Sunday, October 14, 2012

"सन बर्निंग'वर द्राक्ष, टोमॅटोचा रस ठरेल प्रभावी

- त्वचेवरील अतिनील किरणांचे विपरीत परिणाम करतात कमी 
- ऑस्ट्रेलियामध्ये अधिक संशोधन सुरू 

उन्हातील अतिनील किरणांमुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतो. विशेषतः गोऱ्या कातडीच्या लोकांच्या त्वचेमध्ये मेलॅनीन या घटकाचे प्रमाण कमी असल्याने "सन बर्निंग' (किंवा त्वचा जळणे) मोठ्या प्रमाणात होते. सूर्यकिरणांतील अतिनील किरणांमुळे त्वचेच्या कर्क रोगाच्या प्रमाणात वाढ होते. यावर उपचार करण्यासाठी टोमॅटो आणि द्राक्षांच्या अर्कातील गुणधर्मांचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. त्याबाबत ऑस्ट्रेलियामध्ये संशोधन करण्यात येत आहे. हे संशोधन यशस्वी झाल्यास भविष्यात अतिनील किरणांचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम रोखणे शक्‍य होणार आहे.
 

अतिनील किरणांमुळे त्वचा रापण्याचा त्रास ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यामुळे यावर उपचार करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी ऍडव्हेंटीस्ट हॉस्पिटलमधील संशोधन केंद्रामध्ये संशोधन केले जात आहे. विविध भाज्या, फळातील गुणधर्मांचा अभ्यास करून त्यांनी टोमॅटो आणि द्राक्षांची निवड केली आहे. त्यामध्ये "कारटेनॉइड' आणि "पॉलिफेनॉल्स' हे महत्त्वपूर्ण आरोग्यदायी घटक असतात. या घटकांमुळे अतिनील किरणांसाठी त्वचेची प्रतिकारक्षमता वाढू शकते. तसेच सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान कमी होऊ शकेल. 

यापूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या संशोधनामध्ये लायकोपेन या ऍन्टीऑक्‍सिडंटमुळे टोमॅटो आणि इतर भाजीपाल्यांमध्ये लाल रंग तयार होत असल्याचे आढळले होते. तसेच टोमॅटोमध्ये वार्धक्‍य विरोधी गुण असून, ऍन्टीऑक्‍सिडंटमुळे अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण होऊ शकते. त्याबाबत अधिक संशोधन करण्यात येत असून साधारणतः वर्षभरामध्ये त्याचे निष्कर्ष उपलब्ध होतील, अशी माहिती संशोधक स्झेटो यांनी दिली आहे.