Saturday, December 24, 2011

सोलापूर जिल्ह्यात चारा उत्पादनासाठी 98 गावे निश्‍चित

सोलापूर -चाराटंचाईच्या प्रश्‍नावर उपाय म्हणून चारा उत्पादन घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी सात तालुक्‍यांतील 98 गावांची निवड करण्यात आली आहे. यंदा पडलेल्या कमी पावसामुळे आगामी काळात टंचाईसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नुकतेच माढा तालुक्‍यातील भीमानगर येथे सांगोला व मंगळवेढा तालुक्‍यांतील टंचाई निवारणार्थ लोकप्रतिनिधी व प्रशासनाची बैठक घेतली होती. यंदा पाऊसमान कमी असून, येत्या जुलैपर्यंत पाऊस पडणार नसल्याचे गृहित धरून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी बैठकीत नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आता जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत पाचशे हेक्‍टरवर चारा उत्पादन करण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने याबाबत तयारी सुरू केली आहे. 

दक्षिण सोलापूर, मोहोळ, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माढा या सात तालुक्‍यांतील 98 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातून पाचशे हेक्‍टरवर चारा उत्पादन केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर चारा उपलब्ध केला जाणार आहे. त्यांना जिल्हा परिषदेकडून बियाणे व खते तसेच सिंचन विभागाकडून पाणी उपलब्ध केले जाणार असून, प्रति टनाला तीन हजार रुपयांचे अनुदानही दिले जाणार आहे. चारा उत्पादन झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी गरजूंना जनावरांसाठी हा चारा उपलब्ध करून द्यावयाचा आहे. हा चारा गरजू शेतकऱ्यांनी कसा विकत घ्यावयाचा, याचे दर अद्याप निश्‍चित नाहीत. तर पन्नास टक्‍के संबंधित शेतकरी व पन्नास टक्‍के शासन अनुदान असे नियोजन आहे. परंतु केंद्रीय कृषिमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांचा हिस्सा पन्नास टक्‍क्‍यांऐवजी पंचवीस टक्‍के करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे हा निर्णय होणेही अपेक्षित आहे.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111220/5613273486469600026.htm