डॉ. आर. जी. सोमकुंवर
सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागांच्या परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ होत असली, तरी रात्रीच्या तापमानात फारसा फरक पडला नाही. किमान तापमानामध्ये अजून बदल नाही. काही बागांमध्ये सध्या फळकाढणी सुरू आहे, तर काही ठिकाणी बेदाणा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्याच्या वेगवेगळ्या परिस्थितीतील बागांमध्ये परिस्थितीप्रमाणे उपाययोजना करावी लागणार आहे.
सध्या ज्या बागेत काळी द्राक्षे होती, त्या बागेतील फळकाढणी बऱ्याच दिवसांपूर्वी झाली. विश्रांतीचा कालावधीसुद्धा त्या बागेत संपत आला. कारण आपण फळछाटणी जर लवकर घेत असू, तर खरड छाटणीसुद्धा तितक्याच लवकर घेणे महत्त्वाचे असते. दोन छाटणींमधील अंतर साधारणतः पाच महिने असावे. या कालावधीमध्ये बाग फुटून फळकाडी तयार होणे, परिपक्व होणे इ. गोष्टी यामध्ये गरजेच्या असतात. ही गरज पूर्ण होण्याकरिता पाच महिन्यांचा कालावधी लागतो.
ज्या बागेत एवढ्यातच फळकाढणी झाली, अशा ठिकाणी विश्रांती देणे गरजेचे आहे. या वेळी बागेत थोड्याफार प्रमाणात पाणी व अन्नद्रव्ये दिल्यास वेलीची झालेली झीज भरून निघेल व पुन्हा खरड छाटणीनंतर बाग फुटण्यास मदत होईल. कारण या वेलीमध्ये असलेले स्टोअरेज खरड छाटणीनंतर बाग फुटण्यास मदत करते.
खरड छाटणी घेण्यापूर्वी बागेत पूर्वतयारी करणे गरजेचे असते. ही तयारी दोन्ही छाटणीपूर्वी केल्यास त्याचा चांगला फायदा होतो; परंतु फळछाटणीपूर्वी असलेला पाऊस, मजुरांची व शेणखताची उपलब्धता इ. अडचणीच्या गोष्टींमुळे आपण त्यावेळेस पाहिजे तितकी पूर्वतयारी करत नाही. म्हणूनच या वेळी बोद फोडून त्यामध्ये शेणखत आणि शिफारशीत रासायनिक खतांचा वापर करून बागेची मशागत आपण करतो.
खरड छाटणीची पूर्वतयारी ः
खरड छाटणीपूर्वी पूर्वतयारी करणे म्हणजे दोन वेलींमध्ये खोडापासून आठ - नऊ इंच जागा सोडून जवळपास दोन फूट रुंद व तीन - चार इंच खोल अशी चारी घ्यावी. ही चारी घेताना यापूर्वीच्या बऱ्याच मुळ्या तुटतील. या वेळी 30 ते 35 टक्के मुळ्या तुटण्याची शक्यता असेल; परंतु या सर्व मुळ्या जुन्या व काळ्या झालेल्या दिसतील. या मुळ्या तुटल्या तरी चालेल. याचा चांगला फायदा एक महिन्यानंतर बागेत दिसून येईल. दोन वेलींमध्ये चारी घेतल्यानंतर त्या चारीमध्ये दोन पाटी शेणखत, 500 ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. याचसोबत एक बॅग डीएपी प्रति एकर आणि 15 किलो फेरस सल्फेट शेणखतावर पसरवून टाकावे, त्यावर हलका मातीचा थर चढवावा. यामुळे बागेत बोद तयार होईल. या बोदामध्ये हवा खेळती राहून नवीन मुळी वाढल्यास पोषक असे वातावरण तयार होईल. तुटलेल्या मुळीपासून नवीन पांढरी मुळी तयार होईल. ही कार्यवाही खरड छाटणीच्या 12 ते 15 दिवसांपूर्वी सुरू करावी. म्हणजेच, खरड छाटणी झाल्यानंतर बाग फुटून चार ते पाच पानांची अवस्था होईपर्यंत ही मुळी तयार होईल. ही कार्यक्षम अशी पांढरी मुळी या अवस्थेमध्ये आपण बोदामध्ये टाकलेले अन्नद्रव्य व्यवस्थितरीत्या ओढून वेलीला पुरवठा करते, त्यामुळेच वेलीची आवश्यक असलेली वाढ आपल्याला करून घेता येते.
ज्या बागेत पाण्यामध्ये क्षार आहेत, अशा ठिकाणी बोद पूर्ण पांढरे दिसतील किंवा ज्या ठिकाणी आपण पाणी देतो, अशा ठिकाणी जवळपास एक फूट गोलाकृती पांढरी जागा दिसेल. पाण्यात असलेले क्षार वेलीच्या वाढीस हानिकारक ठरतात, त्यामुळे पानांवर स्कॉर्चिंगसुद्धा आलेले आढळून येते. अशा वेळी बोद फोडून चारी घेतल्यानंतर तळात शिफारशीत मात्रेमध्ये गंधक मातीत मिसळावे. यामुळे बऱ्यापैकी फायदा होतो. त्याचसोबत काडी परिपक्वतेच्या काळात बागेत पाणी जेव्हा मुबलक असते किंवा पाऊस येत असल्यास बोद वरून सपाट जर असेल, तर त्या बोदामध्ये गोळा झालेले क्षार लिचिंग होऊन निघून जातील. बोदावर पाणी सोडल्यानंतरसुद्धा हे क्षार बोदाच्या बाहेर पडण्यास मदत होते.
री-कट घेतलेली बाग :
या बागेत री-कट घेऊन बराच उशीर झाला असून, वाढत्या तापमानात नवीन फूट जोमाने वाढताना दिसून येईल. तेव्हा निघत असलेल्या नवीन फुटीचा पुरेपूर फायदा घेऊन खोड ओलांडे तयार करून घ्यावे. नवीन निघत असलेल्या फुटीच्या वाढीचा जोम जास्त असल्यास खोड तयार करते वेळी आठ - नऊ पानांची फूट होताच पाच - सहा पानांवर खुडून घ्यावी. यानंतर निघालेल्या बगलाफुटीस तीन ते चार पानांवर खुडावे. वरची फूट सुतळीने बांबूला बांधावी. अशाप्रकारे वेलीचा खोड तयार करण्याकरिता दुसरा टप्पा तयार होईल, यामुळे खोड लवकर जाड होण्यास मदत होईल. बगलफुटींवर ठेवलेली तीन ते चार पाने सूर्यप्रकाशाचा फायदा घेऊन प्रकाशसंश्लेषणाद्वारे खाद्यपदार्थ तयार करून त्या काडीमध्ये साठवतील व त्याचा फायदा पुढील काळात होईल. यालाच आपण खोडातील किंवा काडीतील स्टोअरेज वाढले असे म्हणतो.
वेलीची जोमदार वाढ होण्याच्या दृष्टीने या वेळी पाणी व नत्र फार महत्त्वाचे आहे. तेव्हा, बागेत या वेळी पाणी भरपूर असल्याची खात्री करून घ्यावी. जमिनीचा प्रकार पाहूनच वेलीला पाणी उपलब्ध करून द्यावे. हलकी जमीन असल्यास कमी प्रमाणात; परंतु जास्त वेळा पाणी दिल्यास त्याचा फायदा होईल.
Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120316/4740042484264728918.htm