वनांचे वाढते महत्त्व व कमी होत चाललेली वृक्षसंपदा यावर वृक्ष लागवड हाच पर्याय असल्याने कृत्रिम वने निर्माण केल्याशिवाय गत्यंतर नाही. यासाठी वनरोपवाटिका मोठ्या प्रमाणात निर्माण करून वनवृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्टे साध्य करणे सोपे होईल.
वनरोपवाटिकेमध्ये प्रत्यक्ष बी रोपण, छाटांपासून आणि तयार रोपांचे स्थानांतर करून रोपेनिर्मिती केली जाते. शुष्क वनरोपवाटिकेमध्ये पाण्याचा वापर कमीत कमी केला जातो. शक्यतो पावसाचे आगमन होण्यापूर्वी बियाणे वाफ्यावरती पेरले जाते. पाण्याची उपलब्धता असलेल्या रोपवाटिकेत कृत्रिमरीत्या पाणीपुरवठा आणि पाणी व्यवस्थापन करून रोपे तयार केली जातात. या रोपवाटिकेत चांगल्या दर्जाची रोपे होतात. पाण्याच्या नियोजनामुळे खत, तण व्यवस्थापन करणेही सोपे होते.
रोपवाटिका करण्यापूर्वी आपणास बियाणे मिळण्याचा हंगाम, प्रति किलोमागे असणारे एकूण बियाणे, बियाणे संस्करण करण्याची पद्धत, उगवणक्षमता इत्यादीची माहिती असणे गरजेचे असते. आवश्यक असलेल्या प्रजातीचे बियाणे जमा केल्यानंतर ते चांगले वाळवून त्यास शिफारशीत बुरशीनाशकांद्वारे संस्करण करून साठविल्यास बुरशी-रोगापासून बचाव होऊ शकतो. काही वनस्पतींचे बियाणे उदा. नीम, सीता अशोक, जांभूळ, आंबा आपण जास्त दिवस साठवून ठेवू शकत नाही. बियाणे संस्करण पद्धतीचा अभ्यास करूनच त्या त्या प्रजातीची पेरणी केल्यास आपणास उगवणीची टक्केवारी निश्चित जास्त मिळून येईल. बियाणे उगवल्यानंतर रोपांचे ऊन, पाऊस, वारा, थंडी, धुके इ. गोष्टींपासून बचाव होण्यासाठी निवारा किंवा सावली करणे आवश्यक असते. सावलीसाठी गवत, बांबूच्या पट्ट्या, नारळाच्या झावळ्या, झाडांचा पाला, प्लॅस्टिक, पॉलिथिन, शेडनेट इत्यादी गोष्टी वापरतात. सद्यःस्थितीत शेडनेट काळ्या-हिरव्या रंगात उपलब्ध आहे. 50-100 टक्के प्रकाश देणाऱ्या जाळ्या आपणास प्रजातीनुसार वापरता येतात.
दर्जेदार रोपांसाठी मातीची सुपीकता वाढविणे रोपवाटिकेत आवश्यक असते. त्यासाठी मातीत कुजलेले शेणखत, जंगलामधील जमिनीच्या वरच्या थरातील कुजलेला पालापाचोळा, हिरवळीचे खत, गांडूळ खत इ. गोष्टींचा अंतर्भाव करणे आवश्यक असते. त्यासाठी रोपवाटिकेबरोबरच नैसर्गिक खतनिर्मिती प्रकल्प उभारणी केल्यास रोपवाटिकेमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. रोपेनिर्मितीवेळी एकदाच खते देऊ नयेत. खते आवश्यकतेनुसार द्यावीत. चांगली दर्जेदार रोपेनिर्मितीचा उद्देश ठेवून लागवड क्षेत्रासाठी रोपे बनविली जातात. तथापि, रोग, किडी इ. गोष्टींमुळे रोपे दर्जेदार होऊ शकत नाहीत. यासाठी रोग, किडी व्यवस्थापन हा घटक रोपवाटिकेत फार महत्त्वाचा असतो. वाळवी, पाने कुरतडणाऱ्या अळ्या, अन्नद्रव्य शोषणाऱ्या किडी, खोडकिडी, मुंग्या इ. मुळे रोपवाटिकेत मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी रोपवाटिकेत स्वच्छता असणे आवश्यक असते. मूळकूज, भुरी, कवड्या, कॉलर रॉट इ. बुरशीजन्य रोग मुख्यत्वेकरून रोपवाटिकेत आढळून येतात. रोग-किडी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड-रोग पद्धती रोपवाटिकेत चांगली ठरते.
संपर्क ः (02358) 283655
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली
Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120307/5461905968484580346.htm