जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील जयपाल लक्ष्मण मोरे उमर्दे (ता. एरंडोल) येथील शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. गावाकडे त्यांची एकत्रित कुटुंब पद्धतीची शेती आहे. त्यांची एकूण 22 एकर शेती असून संपूर्ण क्षेत्र बागायती आहे. त्यात ते केळी, कापूस, मका, मिरची ही पिके घेतात. सुमारे 18 एकर क्षेत्रावर ते ठिबक सिंचन तंत्राचा वापर करतात. त्यांचे भाऊ अनिल, विश्वास यांच्यासह ते शेतीची जबाबदारी सांभाळतात.
पिकाचे व्यवस्थापन
मोरे गुरुजींनी कलिंगड पिकाची प्रगत तंत्रज्ञानावर आधारित लागवड केली. त्यासाठी जैन इरिगेशन कंपनीचे तज्ज्ञ बी. डी. जडे यांचे मार्गदर्शन घेतले. 21 फेब्रुवारी 2012 रोजी कलिंगडाची अडीच एकर क्षेत्रावर लागवड केली. त्यासाठी खासगी कंपनीची संकरित जात निवडली. लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वमशागत करताना नांगरटीच्या पाळीनंतर जमिनीत तीन ट्रॉली शेणखत टाकले. रोटावेटरने ते जमिनीत चांगले मिसळून जमीन भुसभुशीत केली. गादीवाफा तयार करताना जमिनीत डीएपी तीन गोण्या, सिंगल सुपर फॉस्फेटच्या पाच गोण्या, पोटॅशच्या तीन, युरिया एक गोणी, निंबोळी पेंड पाच गोणी, गांडूळ खत 20 गोण्यांचा अडीच एकर क्षेत्रासाठी वापर केला. जमिनीत हे मिश्रण मिसळून घेतल्यानंतर गादीवाफे तयार केले. 2.5 फूट रुंदीच्या गादीवाफ्यांची उंची एक फूट ठेवली. त्यावर सिल्व्हर ब्लॅक रंगाची पॉलिथिन मल्चिंग फिल्म पसरवून नीट बसवून घेतली. मल्चिंग फिल्म पसरण्यापूर्वी गादी वाफ्यावर इनलाईन ठिबकच्या नळ्या सरळ ठेवून त्या शेवटी खुंटीला बांधून घेतल्या. मल्चिंग फिल्म बसविल्यानंतर दोन ओळींतील अंतर सव्वाफूट आणि दोन छिद्रांमध्ये अंतर दीड फूट ठेवले. दोन ओळींतील छिद्रे करताना समोरासमोर न ठेवता झिगझॅग (त्रिकोणीय) पद्धतीने केले. लागवड करण्यापूर्वी ठिबक सिंचन सुरू करून जमीन वाफसा अवस्थेत आणली. त्यानंतर लागवड केली. लागवड करण्यापूर्वी बियाणे रात्रभर कोमट पाण्यात भिजविले. त्यानंतर बियाणे गोणपाटामध्ये ठेवून ते कापसाच्या ढिगामध्ये ठेवले. त्यामुळे बियाणे लवकर उगवणीस मदत झाली. प्रत्येक छिद्रामध्ये एकेक बी टोकण पद्धतीने लावले. बियाणे मातीने झाकून घेतले आणि त्यानंतर ठिबक सिंचनाने 10 ते 15 मिनिटे पाणी दिले. लागवड करताना ठिबक सिंचनाची दोन नळ्यांची आठ फूट अंतरावर उभारणी केली. नळीच्या दोन्ही बाजूंस वरीलप्रमाणे लागवड केली. ठिबकमधून विद्राव्य खते देण्यासाठी व्हेंच्युरी बसवून घेतली. बियाण्याची उगवण जमिनीतील वाफसा आणि बियाणे कोमट पाण्यात भिजविल्याने लवकर आणि उत्तम झाली. लागवडीच्या वेळीच काही बियाणे पॉली ट्रेमध्ये टाकून रोपे तयार करून घेतली. ज्या ठिकाणी खाडे (गॅप) पडले होते तेथे रोपे लावून गॅप भरून घेतले. उगवणीनंतर पहिले 25 दिवस विद्राव्य खत 19:19:19 आणि युरिया एक दिवसाआड प्रत्येकी 4.5 किलो आणि अडीच किलो प्रति एकर दिले. त्यानंतर 19:19:19, 12:61:0, 0:52:34, 13:0:45 यांचा वाढीच्या अवस्थेनुसार वापर केला. लागवडीनंतर आठ दिवसांनी चिलेटेड बोरॉन 1.5 किलो अडीच एकरासाठी ठिबकमधून सोडले. 30 दिवसांनंतर कॅल्शिअम नायट्रेट सहा किलोचे चार डोस ठिबकमधून सोडले. ठिबकमधून विद्राव्य खतांचा टरबूज पिकांच्या अवस्थेनुसार म्हणजे रोपापासून वाढीच्या अवस्थेत 19:19:19 आणि युरियाचा उपयोग केला. उत्तम फूलधारण, फळधारणा होण्याआधी 12:61:0 तर फळांची उत्तम वाढ व आकार मोठा व्हावा यासाठी 0:52:34 चा उपयोग केला. फळांना आकर्षक चकाकी यावी, फळांना आतून लाल रंग आणि गोडी वाढावी यासाठी 13:0:45 चा उपयोग केला.
