अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, अंजनगाव, परतवाडा, अचलापूर या भागात संत्रा व मोसंबी लागवडीखालील मोठे क्षेत्र आहे. विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख या भागाला त्याच कारणामुळे मिळाली आहे. अंजनगाव तालुक्यातील हिरापूरचा रहिवासी राहुल सहारे याने उच्च शिक्षण घेतले. कृषी उद्यानविद्या पदवी त्यासोबतच पत्रकारिता क्षेत्रात नशीब अजमाविण्यासाठी या विषयातील पदवीदेखील प्राप्त केली. उच्चशिक्षित राहुलचे नोकऱ्यांसाठी असलेला संघर्ष पाहून मन व्यथित झाले. त्यातून नोकरीऐवजी घरच्या शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही केली.
शेतीत करिअर -
अंजनगाव तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले हिरापूर गाव निसर्गाचा वारसा लाभलेल्या सातपुडा पर्वत रांगांत वसले आहे. राहुल यांच्याकडे वडिलोपार्जित बारा एकर शेती. सिंचनाची सोय बोअरवेल व एका विहिरीच्या माध्यमातून केली आहे. राहुलची शेती डोंगराच्या पायथ्याशी असल्याच्या परिणामी या भागातील भूगर्भातील जलस्रोत काहीसा समाधानकारक आहे. सहारे कुटुंबीयांकडे असलेल्या एकूण बारा एकर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. त्यातील तीन एकर क्षेत्रावरील लागवड 19 ते 20 वर्षांपूर्वीची असून तीन वर्षांपूर्वी उर्वरित नऊ एकर क्षेत्रावरही नव्याने संत्रा लागवड केली आहे. जुन्या बागेतून वर्षाकाठी एकरी 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न हमखास मिळते, असे ते सांगतात. बागेच्या व्यवस्थापनावर होणाऱ्या खर्चाची तूट ते या बागेत आंतरपीक घेऊन भरून काढण्याचा प्रयत्न करतात. कपाशी, सोयाबीन, तूर यासारख्या पारंपरिक पिकाची लागवड याकरिता केली जाते.
कुक्कुटपालनाची जोड
शेतीत नवनव्या प्रयोगासाठी सरसावलेल्या राहुलने कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायाची जोड देत शेती पद्धतीत चैतन्य आणले आहे. शेती फायद्याची नाही हा समज या माध्यमातून खोडून टाकण्याचा विचार समाजात पेरण्याचा त्याचा हेतू आहे. कोणत्याही क्षेत्रात उतरण्यापूर्वी त्यातील बारकावे अभ्यासणे गरजेचे होते. त्याकरिता पशुसंवर्धन अधिकारी, कुक्कुटपालन व्यवसायातील शेतकरी, या क्षेत्रातील खासगी कंपन्या यांच्याशी त्याने संपर्क साधत माहिती संकलन केले. या क्षेत्रातील बारकावे अभ्यासले. अभ्यासाअंती स्वतंत्र कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याऐवजी करार पद्धतीने तो करणे फायदेशीर असल्याचे लक्षात आले.
करार पद्धतीने व्यवसाय -
करार शेतीच्या धर्तीवर कंपन्या कुक्कुटपालन व्यवसाय करू लागल्या आहेत. मांसल कोंबड्यांची मागणी असलेल्या भागातील शेतकऱ्यांना त्यासाठी प्राधान्य दिले जाते. कंपनी मुख्यालय ते मागणी असलेली बाजारपेठ यात बरेच अंतर राहते. दरम्यान, कोंबड्यांच्या वाहतुकीवर मोठा खर्च होणार असल्याची बाब लक्षात घेत कंपन्या मागणी असलेल्या ठिकाणानजीकच अशाप्रकारे शेतकऱ्यांना करार पद्धतीने कुक्कुट व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देतात. राहुलनेदेखील या पद्धतीनुसार कुक्कुटपालन केले आहे. सन 2009-10 मध्ये अमरावती येथील एका कंपनीशी त्याने या संदर्भाने बोलणी केली. ती यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष व्यवसायास सुरवात केली. कुक्कुटपालनाकरिता लागणाऱ्या शेडची उभारणी एका राष्ट्रीय बॅंकेच्या अंजनगाव शाखेतून मिळालेल्या कर्ज रकमेतून करण्यात आली. बॅंकेने चार लाख दहा हजार रुपयांची तरतूद त्यासाठी केली. 30 x 170 फूट आकाराचे हे शेड असून, कोंबड्यांच्या संगोपनासाठी लागणारे साहित्य व शेडची उभारणी यावर सरासरी सात लाखांवर खर्च झाला. बॅंकेकडून मिळालेल्या चार लाख रुपयांत आपल्याकडील रकमेची भर टाकली.
