Wednesday, November 30, 2011

निशिगंध लागवड कशी करावी? कोणत्या जाती निवडाव्यात?

ेनिशिगंधाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. उथळ आणि हलक्‍या जमिनीत फुलदांडे आणि फुले लहान राहतात आणि हंगामही लवकर संपतो. भारी, काळ्या जमिनीत मर आणि कूज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. लागवड शक्‍यतो एप्रिल - मे महिन्यांत करावी. लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम वजनाचे कंद निवडावेत. कंद मागील वर्षीच्या पिकापासून निवडावेत. 15 ग्रॅम वजनापेक्षा कमी वजनाचे कंद लागवडीस वापरल्यास फुले येण्यास सहा ते सात महिने लागतात. निवडलेले कंद लागवडीपूर्वी 0.2 टक्का तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात 15 मिनिटे बुडवून सावलीत वाळवावेत. त्यानंतर लागवडीसाठी वापरावेत. लागवडीपूर्वी जमिनीची उभी-आडवी, खोल नांगरट करून, कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी. हेक्‍टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. सरी वरंब्यावर 30 सें.मी. x 30 सें.मी. अंतरावर कंदाची लागवड करावी. कंद जमिनीत पाच ते सात सें.मी. खोल पुरावा. हेक्‍टरी साधारणपणे 60 ते 70 हजार कंद पुरेसे होतात. निशिगंध कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद देते. जमिनीची पूर्वमशागत करताना हेक्‍टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 200 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी संपूर्ण स्फुरद व पालाश आणि 50 किलो नत्राचा हप्ता द्यावा. राहिलेले नत्र तीन समान हप्त्यांत लागवडीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी द्यावे. लागवडीनंतर दहा दिवसांनी दहा किलो ऍझोटोबॅक्‍टर 100 किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावा. याच पद्धतीने दहा किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक आणि दहा किलो ट्रायकोडर्मा प्रत्येकी 100 किलो ओलसर शेणखतात मिसळून हे ढीग आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र करून हे खत एक हेक्‍टर पिकाला द्यावे. लागवडीनंतर लगेच पहिले पाणी व दुसरे पाच ते सात दिवसांनी द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. फुलांचे दांडे सुरू झाल्यावर नियमित पाणी द्यावे. लागवड केल्यापासून पहिल्या तीन-चार महिन्यांत वेळोवेळी तण काढून जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवली, तर पिकाची वाढ जोमाने होते. 
जाती : 
1) सिंगल ः या प्रकारातील फुले पांढरीशुभ्र असून, अत्यंत सुवासिक असतात. या प्रकारामध्ये स्थानिक सिंगल, शृंगार, फुले रजनी, प्रज्वल या जाती आहेत. 
2) डबल ः या प्रकारामध्ये स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव या जाती आहेत. या जातीची फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात. सेमी डबल या प्रकारच्या जातीची फुले फुलदाणीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. 
3) व्हेरिगेटेड ः या प्रकारामध्ये सुवर्णरेखा व रजतरेखा या जाती आहेत. या जाती बागेत, कुंडीमध्ये शोभेसाठी लावण्यासाठी चांगल्या आहेत. 
संपर्क : 020 - 25693750 
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे 


Source link: http://www.agrowon.com/Agrowon/20111128/5433855174707094694.htm