Showing posts with label sakal. Show all posts
Showing posts with label sakal. Show all posts

Friday, January 13, 2012

प्रदूषण कमी करण्यासाठी पॉलिमेरिक पदार्थ उपयुक्त

वाढत्या शहरीकरणाबरोबरच हवेतील कर्बवायूचे प्रदूषण हा महत्त्वाचा प्रश्‍न झाला आहे. जागतिक तापमानवाढीमध्ये या हरितगृह वायूचा मोठा वाटा आहे. उद्योग आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे कार्बन- डाय-ऑक्‍साईड वायूचे प्रदूषण वाढत आहे. या उद्योगाच्या आणि वाहनाच्या नळकांड्यातून बाहेर पडणाऱ्या कर्बवायूला, तसेच हवेतील वेगळे करणारे तंत्रज्ञान शोधल्याचा दावा अमेरिकेतील लॉकर हायड्रोकार्बन संशोधन संस्था आणि दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यामुळे प्रदूषणामध्ये घट होणार असून, महानगरांतील वातावरण सुधारणे शक्‍य होणार आहे. हे संशोधन अमेरिकन रसायन सोसायटीच्या संशोधनत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. ज्या वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास कार्बन- डाय-ऑक्‍साईड वेगळा करणे शक्‍य आहे. 

21 व्या शतकामध्ये कर्बवायूच्या उत्सर्जनाचा प्रश्‍न फार गंभीर होत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी अलेन जोइपार्ट, जी. के. सूर्या प्रकाश, जॉर्ज ए. ओलाह आणि सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. सध्या प्रचलित असलेल्या कर्बवायू वेगळे करण्याच्या पद्धती या अधिक ऊर्जा वापरणाऱ्या असून त्यांचे तोटेही आढळून आलेले आहेत. या त्रुटी कमी करण्यासाठी स्वस्त असणाऱ्या पॉलिमेरिक घन पदार्थाचा वापर करण्यात आला आहे. त्यातील पॉलिइथिलिनीअमाइन या घटकांमुळे कर्बवायू शोषणाचे प्रमाण आर्द्रतायुक्त हवेमध्ये अधिक असल्याचे आढळले आहे. 

या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजेच शोषण केलेला कर्बवायू हे अन्य कारणासाठी वापरता येऊ शकतो किंवा पर्यावरणातून कायमचा वेगळा करता येऊ शकतो. त्यामुळे या कर्बवायूचा पुनर्वापर करणे शक्‍य होते. 
संशोधकांनी सांगितले, की हे घटक पाण्यात, हवेत आणि कारखान्याच्या धुरांच्या चिमण्यांमध्येही वापरता येतात. 

...असे आहे संशोधन 
संशोधकांनी पॉलिअमाइन आधारित पुनर्वापर योग्य घन शोषक पदार्थाची निर्मिती केली आहे. हे घटक अत्यंत कमी तीव्रतेच्या कर्बवायूचे शोषण करू शकतात. पूर्वी वापरात असलेले शोषक हे केवळ जास्त तीव्रतेच्या कर्बवायूचे शोषण करू शकत असत. त्यामुळे त्यांचा वापर केवळ उद्योगातून उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूसाठी करता येत असे. मात्र या नव्या शोषक पदार्थामुळे उद्योगातून, वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूबरोबरच हवेतील प्रदूषण कमी करणे शक्‍य होणार आहे. या पदार्थाचा आणि गोळा केलेल्या कर्बवायूचा पुनर्वापर करणे शक्‍य असल्याने हे घटक अत्यंत स्वस्त पडणार आहेत.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120111/5533484554183119211.htm

मक्‍यातील प्रतिकारकतेला मदत करणारी जैवरसायने ओळखली

प्रत्येक पिकाची किडी-रोगांशी लढण्यासाठी स्वतंत्र अशी प्रतिकारशक्ती असते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वनस्पतीच्या अंतर्गत जैवरासायनिक बदल घडून येतात. मक्‍यामधील किडी-रोगांची ओळख पटवणाऱ्या जैवरासायनिक प्रतिक्रियेची ओळख पटवण्यात गेनसव्हिले येथील अमेरिकी कृषी विभागाच्या संशोधकांना यश आले आहे. तसेच, मक्‍यावर झालेल्या बुरशीच्या हल्ल्याची माहिती प्रतिकारक संस्थांना पुरवणारे प्रथिन ZmPep1 सुद्धा ओळखण्यात आले आहे. वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे या किडी-रोगांचा प्रतिकार करणे शक्‍य होते. 

अमेरिकेतील फ्लोरिडातील कृषी संशोधन संस्थेतील संशोधक फात्मा कॅपलान आणि वनस्पती शास्त्रज्ञ एरिक शेमेल्झ यांनी मक्‍यातील प्रतिकारशक्तीसंबंधी संशोधन केले आहे. या संशोधनामुळे कीड-रोगाच्या प्रतिकारकतेबरोबरच ताण सहनशीलतेच्या मक्‍यातील यंत्रणेच्या कार्यप्रणाली समजणे शक्‍य होणार आहे. शेमेल्झ यांनी सांगितले, की वनस्पतीमध्ये सेंद्रिय घटकांत आढळणारे झीलेक्‍सिन आणि कौरालेक्‍सिन हे रासायनिक घटक वेगळे करण्यात आले आहेत. यापूर्वी कापूस, टोमॅटो यासारख्या पिकांमध्ये टरपेन या घटकावर अधिक संशोधन झाले आहे. टरपेनचे वनस्पतीमधील प्रमाण वाढवण्यासाठी संशोधक प्रयत्न करत होते. मात्र, टरपेन हे रोगासंदर्भात प्रतिक्रिया देण्यापेक्षा पाने खाणाऱ्या किडींसाठी चांगली प्रतिक्रिया देऊ शकते. 

एआरएसच्या संशोधकांनी रसायन तज्ज्ञ जेम्स रोक्का यांच्यासह मक्‍यातील न्युक्‍लिअर चुंबकीय रेझोनन्स इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ही दोन मूलद्रव्ये वेगळी केली आहेत. 

प्रयोगामध्ये फायटोलेक्‍सिनच्या कुळातील कौरालेक्‍सिनचे ऍन्थ्रक्‍नोज स्टॉक रॉट (Colletotrichum graminicola) या रोगाच्या वाढीला प्रतिकार करण्यामध्ये 90 टक्के मदत केल्याचे आढळले आहे, तसेच झोलेक्‍सिन या मूलद्रव्याने अफ्लाटॉक्‍सिनमुळे वाढणाऱ्या ऍस्परगिलस फ्लाउस या बुरशीची वाढ रोखण्यामध्ये 80 टक्के मदत केली आहे. मक्‍यामध्ये या दोन्ही रोगांमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येत असते. तसेच, प्रयोगशाळेतील प्रयोगामध्ये युरोपियन मका पोखरणाऱ्या अळीच्या खाण्यावरही कौरालेक्‍सिनच्या वाढीमुळे अटकाव करणे शक्‍य झाले आहे. 
हे संशोधन ऍग्रिकल्चरल रिसर्च मॅगझीनमध्ये जानेवारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. 


http://www.agrowon.com/Agrowon/20120111/5111187827865094317.htm

पाण्याचे प्रमाणच ठरवते मिरच्यांचा तिखटपणा

- बियांच्या प्रमाणाचाही असतो सिंचनाच्या पाण्याशी संबंध
- इंग्लंडमधील इंडियाना विद्यापीठातील संशोधन 

जंगली मिरच्या या त्यांचा तिखटपणा आणि उष्ण गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहेत. या मिरच्या फ्युजारियम या बुरशीसाठी काही प्रमाणात प्रतिकारक असतात; मात्र त्यांच्या या गुणधर्मांमध्ये सातत्य असत नाही. काही मिरच्या अत्यंत तिखट असतात, तर काही अजिबात तिखट नसतात. हे असे का होत असावे, यावर इंग्लंडमधील इंडियाना विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात आले. त्यामध्ये मिरची रोपांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर त्यातील तिखटपणा ठरत असून, बियांचे प्रमाणही ठरत असल्याचे आढळून आले आहे. 

तिखट मिरच्या या कोरडवाहू भागामध्ये कमी पाण्यावर येत असल्या, तरी त्यामध्ये अधिक बियांची निर्मिती होण्यासाठी अधिक पाण्याची आवश्‍यकता असते. कोरड्या वातावरणामध्ये फ्युजारियमचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. पावसाळी वातावरणात फ्युजारियम अधिक चांगल्या प्रमाणात वाढते, त्यामुळे जंगली मिरच्या तिखटपणासाठी कारणीभूत असलेल्या कॅपसायसिन या घटकांचे प्रमाण प्रतिकारासाठी वाढवत असल्याचे आढळले आहे. याबाबत बोलताना संशोधक डेव्हिड हाक म्हणाले, की कोरड्या वातावरणामध्ये तिखटपणा कमी होत असला तरी त्यांचे उष्ण गुणधर्म तिथेच राहतात, त्यामुळे कमी तिखट मिरच्या अधिक प्रमाणात बियांची निर्मिती करतात. याचा उपयोग बियाणे निर्मितीसाठी करणे शक्‍य आहे. 

