Friday, July 20, 2012

येणारा काळ फूड टेक्‍नॉलॉजीचा

फूड टेक्‍नॉलॉजी (अन्नतंत्रज्ञान) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असतो. यात एकूण आठ सत्र असतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.टेक. (फूड टेक्‍नॉलॉजी) ही पदवी मिळते. त्यानंतर एम.टेक. (फूड टेक्‍नॉलॉजी) हा पदव्युत्तर पदवीचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. फूड टेक्‍नॉलॉजी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनावेत, यासाठी या अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात कार्यानुभवातून शिक्षण या योजनेखाली अन्नप्रक्रियेशी संबंधित विविध पदार्थांची निर्मिती व मार्केटिंग विद्यार्थी स्वतः करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य विकसित होते. आठव्या सत्रात अन्न व तत्सम उद्योगांतून प्रशिक्षण दिले जाते. आठव्या सत्रात चार महिने प्रशिक्षण असते. 

फूड टेक्‍नॉलॉजी अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश असतो. - अन्नशास्त्र व तंत्रज्ञान 
- अन्न अभियांत्रिकी 
- अन्न आणि औद्योगिक सूक्ष्म जीवशास्त्र 
- अन्न रसायनशास्त्र आणि पोषण शास्त्र 
- अन्न व्यापार आणि व्यवस्थापन विभाग 

विविध ठिकाणच्या संधी 
- फूड टेक्‍नॉलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय (शासकीय / खासगी) अन्नप्रक्रिया उद्योगातून तांत्रिक मनुष्यबळ निर्मितीसाठी अनेक संधी उपलब्ध असतात; तसेच महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनातून "अन्न सुरक्षा अधिकारी' (फूड सेफ्टी ऑफिसर) या पदासाठी देखील विद्यार्थ्यांना अर्ज करता येऊ शकतो. 
- या क्षेत्रातील उच्चशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी पायाभूत ज्ञान मिळून, स्थानिक स्रोतांचा वापर करून नावीन्यपूर्ण अन्नपदार्थांची निर्मिती करण्यासाठी या मनुष्यबळाचा वापर होऊ शकतो. 
- राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थांमधून शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत करण्यासाठी उदा. सीएफपीआरआय (सेंट्रल फूड प्रोसेसिंग रिसर्च इन्स्टिट्यूट), डीएफआरएल (डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी) यासारख्या राष्ट्रीय संशोधन संस्थांत संधी आहेत. 
- महाराष्ट्र शासनाच्या कायदा व सुव्यवस्था प्रशासनातही या विद्यार्थ्यांना संधी आहेत. 

राज्यातील कृषी शिक्षण अभ्यासक्रम


राज्यात चारही कृषी विद्यापीठांतर्गत 133 कृषी व संलग्न महाविद्यालयांमधून कृषी पदवीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते. यासाठी दर वर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. विविध शिष्यवृत्त्या, शुल्कमाफी यामुळे विद्यार्थ्यांना अत्यल्प खर्चात कृषी शिक्षण मिळते. कृषी पदवीधरांपुढे विविध क्षेत्रांत काम करण्याच्या, करिअर घडविण्याच्या संधी आहेत. राज्यातील कृषी शिक्षण अभ्यासक्रमांविषयी... 

डॉ. उत्तम कदम 

- विद्याशाखानिहाय प्रवेश क्षमता 
पदवी ---- अनुदानित --- विनाअनुदानित --- एकूण 
कृषी --- 1712 -- 4800 --- 6512 
उद्यानविद्या --- 200 --- 280 --- 480 
वनशात्र --- 64 --- 0 --- 64 
मत्स्यशास्त्र --- 40 --- 0 --- 40 
अन्नतंत्रज्ञान --- 64 --- 920 --- 984 
कृषी जैवतंत्रज्ञान --- 40 --- 640 --- 680 
कृषी अभियांत्रिकी --- 247 --- 480 --- 727 
गृहविज्ञान --- 40 -- 0 --- 40 
कृषी व्यवसाय व्यवस्थापन --- 0 --- 480 --- 480 
एकूण --- 2407 --- 7600 --- 10,007 

शेती हा अशिक्षितांचा उद्योग नाही, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची व त्यातील संधी काबीज करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी नुकतेच पुणे कृषी महाविद्यालयात व्यक्त केले. विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण, संशोधनात विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. राज्यातील 29 शासकीय अनुदानित व 104 कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयांमधून विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत एकूण 45 कृषी व संलग्न महाविद्यालये आहेत. यापैकी कृषी विद्याशाखेची 22 व कृषीसंलग्न शाखेची 23 महाविद्यालये सुरू आहेत. एकूण कृषी व संलग्न महाविद्यालयांपैकी पाच घटक महाविद्यालये असून, 40 एवढी खासगी संस्थांची विनाअनुदान तत्त्वावरील महाविद्यालये कार्यरत आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी व संलग्न शाखेच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता 3,544 एवढी आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत एकूण 29 कृषी व संलग्न महाविद्यालये असून, पैकी कृषी विद्याशाखेची 20 व कृषीसंलग्न शाखेची नऊ महाविद्यालये सुरू आहेत. तसेच, एकूण कृषी व संलग्न महाविद्यालयांपैकी आठ घटक महाविद्यालये असून, 21 एवढी खासगी संस्थांची विनाअनुदान तत्त्वावरील महाविद्यालये कार्यरत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कृषी व संलग्न शाखेच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता 2155 एवढी आहे. 

मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत एकूण 42 कृषी व संलग्न महाविद्यालये आहेत. यापैकी कृषी विद्याशाखेची 22 व कृषीसंलग्न शाखेची 20 महाविद्यालये सुरू आहेत. तसेच, एकूण कृषी व संलग्न महाविद्यालयांपैकी दहा घटक महाविद्यालये असून, 32 एवढी खासगी संस्थांची विनाअनुदान तत्त्वावरील महाविद्यालये कार्यरत आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कृषी व संलग्न शाखेच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता 3,052 एवढी आहे. 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत एकूण 19 कृषी व संलग्न महाविद्यालये असून, पैकी कृषी विद्याशाखेची सात व कृषीसंलग्न शाखेची 12 महाविद्यालये सुरू आहेत. एकूण कृषी व संलग्न महाविद्यालयांपैकी सहा घटक महाविद्यालये असून, 13 एवढी खासगी संस्थांची विनाअनुदान तत्त्वावरील महाविद्यालये कार्यरत आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये कृषी व संलग्न शाखेच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता 1,356 एवढी आहे. 

राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या दहा हजार सात जागा आहेत. त्यासाठी दर वर्षी सुमारे 22 ते 25 हजार विद्यार्थी इच्छुक असतात. गेल्या काही वर्षांत कृषी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या तुलनेत कमी तणाव असणारा व झटपट स्थैर्य प्राप्त करून देणारा मध्यम मार्ग म्हणून पालक व विद्यार्थी कृषीला पसंती देतात. 

- अभ्यासक्रम व प्रवेशाची स्थिती 
कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, अन्नतंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, मत्स्यशास्त्र व गृहविज्ञान या नऊ विद्याशाखांचे पदवी अभ्यासक्रम राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार त्यास प्रवेश दिले जातात. 

कृषी पदवी अभ्यासक्रमात विविध पिकांचे उत्पादन व संलग्न विषयांचा समावेश आहे. उद्यानविद्या शाखेत फळे, फुले, भाजीपाला व शोभेच्या वनस्पतींचे विस्तृत शिक्षण दिले जाते. वनशास्त्रात वनात आढळणाऱ्या विविध वनस्पतींचे उत्पादन, औषधी वनस्पती व संलग्न विषयांचा समावेश असतो. अन्न तंत्रज्ञानामध्ये उत्पादनाबरोबरच कृषी व फलोत्पादनातील उत्पादनावरील प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाते. बीजोत्पादनाचा समावेशही यात होतो. 

जलसंधारण, मृद्‌संधारण, भू व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, अवजारे व यंत्रे याबाबतच्या सविस्तर अभ्यासक्रमांचा समावेश कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेत असतो. शेतीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी या विद्याशाखेच्या पदवीधरांचे मूलभूत योगदान असते. यातून स्वतःचा उद्योग सुरू करण्याबरोबरच विविध प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. 

कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, मत्स्यविज्ञान व जैवतंत्रज्ञान पदवीच्या प्रवेशासाठी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व इंग्रजी विषयासह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतात. अभियांत्रिकी व कृषी व्यवसाय व्यवस्थापनासाठी गणित विषयही आवश्‍यक असतो. 

- शिष्यवृत्ती व शुल्कमाफी 
कृषी व संलग्न विद्याशाखेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य व भारत सरकारच्या सर्व शिष्यवृत्ती व सोयी-सवलती मिळतातच, शिवाय महाराष्ट्र शासन आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे 50 टक्के शुल्क भरते. म्हणजेच कृषी शिक्षणामध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या जवळजवळ 65 ते 70 टक्के विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची शिष्यवृत्ती ही मिळतेच. 

राज्यात उपलब्ध इतर शिक्षणासाठी असणाऱ्या शुल्काच्या मानाने कृषी शिक्षणासाठी असणारी फी अतिशय कमी आहे. कृषी व संलग्न अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसह अभ्यासक्रम पूर्ण करता येतो, त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना इतर विद्याशाखांच्या तुलनेत कृषीमध्ये अत्यल्प शुल्कात शिक्षण मिळवता येते. 

कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये संबंधित संस्थेमार्फत 20 टक्के जागा व्यवस्थापन कोट्यातून भरण्यात येतात. यासाठी किमान पात्रताधारक विद्यार्थी पात्र असतात. यंदा सर्व संस्था मिळून व्यवस्थापन कोट्यातून एक हजार 488 जागा आहेत. 

कृषी पदवीधरांना राज्य व केंद्रातील प्रशासकीय सेवा, शेती - पाणी व्यवस्थापन, अन्नप्रक्रिया, पणन, जैवतंत्रज्ञान, कृषी निगडित उद्योगधंदे, जल व मृद्‌संधारण, यांत्रिकीकरण, दुग्धविकास व पशुसंवर्धन आणि इतर विभागांमध्ये विपुल प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठे, राष्ट्रीय व सहकारी बॅंका, विविध महामंडळे, राज्यस्तरीय व केंद्रीय संशोधन संस्थांमध्येही नोकरीच्या संधी आहेत. 

