अंश से.पर्यंत वाढते. रात्रीच्या व दिवसाच्या तापमानातील हा फरक बऱ्याच वेळा कमी तापमानाने होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त घातक असतो. हवामानात जास्त आर्द्रता असताना थंडीची लाट आल्यास सकाळी बऱ्याच वेळा धुके राहते. पाने व घड त्यामुळे बहुतेकदा ओले राहतात. असे घड प्रथम थंडीमुळे व त्यानंतर दुपारच्या जास्त तापमानामुळे खराब होऊ शकतात.

सद्यःस्थितीत बहुतांश बागा या मण्यांची वाढ किंवा मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. सध्याच्या हवामानाचा विचार केल्यास किमान तापमान 10 ते 15 अंश से. याच दरम्यान आहे. साधारणपणे या थंडीचा परिणाम द्राक्षवेलीवर दृश्‍य किंवा अदृश्‍य स्वरूपात दिसून येतो.

थंड हवामानाचा द्राक्ष वेलींवरील परिणाम ः
1) मुळांची वाढ मर्यादित होते किंवा नवीन मुळांची निर्मिती होत नाही. यामुळे पाने लहान राहतात, त्यांची जाडी कमी होते व शेंड्यांची वाढ पूर्णपणे थांबते.
2) वेलीची वाढ खुंटते, खोडाची जाडी कमी होते, विस्तार मर्यादित राहतो, उन्हात आल्यामुळे द्राक्षमण्यांचा रंग (तपकिरी) बदलतो.
3) पर्णरंध्रे बराच काळ बंद राहतात, प्रकाश संश्‍लेषण कमी होते, अन्नद्रव्यांचे वहन कमी होते, वेलीची उपासमार होते, त्यामुळे मण्यांचा आकार वाढत नाही व वाढ थांबलेली दिसून येते. परिणामी, द्राक्षाची प्रत बिघडते.
4) पोटॅश, कॅल्शिअम, फॉस्फरस या अवस्थेमध्ये अत्यंत आवश्‍यक असते, ते मण्यांत शोषले जात नाही, त्यामुळे त्यांच्या कमतरतेच्या विकृती द्राक्षमण्यांवर दिसून येतात.
5) सायटोकायनीनची उपलब्धता कमी होते, हरितद्रव्य पानात कमी असते. फेनॉलची निर्मिती वाढते. इथिलीनचे प्रमाण वाढते, त्यामुळे ऍन्थोसायनीनची निर्मिती मण्यांत होते. त्यामुळे रंगीत जातींमध्ये मण्यांना रंग चांगला प्राप्त होतो, या उलट पांढऱ्या द्राक्षांत पिंक बेरीजसारखी विकृती दिसून येते.
6) मण्यांत पाणी उतरण्याच्या वेळी पाणी जास्त प्रमाणात व ड्रीप्सवर असतील, तर द्राक्षमण्यांना चिरा पडू शकतात.
7) जास्त थंडी झाल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो.

पिंक बेरीज आणि द्राक्षमण्यांना चिरा पडणे -
थंड हवामान हे द्राक्षांसाठी बाधक आहे, यामुळे प्रामुख्याने पिंक बेरीज आणि द्राक्षमण्यांना चिरा पडणे यासारख्या शरीरशास्त्रीय विकृती आढळतात.

पिंक बेरीज -
ही विकृती थॉमसन सीडलेस व त्याचे क्‍लोन्स जसे तास-ए-गणेश, माणिक चमन इ.मध्ये दिसून येते. पाणी उतरण्याच्या अवस्थेत जर कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त व किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल, तर द्राक्षमणी गुलाबी रंगाचे होतात. हे तापमान जास्त काळ टिकल्यास सर्वच मणी गुलाबी होतात. यालाच पिंक बेरीज विकृती म्हणून संबोधले जाते. या विकृतीमुळे निर्यातीमध्ये बाधा येते. ही विकृती येऊ नये यासाठी परिणामकारक संशोधन सध्यातरी झालेले नाही, तरीपण काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करून काही अंशी ही विकृती येण्याचे टाळता येऊ शकते.

उपाययोजना-
1) ही विकृती सर्वसाधारणपणे पाणी उतरण्याची अवस्था असणाऱ्या बागेमध्ये दिसून येते. ती टाळण्यासाठी वेलीची ऑक्‍टोबर छाटणी ही ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी.
2) वेलीला पोटॅश या अन्नद्रव्याचे पोषण योग्य प्रमाणात द्यावे.
3) सायटोकायनीन या संजीवकांची मात्रा पाणी उतरण्याच्या वेळी द्यावी, की ज्यामुळे मण्यांत हरितद्रव्ये टिकून राहतील.
4) पाण्याचा जास्त ताण देऊ नये. मण्यांत पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर वेलीवर प्लॅस्टिक शेडनेटचे आच्छादन करावे किंवा घड पेपरमध्ये झाकावेत.
5) सेंद्रिय, गांडूळ, कंपोस्ट व हिरवळीच्या खताचा वापर करावा. सेंद्रिय पदार्थाची स्लरी द्यावी.
6) मण्यांची विरळणी एक किंवा दोनदाच करावी. मण्यांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

द्राक्षमण्यांना चिरा पडणे ः
ही विकृती रंगीत जातींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. ही विकृती मुख्यतः बागेत मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेत सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे दिसून येते. मुळांद्वारे पाणी शोषले जाते; परंतु पानांतून ते बाहेर पडत नाही, कारण वातावरणातील तापमान कमी व आर्द्रता जास्त असते, यामुळे हे पाणी ज्यामध्ये 16 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साखर आलेली असते, अशा मण्यांत शोषले जाते, त्यामुळे मण्यांत दाब वाढतो. हा दाब थांबवून ठेवण्यासाठी मण्यांचा आकार वाढत नाही. परिणामतः मण्याला भेगा पडतात व अशा मण्यातून साखर बाहेर पडते. यावर ऍस्परजिल्स, म्युकर, रायझोपर्स किंवा फेसोलियमसारख्या परोपजीवी बुरशी वाढतात व मणी सडून जातात.

उपाययोजना -
1) जास्त पाणी देण्याचे टाळावे.
2) ड्रीप्स वर न लावता जमिनीपासून एक फूट उंचीवर बांधाव्यात, जेणेकरून जास्त आर्द्रता तयार होणार नाही.
3) मण्यांची विरळणी योग्य प्रकारे करावी, जेणेकरून घड सुटसुटीत राहतील.
4) वेलीचा विस्तार मर्यादित ठेवावा, जास्त कॅनोपी ठेवू नये.
5) नो टिलेज पद्धतीचा वापर करावा, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल. 

प्रदूषण कमी करण्यासाठी पॉलिमेरिक पदार्थ उपयुक्त

वाढत्या शहरीकरणाबरोबरच हवेतील कर्बवायूचे प्रदूषण हा महत्त्वाचा प्रश्‍न झाला आहे. जागतिक तापमानवाढीमध्ये या हरितगृह वायूचा मोठा वाटा आहे. उद्योग आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे कार्बन- डाय-ऑक्‍साईड वायूचे प्रदूषण वाढत आहे. या उद्योगाच्या आणि वाहनाच्या नळकांड्यातून बाहेर पडणाऱ्या कर्बवायूला, तसेच हवेतील वेगळे करणारे तंत्रज्ञान शोधल्याचा दावा अमेरिकेतील लॉकर हायड्रोकार्बन संशोधन संस्था आणि दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यामुळे प्रदूषणामध्ये घट होणार असून, महानगरांतील वातावरण सुधारणे शक्‍य होणार आहे. हे संशोधन अमेरिकन रसायन सोसायटीच्या संशोधनत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. ज्या वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास कार्बन- डाय-ऑक्‍साईड वेगळा करणे शक्‍य आहे. 

21 व्या शतकामध्ये कर्बवायूच्या उत्सर्जनाचा प्रश्‍न फार गंभीर होत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी अलेन जोइपार्ट, जी. के. सूर्या प्रकाश, जॉर्ज ए. ओलाह आणि सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. सध्या प्रचलित असलेल्या कर्बवायू वेगळे करण्याच्या पद्धती या अधिक ऊर्जा वापरणाऱ्या असून त्यांचे तोटेही आढळून आलेले आहेत. या त्रुटी कमी करण्यासाठी स्वस्त असणाऱ्या पॉलिमेरिक घन पदार्थाचा वापर करण्यात आला आहे. त्यातील पॉलिइथिलिनीअमाइन या घटकांमुळे कर्बवायू शोषणाचे प्रमाण आर्द्रतायुक्त हवेमध्ये अधिक असल्याचे आढळले आहे. 

या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजेच शोषण केलेला कर्बवायू हे अन्य कारणासाठी वापरता येऊ शकतो किंवा पर्यावरणातून कायमचा वेगळा करता येऊ शकतो. त्यामुळे या कर्बवायूचा पुनर्वापर करणे शक्‍य होते. 
संशोधकांनी सांगितले, की हे घटक पाण्यात, हवेत आणि कारखान्याच्या धुरांच्या चिमण्यांमध्येही वापरता येतात. 

...असे आहे संशोधन 
संशोधकांनी पॉलिअमाइन आधारित पुनर्वापर योग्य घन शोषक पदार्थाची निर्मिती केली आहे. हे घटक अत्यंत कमी तीव्रतेच्या कर्बवायूचे शोषण करू शकतात. पूर्वी वापरात असलेले शोषक हे केवळ जास्त तीव्रतेच्या कर्बवायूचे शोषण करू शकत असत. त्यामुळे त्यांचा वापर केवळ उद्योगातून उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूसाठी करता येत असे. मात्र या नव्या शोषक पदार्थामुळे उद्योगातून, वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूबरोबरच हवेतील प्रदूषण कमी करणे शक्‍य होणार आहे. या पदार्थाचा आणि गोळा केलेल्या कर्बवायूचा पुनर्वापर करणे शक्‍य असल्याने हे घटक अत्यंत स्वस्त पडणार आहेत.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120111/5533484554183119211.htm

मक्‍यातील प्रतिकारकतेला मदत करणारी जैवरसायने ओळखली

प्रत्येक पिकाची किडी-रोगांशी लढण्यासाठी स्वतंत्र अशी प्रतिकारशक्ती असते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वनस्पतीच्या अंतर्गत जैवरासायनिक बदल घडून येतात. मक्‍यामधील किडी-रोगांची ओळख पटवणाऱ्या जैवरासायनिक प्रतिक्रियेची ओळख पटवण्यात गेनसव्हिले येथील अमेरिकी कृषी विभागाच्या संशोधकांना यश आले आहे. तसेच, मक्‍यावर झालेल्या बुरशीच्या हल्ल्याची माहिती प्रतिकारक संस्थांना पुरवणारे प्रथिन ZmPep1 सुद्धा ओळखण्यात आले आहे. वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे या किडी-रोगांचा प्रतिकार करणे शक्‍य होते. 