...असे झाले संशोधन 
या संशोधनामध्ये सन 2002 ते 2009 या काळात आग्नेय बोलिविया प्रांतातील 12 जंगली मिरच्यांच्या प्रजातींमधील तिखटपणाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये परिसरातील 185 मैल पट्ट्यातील कोरड्या आणि ओलिताखालील प्रदेशातील मिरच्यांचा अंतर्भाव करण्यात आला. त्यामध्ये परिसरातील पावसाचे प्रमाण आणि मिरचीचा तिखटपणा यांच्या संबंधाचा अभ्यास केला, त्यासाठी हरितगृहामध्येही या विषयावर अनेक प्रयोग करण्यात आले. त्याचा उपयोग प्रत्यक्ष शेतावरील स्थितीमध्ये घडणाऱ्या निष्कर्षांशी तुलना करण्यासाठी करण्यात आला. 330 मिरचीची रोपे ही फुले येईपर्यंत समान वातावरणात वाढवली. त्यानंतर त्यामध्ये दोन विभाग केले. एका गटाला मुबलक पाणी पुरवले आणि दुसऱ्या गटाला बोलिविया प्रांतामधील सरासरी पावसाच्या प्रमाणात पाण्याचा ताण दिला. या ताण दिलेल्या व कमी तिखट मिरची रोपांपासून नेहमी मिळणाऱ्या बियांच्या दुप्पट बिया मिळाल्या. त्यांचे प्रमाण तिखट बियांइतकेच असल्याचेही आढळून आले. 

कोरड्या वातावरणामध्ये बियांची संख्या कमी ठेवून मिरची रोपे त्यांची संख्या कमी ठेवतात. त्या कमी बियांच्या संरक्षणासाठी अधिक कॅपसायसिन तयार करतात. पाण्याची उपलब्धता असताना कमी तिखट मिरच्यांवर फ्युजारियमचा प्रादुर्भाव होऊन त्यांच्या बिया खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. हाक यांनी सांगितले, की तिखट मिरच्यांतून कॅपसायसिन तयार करण्याच्या प्रक्रियेत पाण्याचा काटेकोर वापर करण्याची आवश्‍यकता या प्रयोगातून समोर आली. पावसाळी वातावरणात कमी तिखट मिरचीच्या 90 ते 95 टक्के फळांवर फ्युजारियमचा प्रादुर्भाव होतो. तिखट मिरच्या मोठ्या प्रमाणात स्वतःचा बचाव करू शकतात. 

हे संशोधन इंग्लंडमधील "रॉयल सोसायटी ऑफ सायन्स'च्या इतिवृत्तात प्रकाशित करण्यात आले आहे.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120105/4723757374140624037.htm

स्वयंचलित सापळे "आयमेटोज ट्रॅप' विकसित

पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झालेला आहे, हे पाहण्यासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला जातो. या सापळ्यांमध्ये अडकलेल्या किडींची ओळख पटवली जाते. पिकांच्या दृष्टीने हानिकारक पातळीपेक्षा अधिक संख्या असल्यास किडींच्या नियंत्रणासाठी निर्णय घ्यावा लागतो; मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सापळ्यांची निगा, त्यात अडकलेल्या किडींची ओळख पटवण्यामध्ये अनेक अडचणी येतात. विशेषतः शेतीचे क्षेत्र मोठे असल्यास सापळ्यांचे निरीक्षण करण्यामध्येही अडचणी येतात. या अडचणींचा विचार करून ऑस्ट्रियन कंपनी मेटोजने स्वयंचलित सापळे विकसित केले आहेत. हे सापळे त्यात अडकलेल्या किडींची ओळख पटवून त्यांची संख्या व अन्य माहिती शेतकऱ्यांपर्यंत इंटरनेट अथवा मोबाईलवर सूचनेच्या स्वरूपात दिली जाते, त्यामुळे किडींच्या नियंत्रणाचे निर्णय योग्य वेळी घेणे शक्‍य होते. 

नुकतेच इटलीमध्ये भाजीपाला व औषधी वनस्पतीसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ऑस्ट्रियन कंपनीने पेसल इन्स्ट्रूमेंट्‌स या इटालियन कंपनीच्या साह्याने विकसित केलेल्या "आयमेटोज ट्रॅप' या स्वयंचलित सापळ्याचे प्रथम संशोधकांसमोर प्रदर्शन केले. या सापळ्यामध्ये स्वयंचलित तंत्रज्ञान वापरले असून, किडींच्या ओळखीसाठी योग्य ते सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा समावेश केला आहे. 

...अशी आहे स्वयंचलित सापळ्याची कार्यपद्धती 
डेल्टा सापळ्यामध्ये असलेल्या चिकट सापळ्याबरोबरच फ्लॅश असलेले, उच्च क्षमतेचे; पण लहान सहा कॅमेरे बसवलेले असतात. या चिकट सापळ्यात येऊन एखादा कीटक किंवा कीड चिकटली असता, त्याचे छायाचित्र घेऊन ते सर्व्हरकडे पाठवले जाते. सर्व्हरमध्ये उपलब्ध असलेल्या किडीच्या छायाचित्रांशी ते ताडून पाहिले जाते. त्याची ओळख पटवून त्याची सूचना व्यवस्थापकाला दिली जाते. ही सूचना इंटरनेटच्या साह्याने किंवा मोबाईल फोनवर दिली जाते, त्यासाठी जीपीआरएस तंत्रज्ञानाधारित सेवेचे सिमकार्ड सापळ्यामध्ये बसवलेले असते. त्यासोबतच त्या वेळी असलेल्या हवामानाच्या नोंदी घेतल्या जातात, त्याही इंटरनेटवर पुरवल्या जातात. शेतावर हे उपकरण चालण्यासाठी आवश्‍यक असलेली ऊर्जा सौर पॅनेलच्या साह्याने मिळवून ती बॅटरीमध्ये साठवली जाते. 

दररोज उपलब्ध होणाऱ्या छायाचित्रांमुळे किडींची संख्या, त्यांची टक्केवारी, त्यांनी व्यापलेले क्षेत्र आणि मागील माहितीपेक्षा त्यात झालेली वाढ यांची माहिती सातत्याने साठवली जाते. त्याचे अधिक विश्‍लेषण केले असता निर्णय घेण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. सध्या यामध्ये पतंगाच्या Cydia pomonella आणि Eupoecilia ambiguella या जातींसाठी सूचना देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, अन्य किडींसाठी आवश्‍यक त्या प्रकारच्या गंधाची सोय केल्यास त्यांच्याकरिता देखील हा सापळा वापरता येऊ शकतो. 

सापळ्याचे फायदे 
- या निरीक्षणामधून दैनंदिन आढळणाऱ्या किडींच्या जैविक अवस्थेविषयी माहिती मिळते. 
- ही सर्व माहिती स्वयंचलित पद्धतीने गोळा केली जात असल्याने त्याचे माणसांच्या साह्याने निरीक्षण करण्याची आवश्‍यकता राहत नाही. 
- किडीची ओळख स्वयंचलित पद्धतीने पटवली जाते. 
- किडीच्या प्रमाणात नुकसान पातळीपेक्षा अधिक वाढ झाल्यास व आतील प्लेट बदलण्याची गरज असल्यास सूचना दिली जाते. 
- सोबत हवामानाची माहिती मिळत असल्याने किडीच्या प्रादुर्भावाच्या वेळी असलेल्या स्थितीची माहिती मिळते. 
-- या सर्व सूचना इंटरनेटवर किंवा मोबाईलवर दिल्या जातात. शेतापासून दूर असतानाही ही सर्व माहिती उपलब्ध होत राहते.

Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120104/5567580700351807120.htm

आफ्रिकेत इंधनासाठी वाढतेय बांबूची लागवड

सब सहारण आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये इंधन ऊर्जेसाठी जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात होत असते. ही तोड थांबवण्यासाठी बांबूच्या रोपांचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. यासाठी बांबूपासून कोळसा व ब्रिकेट तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापर इंधनासाठी करून जंगलांची तोड थांबवणे शक्‍य आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय बांबू आणि रट्टन संघ आणि आफ्रिकन देशांच्या सहभागाने एक प्रकल्प राबवण्यात येणार असून, बांबूच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या बांबू लागवडीमुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत मिळणार आहे. 