प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात 
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (www.mcaer.org) केंद्रीय पद्धतीने महाराष्ट्र ज्ञान महामंडळामार्फत (http://oasis.mkcl.org./agriug) राबविते. प्रत्येक विद्यार्थ्यास अर्ज भरते वेळी लॉगीन आयडी व पासवर्ड दिला जातो. प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्ता व उमेदवाराने दिलेला विकल्प विचारात घेऊन अत्यंत पारदर्शकपणे राबविली जाते. विद्यार्थी, पालक, विद्यापीठांचे अधिकारी व सर्व संबंधितांच्या प्रवेशासंबंधी शंकांचे समाधान होईल, याची काळजी घेतली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, उद्या (ता. 20) ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 

संधी दुग्ध तंत्रज्ञानातील...


सध्याच्या काळात वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य याचबरोबरीने विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे दुग्ध तंत्रज्ञान. पहिल्यापासून शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जात होते; परंतु बाजारपेठेतील दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी आणि उपलब्ध होत असलेले नवनवीन तंत्रज्ञान पाहता या व्यवसायाने स्वतंत्र रूप घेतले आहे, त्यामुळे यातील संधी वाढताहेत. 

डॉ. ज्ञानेश्‍वर पतंगे 
भारतातील वार्षिक दूध उत्पादन 110 दशलक्ष टनांपेक्षाही जास्त आहे. दूध उत्पादनवाढीचा दर मंदीच्या काळातही 3.5 ते चार टक्केपर्यंत टिकून आहे. भारतीय आहारात दूध सेवनाला अत्यंत महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत देश तसेच परदेशांतही दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते आहे. ग्राहकाच्या आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छ दुधाची निर्मिती आणि त्यावर योग्य प्रक्रिया ही महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी ग्राहकांपर्यंत दर्जेदार दुधाचे योग्य वितरण, योग्य पद्धतीने होण्यासाठी दुग्ध तंत्रज्ञान हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. दूध प्रक्रिया उद्योगातही आता चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. दुग्ध तंत्रज्ञान हा विषय बहुतांशी प्रमाणात अभियांत्रिकी या विषयावर आधारलेला आहे. यामध्ये जीव रसायन, सूक्ष्म जीवशास्त्र, प्रक्रियाशास्त्र आणि आहारशास्त्र हे विषयही शिकविले जातात. भारतीय दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी यंत्रसामग्रीची निर्मिती, विविध प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांचे संशोधन व त्यांचे बाजारीकरण यामुळे मागील तीन दशकांत डेअरी उद्योगाने प्रगती केली आहे. 

दुग्धशास्त्रातील पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम 1) पदविका अभ्यासक्रम - Indian Dairy Diploma (IDD) 
2) पदवी अभ्यासक्रम - बी. टेक. (दुग्धतंत्रज्ञान किंवा बी.एस्सी. दुग्धशास्त्र) 
3) पदव्युत्तर अभ्यासक्रम - M. Tech. / M.Sc. डेअरी तंत्रज्ञान, डेअरी मायक्रोबायोलॉजी, डेअरी केमिस्ट्री, डेअरी इंजिनिअरिंग. 
4) आचार्य पदवी (Ph.D) संबंधित विषयातील आचार्य पदवी. 

1) इंडियन डेअरी डिप्लोमा (IDD) हा अभ्यासक्रम देशात 1923 मध्ये प्रथम बंगलोर येथे सुरू करण्यात आला. नंतर तो अलाहाबाद, कर्नाल, मुंबई, हरिगट्टा आदी शहरांत सुरू करण्यात आला. कालांतराने हा अभ्यासक्रम पदवी म्हणजेच बी.टेक. किंवा बी.एस्सी. (दुग्धशास्त्र)मध्ये रूपांतरित करण्यात आला; परंतु आजही हा इंडियन डेअरी डिप्लोमा मुंबई येथे सुरू आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. 

पात्रता - 12 वी विज्ञान - PCM गटात कमीत कमी 50 टक्के गुण, तर इंग्रजी विषयात किमान 40 टक्के गुण आवश्‍यक आहेत. 
अभ्यासक्रमाची संलग्नता - हा अभ्यासक्रम मुंबईत आरे कॉलनीतील महाविद्यालयातून शिकवण्यात येत असून, तो महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरशी संलग्न आहे. 
प्रवेशक्षमता - 40 विद्यार्थी. 

प्रवेश प्रक्रिया - - बारावीच्या निकालानंतर साधारणतः 15 दिवसांत स्थानिक वर्तमानपत्रांतून किंवा संबंधित महाविद्यालयातून / दुग्ध विज्ञान संस्थेतून प्रवेशाची जाहिरात प्रसारित होते. 
- विद्यार्थ्यास / उमेदवारास बारावीच्या गुणप्रतवारीनुसार प्रवेश दिला जातो. 
- आज महाराष्ट्रातील बहुतांश दुग्ध प्रक्रिया केंद्रांत याच विद्यालयातील विद्यार्थी कार्यरत असून, त्यांनी त्यांची गुणवत्ता व उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. 
- अधिक माहितीसाठी................ www.mfsu.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

2.) बी.टेक. किंवा बी.एस्सी. दुग्धतंत्रज्ञान अधिक क्षमतेचे दुग्ध प्रक्रिया केंद्र चालविण्यासाठी आणि या क्षेत्रातील नवनवीन आव्हाने आणि तंत्रज्ञान पेलण्यासाठी उच्च विद्या किंवा पदवी क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. भारतात प्रथम 1957 मध्ये हरियाना येथील कर्नाल येथे डेअरी सायन्स कॉलेज सुरू करण्यात आले. आज मितीस आपल्या देशात साधारणतः डेअरी तंत्रज्ञानाची 16 महाविद्यालये आहेत, पैकी दोन महाविद्यालये महाराष्ट्रातील पुसद (ता. वरूड) व उदगीर (जि. लातूर) येथे आहेत. 
या सर्व महाविद्यालयांतील 25 टक्के प्रवेश भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली यामार्फत होतात, तर उर्वरित जागा संबंधित महाविद्यालयाच्या विद्यापीठामार्फत भरल्या जातात. 