...असा आहे करार
कंपनीद्वारा पुरवठा होणाऱ्या एका दिवसाच्या पक्ष्याचे वजन सरासरी 40 ते 50 ग्रॅम एवढे राहते. त्यानंतर प्रति किलो वजनवाढीसाठी सव्वा चार रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. विक्रीयोग्य पक्ष्यांचे वजन सरासरी सव्वा दोन ते अडीच किलो राहणे अपेक्षित आहे. पक्ष्यांसाठी लागणाऱ्या पशुखाद्य व लसीकरण औषधांचा पुरवठाही कंपनीस्तरावरूनच होतो. पक्ष्यांची वजन वाढ व त्यासंदर्भाने असलेल्या व्यवस्थापनाची जबाबदारी शेतकऱ्यावर राहते, असा हा सरळसोपा करार आहे. एक दिवसाच्या पक्ष्यांचा पुरवठा कंपनीकडून झाल्यानंतर योग्य व्यवस्थापनाअंती 45 दिवसांत पक्ष्यांचे वजन सव्वा दोन ते अडीच किलो होते. कंपनीकडून पुरवठा होणाऱ्या पक्ष्यांच्या संगोपनावर कंपनीचे सातत्याने लक्ष्य असते. त्याकरिता त्यांचे प्रतिनिधी संबंधित प्रकल्प क्षेत्राला भेटी देत असतात. त्यासोबतच बाजारपेठेचे आकलनही त्यांच्याकडून सुरू असते. शेतकऱ्याकडे विक्रीयोग्य पक्ष्यांसाठी बाजारपेठ शोधली जाते. 45 दिवसांनंतर पक्षी विक्रीसाठी येतात, ही बाब लक्षात ठेवत बाजारपेठ शोधण्यावर भर असतो. पाच हजार पक्ष्यांची मागणी राहुल नोंदवीत असतो. सुमारे 45 दिवसांनंतर हे पक्षी कंपनीद्वारा विक्री झाल्यानंतर रिकामे शेड निर्जंतुक केले जाते. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर सरासरी आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पक्ष्यांची दुसरी बॅच व्यवस्थापनकामी बोलाविली जाते. पाच हजार पक्ष्यांमागे सरासरी 40 ते 50 हजार रुपयांचे अर्थार्जन होते. व्यवस्थापनापोटी मिळणाऱ्या सव्वा चार रुपये प्रति किलो दराला दरातील तेजीच्या काळात बोनसही दिला जाते. 56 ते 60 रुपये प्रति किलो पक्ष्याचा दर असेल तर या रकमेवर दहा टक्के, 61 ते 65 रुपये किलोचा दर असेल तर 20 टक्के आणि 66 रुपये व त्यापेक्षा अधिकचा दर असेल तर 30 टक्के बोनस म्हणून संपूर्ण रकमेवर देण्याची तरतूद करारात आहे.
...असे आहे व्यवस्थापन
एक दिवसाच्या पक्ष्यांना सुरवातीला ऊब देणे गरजेचे असते. त्याकरिता सहा ब्रुडर (ऊब देण्याकरिता विजेवर चालणाऱ्या बल्बवर आधारित विशिष्ट यंत्रणा) बसविण्यात आले आहेत. प्रत्येक ब्रुडरमध्ये 200 वॉटचे चार बल्ब असतात. हिवाळ्यात तापमानात घट होत असल्याच्या परिणामी पक्षी दगावण्याची भीती राहते. त्या वेळी ब्रुडरचा उपयोग होतो. इतरवेळी देखील तापमानात घट आल्यास पक्षी या ब्रुडरच्या उबेत तग धरतात. विदर्भात उन्हाळा तीव्र असतो. अधिक तापमानाचाही पक्ष्यांचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेडच्या आजूबाजूला उन्हाळ्यात मका व शेडनेट त्यासोबतच शेडच्या टिनपत्र्यावर सूक्ष्म तुषार सिंचनाच्या माध्यमातून थंड पाण्याचे फवारे यासारख्या उपाययोजना केल्या जातात. कंपनीकडून पक्ष्याच्या वजनवाढीसाठी पशुखाद्याचा पुरवठा होतो. दोन वेळा लसीकरण, तसेच पक्ष्यांना पाण्यातून औषधे तसेच टॉनिकचा पुरवठा होतो. 45 दिवसांत तयार होणाऱ्या पाच हजार पक्ष्यांच्या व्यवस्थापनावर सरासरी दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च होतो. खर्च वजा जाता मिळणारा निव्वळ नफा 35 ते 45 हजार रुपये उरतो. बाजारपेठही निव्वळ नफ्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक ठरत असला तरी गेल्या काही वर्षांत यापेक्षा कमी मेहनताना मिळाला नसल्याचा राहुल यांचा अनुभव आहे. प्रकल्पस्थळी 24 तास देखरेखीसाठी दोन मजुरांची 100 रुपये रोजाने नेमणूक केली आहे. कोंबड्याचे मरतूक (दगावण्याचे) प्रमाण सहा टक्क्यांपर्यंत कंपनीमान्य आहे. राहुलने या व्यवसायात घट्ट पावले रोवली आहेत. नोकरीपेक्षाही जास्त पैसा या व्यवसायातून मिळत असल्याचे त्याला समाधान आहे.