अमेरिकेतील फ्लोरिडातील कृषी संशोधन संस्थेतील संशोधक फात्मा कॅपलान आणि वनस्पती शास्त्रज्ञ एरिक शेमेल्झ यांनी मक्‍यातील प्रतिकारशक्तीसंबंधी संशोधन केले आहे. या संशोधनामुळे कीड-रोगाच्या प्रतिकारकतेबरोबरच ताण सहनशीलतेच्या मक्‍यातील यंत्रणेच्या कार्यप्रणाली समजणे शक्‍य होणार आहे. शेमेल्झ यांनी सांगितले, की वनस्पतीमध्ये सेंद्रिय घटकांत आढळणारे झीलेक्‍सिन आणि कौरालेक्‍सिन हे रासायनिक घटक वेगळे करण्यात आले आहेत. यापूर्वी कापूस, टोमॅटो यासारख्या पिकांमध्ये टरपेन या घटकावर अधिक संशोधन झाले आहे. टरपेनचे वनस्पतीमधील प्रमाण वाढवण्यासाठी संशोधक प्रयत्न करत होते. मात्र, टरपेन हे रोगासंदर्भात प्रतिक्रिया देण्यापेक्षा पाने खाणाऱ्या किडींसाठी चांगली प्रतिक्रिया देऊ शकते. 

एआरएसच्या संशोधकांनी रसायन तज्ज्ञ जेम्स रोक्का यांच्यासह मक्‍यातील न्युक्‍लिअर चुंबकीय रेझोनन्स इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ही दोन मूलद्रव्ये वेगळी केली आहेत. 

प्रयोगामध्ये फायटोलेक्‍सिनच्या कुळातील कौरालेक्‍सिनचे ऍन्थ्रक्‍नोज स्टॉक रॉट (Colletotrichum graminicola) या रोगाच्या वाढीला प्रतिकार करण्यामध्ये 90 टक्के मदत केल्याचे आढळले आहे, तसेच झोलेक्‍सिन या मूलद्रव्याने अफ्लाटॉक्‍सिनमुळे वाढणाऱ्या ऍस्परगिलस फ्लाउस या बुरशीची वाढ रोखण्यामध्ये 80 टक्के मदत केली आहे. मक्‍यामध्ये या दोन्ही रोगांमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येत असते. तसेच, प्रयोगशाळेतील प्रयोगामध्ये युरोपियन मका पोखरणाऱ्या अळीच्या खाण्यावरही कौरालेक्‍सिनच्या वाढीमुळे अटकाव करणे शक्‍य झाले आहे. 
हे संशोधन ऍग्रिकल्चरल रिसर्च मॅगझीनमध्ये जानेवारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. 


http://www.agrowon.com/Agrowon/20120111/5111187827865094317.htm

पाण्याचे प्रमाणच ठरवते मिरच्यांचा तिखटपणा

- बियांच्या प्रमाणाचाही असतो सिंचनाच्या पाण्याशी संबंध
- इंग्लंडमधील इंडियाना विद्यापीठातील संशोधन 

जंगली मिरच्या या त्यांचा तिखटपणा आणि उष्ण गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहेत. या मिरच्या फ्युजारियम या बुरशीसाठी काही प्रमाणात प्रतिकारक असतात; मात्र त्यांच्या या गुणधर्मांमध्ये सातत्य असत नाही. काही मिरच्या अत्यंत तिखट असतात, तर काही अजिबात तिखट नसतात. हे असे का होत असावे, यावर इंग्लंडमधील इंडियाना विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात आले. त्यामध्ये मिरची रोपांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर त्यातील तिखटपणा ठरत असून, बियांचे प्रमाणही ठरत असल्याचे आढळून आले आहे. 

तिखट मिरच्या या कोरडवाहू भागामध्ये कमी पाण्यावर येत असल्या, तरी त्यामध्ये अधिक बियांची निर्मिती होण्यासाठी अधिक पाण्याची आवश्‍यकता असते. कोरड्या वातावरणामध्ये फ्युजारियमचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. पावसाळी वातावरणात फ्युजारियम अधिक चांगल्या प्रमाणात वाढते, त्यामुळे जंगली मिरच्या तिखटपणासाठी कारणीभूत असलेल्या कॅपसायसिन या घटकांचे प्रमाण प्रतिकारासाठी वाढवत असल्याचे आढळले आहे. याबाबत बोलताना संशोधक डेव्हिड हाक म्हणाले, की कोरड्या वातावरणामध्ये तिखटपणा कमी होत असला तरी त्यांचे उष्ण गुणधर्म तिथेच राहतात, त्यामुळे कमी तिखट मिरच्या अधिक प्रमाणात बियांची निर्मिती करतात. याचा उपयोग बियाणे निर्मितीसाठी करणे शक्‍य आहे. 

...असे झाले संशोधन 
या संशोधनामध्ये सन 2002 ते 2009 या काळात आग्नेय बोलिविया प्रांतातील 12 जंगली मिरच्यांच्या प्रजातींमधील तिखटपणाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये परिसरातील 185 मैल पट्ट्यातील कोरड्या आणि ओलिताखालील प्रदेशातील मिरच्यांचा अंतर्भाव करण्यात आला. त्यामध्ये परिसरातील पावसाचे प्रमाण आणि मिरचीचा तिखटपणा यांच्या संबंधाचा अभ्यास केला, त्यासाठी हरितगृहामध्येही या विषयावर अनेक प्रयोग करण्यात आले. त्याचा उपयोग प्रत्यक्ष शेतावरील स्थितीमध्ये घडणाऱ्या निष्कर्षांशी तुलना करण्यासाठी करण्यात आला. 330 मिरचीची रोपे ही फुले येईपर्यंत समान वातावरणात वाढवली. त्यानंतर त्यामध्ये दोन विभाग केले. एका गटाला मुबलक पाणी पुरवले आणि दुसऱ्या गटाला बोलिविया प्रांतामधील सरासरी पावसाच्या प्रमाणात पाण्याचा ताण दिला. या ताण दिलेल्या व कमी तिखट मिरची रोपांपासून नेहमी मिळणाऱ्या बियांच्या दुप्पट बिया मिळाल्या. त्यांचे प्रमाण तिखट बियांइतकेच असल्याचेही आढळून आले. 

कोरड्या वातावरणामध्ये बियांची संख्या कमी ठेवून मिरची रोपे त्यांची संख्या कमी ठेवतात. त्या कमी बियांच्या संरक्षणासाठी अधिक कॅपसायसिन तयार करतात. पाण्याची उपलब्धता असताना कमी तिखट मिरच्यांवर फ्युजारियमचा प्रादुर्भाव होऊन त्यांच्या बिया खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. हाक यांनी सांगितले, की तिखट मिरच्यांतून कॅपसायसिन तयार करण्याच्या प्रक्रियेत पाण्याचा काटेकोर वापर करण्याची आवश्‍यकता या प्रयोगातून समोर आली. पावसाळी वातावरणात कमी तिखट मिरचीच्या 90 ते 95 टक्के फळांवर फ्युजारियमचा प्रादुर्भाव होतो. तिखट मिरच्या मोठ्या प्रमाणात स्वतःचा बचाव करू शकतात. 

हे संशोधन इंग्लंडमधील "रॉयल सोसायटी ऑफ सायन्स'च्या इतिवृत्तात प्रकाशित करण्यात आले आहे.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120105/4723757374140624037.htm

स्वयंचलित सापळे "आयमेटोज ट्रॅप' विकसित

पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झालेला आहे, हे पाहण्यासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो. या सापळ्यांमध्ये अडकलेल्या किडींची ओळख पटवली जाते. पिकांच्या दृष्टीने हानिकारक पातळीपेक्षा अधिक संख्या असल्यास किडींच्या नियंत्रणासाठी निर्णय घ्यावा लागतो; मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सापळ्यांची निगा, त्यात अडकलेल्या किडींची ओळख पटवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. विशेषतः शेतीचे क्षेत्र मोठे असल्यास सापळ्यांचे निरीक्षण करण्यामध्येही अडचणी येतात. या अडचणींचा विचार करून ऑस्ट्रियन कंपनी मेटोजने स्वयंचलित सापळे विकसित केले आहेत. हे सापळे त्यात अडकलेल्या किडींची ओळख पटवून त्यांची संख्या व अन्य माहिती शेतकऱ्यांपर्यंत इंटरनेट अथवा मोबाईलवर सूचनेच्या स्वरूपात दिली जाते, त्यामुळे किडींच्या नियंत्रणाचे निर्णय योग्य वेळी घेणे शक्‍य होते. 

नुकतेच इटलीमध्ये भाजीपाला व औषधी वनस्पतीसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ऑस्ट्रियन कंपनीने पेसल इन्स्ट्रूमेंट्‌स या इटालियन कंपनीच्या साह्याने विकसित केलेल्या "आयमेटोज ट्रॅप' या स्वयंचलित सापळ्याचे प्रथम संशोधकांसमोर प्रदर्शन केले. या सापळ्यामध्ये स्वयंचलित तंत्रज्ञान वापरले असून, किडींच्या ओळखीसाठी योग्य ते सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा समावेश केला आहे. 

...अशी आहे स्वयंचलित सापळ्याची कार्यपद्धती 
डेल्टा सापळ्यामध्ये असलेल्या चिकट सापळ्याबरोबरच फ्लॅश असलेले, उच्च क्षमतेचे; पण लहान सहा कॅमेरे बसवलेले असतात. या चिकट सापळ्यात येऊन एखादा कीटक किंवा कीड चिकटली असता, त्याचे छायाचित्र घेऊन ते सर्व्हरकडे पाठवले जाते. सर्व्हरमध्ये उपलब्ध असलेल्या किडीच्या छायाचित्रांशी ते ताडून पाहिले जाते. त्याची ओळख पटवून त्याची सूचना व्यवस्थापकाला दिली जाते. ही सूचना इंटरनेटच्या साह्याने किंवा मोबाईल फोनवर दिली जाते, त्यासाठी जीपीआरएस तंत्रज्ञानाधारित सेवेचे सिमकार्ड सापळ्यामध्ये बसवलेले असते. त्यासोबतच त्या वेळी असलेल्या हवामानाच्या नोंदी घेतल्या जातात, त्याही इंटरनेटवर पुरवल्या जातात. शेतावर हे उपकरण चालण्यासाठी आवश्‍यक असलेली ऊर्जा सौर पॅनेलच्या साह्याने मिळवून ती बॅटरीमध्ये साठवली जाते. 

दररोज उपलब्ध होणाऱ्या छायाचित्रांमुळे किडींची संख्या, त्यांची टक्केवारी, त्यांनी व्यापलेले क्षेत्र आणि मागील माहितीपेक्षा त्यात झालेली वाढ यांची माहिती सातत्याने साठवली जाते. त्याचे अधिक विश्‍लेषण केले असता निर्णय घेण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. सध्या यामध्ये पतंगाच्या Cydia pomonella आणि Eupoecilia ambiguella या जातींसाठी सूचना देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, अन्य किडींसाठी आवश्‍यक त्या प्रकारच्या गंधाची सोय केल्यास त्यांच्याकरिता देखील हा सापळा वापरता येऊ शकतो. 

