Friday, January 13, 2012

द्राक्ष लागवडीसाठी खुंटाची निवड महत्त्वाची...

द्राक्ष बागेत खुंट रोपांचा वापर हा विषय आता नवीन राहिलेला नाही. प्रत्येक बागेत नवीन लागवड करताना खुंट रोपांची लागवड करूनच आपण पुढील नियोजन करतो. जमिनीत असलेली चुनखडी आणि क्षारांच्या प्रमाणामुळे द्राक्ष बागेत अपेक्षेप्रमाणे उत्पादन घेणे अशक्‍य होते. या समस्येवर उपाययोजना म्हणून खुंट रोपांची लागवड करणे सोईस्कर होते. डॉ. आर. जी. सोमकुंवर
डॉ. जे. सतीशा 

जागतिक पातळीवर द्राक्ष लागवडीचा विचार करता असे लक्षात येईल, की सूत्रकृमी व फायलोक्‍झेरा या दोन महत्त्वाच्या विकृती स्वमुळावरील वेलीवर आढळून आल्या आहेत. यामुळेच परदेशामध्ये खुंट रोपांचा वापर करून त्या परिस्थितीवर मात करण्यात आली. युरोपसारख्या देशात वाइननिर्मितीच्या द्राक्षाची जास्त लागवड होत असल्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या वाइननिर्मिती उत्पादनाकरिता कोणता खुंट चांगले काम करेल यावरसुद्धा फार मोठे संशोधन झाले आहे. आपल्याकडे जरी ही अडचण नसली तरी एकंदरीत राज्यातील द्राक्ष बाग लागवड असलेल्या जमिनीचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते, की या जमिनीत मातीच्या कणांचे प्रमाण जास्त आहे. त्यांचा सामू आठ किंवा त्यापेक्षा जास्त आहे. या जमिनी जास्त प्रमाणात पाणी साठवून ठेवतात आणि अत्यंत कमी प्रमाणात निचरा करतात. जमिनीत जास्त प्रमाणात पाणी साठून राहिल्यामुळे क्‍लोराईड, कार्बोनेट, बायकार्बोनेट इ. क्षारांचा संचय जास्त प्रमाणात होतो. हेच क्षार वेलीला पुढे हानिकारक ठरतात. हे क्षार पाण्यामध्ये जलदगतीने विरघळतात. त्यामुळे पूर्ण जमीन क्षारयुक्त होते. ज्या वेळी द्राक्षवेल जमिनीतील पाणी शोषते त्या वेळेस हेच क्षार पाण्याबरोबर द्राक्षवेलीत शिरतात. द्राक्षवेलीच्या वाढीवर, विस्तारावर व त्याचसोबत उत्पादनावर अनिष्ट परिणाम करून उत्पादनाच्या प्रत व दर्जावर परिणाम करतात. 

स्वमुळांच्या द्राक्ष बागेत मुळांची वाढ आणि विस्तार कमी प्रमाणात होतो. त्याचाच परिणाम म्हणजे पाण्याचे कमी प्रमाणात संवहन होते. पानांच्या उच्छ्वासामुळे पानातील पाणी लवकर उडून जाते. त्यामधील पाण्याचा साठा कमी होत जातो. मुळांचा विस्तार कमी असल्यामुळे कॅनॉपी पाहिजे तेवढी मिळत नाही. त्यामुळे उत्पादन व द्राक्षाच्या प्रतीवरसुद्धा विपरीत परिणाम होत असल्याचे आपण पाहतो. 

खुंट लागवडीचे फायदे : 1) द्राक्षवेलीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होत नाही. 
2) वेलीची प्रतिकारशक्ती वाढते. 
3) खुटांची मुळे जमिनीत खोलपर्यंत जास्त असल्यामुळे वेलीला कमी पाणी दिले तरी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळते. 
4) खुंटांची मुळे अपायकारक असलेल्या द्रव्यांचे शोषण करत नाही. 
5) सूत्रकृमीला जोरात प्रतिकार करते. 
6) उत्पादन स्वमुळावरील वेलीपेक्षा जास्त मिळते. 

स्वमुळावरील तसेच खुंटावरील वेलीच्या मुळांची तुलना गुणधर्म ---स्वमुळ -----खुंटावरील वेल 
1) मुळांची लांबी ---कमी असते--- जास्त असते 
2) मुळांचा विस्तार ---कमी असतो. खोडापासून फक्त 9 ते 10 इंचापर्यंतच. जास्त व खोलपर्यंत 4-5 फूट खोल मुळे आढळून येतात 
3) मुळांच्या व्यास कमी असतो. जास्त असतो. 
4) मूलद्रव्याचे शोषण सर्वच प्रकारची मूलद्रव्ये शोषून घेतल्या जातात (हानिकारक तसेच फायद्याची.) फक्त उपयोगी असणारी मूलद्रव्ये शोषली जातात. 