आफ्रिकेमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणारे बांबू हे बायोमासच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. याचा विचार करून घाना आणि इथोपिया या देशांनी त्यांच्या अपारंपरिक ऊर्जेच्या धोरणामध्ये बांबूचा समावेश केला आहे. बांबूपासून कोळसा निर्मितीच्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने त्याचे फायदे जंगलतोड रोखण्यासाठी होत असल्याचे आढळले आहे. याबाबत माहिती देताना "आयएनबीएआर'चे महासंचालक डॉ. जे. कुसजे हुंगनडेरॉन यांनी सांगितले, की जळणासाठी लाकडाचा वापर प्रामुख्याने केला जातो, त्यामुळे हरितगृह वायूमध्ये भर पडत असल्याने पर्यावरणावर विपरीत परिणाम होतात. सन 2050 पर्यंत चुलीच्या धुरामुळे 6.7 अब्ज टन हरितगृह वायूमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे, तसेच दोन दशलक्ष आफ्रिकन महिला आणि मुलांच्या आरोग्यावर या धुराचा विपरीत परिणाम होतो आहे. तो या बांबूच्या कोळशाचा वापर केल्यास कमी करता येऊ शकतो. 

बांबूपासून कोळसा बनवण्याचे तंत्रज्ञान चीनने सब सहारण आफ्रिकेतील काही देशांना दिले होते, त्यामुळे इंधनासाठी चांगल्या दर्जाचा कोळसा बनविल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत मिळणार असून, तापमान बदलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या जंगलांची तोड रोखण्यात मदत मिळत आहे. जागतिक बॅंकेचे कृषी व तापमान बदल विभागाचे प्रमुख डॉ. पॅट्रिक वेरकुजेन यांनी सांगितले, की आजच्या काळात अन्न सुरक्षा आणि तापमान बदल हा परवलीचा शब्द झाला आहे. भावी काळात जंगले ही शाश्‍वत विकासासाठी आवश्‍यक राहणार असून, त्यांची तोड थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. दुष्काळ, तापमानात होणारे तीव्र बदल आणि गरिबी यांचा जवळचा संबंध आहे. 

चीनची आघाडी 
बांबूच्या झाडातील प्रत्येक भागाचा वापर कोळसा निर्मितीसाठी करता येतो. यापासून बनवलेल्या कोळशामध्ये अधिक कार्यक्षम इंधनाचे गुणधर्म असतात. बांबूच्या नियंत्रित पद्धतीने ज्वलनाने कोळसा ब्रिकेट हे इंधन विकसित केले जाते. त्यामध्ये जास्त वेळ जळण्याची क्षमता, तसेच धूर आणि हवेतील प्रदूषणही कमी होते. सध्या चीनने बांबू आणि बांबू ब्रिकेटच्या निर्मिती आणि वापर या क्षेत्रामध्ये आघाडी घेतली असून, प्रति वर्ष एक अब्ज डॉलरची उलाढाल या व्यवसायात होते. या क्षेत्रात कार्यरत एक हजारापेक्षा अधिक उद्योग असून, त्यात साठ हजारांपेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. चीनच्या नान्जिंग वन विद्यापीठ आणि वेनझाऊ बांबू चारकोल कंपनी यांनी बांबू ब्रिक क्‍लिनस, ग्राइंडर, ब्रिकेट मशिन व अन्य अवजारे विकसित केली आहेत. त्यांच्या साह्याने स्थानिक उपलब्ध साधनांपासून कोळसा व ब्रिकेट यांची निर्मिती करणे शक्‍य आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन हे घाना व इथोपिया यासारख्या सब सहारण देशांना हे तंत्रज्ञान पुरवीत आहे.

बांबूची रोपे कशी तयार करतात?

बांबूची रोपे तयार करण्यासाठी बियाणे गादी वाफ्यावर पेरावे, त्यासाठी वाफ्याची लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी एक मीटर व लांबी सोयीनुसार दहा मीटर ठेवावी. गादी वाफ्यातील अंतर 30 सें.मी. ठेवून आडव्या ओळीमध्ये सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये बियांची पेरणी करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. तयार केलेली रोपे जून व जुलै महिन्यांत लागवडीसाठी वापरता येतात. रोपांची निर्मिती ही पॉलिथिन पिशवीत बियाणे लावूनसुद्धा करता येते. यासाठी 25 सें.मी. x 12 सें.मी. आकाराच्या पॉलिथिन पिशवीत माती, वाळू व चांगले कुजलेले बारीक शेणखत यांचे 1 ः 1 ः 1 मिश्रण करून ते पॉलिथिन पिशवीत भरून, प्रत्येक पिशवीत तीन ते चार बिया पेरून त्यास पाणी द्यावे. पॉलिथिन पिशव्यांत रोपांची वाढ चांगली होते आणि बियाणे कमी लागते.


संपर्क ः 02426 - 243252
अखिल भारतीय वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी



Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111005/4680155234481353656.htm

उसावरील लोकरी माव्याचे नियंत्रण कसे करावे?

- भरत तुकाराम पाटील, गुडे, ता. भडगाव, जि. जळगाव 
ढगाळ हवामान, किमान व कमाल तापमान 12 ते 35 अंश सेल्सिअस, 70 ते 95 टक्के सापेक्ष आर्द्रता व पावसाचे प्रमाण जास्त लोकरी मावा किडीस अनुकूल असते. जास्त काळ कोरडे हवामान किडीच्या वाढीसाठी प्रतिकूल ठरते. ही कीड उसाच्या पानांच्या खालील बाजूस मध्य शिरेलगत पांढऱ्या लोकरीसारखे मेणतंतूधारी पंखी व बिनपंखी मावा पिल्लांसह आढळतात. मुखांग सुईसारखे असतात. पंख असलेल्या माव्याची मादी काळसर तांबूस व पिल्ले फिकट हिरवट दिसतात, तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट व पिल्ले फिकट पिवळी असतात. एक आठवड्यानंतर पांढऱ्या लोकरीसारखे मेणतंतू येऊन शरीर पांढरे दिसते. म्हणून त्यास “पांढरा लोकरी मावा’ असे म्हणतात. उसाचे पूर्ण पान पांढरे झाल्याचे दिसून येते. या किडीचा प्रादुर्भाव बांधाकडेने दिसून येतो, नंतर तो ऊस क्षेत्रात वाढत जातो. 

नियंत्रणाचे मशागतीय उपाय ः 
1) ऊस लावण पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने करावी. 2) मोठ्या बांधणीनंतर उसाची वाढ चांगली झाल्यावर भांगे पाडून किंवा ऊस सरीत रेलून घ्यावेत म्हणजे फवारणी अथवा धुरळणी व्यवस्थित करता येते. 3) प्रादुर्भाव कमी असल्यास प्रादुर्भित पाने काढून नष्ट करावीत. 4) तणनियंत्रण करून शेत व बांध स्वच्छ ठेवावेत. 5) मावाग्रस्त पानांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करू नये. 6) कीडग्रस्त बेणेमळ्यातील बियाणे वापरू नये. तसे वापरावयाचे असल्यास मॅलॅथिऑनची (तीन मि.लि. प्रति लिटर पाणी) बेणेप्रक्रिया करावी. 7) मावाबाधित क्षेत्रातील उसाची वाळलेली पाने काढून एकत्रित गोळा करून नष्ट करावीत. 8) नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा. भरणीनंतर नत्रयुक्त खते वापरू नयेत व ऊस लोळू देऊ नये. 9) गरजेइतकेच पाणी लांब सरी पद्धतीने द्यावे. 10) मका, चवळी यांसारखी पिके उसाच्या भोवताली घ्यावीत. 

जैविक उपाय ः 
1) क्रायसोपर्ला कारनी या परभक्षक कीटकाची अंडी अथवा अळ्या प्रति एकरी 1000 या प्रमाणात सोडाव्यात. 2) डिफा ऍफिडिव्होरा आणि मायक्रोमस इगोरोट्‌स या परभक्षक मित्रकीटकांच्या अळ्या कोषावस्थेसह पानांचे पाच ते सहा सें.मी. तुकडे कीडग्रस्त पानांवर जोडावेत. 3) व्हर्टिसिलियम लेकानी बुरशी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
रासायनिक उपाय ः 1) लावणीपूर्वी बेणेप्रक्रिया करावी. 2) प्रादुर्भावानुसार मॅलॅथिऑन दोन मि.लि. + ऑक्‍सिडिमेटॉन मिथाईल दोन मि.लि. किंवा डायमेथोएट दोन मि.लि. + एक मि.लि. स्टिकर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा दाणेदार फोरेट (दहा टक्के) सहा महिन्यांपेक्षा लहान पिकात एकरी सहा किलो आणि सहा ते नऊ महिन्यांपर्यंतच्या पिकात एकरी आठ किलो जमिनीत मुळांच्या सान्निध्यात वाफसा असताना द्यावे. दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे म्हणजे पिकाकडून कीटकनाशकाचे शोषण लवकर होते. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला द्यावा. 

संपर्क ः 0231 - 2651445 
प्रा. डी. एम. वीर, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर
 

Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111005/4680155234481353656.htm

कृषी सल्ला


लसूण 
1) लसणाची लागवड ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सपाट वाफ्यात 10 x 7.5 x 3 सें.मी. अंतरावर करावी. 