सापळ्याचे फायदे 
- या निरीक्षणामधून दैनंदिन आढळणाऱ्या किडींच्या जैविक अवस्थेविषयी माहिती मिळते. 
- ही सर्व माहिती स्वयंचलित पद्धतीने गोळा केली जात असल्याने त्याचे माणसांच्या साह्याने निरीक्षण करण्याची आवश्‍यकता राहत नाही. 
- किडीची ओळख स्वयंचलित पद्धतीने पटवली जाते. 
- किडीच्या प्रमाणात नुकसान पातळीपेक्षा अधिक वाढ झाल्यास व आतील प्लेट बदलण्याची गरज असल्यास सूचना दिली जाते. 
- सोबत हवामानाची माहिती मिळत असल्याने किडीच्या प्रादुर्भावाच्या वेळी असलेल्या स्थितीची माहिती मिळते. 
-- या सर्व सूचना इंटरनेटवर किंवा मोबाईलवर दिल्या जातात. शेतापासून दूर असतानाही ही सर्व माहिती उपलब्ध होत राहते.

Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120104/5567580700351807120.htm

आफ्रिकेत इंधनासाठी वाढतेय बांबूची लागवड

सब सहारण आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये इंधन ऊर्जेसाठी जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात होत असते. ही तोड थांबवण्यासाठी बांबूच्या रोपांचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. यासाठी बांबूपासून कोळसा व ब्रिकेट तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापर इंधनासाठी करून जंगलांची तोड थांबवणे शक्‍य आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय बांबू आणि रट्टन संघ आणि आफ्रिकन देशांच्या सहभागाने एक प्रकल्प राबवण्यात येणार असून, बांबूच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या बांबू लागवडीमुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत मिळणार आहे. 

आफ्रिकेमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणारे बांबू हे बायोमासच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. याचा विचार करून घाना आणि इथोपिया या देशांनी त्यांच्या अपारंपरिक ऊर्जेच्या धोरणामध्ये बांबूचा समावेश केला आहे. बांबूपासून कोळसा निर्मितीच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने त्याचे फायदे जंगलतोड रोखण्यासाठी होत असल्याचे आढळले आहे. याबाबत माहिती देताना "आयएनबीएआर'चे महासंचालक डॉ. जे. कुसजे हुंगनडेरॉन यांनी सांगितले, की जळणासाठी लाकडाचा वापर प्रामुख्याने केला जातो, त्यामुळे हरितगृह वायूमध्ये भर पडत असल्याने पर्यावरणावर विपरीत परिणाम होतात. सन 2050 पर्यंत चुलीच्या धुरामुळे 6.7 अब्ज टन हरितगृह वायूमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे, तसेच दोन दशलक्ष आफ्रिकन महिला आणि मुलांच्या आरोग्यावर या धुराचा विपरीत परिणाम होतो आहे. तो या बांबूच्या कोळशाचा वापर केल्यास कमी करता येऊ शकतो. 

बांबूपासून कोळसा बनवण्याचे तंत्रज्ञान चीनने सब सहारण आफ्रिकेतील काही देशांना दिले होते, त्यामुळे इंधनासाठी चांगल्या दर्जाचा कोळसा बनविल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत मिळणार असून, तापमान बदलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या जंगलांची तोड रोखण्यात मदत मिळत आहे. जागतिक बॅंकेचे कृषी व तापमान बदल विभागाचे प्रमुख डॉ. पॅट्रिक वेरकुजेन यांनी सांगितले, की आजच्या काळात अन्न सुरक्षा आणि तापमान बदल हा परवलीचा शब्द झाला आहे. भावी काळात जंगले ही शाश्‍वत विकासासाठी आवश्‍यक राहणार असून, त्यांची तोड थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. दुष्काळ, तापमानात होणारे तीव्र बदल आणि गरिबी यांचा जवळचा संबंध आहे. 

चीनची आघाडी 
बांबूच्या झाडातील प्रत्येक भागाचा वापर कोळसा निर्मितीसाठी करता येतो. यापासून बनवलेल्या कोळशामध्ये अधिक कार्यक्षम इंधनाचे गुणधर्म असतात. बांबूच्या नियंत्रित पद्धतीने ज्वलनाने कोळसा ब्रिकेट हे इंधन विकसित केले जाते. त्यामध्ये जास्त वेळ जळण्याची क्षमता, तसेच धूर आणि हवेतील प्रदूषणही कमी होते. सध्या चीनने बांबू आणि बांबू ब्रिकेटच्या निर्मिती आणि वापर या क्षेत्रामध्ये आघाडी घेतली असून, प्रति वर्ष एक अब्ज डॉलरची उलाढाल या व्यवसायात होते. या क्षेत्रात कार्यरत एक हजारापेक्षा अधिक उद्योग असून, त्यात साठ हजारांपेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. चीनच्या नान्जिंग वन विद्यापीठ आणि वेनझाऊ बांबू चारकोल कंपनी यांनी बांबू ब्रिक क्‍लिनस, ग्राइंडर, ब्रिकेट मशिन व अन्य अवजारे विकसित केली आहेत. त्यांच्या साह्याने स्थानिक उपलब्ध साधनांपासून कोळसा व ब्रिकेट यांची निर्मिती करणे शक्‍य आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन हे घाना व इथोपिया यासारख्या सब सहारण देशांना हे तंत्रज्ञान पुरवीत आहे.

बांबूची रोपे कशी तयार करतात?

