Friday, January 13, 2012

प्रदूषण कमी करण्यासाठी पॉलिमेरिक पदार्थ उपयुक्त

वाढत्या शहरीकरणाबरोबरच हवेतील कर्बवायूचे प्रदूषण हा महत्त्वाचा प्रश्‍न झाला आहे. जागतिक तापमानवाढीमध्ये या हरितगृह वायूचा मोठा वाटा आहे. उद्योग आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे कार्बन- डाय-ऑक्‍साईड वायूचे प्रदूषण वाढत आहे. या उद्योगाच्या आणि वाहनाच्या नळकांड्यातून बाहेर पडणाऱ्या कर्बवायूला, तसेच हवेतील वेगळे करणारे तंत्रज्ञान शोधल्याचा दावा अमेरिकेतील लॉकर हायड्रोकार्बन संशोधन संस्था आणि दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यामुळे प्रदूषणामध्ये घट होणार असून, महानगरांतील वातावरण सुधारणे शक्‍य होणार आहे. हे संशोधन अमेरिकन रसायन सोसायटीच्या संशोधनत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. ज्या वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास कार्बन- डाय-ऑक्‍साईड वेगळा करणे शक्‍य आहे. 

21 व्या शतकामध्ये कर्बवायूच्या उत्सर्जनाचा प्रश्‍न फार गंभीर होत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी अलेन जोइपार्ट, जी. के. सूर्या प्रकाश, जॉर्ज ए. ओलाह आणि सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. सध्या प्रचलित असलेल्या कर्बवायू वेगळे करण्याच्या पद्धती या अधिक ऊर्जा वापरणाऱ्या असून त्यांचे तोटेही आढळून आलेले आहेत. या त्रुटी कमी करण्यासाठी स्वस्त असणाऱ्या पॉलिमेरिक घन पदार्थाचा वापर करण्यात आला आहे. त्यातील पॉलिइथिलिनीअमाइन या घटकांमुळे कर्बवायू शोषणाचे प्रमाण आर्द्रतायुक्त हवेमध्ये अधिक असल्याचे आढळले आहे. 

या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजेच शोषण केलेला कर्बवायू हे अन्य कारणासाठी वापरता येऊ शकतो किंवा पर्यावरणातून कायमचा वेगळा करता येऊ शकतो. त्यामुळे या कर्बवायूचा पुनर्वापर करणे शक्‍य होते. 
संशोधकांनी सांगितले, की हे घटक पाण्यात, हवेत आणि कारखान्याच्या धुरांच्या चिमण्यांमध्येही वापरता येतात. 

...असे आहे संशोधन 
संशोधकांनी पॉलिअमाइन आधारित पुनर्वापर योग्य घन शोषक पदार्थाची निर्मिती केली आहे. हे घटक अत्यंत कमी तीव्रतेच्या कर्बवायूचे शोषण करू शकतात. पूर्वी वापरात असलेले शोषक हे केवळ जास्त तीव्रतेच्या कर्बवायूचे शोषण करू शकत असत. त्यामुळे त्यांचा वापर केवळ उद्योगातून उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूसाठी करता येत असे. मात्र या नव्या शोषक पदार्थामुळे उद्योगातून, वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूबरोबरच हवेतील प्रदूषण कमी करणे शक्‍य होणार आहे. या पदार्थाचा आणि गोळा केलेल्या कर्बवायूचा पुनर्वापर करणे शक्‍य असल्याने हे घटक अत्यंत स्वस्त पडणार आहेत.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120111/5533484554183119211.htm