2) श्‍वेता, गोदावरी, जामनगर, फुले बसवंत या जाती वापराव्यात. लागवडीपूर्वी शेतात हेक्‍टरी नत्र 50 किलो, स्फुरद 50 किलो व पालाश 50 किलो द्यावे. पूर्वमशागतीचेवेळी हेक्‍टरी 25 टन शेणखत मिसळावे. 

3) लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्यांवर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी दहा किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.

माणकापूरचे तेरदाळे ठरलेत ऊस उत्पादनातील "शतक'वीर


"एकरी शंभर टन ऊस उत्पादन घ्या' हा नारा अलीकडे अनेक वेळा दिला जातो. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर इचलकरंजीपासून (जि. कोल्हापूर) केवळ तीन किलोमीटर अंतरावर माणकापूर गाव आहे. 

तेथील मलकारी तेरदाळे यांनी मात्र हा "नारा' आपल्या शेतीत एकदा नव्हे तर सातत्याने अमलात आणला आहे. शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्यातर्फे आयोजित 2010-11 हंगामातील ऊसपीक स्पर्धेत त्यांनी एकरी 117.795 मेट्रिक टन उत्पादन काढून पहिला क्रमांक मिळविला आहे.

पाणी, खत, बेणे यांच्या वापरात बचत व त्यांचा काटेकोर वापर करणे सध्याच्या ऊसशेतीत गरजेचे झाले आहे. अनेक शेतकरी आपले नियोजन त्याप्रमाणे करताना दिसत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर इचलकरंजीपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर माणकापूर (ता. चिक्कोडी) हे गाव आहे. सरकारी कामकाज बेळगावला होत असले तरी या गावचा दररोजचा संपर्क महाराष्ट्रातील शहरांशीच येतो. याच गावातील मलकारी नेमू तेरदाळे या शेतकऱ्याने गेल्या काही वर्षांपासून उसाचे एकरी उत्पादन सातत्याने शंभर टनांपर्यंत तर काही वेळा त्याहून जास्त घेण्याचा सपाटा लावला आहे. शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या 2010-11 या हंगामातील ऊसपीक स्पर्धेत त्यांनी एकरी 117.795 मेट्रिक टन उत्पादन काढून पहिला क्रमांक मिळविला. खोडव्याची तोडणी झाल्यानंतर सातत्याने रान वाळविण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. यामुळेच उत्पादनात सातत्य तर राहतेच, पण जमिनीचा पोत कायम राहत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. 

लावणीपूर्वीचे व्यवस्थापन 
तेरदाळे यांची चोवीस एकर जमीन आहे. त्यात ते सातत्याने ऊस घेतात. प्रत्येक वर्षी या पिकाचे त्यांचे नियोजन वेळापत्रक ठरलेले असते. ऊस स्पर्धेत भाग घेण्यापूर्वीही फुले 265 जातीचा ऊस त्यांनी घेतला होता. याचे उत्पादन शंभर टनांवर निघाले. तेरदाळे यांचे लागवडीचे नियोजन थोडक्‍यात व प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचे तर हरभऱ्याचा बेवड चांगला असल्याने या पिकानंतर ऊस घेण्याचे नियोजन केले. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने हरभऱ्याचे उत्पादन कमी आले. एकरी चार पोती हरभरा निघाला. हरभऱ्याच्या काढणीनंतर उभी- आडवी नांगरट केली. यानंतर एक महिना कालावधीपर्यंत रान वाळविले. यानंतर पुन्हा नांगरट केली. त्यानंतर दक्षिणोत्तर सऱ्या सोडल्या. त्याही महिनाभर वाळविल्या. लागवडीपूर्वी माती परीक्षण केले होते. त्याच्या अहवालानुसार जमिनीस एकरी चार पोती सेंद्रिय खताचा डोस दिला. 

लावणीनंतरचे व्यवस्थापन 
मागील वर्षी 27 जुलैला को- 86032 या जातीची सरी पद्धतीने आडसाली लावण केली. दोन डोळ्यांचे एकरी साडेसहा हजार टिपरी इतके बेणे वापरले. साडेतीन फुटाची सरी सोडून चांगल्या वाफशावर लागवड केली. या वेळी हलके पाणी दिले. उगवण झाल्यानंतर भरणीपूर्वी तीन भांगलणी केल्या. पहिली भांगलण लावणीनंतर एक महिन्यांनी केली. त्यानंतर पंधरा दिवसांत युरियाची दोन पोती, निंबोळी पेंड एक पोती मिसळून ते देण्यात आले. भरणीनंतर दोन भांगलणी झाल्या. सर्व भांगलणी मजुरांमार्फतच केल्या. तणनाशकाचा कोठेही उपयोग केला नाही. भरणीपूर्वी तीन व भरणीनंतर दोन अशा प्रकारे पाच वेळा टॉनिक दिले. एकरी पन्नास हजार ऊस संख्या कशी राहील याकडे विशेष करून लक्ष दिले. निरोगी नसलेले फुटवे काढले. चांगल्या बियाणे प्लॉटमधून बेण्याची निवड केल्याने उगवण चांगली म्हणजे सरासरी 90 ते 95 टक्‍क्‍यापर्यंत झाली. भरणीच्या वेळी युरिया तीन पोती, पोटॅश तीन पोती, गंधक दहा किलो, विविध सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत दहा किलो आदींचा वापर केला. लोकरी मावा येऊ नये यासाठी कीटकनाशकाची एक फवारणी करण्यात आली. 
पाणी नियोजन सरी पद्धतीनेच पाणी दिले. लावणीपासून तोडणीपर्यंत 51 वेळा पाणी दिले. पाणी देताना पाणी अतिरिक्त अथवा कमी होणार नाही याची खबरदारी घेतली. मरके फुटवे काढण्यासाठी उगवणीपासून भरणीपर्यंत "अर्धी' सरीच पाणी दिले. भरणीनंतर पाण्याच्या प्रमाणात थोडी वाढ केली. पावसाळा व हिवाळ्याच्या कालावधीत वेळेत तीन आठवडे ते एक महिन्यानंतर पाणी दिले. तर उन्हाळ्यात पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी दिले. पाणी देताना नेहमीच काटेकोरपणा ठेवण्याचा प्रयत्न केला. तोडणी होईपर्यंत काटकसरीने व वाफसा स्थिती राहील अशा बेतानेच पाणी दिले. 


जमा खर्च (एकरी) 
तपशील खर्च (रुपयांत व एकरी) 

ट्रॅक्‍टर भाडे - 3000 
ऊस बियाणे- 3600 
खत- 10,000 
मजुरी खर्च- 4000 (मशागत) 
मजुरी खर्च 2500 (पाणी देण्यासाठी) 
बैलजोडी- 2000 
रसायने- 4000 
.............................................. 
एकूण खर्च- 29 100 

मिळालेले उत्पादन- 117.795 मेट्रिक टन 

मिळालेला भाव- 2300 रुपये प्रति मेट्रिक टन 

एकूण रक्कम- दोन लाख 70 हजार 928 रुपये 

खर्च वजा जाता मिळालेला निव्वळ नफा - दोन लाख 41 हजार 828 रुपये 

शतकवीर "तेरदाळे' 
तेरदाळे यांनी यापूर्वीही सातत्याने एकरी शंभर टनांच्या वर ऊस उत्पादन घेतले आहे. त्यांचे सरासरी उत्पादन 70 टन इतके आहे. गेल्या दहा वर्षांत सत्तर टनांपेक्षा कमी ऊस त्यांनी काढलेला नाही. त्यांनी उच्चांकी ऊस उत्पादनाची विविध पारितोषिकेही पटकाविली आहेत. तेरदाळे सध्या तरी फुले 265 व को 86032 या वाणाचा वापर करतात. यापूर्वीही त्यांनी अनेक वाण वापरले, मात्र हे दोन वाण अधिक फायदेशीर वाटल्याचे त्यांनी सांगितले. शिरोळच्या दत्त साखर कारखान्याच्या वतीने एकरी दीडशे टन ऊस उत्पादन हा महत्त्वाकांक्षी प्रयोग सुरू करण्यात आला आहे. त्यात तेरदाळे यांनी भाग घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष सा. रे. पाटील यांच्या सान्निध्यात राहिल्याने अनेक लहान-सहान गोष्टींचा अभ्यास करता आला. कारखान्याच्या वतीने प्रत्येक वर्षी उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. तेरदाळे स्वत: या कारखान्याचे संचालक असल्याने या सत्काराच्या वेळी ते उपस्थित असायचे. दुसऱ्याला हे पारितोषिक मिळते तर आपल्याला का मिळू नये, असा विचार येऊन त्यांनी आपली शेती या कारखान्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून सुधारली. या चांगल्या शेतीत आजपर्यंत सातत्य ठेवले आहे. 

