राज्यात चारही कृषी विद्यापीठांतर्गत 133 कृषी व संलग्न महाविद्यालयांमधून कृषी पदवीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते. यासाठी दर वर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. विविध शिष्यवृत्त्या, शुल्कमाफी यामुळे विद्यार्थ्यांना अत्यल्प खर्चात कृषी शिक्षण मिळते. कृषी पदवीधरांपुढे विविध क्षेत्रांत काम करण्याच्या, करिअर घडविण्याच्या संधी आहेत. राज्यातील कृषी शिक्षण अभ्यासक्रमांविषयी...
डॉ. उत्तम कदम
- विद्याशाखानिहाय प्रवेश क्षमता
पदवी ---- अनुदानित --- विनाअनुदानित --- एकूण
कृषी --- 1712 -- 4800 --- 6512
उद्यानविद्या --- 200 --- 280 --- 480
वनशात्र --- 64 --- 0 --- 64
मत्स्यशास्त्र --- 40 --- 0 --- 40
अन्नतंत्रज्ञान --- 64 --- 920 --- 984
कृषी जैवतंत्रज्ञान --- 40 --- 640 --- 680
कृषी अभियांत्रिकी --- 247 --- 480 --- 727
गृहविज्ञान --- 40 -- 0 --- 40
कृषी व्यवसाय व्यवस्थापन --- 0 --- 480 --- 480
एकूण --- 2407 --- 7600 --- 10,007
शेती हा अशिक्षितांचा उद्योग नाही, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची व त्यातील संधी काबीज करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी नुकतेच पुणे कृषी महाविद्यालयात व्यक्त केले. विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण, संशोधनात विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. राज्यातील 29 शासकीय अनुदानित व 104 कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयांमधून विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत एकूण 45 कृषी व संलग्न महाविद्यालये आहेत. यापैकी कृषी विद्याशाखेची 22 व कृषीसंलग्न शाखेची 23 महाविद्यालये सुरू आहेत. एकूण कृषी व संलग्न महाविद्यालयांपैकी पाच घटक महाविद्यालये असून, 40 एवढी खासगी संस्थांची विनाअनुदान तत्त्वावरील महाविद्यालये कार्यरत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी व संलग्न शाखेच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता 3,544 एवढी आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत एकूण 29 कृषी व संलग्न महाविद्यालये असून, पैकी कृषी विद्याशाखेची 20 व कृषीसंलग्न शाखेची नऊ महाविद्यालये सुरू आहेत. तसेच, एकूण कृषी व संलग्न महाविद्यालयांपैकी आठ घटक महाविद्यालये असून, 21 एवढी खासगी संस्थांची विनाअनुदान तत्त्वावरील महाविद्यालये कार्यरत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कृषी व संलग्न शाखेच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता 2155 एवढी आहे.
मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत एकूण 42 कृषी व संलग्न महाविद्यालये आहेत. यापैकी कृषी विद्याशाखेची 22 व कृषीसंलग्न शाखेची 20 महाविद्यालये सुरू आहेत. तसेच, एकूण कृषी व संलग्न महाविद्यालयांपैकी दहा घटक महाविद्यालये असून, 32 एवढी खासगी संस्थांची विनाअनुदान तत्त्वावरील महाविद्यालये कार्यरत आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कृषी व संलग्न शाखेच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता 3,052 एवढी आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत एकूण 19 कृषी व संलग्न महाविद्यालये असून, पैकी कृषी विद्याशाखेची सात व कृषीसंलग्न शाखेची 12 महाविद्यालये सुरू आहेत. एकूण कृषी व संलग्न महाविद्यालयांपैकी सहा घटक महाविद्यालये असून, 13 एवढी खासगी संस्थांची विनाअनुदान तत्त्वावरील महाविद्यालये कार्यरत आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये कृषी व संलग्न शाखेच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता 1,356 एवढी आहे.
राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या दहा हजार सात जागा आहेत. त्यासाठी दर वर्षी सुमारे 22 ते 25 हजार विद्यार्थी इच्छुक असतात. गेल्या काही वर्षांत कृषी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या तुलनेत कमी तणाव असणारा व झटपट स्थैर्य प्राप्त करून देणारा मध्यम मार्ग म्हणून पालक व विद्यार्थी कृषीला पसंती देतात.