बांबूची रोपे तयार करण्यासाठी बियाणे गादी वाफ्यावर पेरावे, त्यासाठी वाफ्याची लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी एक मीटर व लांबी सोयीनुसार दहा मीटर ठेवावी. गादी वाफ्यातील अंतर 30 सें.मी. ठेवून आडव्या ओळीमध्ये सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये बियांची पेरणी करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. तयार केलेली रोपे जून व जुलै महिन्यांत लागवडीसाठी वापरता येतात. रोपांची निर्मिती ही पॉलिथिन पिशवीत बियाणे लावूनसुद्धा करता येते. यासाठी 25 सें.मी. x 12 सें.मी. आकाराच्या पॉलिथिन पिशवीत माती, वाळू व चांगले कुजलेले बारीक शेणखत यांचे 1 ः 1 ः 1 मिश्रण करून ते पॉलिथिन पिशवीत भरून, प्रत्येक पिशवीत तीन ते चार बिया पेरून त्यास पाणी द्यावे. पॉलिथिन पिशव्यांत रोपांची वाढ चांगली होते आणि बियाणे कमी लागते.


संपर्क ः 02426 - 243252
अखिल भारतीय वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी



Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111005/4680155234481353656.htm

उसावरील लोकरी माव्याचे नियंत्रण कसे करावे?

- भरत तुकाराम पाटील, गुडे, ता. भडगाव, जि. जळगाव 
ढगाळ हवामान, किमान व कमाल तापमान 12 ते 35 अंश सेल्सिअस, 70 ते 95 टक्के सापेक्ष आर्द्रता व पावसाचे प्रमाण जास्त लोकरी मावा किडीस अनुकूल असते. जास्त काळ कोरडे हवामान किडीच्या वाढीसाठी प्रतिकूल ठरते. ही कीड उसाच्या पानांच्या खालील बाजूस मध्य शिरेलगत पांढऱ्या लोकरीसारखे मेणतंतूधारी पंखी व बिनपंखी मावा पिल्लांसह आढळतात. मुखांग सुईसारखे असतात. पंख असलेल्या माव्याची मादी काळसर तांबूस व पिल्ले फिकट हिरवट दिसतात, तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट व पिल्ले फिकट पिवळी असतात. एक आठवड्यानंतर पांढऱ्या लोकरीसारखे मेणतंतू येऊन शरीर पांढरे दिसते. म्हणून त्यास “पांढरा लोकरी मावा’ असे म्हणतात. उसाचे पूर्ण पान पांढरे झाल्याचे दिसून येते. या किडीचा प्रादुर्भाव बांधाकडेने दिसून येतो, नंतर तो ऊस क्षेत्रात वाढत जातो. 

नियंत्रणाचे मशागतीय उपाय ः 
1) ऊस लावण पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने करावी. 2) मोठ्या बांधणीनंतर उसाची वाढ चांगली झाल्यावर भांगे पाडून किंवा ऊस सरीत रेलून घ्यावेत म्हणजे फवारणी अथवा धुरळणी व्यवस्थित करता येते. 3) प्रादुर्भाव कमी असल्यास प्रादुर्भित पाने काढून नष्ट करावीत. 4) तणनियंत्रण करून शेत व बांध स्वच्छ ठेवावेत. 5) मावाग्रस्त पानांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करू नये. 6) कीडग्रस्त बेणेमळ्यातील बियाणे वापरू नये. तसे वापरावयाचे असल्यास मॅलॅथिऑनची (तीन मि.लि. प्रति लिटर पाणी) बेणेप्रक्रिया करावी. 7) मावाबाधित क्षेत्रातील उसाची वाळलेली पाने काढून एकत्रित गोळा करून नष्ट करावीत. 8) नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा. भरणीनंतर नत्रयुक्त खते वापरू नयेत व ऊस लोळू देऊ नये. 9) गरजेइतकेच पाणी लांब सरी पद्धतीने द्यावे. 10) मका, चवळी यांसारखी पिके उसाच्या भोवताली घ्यावीत. 

जैविक उपाय ः 
1) क्रायसोपर्ला कारनी या परभक्षक कीटकाची अंडी अथवा अळ्या प्रति एकरी 1000 या प्रमाणात सोडाव्यात. 2) डिफा ऍफिडिव्होरा आणि मायक्रोमस इगोरोट्‌स या परभक्षक मित्रकीटकांच्या अळ्या कोषावस्थेसह पानांचे पाच ते सहा सें.मी. तुकडे कीडग्रस्त पानांवर जोडावेत. 3) व्हर्टिसिलियम लेकानी बुरशी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
रासायनिक उपाय ः 1) लावणीपूर्वी बेणेप्रक्रिया करावी. 2) प्रादुर्भावानुसार मॅलॅथिऑन दोन मि.लि. + ऑक्‍सिडिमेटॉन मिथाईल दोन मि.लि. किंवा डायमेथोएट दोन मि.लि. + एक मि.लि. स्टिकर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा दाणेदार फोरेट (दहा टक्के) सहा महिन्यांपेक्षा लहान पिकात एकरी सहा किलो आणि सहा ते नऊ महिन्यांपर्यंतच्या पिकात एकरी आठ किलो जमिनीत मुळांच्या सान्निध्यात वाफसा असताना द्यावे. दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे म्हणजे पिकाकडून कीटकनाशकाचे शोषण लवकर होते. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला द्यावा. 

संपर्क ः 0231 - 2651445 
प्रा. डी. एम. वीर, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर
 

Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111005/4680155234481353656.htm

कृषी सल्ला


लसूण 
1) लसणाची लागवड ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सपाट वाफ्यात 10 x 7.5 x 3 सें.मी. अंतरावर करावी. 

