Saturday, December 24, 2011

रोपावस्थेतच पपईतील नर, मादी झाडे ओळखणे शक्‍य

पपईमध्ये नर आणि मादी रोपे अशी दोन प्रकारची रोपे असतात. परागीभवन चांगले होण्यासाठी नर आणि मादी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असावी लागते, अन्यथा उत्पादनावर परिणाम होतो. मात्र पपईची रोपे लहान असताना त्यातील नर आणि मादी रोप ओळखता येत नाही. आगामी नुकसान टाळण्यासाठी एका खड्ड्यात तीन रोपे लावली जातात. तरीही अशा लागवडीतून 50 टक्‍क्‍यांपर्यंत नर झाडे येण्याची शक्‍यता असते. नर झाडांपासून उत्पादन मिळत नसल्याने नुकसान होते. हे नुकसान टाळणे आता शक्‍य होणार आहे. पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी "डीएनए' मार्करद्वारे रोपावस्थेतच नर वा मादी रोप ओळखण्याचे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. त्याद्वारे पपई लागवडीवेळी योग्य प्रमाणात मादी रोपे लावता येणे शक्‍य होणार आहे. यामुळे परागीभवन योग्य प्रकारे झाल्याने फळधारणा अधिक होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल. 

शेतामध्ये पपईची लागवड ही बिया टोकून किंवा रोपे लावून केली जाते. एका खड्ड्यात दोन वा तीन रोपे किंवा बिया टोकाव्या लागतात. या परिस्थितीत खड्ड्यात उगवून आलेल्या किंवा लावलेल्या रोपांपैकी तीनही झाडे नर वा मादीही असू शकतात. मात्र रोपे सात ते आठ महिन्यांची होईपर्यंत ते ओळखता येत नाही. त्यामुळे त्यात अनेक वेळा 50 टक्‍क्‍यांपर्यंत नर झाडे उगवून आलेली दिसतात. शास्त्रीयदृष्ट्या पपई शेतामध्ये परागीभवन होण्यासाठी फक्‍त पाच टक्के नर झाडांची आवश्‍यकता असते. त्यामुळे आवश्‍यक तेवढी नर झाडे ठेवून बाकी उपटून टाकावी लागतात; परंतु लागवडीपासून या झाडांना केलेला खते, कीडनाशकांचा खर्च वाया जातो. हे नुकसान टाळणे आता शक्‍य होणार आहे. 

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. विद्या गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे. संशोधनात "पीसीआर' तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या या मॉलिक्‍यूलर मार्करमुळे रोपावस्थेत पपईतील नर वा मादी झाड ओळखता येते. तसेच नर झाडे ओळखण्यासाठी "एससीएआर' मार्करचा वापर करता येतो. या संशोधनामुळे रोपातील नर मादीची झाडे ओळखणे अतिशय सोपे झाले आहे. त्यामुळे अनावश्‍यक नर रोपांवर होणारा खत, कीडनाशकाचा खर्च कमी करणे शक्‍य आहे. या संशोधनाचा फायदा पपई उत्पादक, बियाणे कंपन्या, पेपेन उत्पादक आणि रोपवाटिकाधारकांना होणार आहे. पपई या पिकाबरोबरच जायफळ, पिस्ता, किवी, जोजोबा या पिकांच्या लागवडीतही हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते. या पिकांतही पपईसारखेच नर झाडांच्या तुलनेत मादी झाडे अधिक असणे आवश्‍यक असते. या पिकातही या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन मिळवणे शक्‍य होईल. 

गरज संशोधनाच्या विस्ताराची - 
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत शेतीशी निगडित अनेक प्रकारचे संशोधन होत असते. त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होण्यासाठी त्याच्या विस्ताराचे काम होणे आवश्‍यक आहे. पपईसंदर्भातील या संशोधनाचा वापर शेतकरी स्वतः थेट आपल्या शेतात करू शकत नाहीत. परंतु तांत्रिक सल्लागारांच्या मदतीने ते शक्‍य आहे. राज्याचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे किंवा संशोधन संस्थांच्या माध्यमातून तांत्रिक लोकांच्या मदतीने शेतकऱ्यांना हे संशोधन विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे. 


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111221/5281702528747139989.htm