Friday, January 13, 2012

आफ्रिकेत इंधनासाठी वाढतेय बांबूची लागवड

सब सहारण आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये इंधन ऊर्जेसाठी जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात होत असते. ही तोड थांबवण्यासाठी बांबूच्या रोपांचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. यासाठी बांबूपासून कोळसा व ब्रिकेट तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापर इंधनासाठी करून जंगलांची तोड थांबवणे शक्‍य आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय बांबू आणि रट्टन संघ आणि आफ्रिकन देशांच्या सहभागाने एक प्रकल्प राबवण्यात येणार असून, बांबूच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या बांबू लागवडीमुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत मिळणार आहे. 

आफ्रिकेमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणारे बांबू हे बायोमासच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. याचा विचार करून घाना आणि इथोपिया या देशांनी त्यांच्या अपारंपरिक ऊर्जेच्या धोरणामध्ये बांबूचा समावेश केला आहे. बांबूपासून कोळसा निर्मितीच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने त्याचे फायदे जंगलतोड रोखण्यासाठी होत असल्याचे आढळले आहे. याबाबत माहिती देताना "आयएनबीएआर'चे महासंचालक डॉ. जे. कुसजे हुंगनडेरॉन यांनी सांगितले, की जळणासाठी लाकडाचा वापर प्रामुख्याने केला जातो, त्यामुळे हरितगृह वायूमध्ये भर पडत असल्याने पर्यावरणावर विपरीत परिणाम होतात. सन 2050 पर्यंत चुलीच्या धुरामुळे 6.7 अब्ज टन हरितगृह वायूमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे, तसेच दोन दशलक्ष आफ्रिकन महिला आणि मुलांच्या आरोग्यावर या धुराचा विपरीत परिणाम होतो आहे. तो या बांबूच्या कोळशाचा वापर केल्यास कमी करता येऊ शकतो. 

बांबूपासून कोळसा बनवण्याचे तंत्रज्ञान चीनने सब सहारण आफ्रिकेतील काही देशांना दिले होते, त्यामुळे इंधनासाठी चांगल्या दर्जाचा कोळसा बनविल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत मिळणार असून, तापमान बदलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या जंगलांची तोड रोखण्यात मदत मिळत आहे. जागतिक बॅंकेचे कृषी व तापमान बदल विभागाचे प्रमुख डॉ. पॅट्रिक वेरकुजेन यांनी सांगितले, की आजच्या काळात अन्न सुरक्षा आणि तापमान बदल हा परवलीचा शब्द झाला आहे. भावी काळात जंगले ही शाश्‍वत विकासासाठी आवश्‍यक राहणार असून, त्यांची तोड थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. दुष्काळ, तापमानात होणारे तीव्र बदल आणि गरिबी यांचा जवळचा संबंध आहे. 

चीनची आघाडी 
बांबूच्या झाडातील प्रत्येक भागाचा वापर कोळसा निर्मितीसाठी करता येतो. यापासून बनवलेल्या कोळशामध्ये अधिक कार्यक्षम इंधनाचे गुणधर्म असतात. बांबूच्या नियंत्रित पद्धतीने ज्वलनाने कोळसा ब्रिकेट हे इंधन विकसित केले जाते. त्यामध्ये जास्त वेळ जळण्याची क्षमता, तसेच धूर आणि हवेतील प्रदूषणही कमी होते. सध्या चीनने बांबू आणि बांबू ब्रिकेटच्या निर्मिती आणि वापर या क्षेत्रामध्ये आघाडी घेतली असून, प्रति वर्ष एक अब्ज डॉलरची उलाढाल या व्यवसायात होते. या क्षेत्रात कार्यरत एक हजारापेक्षा अधिक उद्योग असून, त्यात साठ हजारांपेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. चीनच्या नान्जिंग वन विद्यापीठ आणि वेनझाऊ बांबू चारकोल कंपनी यांनी बांबू ब्रिक क्‍लिनस, ग्राइंडर, ब्रिकेट मशिन व अन्य अवजारे विकसित केली आहेत. त्यांच्या साह्याने स्थानिक उपलब्ध साधनांपासून कोळसा व ब्रिकेट यांची निर्मिती करणे शक्‍य आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन हे घाना व इथोपिया यासारख्या सब सहारण देशांना हे तंत्रज्ञान पुरवीत आहे.