टरबूज पिकात पीक संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असते. तज्ज्ञांनी सुचविल्याप्रमाणे करपा, मूळकूज रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईडचे ड्रेंचिंग केले. दर आठवड्याला मॅन्कोझेब, कार्बेन्डाझिम अशा बुरशीनाशकांचा वापर केला. डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू येऊ नये म्हणून दक्षता घेतली. किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर केला. पीक संरक्षण अत्यंत काळजीपूर्वक केल्याने तसेच संजीवके, सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी, ठिबकमधून विद्राव्य खतांचा वापर केल्याने पीक जोमदार वाढले.
काढणीचे नियोजन
एकूण नियोजनातून उत्कृष्ट गुणवत्तेची वजनदार फळे मिळाली. पीक काढणीस आले तरी ते हिरवेगार होते. वेलीचा शेंडा चालतच होता. नवीन फुलेही येत होती. वेलींवर लहान फळेही दिसून येत होती. काढणी लागवडीपासून सुमारे 67 दिवसांपासून सुरू झाली. फळे जसजशी पक्व होत गेली तसतशी सात ते आठ दिवसांच्या अंतराने फळांची तोडणी केली. मुख्य पिकातील फळांची 25 ते 30 दिवसांत काढणी संपली. या 30 दिवसांत नऊ गाड्या फळे काढली. मुख्य पिकाचे अडीच एकरामध्ये सुमारे 79.345 टन उत्पादन मिळाले. साधारणपणे फळे तोडण्याच्या वेळी वेलीवरची पाने पिवळसर होऊन गळायला सुरवात झालेली असते. त्या वेळी फळे तोडून झाल्यानंतर शेतकरी वेली उपटून टाकून पुढील पिकासाठी जमीन तयार करतात. जेव्हा पहिल्या बहराची सर्व फळे तोडून झाली तरीही वेल हिरवीगार होते, पाने निरोगी आणि मोठी होती, शेंडा वाढतच होता. वेलीवर लहान फळे आणि फुले दिसत असताना वेली उपटून न देता पिकाचा पुनर्बहर घेण्याचे ठरवले. परिसरातील शेतकऱ्यांना हे अशक्य वाटत होते. अर्थात निर्णय धाडसी होता. त्या वेळी तापमानही 42 अंश से. होते. तरीही निर्णय पक्का केला आणि पुन्हा मुख्य पिकाप्रमाणे पुनर्बहराच्या पिकाला पाणी आणि विद्राव्य खतांचा वापर ठिबकमधून सुरवात केला. कलिंगडाच्या शेतीमध्ये थोडी साफसफाई केली. त्यात वाढलेले तण उपटून घेतले. ठिबकने पाणी आणि खते दिल्याने फळे चांगली पोसली गेली. सुमारे 25- 30 दिवसांनंतर पुनर्बहर फळांची तोडणी सुरू झाली. त्यापासून 17.70 मे.टन उत्पादन मिळाले. अडीच एकरामध्ये मुख्य पीक आणि पुनर्बहराचे पिकापासून एकूण 97.045 मे.टन उत्पादन म्हणजे एकरी 38.818 टन उत्पादन मिळाले. पुनर्बहराचे पीक पुढेही सुरू ठेवता आले असते, कारण वेलीवर लहान फळे अजून होतीच, परंतु जून महिना सुरू झाला होता. तसेच वातावरणातील तापमानात मोठी घट झाली होती. कडक उन्हाळा नसल्याने आणि आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने कलिंगड फळांची मार्केटमध्ये मागणीही कमी झाल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे तज्ज्ञांशी पुन्हा चर्चा करून टरबूज पीक थांबविण्याचे ठरविले. विक्री शेतात जागेवरच व्यापाऱ्यांना केली. मुंबई, इंदूर येथे हा माल गेला. मोरे गुरुजींनी काही फळे पिंप्री, धरणगाव, जळगाव आणि मालेगाव येथे स्वत: गाडी करूनही विक्री केली. केवळ उत्पादनाचाच नव्हे तर विक्रीचाही चांगला अभ्यास केल्याने या पिकातून त्यांना चांगले यश मिळाले.
कलिंगड पिकासाठी गादी वाफा, ठिबक सिंचन तंत्र, मल्चिंग फिल्मचा वापर, फर्टिगेशन तंत्र, संजीवके आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, विक्री तंत्राचा अभ्यास यातून कलिंगड पिकाचा प्रयोग यशस्वी झाला. अडीच एकरांत 115 ते 120 दिवसांत 4,90,740 रुपयांचा तर एकरी 1,96,296 रुपये निव्वळ नफा मिळाला.