Wednesday, July 18, 2012

गुणवंतरावांच्या प्रयत्नांतून चिबड जमीन झाली सुपीक


हर्सूल (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) या छोट्या गावात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा शानदार झाडांमधून प्रवेश करावा लागतो. कोणी बरे एवढ्या मेहनतीने हे सर्व केलं असावं? असा प्रश्‍न शेजारील शेताकडे पाहत गावाकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येतो. पुढे गेल्यावर शेतात प्रवेश करण्यासाठी दोन मोठे लोखंडी दरवाजे दिसतात. त्यावरील शेतीमालकाच्या नावाची पाटी आपले लक्ष वेधून घेते. गुणवंतराव देशमुख असे या मालकाचे नाव. 
गावालगतच त्यांची पाच एकर वाडी आहे. या वाडीला तारेचं कुंपण केलं आहे. शेतात प्रवेश करताच उजव्या बाजूला विहीर दिसते. मोठ्या मेहनतीने ही विहीर खोदून त्यांनी सिंचनाची सोय केली आहे. विहिरीला लागून पाण्याचे लहानसे सिंमेटचे टाके असून, या टाक्‍याच्या रस्त्याकडील बाजूस गुणवंतरावांचे कुलदैवत विठ्ठल मोठ्या ऐटीत विसावले आहे. 

आगळावेगळा इतिहास - 
या शेताला आगळावेगळा इतिहास आहे. करंडा या नावाने ते साऱ्या गावात प्रचलित होतं. या शेताची दशा पाहूनच कुणीतरी तसं नाव ठेवलं असावं. पावसाळ्यात नाल्यातून वाहणारं सारं पाणी या शेतात गोळा व्हायचं. त्यामुळे ही जमीन चिबड झाली होती, त्यातून उत्पादनाची अपेक्षाच नव्हती. म्हणून तर गुणवंतरावांना ती अगदी कमी भावात मिळाली. हे शेत हाती येताच गुणवंतरावांत दडलेला गुणी शेतकरी बाहेर आला. त्यांनी शेतीचं नियोजन करायला सुरवात केली.

चिबड जमिनीचं केलं चीज 
शेतात साचणारं पाणी आणि त्यामुळे चिबडलेली जमीन हा खरा प्रश्‍न होता. शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी दोन चरे खोदून घेतले. शेताच्या मधोमध एकमेकांना छेदणाऱ्या या चरांमुळे साचलेलं पाणी चरांत गोळा होऊ लागलं. हे पाणी पीव्हीसी पाइपद्वारे जमा करून ते सरळ विहिरीत सोडलं. त्यामुळे दोन कामं झाली. जमिनीतील अनावश्‍यक पाणी निघालं, शेतातील विहिरीचं पुनर्भरण झालं. साहजिकच विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. गुणवंतरावांनी शेणखताचा भरपूर उपयोग केला. स्वतःकडील व गावातून विकत घेऊन एकरी 25 गाड्या शेणखत शेतात टाकलं. अशाप्रकारे जमिनीचा पोत सुधारण्याचा प्रयत्न झाला. खते, फवारणी, निंदणी व डवरणीची वेळ चुकू न देणं, हे गुणवंतरावांचं वैशिष्ट्य आहे. 

शेताची सजावट - मोकाट जनावरांचा त्रास टाळण्यासाठी त्यांनी काटेरी तारेचं कुंपण करून घेतलं. शेतात प्रवेश करण्यासाठी मोठा लोखंडी दरवाजा बसविला. कुंपण व दरवाजामुळे शेताला शोभा आली. या सौंदर्यात भर टाकावी म्हणून बोगनवेल, गुलाब आदींनी शेताचं सुशोभन केलं. झाडं जशी मोठी होऊ लागली, तशी शेताला शोभा येऊ लागली. येता - जाता लोक याविषयी गुणवंतरावांना विचारू लागले. गुणवंतरावांचा उत्साह वाढला. त्यांनी झाडांची विशेष काळजी घ्यायला सुरवात केली. नागपूर - नांदेड या महामार्गाला लागूनच शेत असल्याने येणाऱ्या - जाणाऱ्या अशा प्रत्येकाची नजर शेताकडे वळते. शेताचं सौंदर्य पाहण्यासाठी काही प्रवासी जाणीवपूर्वक इथे थांबतात. काहीजण आपल्या कुटुंबासह वनभोजनाचा आनंद घेतात. या रस्त्यावरून जाणाऱ्या लग्नाच्या वरातीही येथे हमखास थांबतात. अनेकांना येथे फोटो काढण्याचा मोह अनावर होतो. 

