Thursday, July 5, 2012

(इफेक्‍टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स) 'ईएम'

"ईएम' (इफेक्‍टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स) हे एक परिणामकारक नैसर्गिक, सजीव जिवाणूंचा समावेश असलेले द्रावण आहे. याचा वापर शेती, कुक्कुटपालन, पशुपालन, घन कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, सेंद्रिय खतनिर्मितीमध्ये फायदेशीर दिसून आला आहे. 

ज्या जमिनीचा सामू वाढलेला आहे अशा ठिकाणी ईएम-2 या द्रावणाच्या वापरामुळे विशेषतः ऊस या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीची झाल्याचे दिसून येते. मुळांची वाढ, पेरांची संख्या, फुटव्यांची संख्या, तसेच पेऱ्यातील अंतर वाढल्याचे दिसून आले. याचे द्रावण आम्लधर्मी असल्यामुळे ठिबक सिंचन संचामध्ये अडकणारे क्षार विरघळून जातात. शेवाळ वाढत नाही. जिवाणू खतांचा ईएम-2 सोबत केलेला वापर जास्त परिणामकारक दिसून येतो. याच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये चांगल्या पद्धतीचा परिणाम दिसून येतो. रोपवाटिकेमध्ये ईएम-2 चा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते, रोपे तजेलदार होतात. 

एक लिटर ईएम-2 द्रावण प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून याचा वापर शेतीसाठी तसेच रोपवाटिकेसाठी करावा. आम्ही आमच्या केंद्राच्या रोपवाटिकेत याची फवारणी तसेच आळवणी देतो. 

फळझाडांसाठी आठवड्यातून एकदा ठिबक सिंचनातून ईएम-2 दिले जाते. यासाठी एक लिटर ईएम-2 प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून व्हेंचुरीच्या माध्यमातून द्यावे, ईएमचा वापर करताना विद्राव्य खत त्याच वेळी पिकांना देऊ नये. मोसंबी, संत्रा या पिकाला ईएमचा वापर केल्याने फुले लागण्याचे प्रमाण वाढले, फळधारणा चांगली झाली. या द्रावणाच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. सेंद्रिय घटकांच्या वाढीमुळे पांढऱ्या मुळ्या वाढतात. झाडाची अन्नद्रव्य ग्रहणाची शक्ती वाढते. पिकाची चांगली वाढ होते. फळांची गुणवत्ता वाढलेली दिसून आली आहे. काही शेतकरी केळी पिकासाठी ठिबक सिंचनातून याचा वापर करतात, त्यामुळे पिकाची एकसारखी वाढ झाल्याचे दिसून आले. 

ईएमचा वापर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर करण्यात येत आहे. यांचे चांगले फायदे दिसून आले आहेत. काही शेतकरी चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, द्राक्ष, ऊस, केळी या पिकांसाठी वापर करताहेत. 

काही शेतकरी गोठा स्वच्छता, गांडूळ खतनिर्मितीमध्ये याचा वापर करताहेत. साधारणपणे 100 लिटर पाण्यात एक लिटर ईएम-2 हे द्रावण मिसळून गोठ्यात फवारणी केली असता गोठ्यातील दुर्गंधी कमी होते. जनावरांना माश्‍या, चिलटांचा त्रास कमी होतो. गांडूळ खताच्या वाफ्यावर याची फवारणी केली असता लवकर खत तयार होण्यास मदत होते. पालापाचोळा लवकर कुजतो. 


Ref. link: http://www.agrowon.com/Agrowon/20120229/4742729865648037900.htm