अळिंबी ही विशिष्ट स्वाद व चवीसाठी फार पुरातन काळापासून सुपरिचित आहे. अळिंबीचा उपयोग प्राचीन काळापासून औषधीसाठी केला जातो. अन्नघटकांच्या पृथक्करणावरून अळिंबीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने व खनिजे असून भाजीपाल्यापेक्षा पौष्टिक असते, त्यामुळे युरोप व अमेरिकेत दररोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात अळिंबीचा वापर होऊ लागला आहे.
महत्त्व अळिंबीचे
अळिंबीतील उपलब्ध प्रथिनांमुळे या भाजीची चव ही मटणाच्या भाजीसारखी लागते; परंतु अळिंबी ही शाकाहारी आहे. पचनास सोपी, आहारात अतिशय सात्त्विक व पौष्टिक आहे. अळिंबीच्या प्रथिनांमध्ये लायसीन व ट्रिपटोफॅन ही महत्त्वाची अमायनो ऍसिड आहेत. तृणधान्यांत त्यांचा अभाव असल्याने अळिंबीचा वापर केल्यास हे आवश्यक अमायनो ऍसिड आपल्या आहारात येऊ शकतात. यात पिष्टमय पदार्थ नसतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना याचा आहार अतिशय उपयुक्त आहे. अळिंबीत प्रथिनांचे प्रमाण 2.7 ते 3.9 टक्के असून, हे भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत दुप्पट आहे. अळिंबीत शर्करायुक्त व स्निग्ध पदार्थांचे प्रमाण इतर भाजीपाला व डाळींपेक्षा फार कमी असल्याने शरीर काटक ठेवण्यास व वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे उत्तम अन्न आहे.
ओळख
अळिंबी ही वनस्पतीच्या राज्यातील बुरशीची एक जात आहे. इतर बुरशींप्रमाणे ती हरितद्रव्यविरहित असल्यामुळे ती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. अन्नासाठी तिला इतर सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. निसर्गामध्ये हा अन्नपुरवठा शेणखत, कंपोस्ट, कुजलेला काडीकचरा, पिकांचे अवशेष यामार्फत होतो. निसर्गात अनेक आकारांच्या व अनेक रंगाच्या अळिंबी आढळतात. यापैकी फारच थोड्या जाती खाण्यास योग्य आहेत. इतर सर्व जाती विषारी किंवा खाण्यास अयोग्य आहेत. खाण्यास योग्य जातींपैकी फक्त तीन ते चार जातींची व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यात येते.
1) बटन अळिंबी
2) धिंगरी अळिंबी
3) भाताच्या काडावरील अळिंबी
धिंगरी अळिंबी ही आपल्या हवामानाला योग्य आहे. तिच्या वाढीसाठी 22 ते 30 अंश से. तापमानाची आवश्यकता असते. आपणाकडे जून ते फेब्रुवारी या काळात असे तापमान असल्याने या जातीची लागवड करता येते. लागवडीसाठी कंपोस्ट, जमीन किंवा इतर कोणत्याही खास खताची आवश्यकता नसते. सर्वसामान्य माणसास धिंगरी अळिंबीची लागवड करणे सहज शक्य आहे. या अळिंबीच्या खूप जाती विकसित आहेत. पैकी राज्यात जास्त प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या जाती पुढीलप्रमाणे...
1) प्ल्युरोट्स साजोर काजू
2) प्ल्युरोट्स फ्लोरिडा
3) प्ल्युरोट्स डवोस
4) प्ल्युरोट्स प्लॅबीलॅट्स
5) हिपसिझायगस अलमॅरीस
लागवडीसाठी आवश्यक बाबी
लागवडीसाठी माध्यम - अळिंबी लागवडीसाठी तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असलेल्या वस्तू लागतात. व्यापारी तत्त्वावर अळिंबीची लागवड करण्यासाठी गव्हाचे काड किंवा भाताचे काड वापरले जाते. लागवडीच्या दृष्टीने पिकाची काढणी झाल्यास गव्हाचे काड किंवा भाताचे काड पावसात भिजू देऊ नये, ते सुरक्षित ठिकाणी साठवावे.
जागेची निवड - अळिंबीची लागवड करण्यासाठी ............अन्न, वारा, पाऊस लागणार नाही, अशी विटांची किंवा साधी बांबूच्या तक्क्यांपासून तयार केलेली झोपडीसुद्धा वापरता येते.
लागवडीसाठी आवश्यक वातावरण - लागवडीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी तापमान 22 ते 30 अंश से. व आर्द्रता 65 ते 75 टक्के असणे आवश्यक आहे.
लागवडीसाठी साहित्य - चालू हंगामातील गव्हाचे किंवा भाताचे काड
- 150 गेजच्या प्लॅस्टिक पिशव्या (35 x 55 सें.मी.)
- अळिंबीचे बेड ठेवण्यासाठी लाकडी रॅक्स
- अळिंबी स्पॉन
लागवडीची पद्धत
चालू हंगामातील पावसात न भिजलेले गव्हाचे काड लागवडीसाठी घ्यावे. गव्हाच्या काडाचे चार ते पाच सें.मी. लांबीचे तुकडे करावेत. गव्हाचे काड पाण्यात भिजवण्यासाठी प्रथम ते पोत्यात भरून पोते दहा तास पाण्यात भिजत ठेवावे. भाताचे काड असेल तर चार ते पाच तास भिजवावे. गव्हाच्या काडाचे पोते पाण्यातून काढून घेऊन पोत्यातील जास्तीचे पाणी निचऱ्याद्वारे काढून घ्यावे. हे भिजलेले गव्हाचे काड लागवडीसाठी वापरण्यापूर्वी निर्जंतुक करणे आवश्यक आहे. काड निर्जंतुक तीन पद्धतीद्वारे केले जाते.