"आयसीएआर'मार्फत होणाऱ्या प्रवेशाची माहिती
- पात्रता - 12 वी विज्ञान शाखेस प्रवेश घेतलेले किंवा 12 वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झालेले, PMC गट आवश्‍यक, भारताचे नागरिकत्व हवे. 
- वयोमर्यादा - वयाची किमान मर्यादा 17 वर्षे, तर कमाल मर्यादा -----93 वर्षे. 
- प्रवेशप्रक्रिया - "आयसीएआर'च्या संवर्गातून प्रवेश द्यावयाचा असल्यास "आयसीएआर'ने ठरवून दिलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत असणे आवश्‍यक आहे. 
- प्रवेश परीक्षेच्या अर्जाची उपलब्धता ः साधारणतः प्रत्येक वर्षी डिसेंबर - जानेवारी. 
- परीक्षेची तारीख - साधारणतः एप्रिलचा तिसरा आठवडा 
- निकाल - मे किंवा परीक्षेनंतर 20 ते 25 दिवसांत 
- प्रवेश - जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 
- प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम - 11 वी, 12 वी विज्ञानाच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणिताचा अभ्यासक्रम. 
परीक्षा पद्धती - 
- परीक्षा बहुपर्यायी असून, एकूण 180 प्रश्‍न असतात. प्रत्येक प्रश्‍नास चार गुण असतात. चुकीच्या प्रत्येक प्रश्‍नास एक गुण कमी केला जातो. 
- परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाल्यास राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती 1000/- रु. प्रतिमहा एवढी मिळते. 

3) बी.टेक. दुग्धतंत्रज्ञान या विषयाची पदवी  
राज्यात वरूड (ता. पुसद) व उदगीर (जि. लातूर) येथील दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयात एकूण प्रत्येकी साधारण 32 प्रवेशक्षमता आहे. या महाविद्यालयांतून बी.टेक. दुग्धतंत्रज्ञान या विषयाची पदवी मिळते. येथे प्रवेश घेण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात. 
1) पात्रता - 12 वी विज्ञान शाखेत PCM गटामध्ये 50 टक्के गुण आवश्‍यक, इंग्रजीमध्ये 40 टक्के गुण आवश्‍यक. 
2) अभ्यासक्रमाची संलग्नता - हा अभ्यासक्रम महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरशी संलग्न आहे. 
3) प्रवेशक्षमता - साधारण 32 जागा 
4) प्रवेश प्रक्रिया- 12 वी विज्ञानच्या एकूण गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जातो. 
अ) अतिरिक्त गुण - ज्या विद्यार्थ्याकडे शेतीचा 7/12चा उतारा किंवा भूमिहीन शेतमजुराचा उतारा किंवा 12 वी असताना डेअरी सायन्स हा विषय असल्यास अतिरिक्त 20 टक्के गुण मिळतात. 
ब) प्रवेश दिनांक - 12 वीच्या निकालानंतर........... www.mafsu.in या संकेतस्थळावर आणि स्थानिक वर्तमानपत्रांतून प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली जाते, तसेच पुसद येथील दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 07233 - 248696 या क्रमांकावर संपर्क साधावा. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील बऱ्याचशा महाविद्यालयांतून बी.एस्सी. दुग्धशास्त्र या पदवीचे धडे दिले जातात. 

आयडीडी व बी.टेक. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच्या संधी  
1) दुग्धप्रक्रिया प्रकल्पांतील संधी 
आजमितीस आपल्या देशात सुमारे 700 पेक्षा अधिक दुग्धप्रक्रिया प्रकल्प असून, या प्रकल्पांमध्ये वरील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी खालील संधी उपलब्ध आहेत. 
अ) आर्थिक दृष्टिकोनातून सक्षमरीत्या प्रकल्प चालविणे, ब) उत्पादनाचे व खर्चाचे सर्व तपशील हाताळणे, क) विविध प्रकारच्या प्रक्रिया दुधावर करून त्याचे विविध दुग्धजन्य पदार्थांत रूपांतर करणे व त्यास योग्य त्या वेष्टनात साठवणे, ड) पदार्थांच्या वितरणाचे योग्य नियोजन करणे... यासारख्या भरपूर संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. 

2) दुग्धप्रक्रिया प्रकल्पांसाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी व साहित्यनिर्मिती क्षेत्रातील संधी ः- 
आजही भारतात निर्माण होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांच्या प्रक्रिया केंद्रांत वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची निर्मिती अधिक दर्जेदार होत असल्याने आज भारतीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत मोठी मागणी आहे. ही उपकरणे तयार करताना त्यांची आखणी करणे, उपकरणांचा आराखडा आणि निर्मिती सारख्या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. सध्या ग्राहकांकडून खवा तयार करण्याचे यंत्र, पनीर प्रेस मशिन, आइस्क्रीम निर्मिती यंत्रासाठी चांगली मागणी आहे. 

