Wednesday, July 18, 2012

खडतर प्रयत्नांमुळेच दुष्काळातही फुलवली केळी

कोरेगावच्या दक्षिण भागात भाडळे खोऱ्यातील कवडेवाडी हे छोटेसे गाव. गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची फार मोठी बिकट समस्या उद्‌भवते. तालुक्‍यात भाडळे खोऱ्यातील गावे कायम दुष्काळी म्हणून संबोधली जातात. उन्हाळ्यात जनावरांना प्यायला पाणी मिळत नाही तेथे शेतीला पाणी मिळणे खूप कठीण. त्यामुळे दरवर्षी या भागात शेतातील उभी पिके उन्हाळ्यात करपून जातात. कवडेवाडीत नीरा उजवा कालव्यावरील बंधारा आहे. त्यातील पाण्याचा शेतीला फायदा होतो. तोही बंधारा ऐन उन्हाळ्यात कोरडा पडत असल्याने शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी कसरती कराव्या लागतात. 

जगदाळे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. अल्पशिक्षित असूनही त्यांनी प्रचंड इच्छाशक्ती, अभ्यास व सततच्या धडपडीतून शेतीत आर्थिक स्थैर्य मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. खडकाळ व माळरान स्वरूपाची त्यांची सहा एकर शेती आहे. पाण्याच्या उपलब्धतेबरोबर शेतीतून नफा कमावण्यासाठी केलेल्या धडपडीबाबत सांगताना ते म्हणाले, की साधारण 1997-98 पासून पाणी समस्येशी दोन हात करत पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतीला हक्काचे पाणी असावे या हेतूने तब्बल अकरा विंधन विहिरी खोदल्या. पाणी मिळेल या आशेने दरवर्षी विहीर खोदत गेलो. मात्र अकरावेळा प्रयत्न वाया गेले. उपलब्ध विहीर व एका विंधन विहिरीतील पाणी या साठ्यावर पीकनियोजन केले. पाऊसमान व पाण्याच्या उपलब्धतेनुसार दरवर्षी चार ते पाच एकरांवर पीकनियोजन केले जाते. टोमॅटो, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, वांगी, काकडी, भोपळा या भाजीपाला पिकांचे आलटून- पालटून उत्पादन घेतले जाते. त्याबरोबर ऊस, आले व पपई ही दीर्घ मुदतीची पिकेही घेतली जातात. पिके घेताना पाण्याच्या समस्येशी तोंड द्यावे लागते. काही वेळेला पाणी कमी पडल्यानंतर उत्पादनात घट येते. परंतु आलेल्या संकटाला हिमतीने तोंड देण्याची सवय अंगवळणी पडली आहे. यातून होणारे नुकसान पिकाच्या अधिकाधिक उत्पादनातून भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. 

दहा वर्षांपूर्वी उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर व्हावा या हेतूने संपूर्ण शेतावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब सुरू केला. पाण्याचा पुरेसा वापर झाल्याने पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत झाली. नफा वाढला. पर्यायाने दरवर्षी भाजीपाला पिकांतून प्रति एकर सरासरी एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळत राहिले. उसाची एकरी 60 ते 70 टनांपर्यंत उत्पादकता वाढली. सतत वेगवेगळे प्रयोग करण्याची तयारी असल्याने दोन वर्षांपूर्वी केळी पिकाकडे वळलो. सुमारे 50 गुंठ्यांवर केळीचे पीक घेण्याचे निश्‍चित केले. त्याआधी उसाचे पाचट कुजवलेल्या शेतात टोमॅटोचे पीक घेतले. टोमॅटो पिकावर अति तापमानाचा परिणाम झाला. तरीही योग्य व्यवस्थापनामुळे सरासरीपेक्षा जादा उत्पादन मिळाले. दर जादा मिळाल्याने तोटा झाला नाही. उत्पादित तीन टन मालास प्रति किलो 27 ते 28 रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता टोमॅटोच्या पिकातून सुमारे एक लाख 25 हजारांचे निव्वळ उत्पन्न हाती आले. 