1) गरम पाण्याद्वारे, 2) वाफेद्वारे, 3) रसायनाद्वारे.
काड निर्जंतुकीकरणासाठी कुठल्याही एका पद्धतीचा वापर करावा. गरम पाण्यातून काड निर्जंतुक करण्यासाठी काडाचे पोते 80 अंश से. तापमानाच्या गरम पाण्यात एक तास बुडवावे व नंतर ते पोते थंड होऊ देऊन त्यातील जादा पाणी काढून घ्यावे. वाफेद्वारे काड निर्जंतुक करण्यासाठी ऑटोक्लोव्हचा वापर करावा. रासायनिक पद्धतीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कार्बेन्डाझिम व फॉर्म्यालीनचा वापर करतात. रासायनिक पद्धतीद्वारे निर्जंतुकीकरणाची पद्धत सोपी व सहज करता येण्यासारखी आहे; परंतु या पद्धतीमध्ये शिफारशीप्रमाणे रसायनाचा वापर करावा. रासायनिक पद्धतीमध्ये 100 लिटर पाण्यात 7.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम व 50 मि.लि. फॉर्म्यालीन टाकून द्रावण तयार करावे. या द्रावणात काडाचे पोते 12 ते 14 तास भिजू घालावे. त्यानंतर पोते काढून यातून जादा पाणी निचऱ्याद्वारे काढावे व दुसऱ्या दिवशी बेड भरावेत. बेड भरण्यापूर्वी वापरावयाची प्लॅस्टिक पिशवी (150 गेज - 35 x 55 सें.मी.) दोन टक्के फॉर्म्यालीनच्या द्रावणात निर्जंतुक करून घ्यावी. अळिंबीचे बेड भरताना निर्जंतुक केलेल्या काडाचा थर प्लॅस्टिक पिशवीमध्ये दोन ते तीन इंच द्यावा व यावर स्पॉन बेड रिंग पद्धतीने टाकावे. यानंतर यावर परत दोन ते तीन इंच जाडीचा थर द्यावा व परत यावर अळिंबीच्या स्पॉनची रिंग करावी. अशा प्रकारे चार ते पाच थर अळिंबीच्या स्पॉनचे द्यावे. एका बॅगसाठी गव्हाच्या काडाच्या दोन टक्के अळिंबी स्पॉन वापरावा व एक टक्का डाळीचे पीठ वापरावे. मशरूम स्पॉन व डाळीचे पीठ एकत्र मिसळून वापरावे. पिशवी भरल्यानंतर दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे. या पिशवीला निर्जंतुक केलेल्या टाचणीने वा सुईने छिद्रे पाडावीत. पिशवी भरल्यानंतर पिशव्या खोलीत रॅकवर ठेवाव्यात. खोलीतील तापमान 22 ते 30 अंश से. व आर्द्रता 65 ते 75 टक्के राहील, यासाठी जरुरीप्रमाणे हवेत व जमिनीवर पाणी फवारावे. मशरूम बॅग भरून ठेवल्यानंतर 12 ते 14 दिवसांनंतर बॅगमध्ये अळिंबीची पांढरट वाढ दिसून येते. ही वाढ दिसल्यानंतर बेडची प्लॅस्टिक पिशवी काढून घ्यावी व बेड रॅकमध्ये तसाच ठेवावा. या बेडवर दुसऱ्या दिवसापासून सकाळ, दुपार व संध्याकाळ पाण्याची फवारणी करावी. बेडवरील प्लॅस्टिक पिशवी काढल्यानंतर चार ते पाच दिवसांत बेडवर कोंब दिसून येतात व नंतर तीन ते चार दिवसांत पूर्ण अळिंबी दिसून येते.
काढणी
अळिंबीचा पहिला बहर येण्यासाठी 24 ते 25 दिवस लागतात. अळिंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी छाटणी करावी. काढणीअगोदर एक दिवस पाणी बंद करावे व काढणी करून बेडवरील पातळ थर खरडून काढावा व नंतर बेडवर सकाळ - संध्याकाळी पाणी फवारावे. पहिल्या काढणीनंतर आठ ते दहा दिवसांनी दुसरी काढणी सुरू होते. दुसरी काढणी झाल्यावर आठ ते दहा दिवसांनी तिसरी मशरूमची काढणी येते. अशा प्रकारे 40 ते 45 दिवसांत मशरूमची काढणी तीन वेळेस होते व अशा प्रकारे भरलेल्या एका बेडपासून एक ते 1.25 किलो ओली अळिंबी मिळते. काढलेली
अळिंबी स्वच्छ करून 100 ग्रॅम, 200 ग्रॅम वजन करून छिद्रे असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांत भरून ती विक्रीसाठी पाठवावी.
असे तयार होतात विविध खाद्यपदार्थ
धिंगरी अळिंबी रेफ्रिजिरेटरमध्ये तीन ते चार दिवस चांगल्या स्थितीत राहू शकते. उन्हात किंवा ड्रायरमध्ये वाळवून हवाबंद पिशवीत ठेवता येते. वाळल्यामुळे वाळलेली अळिंबी खाण्यासाठी वापरताना कोमट पाण्यात 15 मिनिटे भिजत ठेवावी. भिजल्यानंतर वजनात पाच ते सहा पट वाढ होते. यापासून पुलाव, सूप, करी, भजी, ऑम्लेट इ. खाद्यपदार्थ तयार करता येतात.
संपर्क -7350013147
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, जालना येथे विषय विशेषज्ञ आहेत.)
Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120505/5044815957409018415.htm