रान वाळविण्यामुळे उत्पादनात वाढ 
उच्चांकी उत्पादनाबाबत बोलताना तेरदाळे यांनी सांगितले, की साखर कारखान्याने दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी उसाचे व्यवस्थापन केले; परंतु माझ्या शेतीच्या यशात अनेक गोष्टींपैकी शेताला देत असलेली विश्रांती ही गोष्टही महत्त्वाची ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उसाची लागवड करण्याआधी सुमारे दोन महिन्यांपर्यंत शेतजमिनी पूर्ण उन्हात वाळवितो. जमिनीचा पोत तयार होण्यासाठी जमिनीला मिळालेली विश्रांती महत्त्वाची ठरते. सूर्यप्रकाशामुळे जमिनीची प्रत सुधारून ती अधिक उत्पादनशील बनते असा माझा अनुभव आहे. साधारणत: 1994 पासून मी सातत्याने जमीन तापविण्यावर भर दिला आहे. तसेच ताग, धैंचा या हिरवळीच्या पिकांसोबत हरभऱ्याचे पीक घेतो. ही पिके काढल्यानंतर रान वाळवितो. इतर मशागतींबरोबरच रान वाळविणे म्हणजेच उत्पादन वाढविणे हे यशाचे सूत्र मी अंगीकारले आहे. खते देताना ती विस्कटून न टाकता खते टाकल्यानंतर ती झाकून घेतो. यामुळे पाण्याबरोबर खते वाहून जात नाहीत, तसेच पाणी देताना रानातले पाणी बाहेर पडू नये यावर विशेष लक्ष असते. सरीतून पाणी कडेला जाण्याअगोदर काही वेळ सरीचे पाणी बंद केले जाते. यामुळे सरीत पाणी अतिरिक्त होत नाही. जमिनीला हवे तेवढे पाणी मिळते. अशा लहान लहान गोष्टींकडे लक्ष दिल्यानेच माझ्या उत्पादनातील सातत्य टिकून आहे. 

शेतकरी संपर्क 
मलकारी नेमू तेरदाळे, 0230-2600225 
मु.पो. माणकापूर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव (कर्नाटक)

Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111102/5603978952944701953.htm

आल्यापासून सुंठनिर्मिती कशी करतात,

आल्यापासून सुंठनिर्मिती कशी करतात, याबाबत मार्गदर्शन करावे. 
विजय तांबे, मु. पो. कुंभारी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद 

भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत आणि उन्हात चांगले वाळवावेत. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. सुंठ तयार करावयास वापरावयाच्या आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, माहीम यांसारख्या कमी तंतुमय असणाऱ्या जातींचा वापर करावा. यापासून उत्तम प्रतीची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो. 

सुंठ तयार करण्याच्या पद्धती ः 
1) मलबार पद्धती ः या पद्धतीत आले स्वच्छ निवडून आठ-दहा तास पाण्यात भिजत ठेवतात. त्यानंतर त्याची साल काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा-सात तास भिजत ठेवतात. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्याशा व बंद खोलीत पसरून ठेवतात. बंद खोलीत आल्याच्या कंदाला 12 तास गंधकाची धुरी देतात. थोडक्‍यात, बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत 12 तास गंधकाची धुरी देतात. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते, त्यामुळे आल्याच्या कंदांस पांढराशुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते. 

2) सोडा व खास मिश्रण पद्धती ः या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर दीड x दोन फूट आकाराच्या हाताने उचलेल इतक्‍या क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्‍साईड (कॉस्टिक सोडा)ची 20 टक्के, 25 टक्के आणि 50 टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला पिंजरा 20 टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, 

25 टक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि 50 टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे. 

संपर्क ः प्रा. हेमंत शिंदे, 9822615174 
भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111222/5544896947195005017.htm

नारळ लागवड आणि जातींची माहिती द्यावी.

नारळ लागवडीसाठी एक वर्षे वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्षे वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावी. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. उंच वाढणाऱ्या नारळाच्या झाडाच्या पानाची लांबी 4.5 ते 5.5 मीटर असते. वजना मुळे पानाला धनुष्यासारख्या आकार येतो, त्यामुळे पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 3.25 ते 3.5 मीटर असते. म्हणून दोन माडा ंत 7.5 मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत. माडापासून योग्य प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 7.5 मीटर अंतर असणे गरजेचे आहे. परंतु पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास 6.75 किंवा सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते. 
जातींची माहिती 

उंच जाती 
1) वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) - भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील उ ंच जातीला वेस्ट कोस्ट टॉल म्हणतात. या जातीलाच कोकणात बाणवली या नावाने संबोधले जाते. या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी 80 ते 100 फळे मिळतात. 
2) लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) - ही लक्षद्वीप बेटावरील नारळाची जात आहे. या जातीची झाडे आणि फळे बाणवलीसारखीच असतात, परंतु फळाच्या तीनही कडा उठावदार असतात, पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी 150 फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी 140 ते 180 ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण 72 टक्के असते. 
3) प्रताप - कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी येथे ही जात बाणवली वाणातून निवड पद्धतीने विकसित करून महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आली आहे. नारळाचा आकार मध्यम, गोल असून ती सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात. 
4) फिलिपिन्स ऑर्डिनरी - ही उंच प्रकारातील जात असून याची लागवड मोठ्या प्रमाणात फिलिपिन्स येथे केली जाते. या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी 213 ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन 94 ते 159 असून सरासरी 105 नारळ आहे. 
ब) ठेंगू जाती 
या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. ही जात सिंगापुरी या नावानेही ओळखली जाते, परंतु नारळामध्ये सिंगापुरी अशी जात नाही. ठेंगू जातीचे आयुष्यमान 30 ते 35 वर्षे असते. रंगावरून ऑरेंज डाफर्‌ , ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. त्यातील ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम असून तिच्या 100 मि.लि. पाण्यात सात ग्रॅम एवढे साखरेचे प्रमाण असते. 

क) संकरित जाती 
1) टी ु डी (केरासंकरा) - ही जात "वेस्ट कोस्ट टॉल' किंवा बाणवली आणि चौघाट ऑरेंज डार्फ यांच्या संकरातून तयार केली आहे. या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून 100 ते 160 नारळ फळे, तर सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते. 
2) टी ु डी (चंद्रसंकरा) - या संकरित जातीची फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रति वर्षी 55 ते 158 फळे असते, तर सरासरी उत्पादन 116 फळे आहे. 
: 02352- 235331
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी



Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120102/5439768611959656204.htm

माती परीक्षण कसे करावे?

फळबाग लागवडीपूर्वी माती परीक्षणासाठी जमिनीचा रंग, खडकाळपणा, उंच-सखलपणा याप्रमाणे सारख्या गुणधर्मासाठी एक ते दोन हेक्‍टर क्षेत्राचे भाग पाडून त्याच्या मध्यभागी जास्तीत जास्त तीन फूट अथवा कठीण मुरूम अथवा खडकापर्यंत खड्डा घ्यावा. प्रत्येक एक फूट खोलीसाठी वेगळा नमुना घ्यावा. यासाठी एक फूट खड्डा पूर्ण झाल्यावर खड्ड्याच्या चार बाजूंची माती पाडून खड्ड्यामध्ये टाकावी. गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी. त्यातील अर्धा ते पाऊण किलो माती तपासणीसाठी घ्यावी. 

दुसऱ्या थरातील खोलीसाठी वरील एक फूट सोडून त्यापासून खाली एक फूट खोलीपर्यंत चार बाजूंनी माती खड्ड्यात पाडावी व चांगली एकत्र करून त्यातील अर्धा ते पाऊण किलो तपासणीसाठी घ्यावी. तिसऱ्या थरासाठी खड्ड्याच्या तळापर्यंत तीन फूट खोलीपर्यंत अथवा मुरूम लागला असेल त्या खोलीपर्यंतच्या थरातील माती चारी बाजूंनी खड्ड्यात पाडावी. त्यातील अर्धा किलो नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावा. अशा प्रकारे नमुना तपासणीसाठी घ्यावा. 

- 02426 - 243861 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120102/4922841066775574117.htm

जनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे?

