Sunday, October 14, 2012

तंत्र कांदा लागवडीचे

कांद्याच्या सुधारित जाती - 
पंजाब सिलेक्‍शन, पुसा रतनार, पुसा माधवी, एन 2-4-1, पुसा रेड, अर्का निकेतन, कल्याणपूर रेड राउंड, ऍग्रिफाउंड लाइट रेड, उदयपूर 101, हिसार 2 आदी जाती रब्बी हंगामासाठी उपयुक्त जाती आहेत. कांद्याचे लोणचे तयार करण्यासाठी लहान आकाराची व लाल रंगाची ऍग्रिफाउंड जात निर्यातीसाठी उपयुक्त आहे. पांढरा रंग असणाऱ्या काही जाती आहेत. यात पुसा व्हाइट राउंड, पुसा व्हाइट फ्लेट, उदयपूर 102, पंजाब 48, रब्बी हंगामासाठी व फुले सफेद आणि ऍग्रिफाउंड व्हाइट रांगडा व रब्बी हंगामासाठी विकसित केल्या आहेत. 

जिवाणूंपासून मिळाले नैसर्गिक तणनाशक


रासायनिक तणनाशकांचा वापर गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये वाढत आहे. ही तणनाशके विघटित होत नसल्याने त्यांचे माती, पर्यायाने पाण्याच्या स्रोतातील प्रमाणही वाढत आहे. मात्र, फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी बटाट्यावर येणाऱ्या स्कॅब या रोगासाठी कारणीभूत जिवाणूंपासून नैसर्गिक तणनाशक विकसित केले आहे. ते मातीतील सूक्ष्म जिवांच्या साह्याने चांगल्या रीतीने विघटित होते, त्यामुळे त्याचे अवशेष बाकी राहत नाहीत. या तणनाशकाचा वापर सेंद्रिय आणि पारंपरिक शेतीमध्ये करणे शक्‍य होणार आहे. हे संशोधन "नेचर केमिकल बायोलॉजी'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 

"सन बर्निंग'वर द्राक्ष, टोमॅटोचा रस ठरेल प्रभावी

- त्वचेवरील अतिनील किरणांचे विपरीत परिणाम करतात कमी 
- ऑस्ट्रेलियामध्ये अधिक संशोधन सुरू 

उन्हातील अतिनील किरणांमुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतो. विशेषतः गोऱ्या कातडीच्या लोकांच्या त्वचेमध्ये मेलॅनीन या घटकाचे प्रमाण कमी असल्याने "सन बर्निंग' (किंवा त्वचा जळणे) मोठ्या प्रमाणात होते. सूर्यकिरणांतील अतिनील किरणांमुळे त्वचेच्या कर्क रोगाच्या प्रमाणात वाढ होते. यावर उपचार करण्यासाठी टोमॅटो आणि द्राक्षांच्या अर्कातील गुणधर्मांचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. त्याबाबत ऑस्ट्रेलियामध्ये संशोधन करण्यात येत आहे. हे संशोधन यशस्वी झाल्यास भविष्यात अतिनील किरणांचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम रोखणे शक्‍य होणार आहे.

द्राक्ष रस हृदयरोगासाठी फायदेशीर

अल्कोहोल असलेल्या वाइनपेक्षा द्राक्षाचा रस हृदयरोगाचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. द्राक्ष रसाच्या सेवनामुळे माणसाच्या हृदयरोगाचा धोका असलेल्या माणसांमध्ये रक्तदाब कमी होत असल्याचे संशोधनात आढळले असून, हे संशोधन "अमेरिकन हार्ट असोसिएशन'च्या "जर्नल सर्क्‍युलेशन रिसर्च'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.