- अभ्यासक्रम व प्रवेशाची स्थिती
कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, अन्नतंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, मत्स्यशास्त्र व गृहविज्ञान या नऊ विद्याशाखांचे पदवी अभ्यासक्रम राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार त्यास प्रवेश दिले जातात.
कृषी पदवी अभ्यासक्रमात विविध पिकांचे उत्पादन व संलग्न विषयांचा समावेश आहे. उद्यानविद्या शाखेत फळे, फुले, भाजीपाला व शोभेच्या वनस्पतींचे विस्तृत शिक्षण दिले जाते. वनशास्त्रात वनात आढळणाऱ्या विविध वनस्पतींचे उत्पादन, औषधी वनस्पती व संलग्न विषयांचा समावेश असतो. अन्न तंत्रज्ञानामध्ये उत्पादनाबरोबरच कृषी व फलोत्पादनातील उत्पादनावरील प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाते. बीजोत्पादनाचा समावेशही यात होतो.
जलसंधारण, मृद्संधारण, भू व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, अवजारे व यंत्रे याबाबतच्या सविस्तर अभ्यासक्रमांचा समावेश कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेत असतो. शेतीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी या विद्याशाखेच्या पदवीधरांचे मूलभूत योगदान असते. यातून स्वतःचा उद्योग सुरू करण्याबरोबरच विविध प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत.
कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, मत्स्यविज्ञान व जैवतंत्रज्ञान पदवीच्या प्रवेशासाठी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व इंग्रजी विषयासह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतात. अभियांत्रिकी व कृषी व्यवसाय व्यवस्थापनासाठी गणित विषयही आवश्यक असतो.
- शिष्यवृत्ती व शुल्कमाफी
कृषी व संलग्न विद्याशाखेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य व भारत सरकारच्या सर्व शिष्यवृत्ती व सोयी-सवलती मिळतातच, शिवाय महाराष्ट्र शासन आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे 50 टक्के शुल्क भरते. म्हणजेच कृषी शिक्षणामध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या जवळजवळ 65 ते 70 टक्के विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची शिष्यवृत्ती ही मिळतेच.
राज्यात उपलब्ध इतर शिक्षणासाठी असणाऱ्या शुल्काच्या मानाने कृषी शिक्षणासाठी असणारी फी अतिशय कमी आहे. कृषी व संलग्न अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसह अभ्यासक्रम पूर्ण करता येतो, त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना इतर विद्याशाखांच्या तुलनेत कृषीमध्ये अत्यल्प शुल्कात शिक्षण मिळवता येते.
कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये संबंधित संस्थेमार्फत 20 टक्के जागा व्यवस्थापन कोट्यातून भरण्यात येतात. यासाठी किमान पात्रताधारक विद्यार्थी पात्र असतात. यंदा सर्व संस्था मिळून व्यवस्थापन कोट्यातून एक हजार 488 जागा आहेत.
कृषी पदवीधरांना राज्य व केंद्रातील प्रशासकीय सेवा, शेती - पाणी व्यवस्थापन, अन्नप्रक्रिया, पणन, जैवतंत्रज्ञान, कृषी निगडित उद्योगधंदे, जल व मृद्संधारण, यांत्रिकीकरण, दुग्धविकास व पशुसंवर्धन आणि इतर विभागांमध्ये विपुल प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठे, राष्ट्रीय व सहकारी बॅंका, विविध महामंडळे, राज्यस्तरीय व केंद्रीय संशोधन संस्थांमध्येही नोकरीच्या संधी आहेत.
प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (www.mcaer.org) केंद्रीय पद्धतीने महाराष्ट्र ज्ञान महामंडळामार्फत (http://oasis.mkcl.org./agriug) राबविते. प्रत्येक विद्यार्थ्यास अर्ज भरते वेळी लॉगीन आयडी व पासवर्ड दिला जातो. प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्ता व उमेदवाराने दिलेला विकल्प विचारात घेऊन अत्यंत पारदर्शकपणे राबविली जाते. विद्यार्थी, पालक, विद्यापीठांचे अधिकारी व सर्व संबंधितांच्या प्रवेशासंबंधी शंकांचे समाधान होईल, याची काळजी घेतली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, उद्या (ता. 20) ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.