3) सल्ला सेवा 
दुग्धप्रक्रिया व्यवसायात रोजच नवनवीन प्रक्रिया तंत्रज्ञान, विविध नावीन्यपूर्ण दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होत असते. बाजारात होणारे सर्व नवीन बदल, प्रस्थापित दूधप्रक्रिया प्रकल्पात अवलंबण्यासाठी तज्ज्ञांकडून सल्ला घेतला जातो. उच्चविद्या व चांगला अनुभव असणाऱ्या, तसेच संभाषणचातुर्य असणाऱ्या उमेदवारांस या क्षेत्रातदेखील चांगल्या संधी उपलब्ध आहेत. 

4) शिक्षण व संशोधन देशात असणाऱ्या 16 दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कौशल्यपूर्ण व उच्चविद्याविभूषित प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. अशा प्रकारच्या महाविद्यालयांत व संशोधन सहायक यासारख्या क्षेत्रात संधी मिळू शकतील. 

5) उद्योगशीलता 
कौशल्यपूर्ण व शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला उमेदवार स्वतः दूधप्रक्रिया किंवा दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून स्वतःचा उद्योगधंदा चालवू शकतो. या उद्योगधंद्यात दुधापासून सायनिर्मिती, भारतीय दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, आइस्क्रीम यासारखे लघुउद्योग सहज करू शकतो. त्यासाठी "एनडीडीबी' आणि इतर शासकीय संस्थांकडून आर्थिक मदत मिळत असल्याने या क्षेत्रातही उद्योग उभारणीची संधी पदवीधरांना उपलब्ध आहे. 

रेशीम उद्योगासाठी प्रशिक्षण


राज्यात रेशीम उद्योगाचा विस्तार वाढत आहे, त्यामुळे अनेकांना त्यातील तांत्रिक बारकाव्यांची माहिती हवी असते. त्यांच्यासाठी विविध केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रेशीम व्यवसाय चांगल्या प्रकारे करणे शक्‍य आहे. 
डॉ. ए. डी. जाधव, डॉ. टी. व्ही. साठे 

रेशीम उद्योगाचे अद्ययावत प्रशिक्षण, तंत्रज्ञान देशातील विविध रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध आहे. रेशीम उत्पादक, उद्योजक तसेच रेशीम शेतीबद्दल आवड असणाऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. जैविक कीडनियंत्रण, परोपजीवी किडी तयार करणे, चॉकी संगोपन, शेतकऱ्यांच्या समूहाला विशिष्ट गोष्टींचे तंत्रज्ञान व सल्ला यामध्ये तरुणांना मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. केंद्रीय रेशीम मंडळ, वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या आधिपत्याखाली असलेल्या विविध केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण आयोजित केले जाते. या संस्थेची म्हैसूर (कर्नाटक), रांची (झारखंड), जोरहट (आसाम), बंगळूर, जम्मू आणि काश्‍मीर येथे प्रशिक्षण केंद्रे आहेत. रेशीम उद्योग विस्ताराच्या अनुषंगाने शेतकरी, तंत्रज्ञांना प्रशिक्षण तसेच विद्यार्थांसाठी पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी.पर्यंतचे विविध अभ्यासक्रम राबविले जातात. याशिवाय आवश्‍यकता व गरजेनुसार अन्य विविध अभ्यासक्रमही वेळोवेळी आयोजित केले जातात. अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य, उद्योजकता विकास, संशोधन यासाठी आवश्‍यक प्रयोगशाळा व सोई-सुविधा या संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. तुती रेशीम व वन्य रेशीम (टसर, मुगा, ऐरी) यासाठीही स्वतंत्र संस्था आहेत. 

प्रशिक्षण संस्था  
1) केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, 
मानंदवाडी रोड, म्हैसूर, कर्नाटक 
संपर्क - 0821-2362406, 
फॅक्‍स 0821-2362845 
ई-मेल -
direcror @csrtimys.res.in, 
training @ csrtimys.res.in, 
संकेतस्थळ - www.csrtimys.res.in 

कोर्सची रचना एम.एस्सी (रेशीम तंत्रज्ञान), म्हैसूर विद्यापीठ, म्हैसूर, कर्नाटक (अंतर्गत) 
कालावधी - दोन वर्षे (चार सेमिस्टर) 
कोर्सची सुरवात - दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये 
जागा - 20 (15 भारतीय विद्यार्थी + पाच परदेशी विद्यार्थी) 
कोर्सचे विषय - तुती उत्पादन तंत्रज्ञान, कोष उत्पादन तंत्रज्ञान, किडी आणि रोग व्यवस्थापन, जनुकीय जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, रेशीम अंडीपुंज तंत्रज्ञान, धागानिर्मिती, संस्थाशास्त्र, अर्थशास्त्र, संगणकीकरण, विस्तार आणि व्यवस्थापन 
पात्रता - बी.एस्सी. (ऐच्छिक, कोणतेही तीन विषयांत) रेशीमशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, पर्यावरणशास्त्र किंवा कृषी, बी.एस्सी. (रेशीम) प्राधान्य देण्यात येईल. 
निवड - निवडक ठिकाणी पात्रता परीक्षा घेण्यात येते. 50 टक्के मार्क, पात्रता परीक्षा आणि 50 टक्के शैक्षणिक पात्रता. 