चारा पिकांचे सुधारित वाण 
पज्वारी - फुले, अमृता, रुचिरा, मालदांडी, एस.एस.जी. 59-3. 
पबाजरी - जायंट, बाजरा, राजको बाजरा. 
पमका - आफ्रिकन टॉल, मांजरी कम्पोझिट, विजय, गंगा सफेद 2. 
पओट - केन्ट, आर.ओ. 19 (फुले हरिता). 
पचवळी - श्‍वेता, ईसी 4216, बंदेल लोंबिया, यूपीसी 5286. 
पलसूणघास - आर.एल. 88, आनंद 2, आनंद 3, सिरसा 9. 
पबरसीम - वरदान, मेस्कावी, जेबी 1. 
पसंकरित नेपिअर - फुले जयवंत. 
पस्टॉयलो - हॅमटा, आर.एस. 95 
पमारवेल : मारवेल 7, मारवेल 8, मारवेल 40 


कृषी महाविद्यालय पुणे येथील तज्ज्ञ सोमनाथ माने यांनी दिलेली माहिती : जनावरांना चारा देताना एकदल चाऱ्याबरोबर द्विदल चारा पिका ंचा समावेश करणे फार गरजेचे आहे. वर्षभर हिरवा चारा मिळ विण्यासाठी हंगामानुसार पेरणी करणे गरजेचे आहे; परंतु खरीप हंगामात जास्त चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. खरीप हंगामात मका, ज्वारी, बाजरी, चवळी, स्टॉयलो, संकरित नेपिअर, मारवेल इत्यादी चारा पिकांची लागवड करावी. रब्बी हंगामात बरसीम, लसूणघास, मका व ओटची लागवड करावी. उन्हाळ्यात मका, ज्वारी, चवळी इत्यादींची लागवड करावी. एका पूर्ण वाढ झालेल्या गाईला 25 किलो एकदल व द्विदल चाऱ्याची व पाच किलो सुक्‍या चाऱ्याची गरज असते. हे लक्षात घेता दुभत्या गाईसाठी दहा गुंठे जमीन आवश्‍यक असते. शेतकऱ्याकडे पाच ते सहा दुभत्या गाई असतात, त्यानुसार 60 गुंठे क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. एका गाईसाठी वार्षिक चारा पिकाचे नियोजन करायचे असल्यास हिरवा चारा नऊ ते दहा टन व सुका चारा दोन ते अडीच टन आवश्‍यक आहे. त्यानुसार सहा गाईंसाठी 60 गुंठे जमीन आवश्‍यक आहे. त्यातून अंदाजे 55 ते 60 टन हिरवा चारा व 20 ते 25 टन सुका चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकेल. 

कोरड्या चाऱ्यासाठी ज्वारीचा वापर करावा किंवा मारवेल, संकरित ने पिअरसुद्धा योग्य प्रमाणात वाळवून घेऊ शकता. एकदल व द्विदल चारा कुट्टी करून एकत्र करून घ्यावी. संकरित नेपिअर बांधाच्या कडेने लागवड करून जास्त जमीन उपयोगात आणता येते. कोणताही चारा 50 टक्के फुलोऱ्यात असताना कापणी केल्यास जास्त अन्नघटक


चिकू कलमांचे व्यवस्थापन कसे करावे?

- चिकू लागवड केल्यानंतर सुरवातीच्या दोन वर्षांत कलमांच्या खुंटावरील वारंवार येणारी फूट काढून टाकावी. लागवडीपासून पहिली तीन वर्षे कलमावरील फुले खुडून टाकावीत. कलमांच्या पूर्ण वाढीचा काळ आठ ते दहा वर्षांचा असतो. पहिल्या सहा वर्षांत चिकू लागवडीमध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला, फुलझाडे, कडधान्यांची लागवड करावी. 

पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास माती परीक्षणानुसार एक घमेले शेणखत, 300 ग्रॅम युरिया, 900 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 300 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दोन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. पहिला हप्ता ऑगस्टमध्ये आणि दुसरा हप्ता जानेवारीमध्ये द्यावा. दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षाच्या मात्रेच्या दुप्पट, तिसऱ्या वर्षी तिप्पट याप्रमाणे खताचे प्रमाण 20 वर्षांपर्यंत वाढवत जावे. त्यानंतर दरवर्षी 20 घमेली शेणखत, सहा किलो युरिया, 18 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि सहा किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खते चरातून बांगडी पद्धतीने प्रति झाडास द्यावीत. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. 
संपर्क ः 02358 - 282415, विस्तार क्र ः 218 
उद्यानविद्या विभाग, 
कृषी महाविद्यालय, दापोली 


Ref.:http://www.agrowon.com/Agrowon/20120111/4734746624666896681.htm

नारळामध्ये मसाला पिकांची लागवड कशी करावी?

कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाने कार्यक्षम वापर करून नारळ - मसाला मिश्र पिकांची लागवड करता येते. नारळाची लागवड 7.5 ु 7.5 मीटर अंतरावर करावी. या चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरी वेल लावावेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार नारळ, तसेच मिश्र पीक म्हणून मसाला पिकांची लागवड करावी. नारळ, जायफळ यांच्या लागवडीसाठी 1 ु 1 ु 1 मीटर आकाराचे, तर दालचिनी आणि काळी मिरी लागवडीसाठी 0.60 ु 0.60 ु 0.60 मीटर व 0.30 ु 0.30 ु 0.30 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यांच्या तळाशी वाळवी व हुमणी प्रतिबंधक कीटकनाशके वापरावीत. खड्ड्याच्या तळाशी कुजलेला पालापाचोळा किंवा गिरिपुष्पाचा पाला, दोन ते तीन घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि शिफारशीनुसार सिंगल सुपर फॉस्फेट आणि चांगली माती यांच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. खड्डा भरताना माती जमिनीच्या पृष्ठभागाच्या थोडी वर ठेवावी, जेणेकरून पाणी झाडाच्या बुंध्याशी साठणार नाही. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांवर किंवा मध्यभागी खुणेसाठी खुंट ठेवावे.

नारळ व मसाल्याची पिके एकाच वेळी लावता येणार नाहीत. पहिल्या वर्षी विद्यापीठाने शिफारस केलेल्या प्रताप, टी ु डी यांसारख्या नारळ जातींच्या जोमदार रोपांची निवड करून जून किंवा जुलैमध्ये लागवड करावी. त्याचबरोबर दालचिनीची लागवडही करावी. कोकणात सूर्यप्रकाशाचा दालचिनीच्या झाडांवर तितकासा विपरीत परिणाम होत नाही, त्यामुळे पहिल्या वर्षी फक्त नारळ आणि दालचिनी या दोनच पिकांची लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. अर्थात, प्रखर उन्हाच्या प्रदेशात पहिली दोन वर्षे दालचिनीला सावली करावी.
पाचव्या वर्षी जायफळ लागवड करावी. जायफळाला पहिली तीन वर्षे सावली करावी. त्याचप्रमाणे ऑक्‍टोबर व पहिल्या उन्हाळ्यात नारळाच्या झाडांसही सावली करावी. बागेमध्ये सुरवातीच्या काळात केळी किंवा पपईची मिश्र पीक म्हणून लागवड केल्यास मसाला पिकांना सावली तर मिळतेच; शिवाय केळी, पपईच्या उत्पादनामधून बागेच्या व्यवस्थापनावर होणारा खर्चही काही प्रमाणात भागविता येतो. मिश्र पीक म्हणून सुरवातीच्या काळात अननसाचीही लागवड करणे शक्‍य आहे. 
सातव्या वर्षी नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ मिरीच्या वेलांची लागवड करावी. तिसऱ्या वर्षाच्या सुरवातीला प्रथमतः दालचिनीच्या झाडांपासून उत्पन्न मिळण्यास सुरवात होईल. जायफळाचे झाड जरी तिसऱ्या वर्षी फुलोऱ्यावर येत असले, तरी उत्पादन हे अतिशय मर्यादित असते. अति उत्कृष्ट व्यवस्थापन असणाऱ्या बागेमध्ये तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न अपेक्षित आहे. तथापि, सर्वसाधारणतः पाचव्या वर्षापासून नारळ (टी ु डी) आणि दालचिनी यांचे उत्पन्न मिळू शकते. जायफळाची लागवड पाचव्या वर्षी असल्याने जायफळाचे उत्पन्न आठव्या वर्षापासून मिळू लागते, तसेच मिरीचे वेल सातव्या वर्षी लावल्यामुळे त्याच्या वेलीचा विस्तार झाल्यावर किफायतशीर उत्पादन मात्र लागवडीपासून तिसऱ्या वर्षी मिळते. बागेतील सर्व झाडे ही निरोगी आणि उत्पादनक्षम राहण्यासाठी योग्य खतांच्या मात्रा, पाणीपुरवठा, तसेच पीक संरक्षण या तीन मूलभूत बाबी आहेत. 

