इंदापूर शहरामधील पठाण बंधूंचा मुख्य व्यवसाय म्हणजे कोंबड्यांची चिकन सेंटरला विक्री. आयुबभाई, आसिफभाई, आरिफभाई व आरिसभाई हे चौघे बंधू परिसरातील, तसेच आंध्र प्रदेशातील पोल्ट्री शेडमधील कोंबड्या विकत घेऊन पुणे, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील चिकन सेंटरना पुरवतात. व्यवसायाच्या बरोबरीने त्यांना शेतीचीही आवड आहे, त्यामुळे कोंबडी विक्रीच्या व्यवसायातून मिळालेल्या फायद्यातून त्यांनी सहा वर्षांपूर्वी इंदापूर शहराजवळच तीन एकर शेती विकत घेतली. पारंपरिक शेतीपेक्षा सुधारित शेतीकडे त्यांचा भर आहे, त्यामुळे पिकांच्या लागवडीमध्ये पठाण बंधू सुधारित तंत्राचाच अवलंब करतात. सुरवातीस प्रयोग म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड त्यांनी केली होती. या काळात प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यवस्थापनाच्यादृष्टीने त्यांनी पुढे फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी पहिल्यांदा परिसरातील प्रयोगशील शेतकरी डॉ. दगडे यांची बाग पाहिली, त्यांचे अनुभव लक्षात घेऊन केसर आंबा लागवडीचा निर्णय घेतला.
आंबा बागेचे नियोजन -
केसर आंबा लागवडीबाबत माहिती देताना आसिफभाई पठाण म्हणाले, की आमची तीन एकर जमीन हलक्या मध्यम प्रकारातील आहे, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने आम्ही केसर आंबा लागवडीचा निर्णय घेतला. पारंपरिक पद्धतीने लागवड न करता उत्पादनवाढीसाठी आम्ही लागवडीसाठी पाच मीटर बाय पाच मीटर अंतर निवडले. सन 2008 मध्ये आंबा लागवडीसाठी जमिनीची आखणी आणि मशागत केली. कलमांच्या लागवडीसाठी मे महिन्याच्या सुरवातीला दोन फूट बाय दोन फूट बाय दोन फूट आकाराचे खड्डे खणले. पावसाच्या अगोदर हे खड्डे चांगली माती, शेणखत आणि कोंबडी खताच्या मिश्रणाने भरून घेतले. त्यानंतर चांगला पाऊस झाल्यानंतर केसर कलमांची लागवड केली. पैठणहून आम्ही केसरची दर्जेदार कलमे आणली. सध्या तीन एकरांत 542 कलमे आहेत. कलमांची लागवड केल्यानंतर त्यांना बांबूचा आधार दिला. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन केले आहे, त्यामुळे उपलब्ध पाणी संपूर्ण झाडांना योग्य प्रमाणात देता येते. कलमांना दररोज किमान दोन तास पाणी देतो. पहिली तीन वर्षे कलमांची चांगली वाढ करून घेतली. सप्टेंबर महिन्यात प्रत्येक कलमाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावली जाते, त्यामुळे डिंक्याचा प्रादुर्भाव होत नाही. कलमांच्या फांद्या सर्व दिशेला योग्य पद्धतीने वाढतील याची काळजी घेतली. कलमांवर भुरी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशकांच्या शिफारशीत फवारण्या घेतल्या. आम्ही कलमांना रासायनिक खते देत नाही. दरवर्षी चांगला पाऊस झाल्यानंतर कलमांना आळे करून त्यामध्ये दोन पाटी शेणखत आणि कोंबडी खत मातीत चांगले मिसळून देतो. सेंद्रिय खताच्या वापराने कलमांची वाढ चांगली झाली. वाढीच्या काळात पाण्याचे योग्य व्यवस्थापन ठेवतो. पुढे फळांचेही चांगले उत्पादन मिळू लागले. बागेच्या व्यवस्थापनासाठी आम्हाला फळबाग तज्ज्ञ राजेंद्र वाघमोडे यांचे मार्गदर्शन मिळत असते
.
दर्जेदार फळांचे उत्पादन - फळांच्या उत्पादनाबाबत आसिफभाई म्हणाले, की साधारणपणे सन 2011 मध्ये फळांच्या चांगल्या उत्पादनाला सुरवात झाली. साधारणतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फळांचे उत्पादन सुरू झाले. पहिल्या हंगामात प्रति कलमापासून 20 फळे मिळाली. पहिल्या वर्षीची फळे घरी, तसेच नातेवाइकांना वाटली. व्यापारी तत्त्वावर याची विक्री केली नाही. फळांच्या काढणीनंतर वेड्यावाकड्या फांद्या, खाली वाकलेल्या फांद्यांची हलकी छाटणी केली. पावसानंतर आळ्यामधील माती हलवून प्रति कलमांना दोन पाटी शेणखत, कोंबडी खत मिसळून दिले. कलमांना ठिबकच्या माध्यमातून गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ठेवले. मोहोराच्या काळात शिफारशीत कीडनाशकांच्या फवारण्या केल्याने पुढे फळधारणेला चांगला फायदा झाला. यंदाच्या वर्षी 40 ते 50 टक्केच मोहोर आला होता, तरी देखील प्रत्येक कलमाला सरासरी 40 ते 50 फळे मिळाली.
स्वतःच केली फळांची विक्री -
फळांच्या विक्रीबाबत आसिफ पठाण म्हणाले, की आमची गावात दोन दुकाने आहेत, त्यामुळे व्यापाऱ्याला फळे न विकता आम्ही स्वतःच फळांच्या विक्रीचे नियोजन केले. बाजारपेठेच्या मागणीनुसार दररोज सातशे ते आठशे फळांची तोडणी करून घरातच नैसर्गिक पद्धतीने आढी घालून आंब्याची पिकवणी केली. त्यानंतर स्वतःच्या दुकानात विक्री सुरू केली. फळांची गोडी, चांगला आकार यामुळे हातोहात फळांची विक्री झाली. सरासरी 70 रुपये प्रति किलो या दराने फळांची विक्री केली. सरासरी एका किलोत चार फळे बसली. साधारणपणे फळांच्या विक्रीतून सव्वा लाखाचे उत्पन्न मिळाले. बागेच्या व्यवस्थापनाचा खर्च चाळीस हजार रुपये झाला. कमी व्यवस्थापनात आम्हाला केसर आंबा बागेने चांगला नफा मिळवून दिला आहे. येत्या काळात चांगले व्यवस्थापन ठेवून दर्जेदार फळांच्या उत्पादनावर आमचा भर आहे.
संपर्क -
आसिफ पठाण - 9423212125