रेशीम प्रशिक्षण संस्था 1) केंद्रीय रेशीम तंत्रज्ञान संशोधन संस्था, बंगळूर, कर्नाटक 
संपर्क : 080-26685238, 26282316 
फॅक्‍स : 080-26680435 
ई-मेल : cstri@silkboard.in 

2) केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, रांची, झारखंड 
संपर्क : 0651- 2775815 फॅक्‍स ः 0651- 2775629 
ई-मेल : rch silkme@sanchapnet.in 

3) केंद्रीय मुगा आणि एरी रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था 
पोस्ट बॉक्‍स क्र. 131, जोरहट 
आसाम- 785700 
संपर्क : 0376- 2335528 
फॅक्‍स : 0376- 2335124 
ई-मेल : cmerti@ flasmail.Com. 

प्रशिक्षणाचे विषय प्रशिक्षण -------------------------------- विषय 
1) बायव्होल्टाईन कीटक संगोपन -------- तुती लागवड आणि कीटक संगोपन, स्वच्छता, रोग- किडींचे नियंत्रण, संगोपन प्रात्यक्षिक 
2) प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ------------------ नियोजन कार्यक्रम तयार करणे, विकासात्मक वेळापत्रक तयार करणे, विस्तार पद्धती, 
मनुष्यबळ विकास. 

प्राथमिक स्वरूपाचे, नव्याने धागानिर्मिती करू इच्छिणाऱ्यांसाठी छोटे प्रशिक्षण वर्ग प्रशिक्षण--------------------------------------- कालावधी 
1) तुती धागानिर्मिती तंत्रज्ञान ---------------- जुलै, नोव्हेंबर- डिसेंबर (10 दिवस) 
2) कच्चे रेशीम, कोषांची चाचणी आणि निवड - ---- फेब्रुवारी (चार दिवस) 
3) रेशमाला पीळ देणे ------------------ जुलै, डिसेंबर (7 दिवस) 
4) रेशीम विणकाम ----------------------- जुलै, ऑगस्ट (6 दिवस) 
5) डॉल्बी आणि जॅकवारड वर डिझाईनिंग ----- ऑक्‍टोबर, फेब्रुवारी (10 दिवस) 
6) पॉवरलूम सेटिंग आणि देखभाल ------------ ऑगस्ट,सप्टेंबर (10 दिवस) 
7) रेशीम रंगकाम आणि छपाई ------------------जून, जानेवारी (10 दिवस) 
8) रेशीम मशिन देखभाल --------------------- ऑगस्ट (10 दिवस) 
9) वन्य रेशीम तंत्रज्ञान (एरी, मुगा, टसर) ------------ नोव्हेंबर (10 दिवस)

कृषी शिक्षणातील संधी

कृषीच्या उत्पादन वाढीमध्ये कृषी शिक्षणाचा व संशोधनाचा मोठा वाटा आहे. भारतात मध्ययुगीन काळापासून कृषी शिक्षणाचे महत्त्व दिसून येते. नालंदा व तक्षशिला विद्यापीठात कला अभ्यासाबरोबर कृषी अभ्यासक्रमाचा देखील समावेश होता. आधुनिक कृषी शास्त्राचा सुसूत्र अभ्यासक्रम सन 1905 मध्ये कानपूर, लॉयलपूर, कोइमतूर आणि नागपूर येथे कृषी महाविद्यालय स्थापन होऊन सुरवात झाली. त्यानंतर सन 1906 मध्ये पुणे येथे कृषी महाविद्यालयाची स्थापन होऊन सुरवात झाली. देशामध्ये सन 1960 मध्ये पंतनगर येथे जी. बी. पंत कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उच्च कृषी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सध्या भारतामध्ये एकूण 53 कृषी विद्यापीठे, पाच अभिमत विद्यापीठे, एक केंद्रीय कृषी विद्यापीठ व चार केंद्रीय विद्यापीठे कार्यरत आहेत. या सर्व विद्यापीठांमधून कृषी क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविले जाते. 

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठामध्ये घटक व विनाअनुदानित महाविद्यालयांमधून कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान आणि वनिकी या शाखांचा पदवी अभ्यासक्रम राबविला जातो. या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किमान 12 वी विज्ञान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत राबविली जाते. सन 2008-09 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र ज्ञान आयोग मर्यादित यांचे सहकार्याने प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज उपलब्ध आणि अर्ज भरून देण्याची सुविधा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र ज्ञान आयोगाच्या संकेतस्थळावर आणि त्यांचे तालुका पातळीपर्यंत असणाऱ्या केंद्रामधून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

