Saturday, December 24, 2011

"समृद्ध जीवन फाउंडेशन'ची शेतकऱ्यांसाठी "समृद्धी किसान योजना'

पुणे  - अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पुण्यातील समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने समृद्धी किसान योजनेची आखणी करण्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याला म्हैस भाकड झाल्यावर तिच्या चाऱ्याचा खर्च परवडत नाही आणि मग त्याचा दूध व्यवसाय तोट्यात जातो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी "समृद्ध जीवन फाउंडेशन'च्या वतीने शेतकऱ्यांना म्हैस दिली जाईल आणि ती भाकड होईल तेव्हा ती परत घेऊन दुसरी म्हैस दिली जाईल. यामुळे त्याच्या दूध संकलनात खंड पडणार नाही. या म्हशीचे दूध फाउंडेशनच्या वतीने खरेदी केले जाणार आहे. या दुधासाठी सरकारी दरापेक्षा प्रत्येक फॅटला पन्नास पैसै कमी दर असेल, तरीही शेतकऱ्याला चांगला दर मिळू शकेल व त्याला या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकेल, असे समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. येत्या एक जानेवारीपासून राज्यात ही योजना चाळीसगाव व सांगोल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. 

संस्थेचे अध्यक्ष महेश मोतेवार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की या योजनेत शेतकरी दूध व्यवसायात स्थिर होणार आहे. त्याला आम्ही म्हैस विकणार नसून, सांभाळण्यासाठी देणार आहोत, त्यासाठी काही अल्प रक्कम किंवा काही तारण घेतले जाईल. सामाजिक बांधिलकीच्यादृष्टीने आम्ही या प्रकल्पाची आखणी केली आहे. व्यवस्थापन कौशल्य आणि शेतकऱ्यांचे सहकार्य यातून प्रायोगिक स्वरूपाचा प्रकल्प आम्ही पाच राज्यांत राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात पंचवीस हजार म्हशींचे वितरण करण्यात येईल, तर संपूर्ण वर्षात एक लाख म्हशींचे वितरण करण्याचा आमचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क दत्ता यादव - 9552579527 


Ref. : http://www.agrowon.com/Agrowon/20111225/5341824166582774837.htm