ः 02358 - 280238
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20110923/4734093617058429728.htm

कमी पाण्याच्या पट्ट्यात कष्टाने फुलवली ऊस-द्राक्ष शेती

अवर्षणग्रस्त विटा भागातील संग्राम जाधव यांची किफायतशीर शेती 
ठिबक सिंचन, पीक फेरपालट, हिरवळीची खते यांवर दिला भर 

नियोजनबद्ध शेती हीच बाब अलीकडच्या काळात शेती फायदेशीर करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत सूत्रबद्ध नियोजन केले तर फायदेशीर शेतीत तिचे रूपांतर करता येते. सांगली जिल्ह्यातील वाझर (ता. खानापूर) येथील संग्राम खानाजीराव जाधव यांनी दाखवून दिले आहे. सुमारे पस्तीस एकर शेतीतून सातत्याने नफा कमविला आहे. ऊस, द्राक्षांसह फळबागांची शेती त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून फुलविली आहे. पिकांची फेरपालट व ठिबक सिंचनाचा वापर हे त्यांच्या उत्पादनवाढीचे सूत्र आहे. विशेष करून ऊस पीक घेताना त्यांनी ही पद्धत वापरली व उत्पादन वाढविले. पिके घेताना त्यांनी जमीन सुधारण्यासाठी घेतलेली पिके व त्यात राखलेले सातत्य वाखाणण्याजोगे ठरले आहे. 
राजकुमार चौगुले 

वाझर. सांगली जिल्ह्यात विट्यापासून सतरा किलोमीटर अंतरावर असणारे खानापूर तालुक्‍यातील केवळ चौदाशे लोकसंख्येचे गाव. येरळा नदीवर असणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व आरफळ योजनेमुळे या गावात काही प्रमाणात समृद्धी आली आहे. विटा हा तसा अवर्षणाचा पट्टा. त्यामुळे हे गावही त्याच पट्ट्यातले. मात्र काही प्रमाणात पाणी आल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतीत काहीतरी बदल करण्यासाठी वाव मिळाला आहे. वाझर गावातले संग्राम जाधव यांचे नाव या भागात त्याबाबतीत आदराने घेतले जाते. दिवसभर शेतीत रमून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे त्यांचा नेहमीच ओढा राहिला आहे. अर्थशास्त्र व इतिहास विषयांतून त्यांनी पदवी घेतली आहे. पण वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच शेतीत काम करण्यास सुरवात केल्यामुळे आपले शिक्षण पूर्ण होताच त्यांनी पुन्हा आपले लक्ष शेतीकडे वळवले. 

संग्राम यांचे वडील खानाजीराव (वय 80) हे येरळा विकास संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या संस्थेमुळे या भागात शेती फुलली. सन 1976 मध्ये तत्कालीन मंत्री एन. डी. पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा 2000 मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर या भागात पाणी आले. येरळा नदीच्या पाण्यावर संग्राम यांनी द्राक्षाबरोबरच ढोबळी मिरची, टोमॅटोचे पीक काही वर्षे घेतले. पण योग्य भावाचे गणित न जमल्याने त्यांनी भाजीपाल्याची शेती सोडून दिली. सन 2003 ला या भागात मोठा दुष्काळ पडला. इतर पिकांबरोबर द्राक्ष बाग वाचविणेही कठीण झाले. पाणी नसल्याने मोठ्या प्रमाणात शेती असूनही संग्राम यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. पाण्याचे महत्त्व काय असते हे संग्राम यांना या काळात पुरेपूर उमगत होते. यामुळेच त्यांनी कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त शेती करण्याचा निर्णय घेतला. याबाबत प्रयत्न सुरू केले. संग्राम यांच्याकडे ऊस क्षेत्र होते; परंतु पाणी नसल्याने उत्पादनवाढीला मर्यादा होती. कमीत कमी पाणी वापर करण्याच्या त्यांच्या इच्छेला ठिबक सिंचनाच्या रूपाने मूर्त स्वरूप मिळाले. दुष्काळात पोळलेल्या संग्राम यांनी 2006 ला उसासाठी ठिबक करण्याचा प्रयोग राबविला. या क्षेत्रातील एका कंपनीच्या साह्याने त्यांनी पहिल्यांदाच साडेतीन एकरांवर ठिबकचा प्रयोग केला आणि येथूनच पाणी व्यवस्थापन साधत त्यांनी उत्पादन वाढीकडे वाटचाल सुरू केली. 

....अशी आहे संग्राम यांची शेती 
संग्राम यांच्याकडे वडिलोपार्जित एकत्रित अशी पंचेचाळीस एकर शेती आहे. त्यापैकी पस्तीस एकर क्षेत्रावर विविध पिके आहेत. दहा एकर क्षेत्रावर ऊस, साडेसहा एकरावर द्राक्षे, पाच एकरावर -----------डाळिंब, दोन एकरावर डाळिंब, तर चिकू, पेरूची बाग एक एकरावर आहे. विविध पिके असूनही त्यांचे नियोजन सूत्रबद्ध पद्धतीने केले जाते. एकात्मिक शेती असली तरी मुख्य पिके म्हणून ऊस व द्राक्षे हीच आहेत. या सर्व पिकांना ठिबक सिंचनाने पाणी दिले गेले आहे. मिश्र पद्धतीची अर्थात माळ, चुनखडी, थोडी काळी अशा पद्धतीची जमीन आहे. शेतीच्या मध्यभागी असणाऱ्या दोन विहिरींत शेतीतील इतर कूपनलिकांचे पाणी एकत्रित केले जाते. तेथून ठिबकने सर्व शेतात पाणीपुरवठा केला जातो. 

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी फेरपालटीत सातत्य 
वीस एकर क्षेत्रात आलटून पालटून ऊस शेती केली जाते. दहा- दहा एकर अशा दोन क्षेत्रांत ऊस पीक घेतले जाते. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या नियमात खंड पडला नाही. दहा एकर क्षेत्रातील खोडवा गेल्यानंतर पाला कुट्टी करून रोटर फिरवला जातो. नांगरट करून रान रिकामे केले जाते. वीस मेच्या दरम्यान सोयाबीनची टोकण केली जाते. सोयाबीन काढणीनंतर रब्बी हंगामात हरभऱ्याचे पीक घेतले जाते. हरभरा करण्यापूर्वी नांगरट करून रोटर फिरवला जातो. अडीच फुटांची सरी करून हरभरा वापरला जातो. सरी फोडल्यानंतर हरभरा बुंध्यात येतो. बुंधा पूर्ण भिजेल या पद्धतीने हळूवार पाणी दिले जाते. हरभऱ्याची उगवण, फुलकळी येण्याअगोदर, फुलकळी आल्यानंतर, पाणी दिले जाते. हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर ताग विस्कटला जातो. तागाला तीन वेळा पाणी दिले जाते. फुलोऱ्यात आल्यानंतर ताग जमिनीत गाडला जातो. यानंतर नांगरट करून रान वाळविण्यासाठी सोडून दिले जाते. जमिनीची सुपीकता टिकविणे हा महत्त्वाचा उद्देश यामागे असतो. शक्‍यतो करून ऑगस्टमध्ये आडसाली लावणीला प्राधान्य दिले जाते. 

उसासाठी रान तयार करताना होणारा दुहेरी फायदा 
खोडवा गेल्यानंतर जमिनीची सुपीकता व बेवड मिळविण्याच्या उद्देशानेच इतर पिके वर्षभरात घेतली जातात. शेणखत व इतर तत्सम खते महाग असल्याने खतांचा खर्च परवडत नाही. यामुळे पिकांची फेरपालट करून, शेताला ताकद देणारी पिके घेऊन जमीन सुपीक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वर्षभराच्या या प्रयत्नातून सोयाबीनचे एकरी दहा ते बारा क्विंटल, हरभऱ्याचे सरासरी सात क्विंटल इतके उत्पादन घेतले जाते. प्रत्येक वेळी ऊस पीक घेऊन महागडी खते घालण्यापेक्षा एक वर्ष दुसरी पिके घेऊन जमिनीचा पोत सुधारल्यास उसासाठी ते निश्‍चितपणे फायदेशीर ठरत असल्याचा आपला अनुभव असल्याचे संग्राम म्हणतात. 

ऊस लावण करताना ती पाच फुटी सरी सोडून केली जाते. को 86032 या जातीच्या लागवडीला अधिक प्राधान्य दिले जाते. रान तयार केल्यानंतर सहा पोती सुपर फॉस्फेट, दोनशे किलो निंबोळी पेंड, युरिया एक पोते, डी.ए.पी. दोन पोती, गांडूळ खत एकरी दहा पोती अशी मात्रा दिली जाते. दात्री मारून ठिबकच्या साह्याने पूर्ण आठ तास पाणी देऊन रान भिजविले जाते. पूर्ण ओल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन डोळ्यांच्या टिपरीची बेणेप्रकिया करून लावण केली जाते. दोन टिपऱ्यांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवले जाते. आडसाली लावणीसाठी दोन फुटांचे अंतर ठेवले जाते. 

पाणी देताना दक्षता 
ठिबकने पाणी देतानाही दक्षता पाळण्याची गरज असल्याचे संग्राम सांगतात. गरजेनुसार पीक गुणांक पाहून पाणी गरजेचे असते. लावणीवेळी बाष्पीभवन व पीक गुणांकानुसार एकरी सहा ते सात हजार लिटर पाणी लागते. एक दिवसाआड पाण्याचे नियोजन केले जाते. आठ दिवसांनंतर पाण्याचे नियोजन बदलले जाते. मार्च ते मे या कालावधीत दररोज अडीच ते तीन तास, पाणी दिले जाते. 

