Wednesday, July 18, 2012

प्रयोगातून जरबेरा फुलला अभ्यासातून अधिक बहरला


पुणे- बंगळूर महामार्गावर साताऱ्यापासून जवळ नागठाणे गाव आहे. येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून मनोहर साळुंखे यांची जिल्ह्यात ओळख आहे. हलक्‍या व मध्यम स्वरूपाच्या 17 एकर शेतीत त्यांचे विविधांगी प्रयोग उभे आहेत. द्राक्षे, कलिंगड, पपई, केळी, भाजीपाला शेतीबरोबर इमूपालन व्यवसाय त्यांनी साकारला आहे. हे सर्व व्याप सांभाळण्यासाठी वेळ व कामाची सांगड घालण्यात ते यशस्वी ठरले आहेत. 

-फुलशेतीविषयी 
सन 2005-06 मध्ये ते हरितगृहामधील जरबेरा शेतीकडे वळले. राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत 20 टक्के अनुदान घेऊन 80 फूट रुंद व 450 फूट लांबीच्या आकारातील गॅलव्हनाईज पाइपच्या साहाय्याने शेड उभारले. शेडनेट व प्लॅस्टिक पेपरने ते बंदिस्त केले. त्यामध्ये जरबेरा फुलांची शेती सुरू केली. जमिनीची पूर्वतयारी म्हणून 450 ब्रास पूर्ण निचरा होणारी लाल माती प्रति ब्रास 700 रुपयांप्रमाणे विकत आणली. फुलपिकाला सेंद्रिय कर्ब पुरविण्याच्या उद्देशाने मातीत 150 ब्रास शेणखत व 5 टन सेंद्रिय खत मिसळले. पाण्याचा निचरा होण्यासाठी 20 ब्रास वाळू तसेच जमिनीचा पोत टिकवण्यासाठी 10 ब्रास भाततूस मिसळले. फॉरमॅलीनच्या साह्याने निर्जंतुकीकरण केले. बेडवर दोन ड्रीपर ठेवून इनलाईन ठिबक सिंचन केले. जुलै 2006 मध्ये चेन्नई येथून रोपे मागवून 23 हजार 100 रोपांची लावण केली. रोपांना वाढीच्या अवस्थेनुसार ठिबकदद्वारे 19-19-19, 12-61-0, 13-0-45, 0-52-34, 0-0-50 व सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली. पाने व फुलांवर येणाऱ्या रोग-किडींचा योग्य अटकाव करण्यासाठी योग्य कीडनाशकांचा वापर केला. हंगामातील वातावरणानुसार 150 ते 450 मि.लि.पर्यंत प्रति रोपास पाणी पुरवले जाते. लावणीपासून अडीच ते पावणेतीन महिन्यानंतर फुलांचे उत्पादन घेण्यास सुरवात झाली. फुलांची काढणी एकाड एक दिवसाने केली जाते. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत काढणी पूर्ण करण्याचा नित्यपणा आहे. या वेळेत फुलांची काढणी केल्यामुळे कमी तापमानात तजेलदार व देठात ताठरपणा असणारी फुले मिळतात हा अनुभव साळुंखे यांनी सांगितला. उत्पादित फुले पॅकिंगसाठी पॅकहाऊसमध्ये घेऊन प्रत्येक फुलास प्लॅस्टिकची पिशवी वापरली जाते. दहा फुले एकत्रित घेऊन रबर बॅंडच्या साहाय्याने बंच बनवला जातो. असे एकूण 40 बंच एका बॉक्‍समध्ये भरले जातात. शेतालगत कृषी विभागाच्या अनुदानावर 80 x 18 फूट अंतराचे पॅकहाऊस उभारले आहे. त्याचा वापर द्राक्षे, पपई, केळी, कलिंगड, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची व कारली यांच्या पॅकिंगसाठी झाला आहे. 

