Saturday, December 24, 2011

फवारण्या कमी ठेवून मित्रकीटक वाचवा

पांढरी माशीचा प्रादुर्भाव अनेक पिकांत आढळून येतो. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध कीडनाशकांची फवारणी करतात. त्यातही अमेरिकेतील कापूस उत्पादक शेतकरी व्यापक क्षमतेच्या कीडनाशकाचा वापर अधिक प्रमाणात करत असल्याने शेतातील मित्रकीटकांची संख्या कमी होते. त्यामुळे कीडनाशकांवर जास्तीत जास्त अवलंबून राहावे लागते. यासाठी अमेरिकेतील कृषी संशोधन संस्थेच्या संशोधकांनी हे कीडनाशकांवरील अवलंबन कमी करण्यासाठी अभ्यास प्रकल्प राबवला होता. नैसर्गिक पद्धतीने पांढरी माशीचे नियंत्रण करण्यासंदर्भातील या संशोधनाचे निष्कर्ष "ऍग्रिकल्चरल रिसर्च मॅगझीन'च्या नोव्हेंबर - डिसेंबरच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहेत. 

अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी पांढरी माशीसाठी सर्वसाधारणपणे व्यापक क्षमतेच्या कीडनाशकाची फवारणी करतात, त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होते, त्याचबरोबर मित्रकीटकांचीही मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे पांढरी माशीचे नियंत्रण करण्यासाठी योग्य कीडनाशकाची वेळीच फवारणी करावी. वारंवार फवारण्या केल्यामुळे मित्रकीटकांच्या संख्येत घट होते. हे टाळण्यासाठी सातत्याने व्यापक क्षमतेच्या कीडनाशकांच्या फवारण्या टाळाव्यात, असे मारीकोपा येथील संशोधन संचालक नारान्जो यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा संशोधन प्रकल्प राबवण्यात आला होता. 

...असे आहे संशोधन 
प्रकल्पाच्या तीन प्रक्षेत्रापैकी एका प्रक्षेत्रावर पांढरी माशीसाठी विशेष कीडनाशके, दुसऱ्या प्रक्षेत्रावर व्यापक क्षमतेची कीडनाशके यांच्या फवारण्या करण्यात आल्या. तिसऱ्या प्रक्षेत्रावर कोणतीही फवारणी केली नाही. त्यात दोन्ही कीडनाशकांच्या फवारण्यांनंतर सुरवातीला पांढरी माशी आटोक्‍यात येत होती; मात्र व्यापक क्षमतेच्या कीडनाशकांच्या प्रक्षेत्रावर वारंवार फवारणी करावी लागत असल्याचे आढळले आहे. त्या तुलनेत विशेष पांढरी माशीसाठी फवारणीच्या प्रक्षेत्रात कमी फवारण्या कराव्या लागतात. त्या प्रक्षेत्रामध्ये मित्रकीटकांची संख्या वाढल्याचे आढळून आले आहे. या मित्रकीटकांमुळे पांढऱ्या माशीचे जैविक पद्धतीने नियंत्रण करणे शक्‍य होते. फवारण्यांची संख्याही त्यामुळे कमी राहते. तसेच, संशोधक नारान्जो आणि एल्सवर्थ यांनी पांढरी माशीचे दुसऱ्या पिकांपासून कपाशीकडे वळण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले. ऍरिझोनामध्ये जुलै महिन्यामध्ये कॉन्टालूप पिकांच्या काढणीनंतर कपाशी पिकावर पांढरी माशीचे प्रमाण वाढत असल्याचे आढळले होते. त्या कालावधीत पांढरी माशीसाठी असणाऱ्या विशेष कीडनाशकाची एक फवारणी केल्यास पांढऱ्या माशीपासून पिकांचा बचाव करणे शक्‍य होते. फवारण्याची संख्या कमी राहिल्याने मित्रकीटकांची संख्या वाढते. त्यातून जैविक पद्धतीने अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकते. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111221/5514386808276223694.htm