टोमॅटोची झाडे शेतात तशीच ठेवून जुलै 2010 मध्ये उतिसंवर्धित ग्रॅंडनाईन जातीच्या केळीची एक हजार 850 रोपांची लागवड केली. या पिकातील अनुभव नवा असल्याने कोरेगाव येथील जयवंत जगदाळे यांचे मार्गदर्शन घेतले. केळीची रोपे लावल्यानंतर एक महिन्याने टोमॅटोची रोपे कापून सरीच्या मधील भागात टाकली. रोपांचे रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी कार्बेन्डाझिम, मॅन्कोझेब आदी बुरशीनाशकांचा वापर केला. टोमॅटोसाठी जोडलेल्या ठिबक सिंचनाच्या पाइप केळीच्या रोपांच्या बुंध्याजवळ घेऊन पाण्याचे व्यवस्थापन सुरू केले. जमिनीतील वाफशानुसार दररोज दोन तास पाणी सुरू ठेवले. वाढीच्या अवस्थेनुसार जमिनीतून खते देण्याबरोबरच 13ः0ः45, 12ः61ः0, 0ः0ः50, 0ः52ः34 ही विद्राव्य खते ठिबकद्‌वारे दिली. सूक्ष्म अन्नद्रव्येही दिली. लगडलेल्या घडांचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी प्रत्येक झाडाकडे लक्ष पुरवले. पॉवरटिलरच्या साहाय्याने आंतरमशागती केल्या. अकराव्या महिन्यात घड काढणी सुरू केली. तेथून पुढे ऑक्‍टोबरपर्यंतच्या तीन टप्प्यांतील काढणीपासून 72 टन माल निघाला. त्यास किलोला किमान सहा रुपये 75 पैशापासून कमाल आठ रुपये 75 पैशापर्यंत दर मिळाला. त्या दरम्यान रमझान ईदचा सण आल्याने सर्वाधिक दर मिळाला. उत्पादित मालाची जागेवर भावाची बोली करून व्यापाऱ्यांना विक्री केली. वाहतूक, तोडणीचा खर्च व्यापाऱ्यांकडे सोपवला. विक्रीपश्‍चात पाच लाख 40 रुपयांचे उत्पन्न मिळाले. रोपे, खते व कीडनाशकांसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च आला. ठिबक सिंचन आधीच्या पिकातील असल्याने त्यासाठीचा खर्च घसारा पद्धतीने पकडल्यास तो फारसा नाही. खर्च वजा जाता चार लाख 40 हजारांचे निव्वळ उत्पन्न शिल्लक राहिले. लागवडीवेळेसच मजुरांचा अधिक वापर झाला. अन्यथा, बहुतांश व्यवस्थापन पत्नी सौ. शोभा यांच्या बरोबरीने सांभाळल्याने मजुरीच्या खर्चात मोठी बचत करता आली. 

लावणीतील केळीची काढणी पूर्ण झाल्यानंतर पूर्ववतपणे खोडव्यासाठी राखलेल्या सक्षम पिल्लांना खत व्यवस्थापन सुरू केले. सुरवातीला शेणखत व पोल्ट्री खताचा प्रति तीन ट्रेलर या प्रमाणात वापर केला. खोडव्यातील झाडांना फेब्रुवारीपर्यंत खते दिली. मार्च महिन्यात पाणी कमी झाल्यानंतर विद्राव्य खतांच्या मात्रा कमी केल्या. खोडव्यातील उत्पादन सुरू झाले आहे. प्रति घड सरासरी 28 ते 32 किलो वजन मिळाले आहे. आतापर्यंत 13 टन माल निघाला आहे. उत्पादित मालाची तीन टप्प्यांत काढणी केली. यंदा उन्हाळ्यातील तीव्र तापमानामुळे 30 टक्के बाग वाया गेली आहे. आतापर्यंत उत्पादित झालेल्या मालास प्रति किलो सरासरी दहा रुपयांप्रमाणे दर मिळाला आहे. टप्प्याटप्प्याने काढणी केल्याने एकसारखा दर मिळाला नाही. तरीही सरासरी प्रति किलो दहा रुपये दरानुसार एक लाख 25 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. खोडव्यासाठी 45 ते 50 हजार रुपये संपूर्ण खर्च आला आहे. अजूनही उर्वरित झाडांपासून 20 टन मालाचे उत्पादन अपेक्षित आहे. लागण व खोडव्यात कमी खर्चात अधिक उत्पादनाचे तंत्र गवसल्याने या पिकाचे निडवा व्यवस्थापन सुरू केले आहे. 
तात्याबा जगदाळे, 9422023342 


कवडेवाडी येथे दुष्काळी पट्ट्यात तात्याबा व सौ. शोभा जगदाळे यांनी केळीची शेती फुलवली आहे. 


झाडांचा पालापाचोळा बुंध्यालाच गाडला. व खतांचे सुयोग्य व्यवस्थापन केल्याने चांगले उत्पादन घेणे शक्‍य झाले. 


खोडवा पिकातील केळीचा घड.