समस्येनुसार खुंट रोपांची लागवड : 
अ. क्र. अडचण खुंटाचे नाव 
1) पाण्याची कमतरता 1103 P, 140-Ru, 110-R, SO4, 99-R, St. George 
2) जमिनीमध्ये सोडिअमचे प्रमाण 15% पेक्षा जास्त असणे व पाण्याचा SAR आठपेक्षा जास्त 1613-C, रामसे, डॉगरीज 
3) पाण्यातील क्‍लोराईडचे प्रमाण 4 मि.इ./ लिटरपेक्षा जास्त रामसे, डॉगरीज, टेलेकि-SA 
4) जमिनीची विद्युत वाहकता 2 मिमोनपेक्षा जास्त, पाण्याची विद्युत वाहकता 2 पेक्षा जास्त असते. रामसे, डॉगरीज, 110-आर, 99-आर 
5) माती आणि पाणी चांगल्या प्रतीचे असताना वेलीची वाढ मर्यादित ठेवणे व डोळे फुटण्याचे प्रमाण वाढवणे डॉगरीज, सेंट जॉर्ज, रामसे, 1613-सी, 110-आर 

ओळख खुंटाची : 1) डॉगरीज : हा खुंट व्हिटीस चॅंपिनी या जातीच्या रोपापासून निवडलेला आहे. क्षारयुक्त जमीन तसेच सूत्रकृमीवर प्रतिकार असा हा खुंट आढळून येतो. या खुंटावर कलम केलेल्या द्राक्षवेलीची वाढ ही बाकी दुसऱ्या खुटांवरील वेलीच्या वाढीपेक्षा जास्त असते. वाढीचा जोम जास्त असल्यामुळे कलम केल्यानंतर पहिल्याच वर्षी वेलीचा सांगाडा म्हणजे ओलांडे व काड्या तयार करून घेता येतात. हा खुंट हलक्‍या तसेच रेताड जमिनीमध्ये चांगला उपयोगी असल्याचे आढळून येते. कारण भारी जमिनीमध्ये या खुंटावरील वेलीचा जोम जास्त असतो व घडनिर्मिती या परिस्थितीत कमी होत असल्याचे आढळते. कलम केल्यानंतर पहिल्या वर्षी या खुंटावरील वेलीवर फेरस तसेच मॅग्नेशिअमची कमतरता दाखवते. परंतु वेळीच या सूक्ष्मद्रव्याची पूर्तता केल्यास चांगले परिणाम पाहावयास मिळतात. 
2) रामसे : या खुंटाला ----साल्ट क्रिक या नावानेसुद्धा ओळखले जाते. हा खुंट सूत्रकृमीकरिता प्रतिकारक आहे. क्षारपट जमिनीत हा खुंट फायद्याचा ठरतो. यावर केलेले कलम लवकर म्हणजे डॉगरीजप्रमाणेच यशस्वी होते. या खुंटावरील द्राक्षवेलीची वाढ जोमाने होते व क्षारतेच्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळते. 
3) 1613-सी : हा खुंट व्हिटीस सोलोनीस आणि फळे येणाऱ्या ओथेला जातीच्या संकरातून निर्माण केलेला आहे. हा खुंट मध्यम, सुपीक आणि चुनखडीयुक्त जमिनीत चांगल्याप्रकारे येऊ शकतो. हा खुंट सूत्रकृमींना प्रतिकारक्षम आहे. या खुंटाची पाने मध्यम ते मोठी आणि वरून लवविरहित असून जाड असतात. आपल्या परिस्थितीत या खुंटावर डॉगरीज व साल्ट क्रिकच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. 
4) सेंट जॉर्ज : या खुंट्यास रुपेस्ट्रिस सेंट जॉर्ज किंवा रुपेस्ट्रिज असेही म्हणतात. व्हिटीस रुपेस्ट्रिज या रानटी जातीच्या रोपापासून या खुंटाची निवड केली आहे. द्राक्ष पिकविणाऱ्या बहुतांशी देशांमध्ये या खुंटांचा उपयोग केला जातो. कॅलिफोर्नियामध्ये या खुंटांची सूत्रकृमीप्रतिकारक म्हणून शिफारस केलेली आहे. आपल्या परिस्थितीमध्ये या खुंटावर उत्पादन पाहिजे तसे मिळत नसल्याचे आढळून आले. 
5) 110 आर : हा खुंट रुपेस्ट्रिस रिपेरिया या जातीच्या संकरणातून तयार केलेला आहे. डॉगरीज खुंटाच्या पानांचा रंग गडद असून पाने जाड आहेत, तर या खुंटाच्या पानांचा रंग हलका, पाने पातळ असून, हृदयासारखा आकार पाहावयास मिळतो. या खुंटावर कलम यशस्वी होते. वेलीचा वाढीचा जोम मध्यम प्रकारचा (डॉगरीजच्या तुलनेत कमी) असून, घडनिर्मितीवर दिलेल्या सर्व खुंटांपेक्षा जास्त आहे. भारी जमिनीमध्ये डॉगरीज खुंटावर जोम जास्त असल्यामुळे अशा प्रकारच्या परिस्थितीत हा खुंट फायदेशीर ठरू शकतो. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120113/5427691256048451602.htm