आंबेगाव तालुक्यातील (जि. पुणे) सातगाव पठारावरील पेठ हे बाबाजी धुमाळ यांचे गाव. वडिलोपार्जित 57 गुंठे कोरडवाहू जमीन वगळता त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. डिझेल मेकॅनिक बनायच्या उद्देशाने त्यांनी आळेफाटा येथे ट्रॅक्टर गॅरेजमध्ये काम करायला सुरवात केली. पुढे मित्रांकडून उसने पैसे, बॅंकेकडून कर्ज घेऊन 1972 मध्ये 26 हजार रुपयांना जुना ट्रॅक्टर, 1600 रुपयांना ट्रॉली, नांगर अशी अवजारे विकत घेतली. पुढे या ट्रॅक्टरनेच त्यांच्या प्रगतीला गती दिली.
ट्रॅक्टर घेतल्यानंतर बाबाजींनी जमीन सपाटीकरण करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत विविध भागांत रात्रंदिवस ट्रॅक्टर चालवण्याचे काम करतानाच देवगाव येथे 11 एकर पडीक माळरान जमीन खरेदी केली. येथूनच खऱ्या अर्थाने शेतीचा श्रीगणेशा झाला. पै - पै जोडत शेती 50 एकरपर्यंत वाढवली. या वाटचालीत थोरले बंधू बबनशेठ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेतीत सुरवातीला जिरायती ज्वारी, मटकी, हुलगा अशी पिके घेतली. 1983 मध्ये शेतातच घर बांधून ते देवगावमध्ये स्थायिक झाले. घोडनदीवरून साडेतीन हजार फूट लांबीच्या दोन स्वतंत्र पाइपलाइन करून अनुक्रमे 10 व 15 अश्वशक्तीच्या मोटारींनी शेतात पाणी खेळवले. एक विहीर असून त्यावर दहा अश्वशक्तीची मोटर आहे. तिन्ही पाइपलाइन स्वतंत्र आहेत.
ऊस उत्पादनात सातत्य, बहुविध भाजीपाला पद्धती पाण्याची सोय झाल्यावर आठ - दहा वर्षे ढोबळी मिरची, काकडी, कांदा, बटाटा, कलिंगड, टोमॅटो आदींचे उत्पादन घेतले. उत्तर पुणे जिल्ह्यात ढोबळी मिरची यशस्वी करण्याचे श्रेय बाबाजींकडे जाते. गेल्या 32 वर्षांपासून ऊस उत्पादनात ते जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत सातत्याने आघाडीवर आहेत. विघ्नहर सहकारी साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी आपला ऊस गुऱ्हाळात नेऊन गूळ तयार करून घेत. मंचरजवळील पेठच्या बाजारात विक्री करत. "विघ्नहर' सुरू झाल्यानंतर उसाचे क्षेत्र 30 एकरपर्यंत वाढवले. त्यात स्थिरता आल्यावर 1985च्या दरम्यान 15 एकरांत संत्रा, मोसंबी, नारळ, आंबा, चिकू, डाळिंब यांची लागवड केली. चिकूची 200 झाडे आहेत. ऑक्टोबर ते सप्टेंबर या वर्षाच्या कालावधीचा करार व्यापाऱ्यांसोबत केला जातो. दर पंधरा दिवसांनी चिकूची काढणी होते. नारळाची दोन एकरांत 30 बाय 30 फूट अंतरावर सुमारे 100 झाडे आहेत. याच बागेत आंब्याची रत्ना, पायरी, तोतापुरी, मलगोबा, हापूस जातींची 300 झाडे आहेत. वर्षभरात सुमारे सहा - सात हजार नारळ मिळतात. प्रति नग सात ते आठ रुपये या दराने विक्री होते. आंब्याची वाशी बाजार समितीत विक्री होते. दोन एकरांवर हापूस आंब्याची 150 झाडेही लावली आहेत.
उसात कुशलता
बाबाजी 11 वर्षे आपला ऊस भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देत आहेत. सध्या 20 एकरांवर ऊस आहे. प्रत्येकी दहा एकरांत फुले 265 व त्याचा खोडवा आहे. गेल्या वर्षी पाण्याचा मोठा ताण पडल्याने उत्पादन घसरून एकरी सरासरी 60 टनांचा उतारा मिळाला. त्यापासून बोध घेत सिंचनाच्या आराखड्यात बदल केला आहे. वसंतदादा साखर संस्थेने (व्हीएसआय) 2003-2005 मध्ये 86032 जातीच्या उतिसंवर्धित रोप लागवडीचा "प्रात्यक्षिक प्लॉट' त्यांच्याकडे घेतला. त्यातून एकरी 100 टन उत्पादन मिळाले. "भीमाशंकर'मार्फत 2009-10 मध्ये त्यांना सर्वोच्च 2650 रुपये प्रति टन दर मिळाला. यंदा सर्व उसाला इनलाईन ठिबक सिंचन असून, त्यासाठी एकरी 40 हजार रुपये खर्च आला.