ठिबकमधून खताचा जास्तीत जास्त वापर 
लावणीनंतर पंधरा दिवसांनी ठिबकमधून युरिया एकरी 250 ग्रॅम दिला जातो. एक महिन्यानंतर 12:61 खत वाढविले जाते. एकूण वर्षभरात 270 व्या दिवसापर्यंत युरिया 550 ते 600 किलो, एम.ओ.पी. 400 किलो, 0.0.50 हे खत 25 किलो इतके दिले जाते. जिवाणूखत देताना रासायनिक खताची मात्रा पूर्णपणे थांबविली जाते. 

झिंक सल्फेट पाच किलो, फेरस सल्फेट पाच किलो, मॅंगेनीज दोन किलो, बोरॉन एक किलो, मॅग्नेशिअम वीस किलो, गांडूळ खत 250 किलो इतकी खताची मात्रा देऊन बाळभरणी केली जाते. तिसऱ्या महिन्यात भरणीच्या वेळी पुन्हा असा डोस देऊन भरणी केली जाते. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या चार फवारण्या केल्या जातात. पहिल्या महिन्यात 19:19:19 दिले जाते. प्रत्येक फवारणीत काही बदल केले जातात. तिसऱ्या फेरीस 19:19:19 ऐवजी 0:52: 34 तर चौथ्या फवारणीत 0:52:34 ऐवजी 0: 0:50 वापरले जाते. 

50 टनांपासून 80 टनांपर्यंत उत्पादन वाढले 
गेल्या दहा वर्षांपासून ऊस पीक घेताना फेरपालटीत सातत्य ठेवल्याने व ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर केल्याने आता एकरी उत्पादन 40 ते 50 टनांपासून 80 टनापर्यंत पोचले आहे. हे उत्पादन प्रत्येक वर्षी याच पातळीवर राहील असा प्रयत्न केला जातो. अलीकडे शेतकरी जमिनीचा पोत वाढविण्याकडे कमी लक्ष देतात. याचा दूरगामी परिणाम उत्पादन घटण्यात दिसून येतो. पाणी मुबलक असूनही उत्पादन वाढत नाही. मात्र संग्राम यांनी विचारपूर्वक ऊस शेतीचे नियोजन केले आहे. 

संग्राम यांनी आपल्या ऊसशेतीत "सबसरफेस ठिबक' सिंचनाचा प्रयोग केला आहे. परिसरातील हा त्यांचा असा पहिलाच प्रयोग असावा. या प्रयोगामुळे उंदरांचा त्रास कमी झाला, ऊस तोडणीच्या वेळी सुलभता येते, पाइप वरच्या भागात नसल्याने ती तुटत नाही. चोकअप होण्याची शक्‍यता कमी असते. यामुळे पाण्यामध्ये अधिक प्रमाणात बचत होते असे त्यांचे म्हणणे आहे. सुमारे सहा एकर क्षेत्रावर सबसरफेस ठिबक यंत्रणा त्यांनी बसविली आहे. 

एक एकर ऊसाकरिता येणारा खर्च 
तपशील रुपये 
नांगरट- 1400 
रोटर-1000 
सरी- 600 
युरिया-1680 
अन्नद्रव्ये- 3000 
जिवाण ूखत- 330 
फवारणी-4200 
मजुरी- 3600 
भरणी- 2100 
व अन्य - 
................................ 
एकूण खर्च 20,000 -------(17,910)-------- 

उत्पादन 80 टन 
एकूण उत्पन्न- एक लाख 60 हजार (2000 रुपये प्रति टन याप्रमाणे) 
खर्च वजा जाता मिळणारी रक्कम- एक लाख 40 हजार 

द्राक्षपिकाकडेही लक्ष 
संग्राम यांची सहा एकर क्षेत्रावर द्राक्ष बागही आहे. तास-ए- गणेश जातीच्या द्राक्षांची लागवड त्यांनी केली आहे. सन 1973 पासून त्यांच्या वडिलांनी काही प्रमाणात द्राक्ष लागवड केली. आजही संग्राम यांनी ती परंपरा सुरू ठेवली आहे. द्राक्ष क्षेत्रालाही ठिबक सिंचनाची जोड दिली आहे. सन 2006 पर्यंत निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले जात होते. सन 2006 मध्ये झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागेचे अतोनात नुकसान झाले. द्राक्षांचा दर्जा ढासळला. कवडीमोल किमतीला द्राक्षे विकावी लागली. त्या वेळेपासून मात्र त्यांनी स्थानिक ठिकाणी द्राक्षे विक्रीसाठी पाठविली. कीडनाशकांची मात्रा, पीएचआय, छाटणीचा कालावधी, वातावरण या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. यानुसार फवारणीचे नियोजन केले जाते. भुरी व डाऊनी नियंत्रणासाठी बुरशीनाशके वेळेवर फवारली जातात. एकूण एक लाख रुपयांचा खर्च वजा जाता प्रत्येक वर्षी एकरी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पादन या पिकातून मिळत असल्याचे संग्राम यांनी सांगितले. 

डाळिंबही फुलवले 
संग्राम यांनी खडकाळ जमिनीत डाळिंबाची बागही फुलविली आहे. डाळिंबाचे त्यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदाच पीक घेतले. या पिकाबाबत पूर्ण माहिती नसल्याने त्यांनी राज्यभर फिरून त्याबाबतची माहिती संकलित केली. या क्षेत्रातील अनेक जाणत्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या अनुभवांची शिदोरी घेऊन भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली. शेणखत, गांडूळ खत झाडाला वीस ते चाळीस किलो दिले. तेलकट डाग रोग येऊ नये यासाठी ते काटेकोर राहिले आहेत. डाळिंबाचे अवशेष ते नष्ट करतात. पाण्याचे जेमतेम नियोजन असल्याने ठिबकचाच आधार घेतला. गेल्या वर्षी खर्च वजा जाता या पिकातून एक लाख रुपयांचा नफा झाला. अजूनही डाळिंब शेतीत खूप काही करायचे असल्याचे संग्राम यांनी सांगितले. डाळिंबाशिवाय चिकू व पेरूचेही 

...असा आहे संग्राम यांचा दिनक्रम 
सकाळी आठ वाजता ते शेतात येतात. शेतात दहा जनावरांचा गोठाही आहे. गावरान जातीच्या म्हशी आहेत. एक देशी गाय आहे. दररोज दहा ते पंधरा लिटर दुधाची विक्री केली जाते. जनावरांचे व्यवस्थापन पाहिल्यानंतर ते शेतीच्या कामाची पाहणी करतात. शेतात दहा मजूर कायमस्वरूपी आहेत. दिवस उजाडल्यापासून फवारणी, पाणी, तसेच अन्य नियोजन सुरू होते. भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार पाण्याचे नियोजन केले जाते. मजूर उपलब्ध नसेल तर संग्राम स्वत: काम करतात. आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे ते सामाजिक व राजकीय कामासाठी देतात. ते अनेक संस्थांचे पदाधिकारीही आहेत. बचत गटाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी संपर्क करतात. नावीन्यपूर्ण शेती पाहण्यासाठी ते अन्य शेतकऱ्यांबरोबर विविध ठिकाणी जाऊन माहिती घेतात. याचा खूप मोठा उपयोग शेती सुधारण्यासाठी होत असल्याचे त्यांचे मत आहे. 

नैसर्गिक आपत्तीसाठी रक्कम शिल्लक ठेवावी 
संग्राम यांनी शेतीतील अनुभव कथन करताना सांगितले, की प्रत्येक दोन ते तीन वर्षाला एखादी नैसर्गिक आपत्ती येत असते. यामुळे शेती तोट्यात येते. यामुळे नवीन पिके घेण्यात शेतकऱ्यांकडे पैसे नसतो. मी शेती करत असल्यापासून असेच होत आले आहे. यातून मी शिकत आलो आहे. आपल्याला मिळणाऱ्या नफ्यातून काही रक्कम शिल्लक ठेवणे गरजेचे आहे. एखादे वेळी नैसर्गिक आपत्ती आल्यास शिल्लक रक्कम खूप मोठा आधार ठरते. शेतकऱ्यांनी प्रत्येक वर्षी थोडी का होईना ही तजवीज करावी या आग्रहाचा मी आहे. 

जाधव यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
* पिकांच्या फेरपालटीला महत्त्व, दहा वर्षांपासून पिकांच्या फेरपालटीत सातत्य 
* ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करून उत्पादनवाढ 
* रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खताचा वापर 
* सबसरफेस ठिबक सिंचनाचा प्रयोग 
* उसाबरोबरच द्राक्ष, डाळिंब पिकांचेही व्यवस्थापन 
* कमीत कमी पाणी वापरण्याकडे कल 
-अनुभवी शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी- शिकाऊ वृत्ती


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120111/4718744531294090928.htm