2) श्‍वेता, गोदावरी, जामनगर, फुले बसवंत या जाती वापराव्यात. लागवडीपूर्वी शेतात हेक्‍टरी नत्र 50 किलो, स्फुरद 50 किलो व पालाश 50 किलो द्यावे. पूर्वमशागतीचेवेळी हेक्‍टरी 25 टन शेणखत मिसळावे. 

3) लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्यांवर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी दहा किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.

माणकापूरचे तेरदाळे ठरलेत ऊस उत्पादनातील "शतक'वीर


"एकरी शंभर टन ऊस उत्पादन घ्या' हा नारा अलीकडे अनेक वेळा दिला जातो. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर इचलकरंजीपासून (जि. कोल्हापूर) केवळ तीन किलोमीटर अंतरावर माणकापूर गाव आहे. 

तेथील मलकारी तेरदाळे यांनी मात्र हा "नारा' आपल्या शेतीत एकदा नव्हे तर सातत्याने अमलात आणला आहे. शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्यातर्फे आयोजित 2010-11 हंगामातील ऊसपीक स्पर्धेत त्यांनी एकरी 117.795 मेट्रिक टन उत्पादन काढून पहिला क्रमांक मिळविला आहे.

पाणी, खत, बेणे यांच्या वापरात बचत व त्यांचा काटेकोर वापर करणे सध्याच्या ऊसशेतीत गरजेचे झाले आहे. अनेक शेतकरी आपले नियोजन त्याप्रमाणे करताना दिसत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर इचलकरंजीपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर माणकापूर (ता. चिक्कोडी) हे गाव आहे. सरकारी कामकाज बेळगावला होत असले तरी या गावचा दररोजचा संपर्क महाराष्ट्रातील शहरांशीच येतो. याच गावातील मलकारी नेमू तेरदाळे या शेतकऱ्याने गेल्या काही वर्षांपासून उसाचे एकरी उत्पादन सातत्याने शंभर टनांपर्यंत तर काही वेळा त्याहून जास्त घेण्याचा सपाटा लावला आहे. शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या 2010-11 या हंगामातील ऊसपीक स्पर्धेत त्यांनी एकरी 117.795 मेट्रिक टन उत्पादन काढून पहिला क्रमांक मिळविला. खोडव्याची तोडणी झाल्यानंतर सातत्याने रान वाळविण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. यामुळेच उत्पादनात सातत्य तर राहतेच, पण जमिनीचा पोत कायम राहत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. 

लावणीपूर्वीचे व्यवस्थापन 
तेरदाळे यांची चोवीस एकर जमीन आहे. त्यात ते सातत्याने ऊस घेतात. प्रत्येक वर्षी या पिकाचे त्यांचे नियोजन वेळापत्रक ठरलेले असते. ऊस स्पर्धेत भाग घेण्यापूर्वीही फुले 265 जातीचा ऊस त्यांनी घेतला होता. याचे उत्पादन शंभर टनांवर निघाले. तेरदाळे यांचे लागवडीचे नियोजन थोडक्‍यात व प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचे तर हरभऱ्याचा बेवड चांगला असल्याने या पिकानंतर ऊस घेण्याचे नियोजन केले. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने हरभऱ्याचे उत्पादन कमी आले. एकरी चार पोती हरभरा निघाला. हरभऱ्याच्या काढणीनंतर उभी- आडवी नांगरट केली. यानंतर एक महिना कालावधीपर्यंत रान वाळविले. यानंतर पुन्हा नांगरट केली. त्यानंतर दक्षिणोत्तर सऱ्या सोडल्या. त्याही महिनाभर वाळविल्या. लागवडीपूर्वी माती परीक्षण केले होते. त्याच्या अहवालानुसार जमिनीस एकरी चार पोती सेंद्रिय खताचा डोस दिला. 

लावणीनंतरचे व्यवस्थापन 
मागील वर्षी 27 जुलैला को- 86032 या जातीची सरी पद्धतीने आडसाली लावण केली. दोन डोळ्यांचे एकरी साडेसहा हजार टिपरी इतके बेणे वापरले. साडेतीन फुटाची सरी सोडून चांगल्या वाफशावर लागवड केली. या वेळी हलके पाणी दिले. उगवण झाल्यानंतर भरणीपूर्वी तीन भांगलणी केल्या. पहिली भांगलण लावणीनंतर एक महिन्यांनी केली. त्यानंतर पंधरा दिवसांत युरियाची दोन पोती, निंबोळी पेंड एक पोती मिसळून ते देण्यात आले. भरणीनंतर दोन भांगलणी झाल्या. सर्व भांगलणी मजुरांमार्फतच केल्या. तणनाशकाचा कोठेही उपयोग केला नाही. भरणीपूर्वी तीन व भरणीनंतर दोन अशा प्रकारे पाच वेळा टॉनिक दिले. एकरी पन्नास हजार ऊस संख्या कशी राहील याकडे विशेष करून लक्ष दिले. निरोगी नसलेले फुटवे काढले. चांगल्या बियाणे प्लॉटमधून बेण्याची निवड केल्याने उगवण चांगली म्हणजे सरासरी 90 ते 95 टक्‍क्‍यापर्यंत झाली. भरणीच्या वेळी युरिया तीन पोती, पोटॅश तीन पोती, गंधक दहा किलो, विविध सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत दहा किलो आदींचा वापर केला. लोकरी मावा येऊ नये यासाठी कीटकनाशकाची एक फवारणी करण्यात आली. 
पाणी नियोजन सरी पद्धतीनेच पाणी दिले. लावणीपासून तोडणीपर्यंत 51 वेळा पाणी दिले. पाणी देताना पाणी अतिरिक्त अथवा कमी होणार नाही याची खबरदारी घेतली. मरके फुटवे काढण्यासाठी उगवणीपासून भरणीपर्यंत "अर्धी' सरीच पाणी दिले. भरणीनंतर पाण्याच्या प्रमाणात थोडी वाढ केली. पावसाळा व हिवाळ्याच्या कालावधीत वेळेत तीन आठवडे ते एक महिन्यानंतर पाणी दिले. तर उन्हाळ्यात पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी दिले. पाणी देताना नेहमीच काटेकोरपणा ठेवण्याचा प्रयत्न केला. तोडणी होईपर्यंत काटकसरीने व वाफसा स्थिती राहील अशा बेतानेच पाणी दिले. 