हरितगृहातून प्रति तोड्यास सात ते आठ हजार फुले मिळतात. तोडलेली फुले 2006 ते 2011 पर्यंत सातारा येथील अजिंक्‍यतारा फळे, फुले खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातून पुणे, मुंबई, दिल्ली, लुधियाना, लखनौ, हैदराबाद, गुंटूर, कोलकता, बंगळूर आदी ठिकाणी विक्रीस पाठवली. अलीकडे फुलांची विक्री स्वतः सुरू केली आहे. 
जरबेरा रोपांपासून तीन ते चार वर्षे सलग उत्पादन घेतले जाते. त्यानंतर नवीन रोपांची लागवड केली जाते. याकामी रोपांसह इतर खर्चास एकरी सात ते आठ लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. हा खर्च शेतकऱ्यांना न पेलणारा असाच आहे. जास्तीत जास्त दिवस उत्पादन देण्याच्या दृष्टीने रोपांचे काळजीपूर्वक संगोपन साळुंखे यांनी केले आहे. आजमितीला सलग सहाव्या वर्षी फुलांचे उत्पादन ते घेत आहेत. याकामी महिन्यातून एकवेळ सर्व रोपांची काळजीपूर्वक स्वच्छता केली जाते. रोपाभोवतीचा काडी कचरा, वाळलेली पाने, फुलांचे तुटलेले देठ स्वच्छतेवेळी बाजूला काढले जातात. त्यानंतर संपूर्ण बेड हलवून घेतला जातो. त्यावर एकरी तीन पोती निंबोळी पेंड, तीन पोती 5-10-5, 75 किलो डीएपी, 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 10 किलो ग्रॅन्यूअल ह्युमिक ऍसिड, मॅग्नेशिअम-कॅल्शिअम-सल्फर प्रति 10 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो एकत्रित मिसळून दिले जाते. वर्षातून एकवेळ बाजारपेठेतील दर कमी होतो. त्या वेळी वाढलेल्या फुटव्यांच्या संख्या नियंत्रित केली जाते. त्याचबरोबर बेडवरील दुरुस्त्या केल्या जातात. दरवर्षी ही कामे नित्यपणे केली जातात. फुटवे रोगमुक्त ठेवणे, पॉलिहाऊसमधील हवा खेळती ठेवणे याचबरोबर रोपांची मर टळून रोग नियंत्रित करणे सुलभ झाले. त्या अनुषंगाने उत्पादित फुलांची प्रत व संख्या चांगली मिळवण्यात यश आले आहे. 

साळुंखे यांनी फुटव्यांपासून रोपनिर्मितीचा प्रयोगही केला आहे. फुले काढताना निघालेल्या फुटव्यांच्या पाने व मुळांची योग्य छाटणी घेऊन त्यापासून पिशवीमध्ये रोपनिर्मिती करून पाहिली. या प्रयोगात यश मिळाले. हरितगृहामधील एकूण जातींपैकी दोन ते तीन जाती कमी उत्पादन देणाऱ्या होत्या. त्या पूर्णपणे काढून त्या ठिकाणी फुटव्यांपासून तयार केलेली नऊ हजार रोपे लावली आहेत. याकामी पाच ते सहा लाख रुपये खर्च अपेक्षित होता. तो कमी झाल्याने उत्पन्न वाढल्याचे त्यांनी सांगितले. फुटव्यांपासून तयार केलेल्या रोपांपासून फुलांचे उत्पादन आजमितीला चांगले मिळत आहे. त्यांनी हा अनुभव आजूबाजूच्या हरितगृह शेतकऱ्यांना दिला आहे. 

साळुंखे यांना पत्नी सौ. सुनीता, थोरले बंधू नानासाहेब व त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा तसेच जिल्हा कृषी अधीक्षक विकास पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील राजेंद्र सरकाळे यांचे मार्गदर्शन मिळते. 

लागवडीच्या पहिल्या वर्षी अनुभव कमी असल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. परंतु दुसऱ्या वर्षापासून प्रति झाडाकडून प्रति वर्षी 42 ते 46 फुलांचे उत्पादन मिळाले. आजअखेर एक फूल निर्मितीसाठी एक रुपया 17 पैसे एवढा खर्च आला आहे. विक्रीपश्‍चात प्रतिकूल दोन रुपये 20 पैसे मिळतात. चढ-उतारानुसार सर्व खर्च गृहीत धरून प्रतिफुलाला एक रुपया एवढा वार्षिक नफा मिळवता आल्याचे त्यांनी सांगितले. 

मनोहर साळुंखे- 9822603075. 

सध्या हरितगृहात मोठ्या प्रमाणात जरबेरा फुलांची लागवड झाल्याने व फुलांना हंगामी मागणी असल्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात चढ- उतार होत असतात. साळुंखे यांनी जरबेरा फुलांच्या विक्रीकरिता अवलंबलेली करार पद्धत व उत्पादन खर्च कमी करण्याकरिता रोपांपासून तयार केलेले फुटवे पुनर्लागवडीला वापरून उत्पादनखर्चात केलेली बचत ही शेतकऱ्यांना अनुकरणीय आहे. 
विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा. 

साळुंखे यांनी विविध पीक पद्धती स्वीकारली आहे. त्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या नियोजन केले आहे. बाजारपेठेतील शेतीमालाच्या विक्रीदराचा अंदाज घेऊन पीकनियोजन व व्यवस्थापन केल्यास शेती किफायतशीर ठरू शकते याची प्रचिती त्यांचे शेत पाहून येते. त्यांनी आपल्या शेतात उच्च तंत्राचा अवलंब केला आहे. नियंत्रित पद्धतीने पाणी, खतांचा संतुलित वापर व मार्केटिंगचे योग्य व्यवस्थापन यशस्वी केल्याचे पाहण्यास मिळते.