Thursday, July 5, 2012

औषधी अडुळसा लागवड

अडुळसा हे अकॅन्थॅसी कुळामधील झुडूप असून, त्याचे शास्त्रीय नाव Justicia Adhatoda आहे. ही सदाहरित असणारी दोन ते तीन मीटर वाढणारी प्रजाती काही ठिकाणी कुंपणासाठी लागवड केलेली आढळते. पाने हिरवी, लांबट, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. मध्यम आकाराच्या या झुडपाचे सोटमूळ लांब वाढते. खोडाला पाने समोरासमोर येतात. पेरे फुगलेली असतात. फुले पांढरी असतात व फुलांना देठ नसते. 

ही वनस्पती उष्ण व दमट हवामानात चांगली वाढते. कमी पावसाच्या प्रदेशात या वनस्पतीची लागवड करता येते. जमीन निचरा होणारी, हलकी, मध्यम लागवडीसाठी उत्तम असते. पोयटा, गाळाची, वाळूमिश्रित जमीनही लागवडीसाठी चालते. समशीतोष्ण प्रदेशात ज्या ठिकाणी पाऊस भरपूर पडतो, त्या ठिकाणी वाढ चांगली आढळून येते. किनारपट्टी प्रदेशात कुंपणाला याची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील कोकणपट्टी, ओरिसा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू व बंगाल तसेच समुद्रकाठच्या प्रदेशात या वनस्पतीची लागवड दिसून येते. 

लागवड तंत्र ः 
खोडाच्या छाटापासून रोपे तयार करून लागवड करता येते. कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर एक मीटर दोन झाडांतील अंतराने लागवड करावी. शेतजमिनीत सलग लागवड करावयाची झाल्यास दोन झाडांत 1 x 1 मी. अंतर ठेवावे. परिपक्व खोडाचे छाट काढून ते 12 ते 15 सें.मी. आकाराचे तयार करावेत. जमिनीकडील भाग तिरका कापून लागवड प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये करावी. छाट फुटण्यास सुरवात झाल्यानंतर रोपांची लागवड जून, जुलै महिन्यांत पाऊस पडल्यानंतर करावी. जमिनीत पाणी भरून राहणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर मूळकूज रोग येण्याची शक्‍यता असते. त्यासाठी वेळीच रोगनियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. 

काढणी ः 
लागवडीनंतर वाढीनुसार पाने तोडणी सुरू करावी. साधारणतः चांगली झाडे वाढल्यास सहा महिन्यांपासून पाने तोडणीयोग्य होतात. परिपक्व गर्द हिरवी पाने काढून मागणीप्रमाणे तयार करावीत. काही वेळा वाळलेल्या स्वरूपात, तर काही वेळा ताज्या स्वरूपात औषध निर्मितीसाठी लागतात. अपरिपक्व व पिकलेली पाने औषधासाठी वापरू नयेत. पहिल्या तोडणीनंतर तीन महिन्यांच्या अंतराने तोडे करावेत. पाण्याचे व खताचे उत्तम नियोजन केल्यास पानांचे उत्पादन चांगले येते. दोन वर्षे वयाच्या प्रति झाडापासून सरासरी प्रत्येक तोड्यास एक किलो ताजी पाने मिळतात. 

औषधी उपयोग ः 
अडुळसा वनस्पतीच्या पानात व्हॅसिसीन अल्कीलॉईज असते. क्षयरोग, कफ, दमा, अस्थमा, खोकला या विकारांसाठी अडुळसा रामबाण म्हणून वापरला जातो. कफावर ज्यात फार दिवस खोकला येतो, बारीक ताप येतो तेव्हा दहा ग्रॅम म्हणजे चार चमचे रस व तितकाच मध व चिमूटभर पिंपळीचे चूर्ण एकत्र करून हे चाटण वरचेवर घेत राहावे. कफ मोकळा होतो व बरे वाटते. धाप लागणे, दमा यावरदेखील अडुळसा वापरला जातो. नाकातून, तोंडातून रक्त येत असेल तर पानांचा रस समभाग खडीसाखर घालून देतात. अडुळशाच्या फुलांचा अवलेह रक्त पित्त कमी करण्यासाठी वापरतात. पानांचा रस किंवा काढा मधाबरोबर आवाज बसला असता उपयुक्त असतो. आम्लपित्त, तापामध्ये आणि त्वचारोगामध्ये पंचतिक्ताचा (अडुळसा, काटेरिंगणी, कडुनिंब साल, गुळवेल, कडूपडवळ) काढा आणि सिद्धघृत दोन वेळा देतात. घरगुती वापर होताना तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे. 


Ref.Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120313/5478629246599291387.htm