डॉ. एस. डी. सावंत
सर्व विभागांमध्ये वातावरणातील उष्णता हळूहळू वाढत चालली आहे; परंतु मोठ्या प्रमाणात द्राक्षाची काढणी अजून राहिली आहे. या वर्षीच्या थंडीच्या लाटेमुळे सर्व विभागांमध्ये मणी तयार होण्यासाठी दहा ते वीस दिवस जास्त लागलेले आहेत. घडांमध्येसुद्धा एकाच वेळी पक्वता दिसत नाही. बऱ्याच वर्षांनंतर बागेमध्ये लागलेले जास्त घड पीक नियंत्रित करण्यासाठी कमी केले नव्हते. वातावरणाने चांगली साथ दिली म्हणून दरवर्षीप्रमाणे घडवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कमी होणारे घड या वर्षी कमी झाले नाहीत. म्हणूनच सर्व बागांमध्ये दरवर्षीपेक्षा जास्त घड आहेत, त्यामुळेसुद्धा घड काढणीस तयार होण्यास वेळ होत आहे.
थंडीच्या दिवसांमध्ये हवी तशी कर्बग्रहण क्रिया झालेली नाही, त्यातच अतिथंडीमुळे काही पाने कमी तयार झाली. म्हणून कमी पाने असल्यामुळे घड तयार होण्यास वेळ झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या तापमान वाढत आहे आणि पानांची कर्बग्रहण क्रिया करण्याची शक्तीसुद्धा वाढत आहे. या परिस्थितीमध्ये मण्यांमध्ये चांगल्या प्रकारे साखर वाढण्यासाठी पोटॅशची कमतरता न राहणे अत्यंत जरुरी आहे. म्हणून दोन ते तीन ग्रॅम मोनोपोटॅशिअम फॉस्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी) प्रति लिटर पाण्यात मिसळून पानांवर फवारल्यास मण्यांमध्ये चांगली साखर भरण्यास फायदा होऊ शकेल.
सध्याच्या परिस्थितीमध्ये घड उशिरा तयार झाले आहेत. त्याचा परिणाम पुढच्या छाटणीवरती होणार आहे. म्हणूनच जर फळांमध्ये ऍसिडिटी जास्त राहिली नसल्यास आणि 15 ते 16 च्यापुढे साखर गेलेली असल्यास, घडांची काढणी करावी. पानांवर लाल कोळी जर वाढत असेल आणि खरड छाटणीला वेळ असेल, तर पाने टिकवण्यासाठी पाण्याची किंवा एक ते दीड ग्रॅम सल्फर ( 80 डब्लूडीजी) प्रति लिटर पाण्यात मिसळून केलेली फवारणी अजूनही फायद्याची होऊ शकेल. पाने गळालेली असल्यास खरड छाटणी लवकर घेण्याचा निर्णय घ्यावा; परंतु पानगळ विशेषतः थंडीमुळे झाली असल्यास नवीन फुटी आलेल्या असतील तर त्या फुटी सक्रिय होईपर्यंत थांबून खरड छाटणी उशिरा घेतल्यास फायदा होऊ शकेल, याची नोंद घ्यावी.