सध्या काळाची गरज विचारात घेता जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर भर असलेला कार्यानुभवाधिष्ठित अभ्यासक्रम चौथ्या अखिल भारतीय अधिष्ठाता समितीने शिफारस केल्यानुसार सन 2007-08 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आला आहे. या सुधारित अभ्यासक्रमानुसार बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सातव्या सत्रात ग्रामीण कृषी कार्यानुभवावर आधारित कृषी पूरक उद्योगामध्ये कृषी शिक्षण आणि आठव्या सत्रामध्ये कार्यानुभवाधिष्ठित व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाचे कृषी शिक्षण दिले जात आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होईल. बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आठही शाखांच्या कृषी संलग्न पदवीधारकांना सातव्या सत्रात संपर्क शेतकरी आणि कृषी पूरक कारखानदारीमध्ये कार्यानुभव प्रशिक्षण आणि आठव्या सत्रामध्ये कार्यानुभव आधारित व्यावसायिक कृषी शिक्षण दिले जात आहे. उद्यान विद्या, गृहविज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी या पदवीधारकांना कृषिपूरक उद्योगामध्ये जास्त दिवस कार्यानुभव कृषी शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे या पुढील काळात कृषी आणि कृषी संलग्न पदवीधारकामध्ये आत्मविश्‍वास निर्माण होऊन स्वयंरोजगार वाढण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. तसेच या सर्व प्रयत्नामुळे कृषी विद्यापीठांना व्यावसायिक पदवीधर निर्माण करणे शक्‍य आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रम  
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये एम.एस्सी. (कृषी), एम.टेक. (कृषी अभियांत्रिकी), एम.एस्सी. (कृषी जैवतंत्रज्ञान) हे दोन वर्षांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच तीन वर्षांचा आचार्य पदवी अभ्यासक्रम राबविले जातात. याशिवाय एम.टेक. (अन्नशास्त्र) आणि एम.एस्सी. (गृहविज्ञान) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे तर एम.एस्सी. (कृषी हवामान शास्त्र) अभ्यासक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथे व मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, लातूर येथे राबविण्यात येत आहे. मत्स्य विज्ञान या विषयाचा एम.एस्सी. (मत्स्यशास्त्र) पदव्युत्तर अभ्यासक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाव्यतिरिक्त सर्व कृषी विद्यापीठात दोन वर्षांचा एम.एस्सी. (उद्यान विद्या) पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. यामध्ये भाजीपाला शास्त्र, फलोद्यान, पुष्पोत्पादन आणि बगीचा सुशोभीकरण या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे एम.एस्सी. (काढणीपश्‍चात व्यवस्थापन) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे. तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे वनिकी या विषयाचा दोन वर्षांचा एम.एस्सी. (वानिकी) पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू आहे. 
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथे विद्यापीठाचे महसुली उत्पन्नातून कृषी व्यवसाय व्यवस्थापन हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम एम.बी.ए. (कृषी) सन 2008-09 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमासाठी 30 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) कृषी संलग्न शाखेचे बी.एस्सी. (कृषी व्यवसाय व्यवस्थापन), बी.एस्सी. (कृषी), बी.एस्सी. (उद्यानविद्या), बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी.टेक. (अन्न तंत्रज्ञान), बी.एस्सी. (कृषी जैव तंत्रज्ञान), बी.एस्सी. (गृह विज्ञान), बी.एस्सी. (मत्स्य विज्ञान) आणि बी.एस्सी. (वनिकी) या शाखांचे पदवीधर पात्र समजले जातात. 

कृषी व्यवसाय व्यवस्थापन हा पदव्युत्तर अभ्यासक्रम मॅनेज हैदराबाद या संस्थेचे सहकार्याने तयार करण्यात आला आहे. तसेच देशामध्ये राबविण्यात येत असलेल्या तत्सम अभ्यासक्रमाचा विचार करून हा पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक, पुणे येथील व्यवस्थापन संस्था आणि हैदराबाद, बंगलोर, अहमदाबाद, लखनौ इ. ठिकाणचे तत्सम अभ्यासक्रमातील तज्ज्ञ प्राध्यापक यांच्याकडून शिकविला जातो. तसेच एम.बी.ए. (कृषी) अभ्यासक्रम, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे अनुक्रमे 30 व 35 प्रवेश क्षमतेने सुरू केला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी 70 टक्के वेटेज व 30 टक्के वेटेज पदवी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांना (सीजीपीए) देऊन पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशासाठीची सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र ज्ञान आयोग यांच्या सहकार्याने घेतली जाते. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशासाठीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात घेतली जाते. सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अकोला आणि नागपूर, मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणी, बदनापूर आणि लातूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत धुळे, राहुरी, पुणे आणि कोल्हापूर तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत दापोली या दहा केंद्रांवर घेतली जाते. या शैक्षणिक वर्षात सामाईक प्रवेश परीक्षा 7-7-2012 ते 12-7-2012 या कालावधीत घेतली जाणार आहे. 

निम्नस्तर कृषी शिक्षण 
कृषी विद्यापीठांमध्ये निम्नस्तर कृषी शिक्षणांतर्गत दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येतो. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक घटक कृषी तंत्र विद्यालय उपलब्ध असून या अभ्यासक्रमास दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला गुणानुक्रमानुसार प्रवेश दिला जातो. कृषी तंत्र विद्यालयाची प्रवेश क्षमता प्रत्येकी 60 इतकी आहे. याशिवाय महाराष्ट्रात खासगी कृषी तंत्र विद्यालये चारही कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत आठ घटक कृषी तंत्रविद्यालये, एक संलग्न कृषी तंत्र विद्यालय आणि 84 खासगी विनाअनुदानित कृषी तंत्र विद्यालये कार्यरत आहेत. 

सन 2007-08 पासून कृषी पदविका अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. तसेच कृषी पदविका अभ्यासक्रमाचे नामकरण 2007-08 पासून कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम असे करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आलेला आहे. यामध्ये यांत्रिकीकरण, जलसंधारण, व्यवसायाभिमुख शिक्षण या बाबींवर भर देण्यात आला आहे. 

