डाळिंब हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत अत्यंत चांगल्याप्रमाणे घेता येते. हलक्या व मध्यम जमिनीत जमिनीच्या मगदुराचा विचार करून 4.5 x 3.0 मीटर अंतरावर 60 सेंटिमीटर लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे उन्हाळ्यात खणून ते पावसाळ्यापूर्वी खत, माती मिश्रणाने भरून घ्यावेत. लागवडीसाठी गणेश, जी- 137, मृदुला, फुले आरक्ता, भगवा या जातींची निवड करावी. डाळिंबाच्या झाडास अनेक फुटवे येतात. यापैकी एकच खोड ठेवल्यास खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे काही वेळा संपूर्ण झाड जाण्याचा धोका असतो. यासाठी सुरवातीच्या वाढीच्या काळातच चार ते पाच खोडे विकसित होऊ द्यावीत आणि यावरील जमिनीपासून दोन ते अडीच फुटापर्यंतचे फुटवे येऊ देऊ नयेत. आवश्यकतेनुसार झाडास आधार दिल्यास झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा नियमित पुरवठा करणे आवश्यक आहे. पहिल्या एक ते दोन वर्षांच्या कालावधीत खतांच्या मात्रा दर महिन्यास पिकाच्या वाढीनुसार विभागून दिल्यास झाडाची वाढ जोमाने होते. पुढील टप्प्यात गरजेनुसार रासायनिक खतांची मात्रा वाढवीत न्यावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे चांगल्या उत्पादनासाठी नियमित पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. सिंचनाचे पाणी त्या ठिकाणच्या बाष्पीभवनाचा दर लक्षात घेऊन ठिबक पद्धतीनेच द्यावे. www.agriplaza.in