Wednesday, July 18, 2012

बोन्सायचे प्रकार


बोन्साय ही निसर्गाची एक उत्कृष्ट लहान प्रतिकृती आहे. बोन्सायला आकार देण्याआधी निवडलेले झाड निसर्गात कसे वाढते याचे निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बोन्सायचे मूलभूत सहा प्रकार आहेत. या मूलभूत (स्टाइल) प्रकारावरून अनेक प्रकार पडतात. 
1) औपचारिक / अनौपचारिक उभे - सर्वसाधारणपणे निसर्गात वाढणारे वृक्ष सरळ उभ्या बुंध्याचे व चारही बाजूंनी फांद्यांचा समतोल असणारे असतात, याला औपचारिक असे म्हटले जाते; तसेच ज्या झाडांचा बुंधा वाकडा आहे, त्यांस अनौपचारिक म्हटले जाते. या पद्धतीकरिता गोल कुंडी वापरावी. 
2) तिरकस उभे - आपण एखाद्या उघड्या रानात किंवा समुद्रकाठी गेलो, तर आपल्याला सगळी झाडे वाऱ्यामुळे एका बाजूला झुकलेली दिसतात. या स्थितीला लक्षात घेऊनच या पद्धतीचा उगम झाला. या पद्धतीचे बोन्साय अंडाकृती कुंडीत चांगले दिसते. रोपटे लावतानाच तिरपे लावावे. 
3) जुळे खोड / बहू खोडे - या पद्धतीत वृक्षाला एक मुख्य खोड नसून, मुळापासूनच दोन खोडे किंवा बहू खोडे असतात. पण बहू खोडे असलेल्या वृक्षांना समतोल न देता नैसर्गिक; पण त्या दृष्टीने तीन, पाच, सात किंवा नऊ अशी खोडे असतात. 
4) उतरती पद्धत - एखाद्या डोंगराळ ठिकाणी आपण गेलो, तर अशा प्रकारची झाडे हमखास आढळतात. झाडांचे मूळ फांद्यांच्या पातळीपेक्षा वरती व पाहताच एखादा झरा वाहत असल्याचा भास होतो, यालाच उतरती पद्धत म्हणतात. ही अतिशय वेगळी पण तेवढीच देखणी पद्धत आहे. या पद्धतीला मात्र कुंडी उंच वापरतात, उथळ नको. जुनिपर्स या पद्धतीसाठी उत्तम आहे. 
5) जंगल - एका पसरट कुंडीत अनेक झाडे लावली जातात. बहुखोडेप्रमाणे झाडांची संख्या तीन, पाच, सात अथवा नऊ असावी. झाडे ओळीत नसून पुढे-मागे लावण्यात येतात. सर्वांत उंच व जुने झाड मध्यभागी असावे व त्याच्या बाजूला इतर लहानशी झाडे असावीत. हे पाहताच एक जंगल आहे असा भास होतो. एकाच जातीची झाडे किंवा दोन-तीन वेगवेगळ्या जातीची झाडे एकत्र करता येतात. 
6) खडकावरील बोन्साय - नदीकाठी जी झाडे वाढतात ती वरच्यावर पाहिले, तर त्यांचा शेंडा सर्वसाधारणपणे वृक्षाप्रमाणे दिसतो; पण जेव्हा आपण त्यांच्या मुळांकडे पाहतो, तेव्हा मुळांचे विलक्षण चित्र डोळ्यांसमोर येते. नदीच्या प्रवाहामुळे माती वाहून जाते व केवळ खडकाचा आधार असलेले हे वृक्ष आहेत हे आपल्याला दिसते. मुळे उघडी करून दगडावर मांडणी जरी आकर्षक दिसत असली, तरी प्रत्यक्ष ते करणे अवघड आहे. एखाद्या झाडाची मुळे उघडी करताना जर काळजी घेतली नाही, तर इजेमुळे ते झाड दगावू शकते.
 
बागेसाठी पाम 
लॅंडस्केपिंगमध्ये पाम गटातील विविध प्रजातींचा वापर करण्यात येतो. पामचा वृक्ष त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लोकप्रिय आहे. याचे खोड स्वच्छ, सरळ, उंच वाढणारे असते. खोडाच्या टोकाला पाने डेरेदार रचनेत येतात. अनेकदा खोड खाली जाड, गोल आकाराचे व टोकाला निमुळते होणारे असते. पाने नाजूक किंवा अवाढव्य असल्याने आपल्याला हवी ती प्रजात निवडून तिचा लॅंडस्केपिंग करताना हवा तसा वापर करता येतो. पामचा वापर "ऍव्हेन्यू'करिता करावयाचा असल्यास रॉयल पाम, बॉटल पाम, फिशटेल पाम, अरेका पाम इ. लावण्यात येतात. हे पाम उंच व सरळ वाढतात व यांचे खोड रस्त्याला एकप्रकारे वेगळे स्वरूप प्रदान करतात. 

लॉनच्या कडेला लावण्यासाठीदेखील पामचा वापर करता येतो. पामची पाने दाट नसल्याने त्यातून सूर्यप्रकाश खाली झिरपतो व यामुळेच लॉनमध्ये लावण्यासाठीदेखील पामचा वापर करता येतो. शिवाय, या पामच्या खोडाभोवती फुलझाडे व शोभिवंत पानांच्या वनस्पतीही लावता येतात, यामुळे मोठी लॉन आकर्षक करता येते. बागेमध्ये अनेकदा लॉन लावताना ती समतल न लावता उंच-सखल लावण्यात येते. अशा ठिकाणी उंचवट्यावर बुटके, जाड-गोल खोडाचे पाम लावून तो परिसर उठावदार करता येतो. अशा ठिकाणी दोन ते तीन पाम एकत्र लावण्यात येतात. मोठ्या रॉकरीमध्येही पाम लावण्यात येतात. पाम ही वनस्पती अत्यंत सावकाश वाढणारी आहे. हिची लागवड आउटडोअर व इनडोअर अशा दोन्ही ठिकाणी करता येते. काही पाम अगदी 60 ते 90 सेंटिमीटर उंच वाढणारे असतात. असे पाम छोट्या कुंडीत लावून टेबलवर ठेवता येतात. बहुतेक पाम तीन ते पाच फूट उंच वाढेपर्यंत दिवाणखान्यात, पॅसेजमध्ये, टेरेस गार्डन, बाल्कनी किंवा ऑफिसमध्ये ठेवण्यात येतात. मोठे झाल्यावर हेच पाम बागेमध्ये लावता येतात. पामला जेव्हा फुले व फळे येतात, तेव्हा ते बागेच्या सौंदर्यात भर टाकतात. पाम सदाहरित असल्याने बाग वर्षभर हिरवीगार दिसते. याची पाने एकदम कधीही सुकत नाहीत की पिवळी पडत नाहीत. हळूहळू एक-एक पान सुकत जाते, त्यामुळे ही वनस्पती बागेत कचरा अजिबात तयार करत नाही. सुकलेली पाने हाताने काढून टाकावी लागतात व यामुळेदेखील इनडोअर प्लॅंटकरिता पाम अत्यंत उपयुक्त आहे. अनेकदा लॅंडस्केपिंग करताना इमारत व व्यक्तींची सुरक्षितता जपणे आवश्‍यक ठरते.