पिकांचे नियोजन व भरघोस उत्पादन - 
शेताला नवं सौंदर्य मिळवून देतानाच गुणंवतरावांनी भरघोस उत्पादन घेण्यास सुरवात केली. परिसरातील पारंपरिक कपाशी, सोयाबीन या पिकांसोबतच गहू, हरभरा पिके ते घेतात. सोबत कांदा, वांगी, मिरची ही भाजीपाला पिके घ्यायलाही सुरवात केली आहे. संत्र्याची लागवड असून, पुढील वर्षापासून विक्रीला सुरवात होईल. तीन एकरांत 410 झाडे आहेत. या बागेत सोयाबीनचे आंतरपीक घेतले जाते. सोयाबीन काढल्यावर गहू, हरभरा पिके याच बागेत घेतली जातात. कापूस लावण्यासाठी ते पावसाची वाट पाहत नाहीत. गावातील अन्य शेतकरी कापूस लागवड करीत असताना गुणवंतराव डवरणी देत असतात. शेतातील विहिरीचे पुनर्भरण केल्याने सिंचनासाठी उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होते आणि त्यामुळे कापसाची उन्हाळी पेरणी शक्‍य होते. लागवड लवकर केल्याने पीक आधी येते. कामासाठी मजूर सहज उपलब्ध होतात. भावही चांगला मिळत असल्याचा गुणवंतरावांचा अनुभव आहे. शिवाय, खरिपाचे पीक आटोपून रब्बीचे पीक घेण्यासाठी जमीन तयार करायला वेळ मिळतो. रब्बीचेही पीक इतरांपेक्षा आधी घेऊन उन्हाळवाही चांगली करता येत असल्याचे गुणवंतराव आवर्जून सांगतात. कपाशी पीक 21 दिवसांचे झाल्यावर युरिया, पोटॅश व डीएपी एकत्र करून खताचा पहिला डोस देतात. पिकाची स्थिती व पोषणाची गरज पाहून खतांचे नियोजन केले जाते. डवरणीचे पाच फेर देऊन पिकाला भर दिली जाते. तीन ते चार वेळा निंदणी करून तणांपासून संरक्षण केले जाते.
 
बैलांचाही छंद - 
गुणवंतरावांना गोऱ्हे विकत घेऊन त्यांना शिकविण्याचा छंद आहे. दरवर्षी किंवा दोन वर्षांत एकदा तरी पाच ते दहा हजारांत गोऱ्हे विकत घेतात. त्यांना शेतीकाम, बैलगाडी असे सविस्तर प्रशिक्षण देऊन तयार करतात. असे प्रशिक्षित बैल 70 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत विकतात. त्यातून चांगला नफा मिळतोच, शिवाय शेतीसाठी बैलही उपलब्ध होतात. हे काम नफा मिळविण्यासाठी किंवा व्यवसायासाठी न करता तो छंद असल्याचे गुणवंतराव म्हणतात. 

* उत्पादन (एकरी) व उत्पन्न दृष्टिक्षेपात - 
वर्ष 2011-12 
कापूस = उत्पादन - एकरी 18 क्विंटल - भाव 4,000 रु. भावाने 72 हजार रु. उत्पन्न 
सोयाबीन = 10 क्विंटल - दर दोन हजार 200 रु.प्रमाणे 22 हजार रु. 
गहू = 6 क्विंटल, दर एक हजार 200 रु., उत्पन्न सात हजार 200 रु. 
हरभरा = 6.5 क्विंटल, दर तीन हजार रु.प्रमाणे 19 हजार 500 
वांगी = 10 गुंठे क्षेत्रात 17 क्विंटल उत्पादन. उत्पन्न 12 हजार रु. 
कांदे = 10 गुंठे क्षेत्र - 20 क्विंटल उत्पादन, उत्पन्न सहा हजार रु. 
मिरची - पाच क्विंटल उत्पादन, उत्पन्न सहा हजार रु. 

एकूण एकरी उत्पादन = 1 लाख 44 हजार 700 रु. 

* वर्ष 2010-11 
कापूस 16.5 क्विंटल = सहा हजार 500 रु. दराप्रमाणे एक लाख सात हजार 250 रु. 
सोयाबीन 11 क्विंटल = एक हजार 900 रु.प्रमाणे 20 हजार 900 रु. 
एकूण - एक लाख 28 हजार 150 रु. 

शेतात सिंचन सुविधा उपलब्ध करून त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. शेतातील उपलब्ध साधन सुविधांचा किंवा अल्प प्रयत्नाने मिळणाऱ्या सुविधांचा शोध शेतकऱ्यांनी घ्यावा, त्यातून आवश्‍यक बाबींची पूर्तता करून मग उत्पादन वाढविण्याकडे वळावे. पावसाच्या पाण्याचे संकलन करून विहिरीची पाणीपातळी वाढविण्यासारखे सोपे उपाय शेतकरी करू शकतात. 
- गुणवंतराव देशमुख 

संपर्क - गुणवंतराव देशमुख - 9552985336.