- वनशेतीतही अग्रेसर
बाबाजींनी 2003 मध्ये साडेपाच एकर क्षेत्रावर सागाची सहा हजार टिश्यू कल्चर रोपे कर्नाटकातून आणून लावली. त्यालाही ठिबक सिंचन आहे. सागात पहिली दोन वर्षे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा "काबुली 2' हरभरा व अन्य आंतरपिके घेतली. दीड वर्षापूर्वी पाऊण एकरात 10 बाय 12 फूट अंतरावर डाळिंबाच्या 300 रोपांची लागवड केली. यंदा पहिल्या वर्षी 300 क्रेट (सरासरी 16 किलो प्रति क्रेट) उत्पादन झाले. ज्वारी, गहू, खरबूज, कलिंगडाचेही यशस्वीपणे उत्पादन ते घेतात. काटेकोर शेतीतून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळविण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो.
- प्रेसमडपासून कंपोस्ट निर्मिती
पिकांसाठी सेंद्रिय खताच्या वापरावर बाबाजींचा भर आहे. दरवर्षी सुमारे दोनशे ते सव्वादोनशे टन कंपोस्ट खत ते तयार करतात. यासाठी साखर कारखान्यातील सुमारे दोनशे टन प्रेसमड (मळी) वापरले जाते. त्यात पाच ते दहा टन राख (कारखान्यातील), 10 ते 20 टन शेणखत, एक ते दोन टन सुपर फॉस्फेट व अर्धा टन युरिया जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मिसळतात. त्यात कंपोस्टिंग कल्चर, स्फुरद विघटक जिवाणू, ऍझोटोबॅक्टरचा वापर होतो. संपूर्ण ढिगाला दोनदा जेसीबी यंत्राने पलटी दिल्यानंतर दहा ते अकरा महिन्यांत हे मिश्रण कुटून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते. फळझाडांसाठी 18ः46ः0, 10ः26ः26, युरिया, एसएसपी व निंबोळी खताचा गरजेनुसार वापर होतो.
- ठिबक तंत्रज्ञानात निष्णात
बाबाजींनी 1987-88 पासून सर्व पिकांमध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे. एका खासगी कंपनीच्या संशोधन व विकास विभागाच्या तज्ज्ञांकरवी पाइपलाइनवरील दाब नियंत्रित ठेवणारी विशिष्ट पद्धतीची फिल्टर यंत्रणा (मॅनिफोल्ड) विकसित करून घेतली. यात प्रत्येकी 50 घनमीटर क्षमतेचे तीन सॅण्ड फिल्टर व 160 घनमीटर क्षमतेचे दोन स्क्रीन फिल्टर वापरण्यात आले. फळबागांसाठी ते सेमिऍटोमॅटिक सॅण्ड फिल्टर व 40 घनमीटरचा स्क्रीन फिल्टर वापरतात. भुईमूग, मेथी, कोथिंबीर यांचे मायक्रो स्प्रिंकलरद्वारे उत्पादन घेतात. साखर कारखान्यांचे तज्ज्ञ, शेतकरी, प्राध्यापक, विद्यार्थी त्यांच्या शेतीला आवर्जून भेट देतात.
पीक, कीड - रोगांचा शास्त्रीय अभ्यास
पिकांच्या शास्त्रीय अभ्यासाबरोबर अनेक किडी - रोगांची शास्त्रीय नावे, रासायनिक कीडनाशकांतील घटक, त्याबाबतची माहिती बाबाजींना तोंडपाठ आहे. त्यांची धनेश, मनोहर व गणेश ही मुलेही वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीत कार्यरत असून, त्यांचा शेतीचा दांडगा अभ्यास आहे. धनेश कृषी पदवीधर व एमबीए आहे.
विजेवरील ट्रॅक्टरचलित जनरेटर
धुमाळ यांनी अवघ्या 90 हजार रुपयांत 20 केव्ही क्षमतेचा ट्रॅक्टरवर चालणारा, जोडणी करून कोठेही नेता येणारा, कमी आकारमान व वजनाचा जनरेटर तयार केला आहे. यासाठी डायनामो विकत घेऊन गरज व संकल्पनेनुसार वर्कशॉपमध्ये त्यात बदल करून घेतले. त्यांच्या 45 वर्षे जुन्या ट्रॅक्टरच्या रोटर शाफ्टवरून डायनामोला गती देऊन जनरेटर कार्यान्वित केला जातो. एकाच वेळी साडेसात अश्वशक्तीच्या दोन किंवा 15 अश्वशक्तीची एक मोटर चालविण्यास तो सक्षम आहे. त्यासाठी दर ताशी चार ते पाच लिटर डिझेल म्हणजेच 225 रुपयांपर्यंत खर्च येतो. याच क्षमतेचा नवा स्वयंचलित जनरेटर तीन लाख रुपयांदरम्यान बाजारात मिळतो. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी असे जनरेटर तयार केले आहेत. घरच्या घरी कमी खर्चात ट्रॅक्टरचलित फवारणी पंपही बाबाजींनी तयार केला आहे.