बंदिस्त शेळीपालन करताना शेळ्यांची संख्या हळूहळू वाढवावी, त्याप्रमाणे विस्ताराच्या दृष्टीने गोठा बांधताना जागेची सोय ठेवावी. गोठा बांधणी ही शेतातील उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून करता येते. गोठा बांधताना शक्यतो गोठ्याची लांबी पूर्व-पश्चिम ठेवावी, जेणेकरून अति ऊन, पाऊस आणि वारा यांच्यापासून शेळ्यांचे संरक्षण होईल. गोठ्याच्या जमिनीवर शक्यतो माती, मुरूम, लाकडाचा भुस्सा, विटा यांच्या साह्याने चांगले दाबून धुम्मस तयार करावे. अशी जमीन हिवाळ्यात उबदार राहते व करडांचे व शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. शेतातील बाभळीच्या झाडांपासून खांब; तर तुराट्या, भाताचा पेंढा, गव्हाच्या पेंढ्या, तसेच बाजरीचे सरमाड यांचा वापर करून गोठ्याचे छत शाकारता येते. कुंपण तसेच गोठ्यातील कप्पे, भिंती तुराट्या, बांबूच्या पट्ट्यांचा वापर करून तयार करता येतात. गोठ्याचे छत हे नेहमीपेक्षा थोड्या जास्त उंचीवर शाकारावे, जेणेकरून हवा खेळती राहील, तसेच दुर्गंधी राहणार नाही. गोठ्याच्या छताला प्लॅस्टिक, पॉलिथिन अथवा खताच्या रिकाम्या पिशव्या शिवून केलेले आवरण / आच्छादन बसवल्यास पावसापासून जास्त संरक्षण मिळते. थंडीच्या दिवसांत गोणपाटाच्या साह्याने शेळ्यांसाठी, मुख्यत्वेकरून करडांसाठी ऊब राखता येते. एकेरी गोठ्यासाठी पूर्व व पश्चिमेकडून पत्र्यापर्यंत भिंतीचे बांधकाम व मोकळ्या पटांगणाच्या विरुद्ध बाजूकडून तीन ते चार फूट भिंत व त्यावर छतापर्यंत चेनलिंक जाळी बसवावी, तर मोकळ्या पटांगणाकडून जमिनीपासून चेनलिंक जाळी व त्याचेच दार बसवावे. दुहेरी गोठ्यासाठी (100 पेक्षा जास्त शेळ्यांसाठी) पूर्व-पश्चिम छतापर्यंत भिंती, त्यामध्ये लाकडाचे दार व दोन्ही बाजूंस आवार करून चेनलिंक जाळीचे कुंपण घालावे. छताला सिमेंटचे पत्रे लोखंडी अँगलचा वापर करून बसवावे. सिमेंटच्या अर्ध्या पाइपाच्या साह्याने एकेरी गोठ्यात पूर्व-पश्चिम लांबी असलेल्या भिंतीच्या बाजूने, तर दुहेरी गोठ्यात मधल्या जागेच्या दोन्ही बाजूंस जाळीच्या बाहेर जमिनीपासून साधारण एक ते दीड फूट उंचीवर गव्हाण बसवावी. या गव्हाणीची रुंदी एक फूट, साधारण तेवढीच खोली असावी. गव्हाणीच्या बाजूची जाळी ही लोखंडी पट्ट्यांच्या साह्याने मोठे कप्पे असलेली करावी, जेणेकरून शेळ्यांना त्या कप्प्यातून चारा खाणे शक्य होईल. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटची एक टाकी गोठ्याबाहेर एका कोपऱ्यात ठेवावी.
http://www.agriplaza.in/agri-guide.htm
http://www.agriplaza.in/agri-guide.htm