सर्व साधारण 70 ते 75 मि.मी. पाऊस पडल्यावर पेरणीला सुरवात होईलच. पेरणी साधल्यानंतर जमिनीचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी लगेच सर्व साधारण एका आठवड्यात परत पावसाची आवश्यकता असते; परंतु पावसामध्ये खंड पडल्यास जमिनीला भेगा पडायला सुरवात होते. त्यामुळे नुकतेच उगवलेल्या रोपांचे मूळ, खोड उघडे पडतात. अशा परिस्थितीत पिकांवर वाणी, खुरपडी (जमिनीवरचे नाकतोडे) यांचा प्रादुर्भाव होतो. किडीचे प्रौढ व पिल्ले आपल्या जबड्याच्या साहाय्याने बियांचे अंकुर, मुळे आणि जमिनीलगत रोपे कुरतडतात. अशी रोपे कोलमडतात. त्यामुळे एकरी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनामध्ये घट येते.
उपाययोजना -
उपाययोजना -
- शेतामध्ये शेणखताचे ढीग लावून ठेवू नयेत.
- धुऱ्यावरील गवताचा व इतर वनस्पतींचा वेळीच बंदोबस्त करावा.
- शेताचे नियमित सर्वेक्षण करावे.
- वाणीचे समूह आढळल्यास केरोसीनच्या पाण्यामध्ये बुडवून नष्ट करावे.
- धुऱ्यावरील गवतावर नाकतोडे आढळल्यास नियंत्रणासाठी दोन टक्के मिथिल पॅराथियान भुकटी किंवा क्विनॉलफॉस 1.5 टक्का भुकटी (उपलब्ध असल्यास) 20 किलो प्रति हेक्टरी धुऱ्यावर धुरळणी करावी. सकाळी किंवा सायंकाळी वारा शांत असताना धुरळणी करावी. बांधावर सर्वसाधारण 10 ते 15 दिवस जनावरांना चरू देऊ नये.
- ज्या भागात या किडीचा प्रादुर्भाव नियमित होत असतो किंवा दाट शक्यता असल्यास बी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 10 किलो फोरेट (10 टक्के) ओळीमध्ये जमिनीत मिसळून द्यावे. परंतु पेरणीच्या वेळी ही उपाययोजना केली नसल्यास पेरणीनंतर ज्या ठिकाणी या किडीच्या प्रादुर्भावास सुरवात झाली असेल तेथे जमिनीत ओलावा असताना रोपट्यांच्या बाजूला 10 किलो फोरेट (10 टक्के) प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे.