Sunday, October 14, 2012

तंत्र कांदा लागवडीचे

कांद्याच्या सुधारित जाती - 
पंजाब सिलेक्‍शन, पुसा रतनार, पुसा माधवी, एन 2-4-1, पुसा रेड, अर्का निकेतन, कल्याणपूर रेड राउंड, ऍग्रिफाउंड लाइट रेड, उदयपूर 101, हिसार 2 आदी जाती रब्बी हंगामासाठी उपयुक्त जाती आहेत. कांद्याचे लोणचे तयार करण्यासाठी लहान आकाराची व लाल रंगाची ऍग्रिफाउंड जात निर्यातीसाठी उपयुक्त आहे. पांढरा रंग असणाऱ्या काही जाती आहेत. यात पुसा व्हाइट राउंड, पुसा व्हाइट फ्लेट, उदयपूर 102, पंजाब 48, रब्बी हंगामासाठी व फुले सफेद आणि ऍग्रिफाउंड व्हाइट रांगडा व रब्बी हंगामासाठी विकसित केल्या आहेत. 



कांदा संशोधन केंद्राच्या नवीन जाती - 
चालू वर्षी केंद्राने रब्बी हंगामासाठी तीन नवीन जाती विकसित केल्या आहेत. भीमा किरण, भीमा शक्ती, भीमा श्‍वेता अशी त्यांची नावे आहेत. 

लागवडीचे नियोजन : 
कांद्यासाठी जमिनीची उभी- आडवी नांगरट करून दोन- तीन कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. मशागत करताना अगोदरच्या पिकांचे धसकटे, काडीकचरा असल्यास गोळा करून घ्यावा. जमिनीचा उतार आणि ओलिताची सोय लक्षात घेऊन योग्य आकाराचे सपाट वाफे बांधून घ्यावेत. सपाट वाफ्यात सरी वरंबा पद्धतीपेक्षा 25-30 टक्के रोपे जास्त लागतात व मध्यम आणि सारख्या आकाराचे कांदे मिळू शकतात. पाणी देण्याच्या सोयीनुसार 1.5 ते दोन मी. रुंद व तीन ते सहा मी. लांबीचे सपाट वाफे तयार करावेत. लागवड करताना ठिबक अथवा तुषार सिंचनाचा वापर करायचा असल्यास वेगळ्या प्रकारे रानबांधणी करावी लागते. यासाठी 120 सें.मी. रुंदीचे व 10-15 सें.मी. सें.मी. उंचीचे व 60 मी. लांब गादी वाफे तयार करावेत. असे वाफे ट्रॅक्‍टर चलित एक प्रकारच्या सरी यंत्राने तयार करता येतात. वाफे तयार करण्यासाठी जमीन चांगली भुसभुशीत व ढेकळेविरहित असावी. 

पुनर्लागवड 
सपाट वाफे किंवा सरी-वरंबे यांना पाणी देऊन त्यात रोपांची लागवड केली जाते. काही ठिकाणी कोरडी लागवडही केली जाते. परंतु या पद्धतीत रोपांची लागवड केल्याबरोबर पाठोपाठ वाफ्यातून पाणी द्यावे. पाणी देताना रोपे वाढू नयेत म्हणून वाफ्याच्या तोंडावर गवताची पेढी लावून पाण्यावर नियंत्रण ठेवावे. ओली लागवड करताना पुरेसे पाणी राहील याची काळजी घ्यावी. तसेच रोपांची संख्या ठराविक असावी. रब्बी हंगामात 10 x 10 सें.मी. किंवा 10 x 15 सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करावी. ठिबक अथवा तुषार सिंचनावर लागवड करायची असल्यास हे संच लागवडीअगोदर सुरू करावे व तीन-चार सें.मी. खोलीपर्यंत ओल राहील इतपत पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफ्यावर लागवड करून मग पाणी द्यावे. रब्बी हंगामात 50 ते 55 दिवसांत तयार होतात. रोप उपटल्यानंतर पानाचा 1/3 भाग कापून मुळे पाण्यात धुऊन घ्यावीत. तयार केलेली रोपांची मुळे कार्बेन्डाझिम एक ग्रॅम अथवा क्‍लोरोथॅलोनील दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात 10-15 मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापरावीत. कांद्याची लागवड शेतात बी पेरूनसुद्धा केली जाते. परंतु यासाठी ट्रॅक्‍टरला जोडता येणाऱ्या पेरणी यंत्राची आवश्‍यकता असते. यंत्रामुळे दोन ओळींतील आणि दोन रोपांतील अंतर व्यवस्थित राखता येते. 

तणनाशकाचा वापर : 
पुनर्लागवडीनंतर मूळ जोर धरत असतानाच तणांचा उपद्रव सुरू होतो. तणनाशकांचा वापर करताना अतिशय काळजीपूर्वक करावा व वापरण्याचे आधी पूर्ण माहिती घ्यावी. कांद्यामध्ये ऑक्‍सीफ्लोरफेन या तणनाशकाचा चांगला उपयोग होतो. रोपे लागवडीपूर्वी कोरड्या वाफ्यात 15 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. फवारणीसाठी विशिष्ट प्रकारच्या नोझलचा वापर करावा. फवारणीनंतर लगेच पाणी देऊन लागवड करावी. 

खताचा वापर - प्रति हेक्‍टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. शेणखत उन्हाळ्यात पसरवून नांगरट करून मातीमध्ये मिश्रित करावे. शेणखत अर्धवट कुजलेले असेल तर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शेणखत, हिरवळीचे खत आणि इतर पिकांची फेरपालट व्यवस्थित होत असेल तर सूक्ष्मद्रव्येसुद्धा पिकांना उपलब्ध होतात. कांदा रोप लागवडीनंतर दोन महिन्यांपर्यंत नत्राची गरज जास्त असते. कांदा पूर्ण वाढल्यानंतर नत्राची आवश्‍यकता नसते. पिकांच्या मुळांचे वाढीकरिता स्फुरदाची आवश्‍यकता असते. स्फुरद जमिनीत तीन ते चार इंच खोलीवर रोपांच्या लागवडी अगोदर द्यावे म्हणजे नवीन मूळ तयार होईपर्यंत स्फुरद उपलब्ध होते. स्फुरदाबरोबर पालाशची पूर्ण मात्रा लागवडीअगोदर दिली जाते. कांद्यासाठी गंधकयुक्त खतांची गरज भासते. गंधकामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. कांदा पिकास जर खते सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश आणि अमोनिअम सल्फेट किंवा युरिया याद्वारे दिली तर गंधक वेगळा वापरण्याची गरज नाही. 

कांदा पिकासाठी खतांच्या मात्रा किती द्यावयाच्या हे जमिनीचा प्रकार, लागवडीचे हंगाम, वापरली जाणारी आणि खत देण्याच्या पद्धती यावर अवलंबून असते. महाराष्ट्रात साधारणपणे रब्बी हंगामासाठी 150 कि.ग्रॅ. नत्र, 50 कि.ग्रॅ. स्फुरद, 80 कि.ग्रॅ. पालाश व 50 किलो ग्रॅम गंधकयुक्त खते या प्रमाणावर रासायनिक खतांबरोबर 20 ते 25 टन शेणखत द्यावीत. यापैकी 1/3 भाग नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश व गंधक लागवडीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन हप्त्यांत विभागून द्यावे.

पाणी नियोजन - 
कांद्याची मुळे जमिनीच्या वरच्या भागातच 10 ते 15 सें.मी. खोलीपर्यंत वाढतात. त्यामुळे पिकाला पाणी देताना 15 सें.मी. जास्त खोलवर ओल जाईल असे पाणी देण्याची गरज भासत नाही. सुरवातीच्या काळात कांद्याच्या पिकाला बेताचे पाणी लागते. कोरड्यात लागवड केल्यास पाठोपाठ पाणी द्यावे. कोरडी किंवा ओली लागवड केल्यानंतर दोन दिवसांनी चिंबवणी द्यावी. सुरवातीच्या काळात कांद्याला कमी पाणी लागते. पिकाच्या वाढीबरोबर पाण्याची गरज वाढते. पाण्याचे प्रमाण आणि दोन पाळ्यांतील अंतर हे पिकाची वाढीची अवस्था, लागवडीचा हंगाम, जमिनीचा मगदूर इत्यादीवर अवलंबून असते. रब्बी हंगामात अर्थात ऑक्‍टोबर ते जानेवारीमध्ये आठ ते 12 दिवसांनी व फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये पाच ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. साधारणतः कांद्याला 15 ते 18 पाण्याच्या पाळ्या लागतात. 

ठिबक सिंचनाचा वापर करायचा असल्यास 120 सें.मी. रुंदीच्या गादीवाफ्यावर लागवड करावी. एक वाफ्यावर दोन लॅटरल 60 सें.मी. अंतरावर पसरवून घ्यावे. दोन ड्रीपरमध्ये 50 सें.मी. अंतर असावा. तुषार संचासाठी पंपसेट ठिबकपेक्षा जास्त शक्तिशाली आणि उच्च दाबाचा आवश्‍यक असतो. तुषार सिंचनमध्ये पाण्याची प्रत चांगली असणे अति आवश्‍यक आहे. ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देता येतात. त्यामुळे खते देण्याची मजुरी वाचते तसेच खतांच्या मात्रा कमी प्रमाणात अधिक भागात विभागून दिल्यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते.