Wednesday, July 18, 2012

शेतकऱ्यांनो, कृषी उद्योजव व्हा..

मानसिकता बदला ! 
सी. ई. पोतनीस, 
व्यवस्थापकीय संचालक, निटॉर 
उद्योजक होण्यासाठी बिझनेस, उद्योग रक्तात असावा लागतो, हे चुकीचे आहे. पिढ्यान्‌ पिढ्यांच्या उद्योगांपेक्षाही अनेक नवीन उद्योजकांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. उद्योजकता ही मानसिकता आहे. त्यामुळे उद्योजक होण्यासाठी सर्वप्रथम आपण आपली मानसिकता तशी घडवली पाहिजे. 

सकारात्मक व नकारात्मक अशा दोन प्रकारच्या धारणा असतात. आपल्यावर लहानपणापासून नकारात्मक धारणेचा पगडा असतो. आपल्याला लहानपणापासून 18 वर्षांपर्यंत एक लाख 48 हजार वेळा "तुला हे जमणार नाही', असे ऐकवले जाते. नकारात्मकतेसह सुरवात ही उद्योजकतेसाठी धोक्‍याची घंटा असते. उद्योग माझ्यासाठी नाही, अशी धारणा असणारा कधीच उद्योजक होऊ शकणार नाही. धारणा असेल तसे विश्‍व घडते. म्हणून धारणा सकारात्मकच हवी. स्वतःवरील विश्‍वास हा व्यवसायाचा पाया असतो. बहुतेक तरुण मुलांची व्यवसायाची कल्पना फारच छोटी, त्रोटक असते. त्यात दूरदृष्टी नसते. स्वप्नं पाहायचीच तर ती मोठीच पाहिली पाहिजेत. कारण प्रेरणा ही फक्त मोठ्या गोष्टीतून येते. शाळा महाविद्यालय सोडले की आपण शिकणे थांबवतो. खरे तर तेथून पुढे शिकण्याची खरी सुरवात होते. प्रत्येक अनुभव स्वतः घेण्यापेक्षा इतरांच्या अनुभवातून शिकले तर वेगाने प्रगती करता येते. यासाठी पुस्तके, भाषणे, चर्चासत्रे अतिशय महत्त्वाची असतात. मी केव्हा शिकणार आणि केव्हा उद्योग करणार, अशी चिंता करण्याची गरज नाही. दररोज तासभर वेळ दिला तरी ते सर्व सहजसाध्य होऊ शकते. उद्योजकाकडे नेतृत्व अंगभूत असावे लागत नाही. महात्मा गांधी, बिल गेट्‌स, नारायणमूर्ती या प्रत्येकाने स्वतःतील न्यूनगंडावर मात करून नेतृत्व घडवले. आयुष्यात प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक करायला हवी. यासाठी जाणीवपूर्वक जगणे हा यशाचा पहिला मार्ग आहे. एकमेकांच्या सहयोगातून निर्माण केले तर अधिक लाभ मिळतो. कृषी क्षेत्रात यापुढील काळात सहयोगातून क्रांती होणार आहे. त्यामुळे ही वृत्ती निर्माण करावी व त्यादृष्टीने त्याकडे बघावे. आपण बुध्यांकाला अवास्तव महत्त्व देतो. उद्योगासाठी तुमचा बुध्यांक नाही तर भावनांक खूप चांगला असावा लागतो. तुमची स्वतःबरोबर व दुसऱ्याबरोबर वागण्याची क्षमता तुमचे यश ठरवते. उद्योजकाच्या अंगी शिस्त हवी. त्याशिवाय कुठलाच उद्योग घडू शकत नाही. वेळ चुकली की सर्व चुकते. उद्योजकाचा एक पाय वर्तमानात व दुसरा भविष्यात असावा लागतो. मुळात उद्योगाचा हेतू उदात्त हवा. 

...असा करा प्रकल्प अहवाल
निशिकांत देशपांडे, 
बॅंकिंग तज्ज्ञ 
कृषी उद्योगासाठी कर्ज, गुंतवणूक, शासकीय अनुदाने, सवलती हवी असेल तर प्रकल्प अहवाल तयार करणे अत्यावश्‍यक असते. सुयोग्य प्रकल्प अहवाल हा उद्योजक, बॅंक, वित्तीय संस्था, शासनाची धोरणे, योजनांची उद्दिष्टे, तांत्रिक, आर्थिक बाजू, बाजारपेठ अभ्यास, सामाजिक फायदे या सर्वांचा एकत्रित विचार करून तयार होतो. तुम्ही प्रकल्प वेगळ्या पद्धतीने पाहिला, तुमचे सर्वोत्तम पाऊल टाकले तर बॅंक तुमच्या मागे येईल. प्रकल्पासाठी सल्लागार काळजीपूर्वक निवडावा. संबंधित सल्लागार बॅंकांच्या काळ्या यादीत किंवा गुप्त नकारात्मक यादीत नसल्याची खातरजमा करावी. उद्योग कसा अपेक्षित आहे, तुमची माहिती, शैक्षणिक व तांत्रिक पात्रता, अनुभव, आर्थिक गुंतवणूक, आर्थिक माहिती, क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट व कंपनी क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याबाबत सविस्तर माहिती असावी. वीजपुरवठा, कच्चा माल व त्याची गुणवत्ता, सल्लागार या तांत्रिक बाबी, बाजारपेठेचा अभ्यास, विक्री कशी होणार, निर्यातीच्या संधी, विविध प्रमाणपत्रे, प्रकल्पाचा एकूण अपेक्षित खर्च व प्रस्तावित अंशदान, कर्ज उभारणी याचाही विचार करावा. मुलाखतीची चांगली तयारी करावी.कर्जाची दीर्घ मुदत व परतफेड सुरू होण्याआधी दिलेली मुदत लक्षात घेऊन तेवढ्या कालावधीचे संभाव्य ताळेबंद पत्रक तयार करावे. खेळते भांडवल कसे उभारणार, वीज, पाणी, पगार, वेष्टण, प्रसिद्धी, कर्जाच्या परतफेडीचे नियोजन काय आहे. विविध परवाने मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न व सद्य:स्थिती याची माहिती बॅंकेला द्यावी. तुमची क्षमता, प्रकल्पाची क्षमता, कोणते उत्पादन घेणार, किती, उत्पादन प्रक्रिया, आवश्‍यक यंत्रसामग्री व ती कोठून घ्यावी, तांत्रिक बाजू, व्यापारी दृष्टिकोन, आर्थिक बाजू, परवाने, अभिप्रेत व्यवस्थापन, लागू असलेले राज्य व केंद्राचे कायदे, मनुष्यबळ, कुशल, निमकुशल, विक्री व्यवस्थापन, प्रोत्साहने व अनुदाने, उपलब्ध व्यवसायाभिमुख सेवा लक्षात घेऊन प्रकल्प अहवाल तयार करावा. 

फायनान्स महत्त्वाचा... प्राजक्ता देव, 
अर्थ विषयक सल्लागार 
आर्थिक बाबींचा नीट अभ्यास करून व्यावहारिकपणे निर्णय घेतल्यास खूप फायदा होतो. व्यवसाय करताना नफा, तोटा, व्यवसायाची वाढ, उलाढाल, डिमांड, शासकीय धोरण, किंमत या गोष्टी माहिती हव्यात. प्रॉफिट व मार्जिनऐवजी किती पैसे गुंतवले व किती परतावा मिळाला, याकडे सर्वाधिक लक्ष हवे. परतावा पुरेसा नसेल तर तो व्यवसाय बंद करून दुसरा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. रोख उलाढाल वृत्तांत, नफा तोटा वृत्तांत व ताळेबंद तयार करणे व अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे असते. अनेकदा नफा कागदोपत्री असतो, पैसे हाती आलेले नसतात. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी "कॅश फ्लो' म्हणजेच तुमच्या हाती नक्की किती रक्कम राहते, हे महत्त्वाचे असते. कॅश फ्लो हा व्यवसायाच्या टिकाऊपणाचा निर्देशांक असतो. कॅश फ्लो व्यवस्थित नसल्याने 90 टक्के उद्योग बंद पडतात. उद्योजकाला स्वतःचा कॅश फ्लो मांडता आला पाहिजे. वैयक्तिक खर्च, स्थिरमत्ता संपादन केल्याने हाती पैसा राहत नाही. त्यामुळे कॅश फ्लोचे योग्य नियोजन करूनच खर्चाचे व गुंतवणुकीचे नियोजन केले पाहिजे. भांडवली जमेमुळे कॅश फ्लो वाढतो. कॅश फ्लो तयार करताना रोख उत्पन्न, देणेकऱ्यांकडून वसुली व व्याज व इतर उत्पन्न; कच्चा माल खरेदी, कामगार मजुरी, उत्पादन खर्च, परिवहन खर्च व मार्केटिंगचा खर्च, एकूण महसुली खर्च, निव्वळ रोख नफा, वजा होणारी स्थिर मालमत्ता प्राप्ती, भांडवली जमा व गुंतवणूक, निव्वळ भांडवली जावक, व्यवसायातील रोख मिळकत, मालकाने काढलेली रक्कम, वैयक्तिक खर्च, इत्यादींचा विचार करून निव्वळ शिल्लक रोख रक्कम म्हणजेच कॅश फ्लो आखता येतो. वैयक्तिक खर्च हा नेहमी रोख मिळकतीहून कमीच असला पाहिजे. व्यवसायाची ध्येय, ते कसे साध्य करता येईल याचा तर्क व मांडणी याचा विचार करून प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करावा. आर्थिक, विपणन, व्यवस्थापन व कार्यांच्या नियोजनाचा त्यात समावेश असावा. 

निर्णय ठाम हवा
सत्यवान काशीद, संचालक, एशियन बायोटेक्‍नॉलॉजीस 
कृषी शिक्षण घेतल्यानंतर मी शासकीय नोकरीच्या मागे न लागता सात-आठ वर्षे विविध कृषी उद्योगांमध्ये राज्यभर कामाचा अनुभव घेतला. या अनुभवाच्या जोरावर उद्योगाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसतानाही स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. भांडवल काही नव्हते. विचार पक्का व निर्णयावर ठाम असल्यास उद्दिष्ट नक्कीच साध्य होते. तुम्ही जसा विचार कराल, जसे कर्म कराल तसे तुम्ही घडता. उद्योग सुरू करताना माझ्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी पहिल्या दोन- तीन महिन्यांत 200-300 वितरक नेमले. प्रत्येकाकडून 25 हजार रुपये अनामत रक्कम घेतली. यातून उद्योगासाठी मुख्य भांडवल उभे करून पुढील सर्व विकास, विस्तार केला. 2006 मध्ये नाशिकमध्ये शून्यातून सुरू केलेल्या माझ्या जैविक खते व औषधी निर्मितीचा उद्योगाची उलाढाल आता 25 कोटी रुपयांहून अधिक वाढली आहे. कुठलाही व्यवसाय करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वे केला पाहिजे. मार्केटमध्ये काय स्कोप आहे, ग्राहकांची गरज काय हे लक्षात घेतले तर जास्त फायदा होतो. उद्योग सुरू करण्याआधी बारकाईने सर्वेक्षण, अभ्यास केला पाहिजे. ग्राहकांच्या व तुमच्या गरजेतून उद्योगांच्या नवनवीन संधी खुल्या होत जातात. शेतकऱ्यांचा फायदा डोळ्यांसमोर ठेवून काम केल्यास कृषी उद्योगात प्रचंड संधी आहेत. 

कोणताही उद्योग यशस्वी करणे हे "टीम वर्क' असते. कर्मचाऱ्यांना कामाचे समाधान मिळाले पाहिजे. करचुकवेगिरी कधीच लपत नाही. कधी ना कधी कर भरावाच लागतो. त्यातून सुटका नसते. कोणताही उद्योग करताना गुणवत्तेशी तडजोड करता कामा नये. अनेक कंपन्या 20-30 हजार रुपयांत "आयएसओ' प्रमाणपत्रे मिळवतात. प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. निकष पाळले तरच ग्राहकांचा व पर्यायाने कंपनीचाही फायदा होतो. खरेदी- विक्री करतानाही नियम व अटींचे पालन केले पाहिजे. रक्कम चेक देणे, बिलिंग, कायदेशीर बाबी, शासकीय परवाने, उत्पादनाचे प्रमाणपत्रे, तपासणीचे रिपोर्ट बारीक सारीक गोष्टींचे काटेकोर पालन केले पाहिजे. 

नाबार्डच्या योजना
सुनील जाधव, नाबार्ड 
गेली 30 वर्षे नाबार्ड शेतीला होणारा पतपुरवठा सुलभ व्हावा, शेतीसाठीचा पतपुरवठा वाढावा यासाठी कार्यरत आहे. नाबार्डमार्फत राष्ट्रीयीकृत बॅंक, शेतकरी ग्रामीण बॅंका, जिल्हा सहकारी बॅंकांना कर्जपुरवठा केला जातो. शेतकरी मंडळे व बचत गटांच्या संगोपनाचे विस्ताराचे कार्य नाबार्डने केले. 

कृषी उद्योगांसाठी नाबार्डच्या 25 हून अधिक योजना आहेत. या सर्व योजनांची सविस्तर माहिती नाबार्डच्या विभागीय कार्यालयांमध्ये अथवा संकेतस्थळावर मिळू शकते. यामध्ये हरितगृहातील शेती, विविध प्रकारची फळबाग लागवड, दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, शेतीचे यांत्रिकीकरण आदी सर्व बाबींचा समावेश आहे. अन्नप्रक्रिया उद्योगांसाठीही नाबार्डकडून अर्थसाहाय्य केले जाते. नाबार्डमार्फत कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जात नाही. फक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाते. किमान 50 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन "कंपनी ऍक्‍ट 1956' मधील कलम 518 नुसार कंपनी स्थापन केली, तर तिला नाबार्डमार्फत थेटपणे कर्ज मिळू शकते. ही उत्पादक कंपनी शेतीसंबंधी कोणत्याही उद्योग व्यवसायात काम करू शकते. त्यांना योग्य तारणावर 10 ते 12 टक्के व्याजदराने पाहिजे तेवढे कर्ज उपलब्ध करून देण्याचे नाबार्डचे धोरण आहे. उत्पादक कंपन्यांना पतपुरवठ्याची काहीही मर्यादा नाही. मागेल तेवढे कर्ज मिळू शकते. लघु सिंचन योजना, ऊस तोडणी यंत्रे, ट्रॅक्‍टर, प्रक्रियेची यंत्रसामग्री, पशुधन, गांडूळ खत, जैविक खते आदी अनेक बाबींसाठी नाबार्डच्या पतपुरवठ्याच्या योजना आहेत.