डॉ. अनिल दुरगडे, डॉ. अजितकुमार देशपांडे
नदी काठ व कालवा सिंचन क्षेत्रातील जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात उसाखाली आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर, उसानंतर वारंवार ऊस घेण्याची पीक पद्धती, सेंद्रिय खतांचा वापर कमी वापर, फेरपालटीचा अभाव, निचऱ्याचा अभाव, सपाट जमिनी आणि रासायनिक खतांचा असमतोल वापर यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
सद्यःस्थितीत नदीकाठच्या क्षेत्रातील 50 टक्केपेक्षा जास्त क्षेत्र मध्यम ते जास्त क्षारपड झाले आहे. या क्षेत्रातील विहीर व कूपनलिकेचे पाणीसुद्धा क्षारयुक्त झाले आहे. या पाण्याने केवळ जमिनीचेच नव्हे तर मानवी तसेच जनावरांचेसुद्धा आरोग्य धोक्यात आले आहे.
सिंचन क्षेत्रात 3.36 टक्के ऊस क्षेत्रासाठी 60 ते 70 टक्के पाण्याचा वापर होतो. अतिरिक्त पाण्याच्या वापराने जमिनी क्षारपड होत आहेत. दुसरीकडे 84 टक्के कोरडवाहू पिकांचे क्षेत्र सिंचनाअभावी दुर्लक्षित आहे. याचा विचार करता सिंचन क्षेत्रातील ऊस पीक हे संपूर्णपणे ठिबकवर आणल्यास 50 टक्के पाण्याची बचत होईल, जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. उसाचे बचत केलेले 50 टक्के पाणी हे कोरडवाहू क्षेत्रातील अन्नधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यास उपयोगी होईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याच्या काटेकोर वापराकडे लक्ष द्यावे. म्हणजे ऊस उत्पादनाबरोबर जमिनीचे आरोग्य पूर्वपदावर आणता येईल.
माती परीक्षण महत्त्वाचे ः
1) क्षारपड जमिनीचे माती परीक्षण करून सदर जमिनी क्षारयुक्त आहे का? क्षारयुक्त चोपण आहे का? चोपण आहे का? यांचे वर्गीकरण करून घ्यावे. ढोबळमानाने फक्त क्षारपड आहे असे समजून उपाययोजना केल्या तर जमिनी आणखी क्षारपड होतील. उदा. क्षारयुक्त व क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये सेंद्रिय भूसुधारक म्हणून मळी-कंपोस्ट, स्पेंटवॉश मिसळू नये. क्षारपड जमिनीमध्ये गंधक व जिप्सम मिसळू नये. माती परीक्षणाने क्षारपड जमिनीचे वर्गीकरण ओळखून सेंद्रिय व रासायनिक भूसुधारकांचा वापर करावा.
2) चोपण जमिनीमध्येच जिप्सम माती परीक्षणानुसार शेणखतात मिसळावे. ज्या चोपण जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे तिथे जिप्समऐवजी गंधकाचा वापर करणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निचरा प्रणालीची व्यवस्था करावी.
3) शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून निचरा प्रणालीसाठी योजना तयार केली आहे. ही योजना सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांतील 28 गावांत 4,145 हेक्टरवर राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे जवळ जवळ 50 टक्के क्षारपड जमिनीचे क्षेत्र सुधारणार आहे. या योजनेअंतर्गत क्षारांचा निचरा होण्यासाठी सामूहिक पद्धतीने शेतातून चरास जागा देऊन नैसर्गिकरीत्या ओढ्यांना किंवा नदीस अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यास मदत करावी.
पीक नियोजन ः
1) प्रथमतः कमी पाणी लागणाऱ्या व क्षार प्रतिकारक पिकांची निवड करावी. चारा गवत पिकांची निवड करून सिंचनाचे पाणी सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीने किंवा ठिबक पद्धतीने करून पाण्याचे व्यवस्थापन करावे. अतिरिक्त पाण्याचा वापर टाळावा, पाणी क्षारयुक्त असल्यास चांगले पाणी एकत्र करून ठिबक किंवा सूक्ष्म तुषार सिंचनाने पाणी द्यावे.
2) क्षारपड जमिनीच्या व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा. दोन वर्षांतून एकदा धैंचा फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावा. पिकांना शेण + जनावराचे मूत्र यासारख्या सेंद्रिय पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करावा. क्षारपड जमिनीमध्ये स्थिर झालेले भरपूर मूलद्रव्ये उपलब्ध स्थितीत आणण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. उदा. रासायनिक खताबरोबर निंबोळीचा वापर वाढवावा, उपलब्ध असलेले शेण + चिपाडापासून अर्धवट कुजवून त्यापासून गांडूळ खत बनवावे. तसेच जैविक किंवा जिवाणूखतांचा वापर वाढवावा. जमिनीचे जैविक गुणधर्म चांगले ठेवावेत.
3) वेळीच उपाययोजनांचा अवलंब न केल्यास याच क्षेत्रात पावसाळ्यात क्षारपड जमिनीत गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढून पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विलायत बाभळींची संख्या वाढून बेटे तयार होतील. चिबड जमिनी तयार होतील. हा धोका लक्षात घेऊन वेळीच सामूहिक पद्धतीने जमिनीचे व्यवस्थापन करावे.
संपर्क - (लेखक मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)
Ref. link: http://www.agrowon.com/Agrowon/20120229/5383454706260986743.htm