जमा खर्च (एकरी) 
तपशील खर्च (रुपयांत व एकरी) 

ट्रॅक्‍टर भाडे - 3000 
ऊस बियाणे- 3600 
खत- 10,000 
मजुरी खर्च- 4000 (मशागत) 
मजुरी खर्च 2500 (पाणी देण्यासाठी) 
बैलजोडी- 2000 
रसायने- 4000 
.............................................. 
एकूण खर्च- 29 100 

मिळालेले उत्पादन- 117.795 मेट्रिक टन 

मिळालेला भाव- 2300 रुपये प्रति मेट्रिक टन 

एकूण रक्कम- दोन लाख 70 हजार 928 रुपये 

खर्च वजा जाता मिळालेला निव्वळ नफा - दोन लाख 41 हजार 828 रुपये 

शतकवीर "तेरदाळे' 
तेरदाळे यांनी यापूर्वीही सातत्याने एकरी शंभर टनांच्या वर ऊस उत्पादन घेतले आहे. त्यांचे सरासरी उत्पादन 70 टन इतके आहे. गेल्या दहा वर्षांत सत्तर टनांपेक्षा कमी ऊस त्यांनी काढलेला नाही. त्यांनी उच्चांकी ऊस उत्पादनाची विविध पारितोषिकेही पटकाविली आहेत. तेरदाळे सध्या तरी फुले 265 व को 86032 या वाणाचा वापर करतात. यापूर्वीही त्यांनी अनेक वाण वापरले, मात्र हे दोन वाण अधिक फायदेशीर वाटल्याचे त्यांनी सांगितले. शिरोळच्या दत्त साखर कारखान्याच्या वतीने एकरी दीडशे टन ऊस उत्पादन हा महत्त्वाकांक्षी प्रयोग सुरू करण्यात आला आहे. त्यात तेरदाळे यांनी भाग घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष सा. रे. पाटील यांच्या सान्निध्यात राहिल्याने अनेक लहान-सहान गोष्टींचा अभ्यास करता आला. कारखान्याच्या वतीने प्रत्येक वर्षी उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. तेरदाळे स्वत: या कारखान्याचे संचालक असल्याने या सत्काराच्या वेळी ते उपस्थित असायचे. दुसऱ्याला हे पारितोषिक मिळते तर आपल्याला का मिळू नये, असा विचार येऊन त्यांनी आपली शेती या कारखान्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून सुधारली. या चांगल्या शेतीत आजपर्यंत सातत्य ठेवले आहे. 

रान वाळविण्यामुळे उत्पादनात वाढ 
उच्चांकी उत्पादनाबाबत बोलताना तेरदाळे यांनी सांगितले, की साखर कारखान्याने दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी उसाचे व्यवस्थापन केले; परंतु माझ्या शेतीच्या यशात अनेक गोष्टींपैकी शेताला देत असलेली विश्रांती ही गोष्टही महत्त्वाची ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उसाची लागवड करण्याआधी सुमारे दोन महिन्यांपर्यंत शेतजमिनी पूर्ण उन्हात वाळवितो. जमिनीचा पोत तयार होण्यासाठी जमिनीला मिळालेली विश्रांती महत्त्वाची ठरते. सूर्यप्रकाशामुळे जमिनीची प्रत सुधारून ती अधिक उत्पादनशील बनते असा माझा अनुभव आहे. साधारणत: 1994 पासून मी सातत्याने जमीन तापविण्यावर भर दिला आहे. तसेच ताग, धैंचा या हिरवळीच्या पिकांसोबत हरभऱ्याचे पीक घेतो. ही पिके काढल्यानंतर रान वाळवितो. इतर मशागतींबरोबरच रान वाळविणे म्हणजेच उत्पादन वाढविणे हे यशाचे सूत्र मी अंगीकारले आहे. खते देताना ती विस्कटून न टाकता खते टाकल्यानंतर ती झाकून घेतो. यामुळे पाण्याबरोबर खते वाहून जात नाहीत, तसेच पाणी देताना रानातले पाणी बाहेर पडू नये यावर विशेष लक्ष असते. सरीतून पाणी कडेला जाण्याअगोदर काही वेळ सरीचे पाणी बंद केले जाते. यामुळे सरीत पाणी अतिरिक्त होत नाही. जमिनीला हवे तेवढे पाणी मिळते. अशा लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिल्यानेच माझ्या उत्पादनातील सातत्य टिकून आहे. 

शेतकरी संपर्क 
मलकारी नेमू तेरदाळे, 0230-2600225 
मु.पो. माणकापूर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव (कर्नाटक)

Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111102/5603978952944701953.htm