Wednesday, July 18, 2012

फुलधारणेसाठी मॅग्नेशिअम महत्त्वाचे

मॅग्नेशिअम पिकांना चस++ या विद्राव्य स्वरूपात उपलब्ध होतो. तसेच पिकांमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण 0.1 ते 0.5 टक्का एवढे असते. नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर व मॅग्नेशिअम खतांचा कमी वापर यामुळे उत्पादनांत मोठी घट जाणवत आहे. म्हणून या अन्नद्रव्याचे पीक पोषणात योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

जमिनीमध्ये मॅग्नेशिअमची उपलब्धता - 
जमिनीच्या वरच्या भागात मॅग्नेशिअमचे सर्वसाधारण प्रमाण 0.03 ते 0.84 टक्का असते. तर रेताड जमिनीत मॅग्नेशिअमचे प्रमाण सर्वांत कमी (0.05 टक्का) तर पोयटायुक्त जमिनीत मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते. (0.5 टक्का) जमिनीच मॅग्नेशिअम विद्राव्य आणि अविद्राव्य स्वरूपात आढळतो. खनिजीय मॅग्नेशिअम व सेंद्रिय पदार्थांमधील मॅग्नेशिअम हे मॅग्नेशिअमचे जमिनीतील स्रोत आहेत. 

मॅग्नेशिअमची कमतरता लक्षणे - 
पिकांना त्यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत मॅग्नेशिअमची गरज कमी अधिक प्रमाणात असते. त्यामध्ये फुलधारणा व फळधारणा अवस्थेत झाडांना मॅग्नेशिअमची गरज जास्त असते. या अवस्थेत पिकांतील इतर अवयवांतील मॅग्नेशिअम फूल व फळ यांच्या वाढीसाठी जास्त खर्च होतो. त्यामुळे फूल व फळधारणा अवस्थेत पिकांना पुरेसे मॅग्नेशिअम उपलब्ध न झाल्यास पिकांमध्ये मॅग्नेशिअमच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात. मॅग्नेशिअमच्या कमतरतेची लक्षणे प्रथम जुन्या पानांवर दिसून येतात. मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे झाडांची पाने सुकून जातात आणि जुन्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात व कालांतराने शिरांकडील भाग पिवळा पडतो. तसेच मॅग्नेशिअमची पिकांना जास्त कमतरता झाल्यास पालाश कमतरता व मॅग्नेशिअम कमतरता यामध्ये फरक करणे अवघड होते. 

मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्यांचा अभाव जाणवतो व पाने लहान आकाराची दिसतात. काही पिकांमध्ये मॅग्नेशिअमच्या अभावामुळे जुन्या पानांच्या कडा तपकिरी रंगाच्या दिसतात. कापूस या पिकात मॅग्नेशिअमच्या अभावामुळे पानांचा रंग लाल होतो. म्हणजेच हरितद्रव्याचा ऱ्हास पानांतील इतर रंगद्रव्यांच्या विघटनाच्या तुलनेत जास्त होतो. तसेच पानांतील प्रथिनांचा ऱ्हास होतो व पाने सुकून जातात. पाने सुकून किंवा पिवळी पडणे ही प्रक्रिया ज्या पानांवर सूर्यप्रकाश जास्त पडतो. अशा भागातील पानांवर जास्त असते तर ज्या पानांवर सावली पडते ती पाने हिरवी राहतात. मका पिकात सर्वांत खालच्या पानांमध्ये पिवळसर रेषा दिसतात, नंतर संपूर्ण पानांवर पसरतात. अति मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे पानांवर डाग दिसतात. पानांची गळ होते. 

मॅग्नेशिअमचे पीक पोषणातील कार्य - 
-हरिद्रव्य तयार होण्यासाठी मॅग्नेशिअमची गरज असते. प्रकाशसंश्‍लेषण क्रियेमध्ये मॅग्नेशिअम महत्त्वाची भूमिका बजावतो. 
-पिकांमध्ये कर्बोदके, प्रथिने व मेद तयार होण्यासाठी, त्यांचे वहन व पिकांत साठा होण्यासाठी मॅग्नेशिअम उपयुक्त असते. 
-मॅग्नेशिअममुळे पिकांतील संप्रेरके व त्यांचे कार्य यांची गती वाढते. 
-पिकांमध्ये संप्रेरके व ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मॅग्नेशिअम अन्नद्रव्य महत्त्वाचे असते. 
-पिकात न्युक्‍लीक आम्ल (ठछअ) तयार होण्यास कार्य करते. 
-पिकांमध्ये ऊर्जा साठवण क्रियेमध्ये मॅग्नेशिअमची उपयुक्तता आहे. 
-पिकांतील पेशींची वाढ, पेशीभित्तका तयार होण्यास मॅग्नेशिअम महत्त्वाचे आहे. तसेच पिकांमध्ये पाण्याचे प्रमाण व संप्रेरकाचे प्रमाण संतुलित ठेवण्यास उपयुक्त असतो. 
-पिकांमध्ये लोहाचा वापर जास्त होण्यास मॅग्नेशिअम मदत करतो. 

मॅग्नेशिअम वापरण्याचे प्रमाण व पद्धत मॅग्नेशिअम जमिनीतून वापर पेरणी किंवा लागवड करतानाच 20 किलो प्रति हेक्‍टरी करावा किंवा पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये फवारणीद्वारे 0.2 ते 0.5 टक्का (20 ते 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून) वापर करण्यात यावा.