कृषी पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रथम वर्षात कृषी मूलतत्त्वे, प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, कृषी अवजारे, यंत्रे व आधुनिक सिंचन पद्धती, पीक संरक्षण, ग्रामीण समाजशास्त्र, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. तर द्वितीय वर्षात सेंद्रिय शेती, बीजोत्पादन तंत्रज्ञान, रोपवाटिका व्यवस्थापन, फुलशेती व हरितगृह तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, शेतीमाल प्रक्रिया, सहकार, पतपुरवठा व पणन या विषयांचा समावेश आहे. तसेच प्रथम व द्वितीय वर्षात अनुक्रमे कार्यानुभव व कृषी आधारित उद्योग कार्यानुभवाचा समावेश केलेला आहे. त्यामुळे या शिक्षणामधून उत्कृष्ट शेती करण्यासाठी, खते, बियाणे, औषधे यांच्या कारखानदारीसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार होणार आहे. तसेच स्वयंरोजगार निर्मितीसाठीचा आत्मविश्‍वास या कृषी पदवीधारकामध्ये निर्माण होईल.
 
कृषी पदविका अभ्यासक्रमाव्यतिरिक्त माळी प्रशिक्षण हा एक वर्षाचा कोर्स निम्नस्तर कृषी शिक्षणांतर्गत राबविला जातो. सातवी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे या कोर्ससाठी प्रवेश दिला जातो. माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम सध्या गणेशखिंड, पुणे, नारायणगाव, बारामती व प्रवरानगर येथे राबविला जातो. 

आचार्य अभ्यासक्रम  
महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांतर्गत आचार्य पदवी अभ्यासक्रम सुरू असून सध्या कृषी शाखेअंतर्गत एकूण 14 विषयांमध्ये आचार्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात आहे. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून पीक शरीरक्रिया शास्त्र, बियाणे तंत्रज्ञान, कृषी अणुजीवशास्त्र व जीवरसायन शास्त्र या विषयांमध्ये आचार्य पदवी सुरू करण्यात आलेली आहे. गृहविज्ञान या शाखेमध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत दोन विद्यार्थ्यांना, मत्स्यविज्ञान या शाखेमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत पाच विद्यार्थ्यांना आचार्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतो. 
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत सन 2009-10 या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता दीडपट करण्यात आली आहे. सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 364 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो व आचार्य पदवी अभ्यासक्रमासाठी 72 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातून एकूण 1252 जागा पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता तर एकूण 180 जागा आचार्य पदवीकरिता उपलब्ध आहेत (तक्ता क्र. 1 व 2). 

कृषी पदवीधरांकरिता नोकरी/ व्यवसाय संधी  
कृषी व इतर संलग्न शाखांमधून पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता खासगी तसेच सरकारी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या "प्लेसमेंट सेल'मार्फत 2005 पासून आजतागायत सुमारे 1100 पेक्षा अधिक पदवीधरांची निरनिराळ्या खासगी क्षेत्रातील कंपन्या व बॅंकांमध्ये निवड झाली आहे. कृषी शाखेच्या पदवीधराकरिता कृषी विद्यापीठे, कृषी विभाग या सरकारी क्षेत्राव्यतिरिक्त अनेक खासगी बियाणे कंपन्या, बॅंका, कीटकनाशक कंपन्या, ठिबक तुषार सिंचन क्षेत्रातील कंपन्या इत्यादी ठिकाणी मागणी होत आहे. तसेच या पदवीधरांना स्वतःचा कृषी पूरक उद्योग उभारण्यास मोठा वाव आहे. कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये अनेक नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. उद्यानविद्या पदवीधारकांसाठी अनेक पुष्पोत्पादन प्रकल्प, बीजोत्पादन, प्रक्रिया उद्योग, बॅंका इत्यादी ठिकाणी संधी उपलब्ध आहेत. विशेषतः अन्नशास्त्र व तंत्रज्ञान आणि कृषी जैवतंत्रज्ञान पदवीधारकाकरिता नवीन संधी वाढत आहे. अन्नशास्त्र तंत्रज्ञान आणि कृषी जैवतंत्रज्ञान पदवीधारकांकरिता नवीन संधी वाढत आहे. अन्नशास्त्र तंत्रज्ञान या पदवीधारकाकरिता फार मोठी संधी आहे. कृषी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीधरांना विद्यापीठातील/ भाकृअप अंतर्गत संशोधन क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात संधी उपलब्ध आहे. खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांना या तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्‍यकता भासणार राहील. तसेच परदेशामध्ये अनेक ठिकाणी पुढील शिक्षणाकरिता आचार्य पदवीसाठी शिष्यवृत्ती मिळण्याच्या संधी आहेत. 

व्यावसायिका व्हायचंय, करा ऍग्रीक्‍लिनिक व ऍग्रीबिझनेस

केंद्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत "मॅनेज' हैदराबाद या संस्थेच्या माध्यमातून ऍग्रीक्‍लिनिक ऍण्ड ऍग्रीबिझनेस हा कोर्स सन 2002-2003 पासून सुरू झाला. प्रत्येक राज्यामध्ये हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी निवड मॅनेज, हैदराबाद यांच्यामार्फत केली जाते. महाराष्ट्रामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाते. हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅनेज हैदराबादमार्फत प्रमाणपत्र दिले जाते.
हा कोर्स पूर्ण केल्यावर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावरती विद्यार्थ्यांना 20 लाखांपर्यंत कर्ज राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅंकेतून मिळते. यासाठी नाबार्डमार्फत 44 टक्के अनुदान महिला आणि एस्सी, एसटी विद्यार्थ्यांना तसेच 36 टक्के अनुदान इतरांना मिळते. पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर पुन्हा 20 लाख रुपयांचे कर्ज मिळते. त्यासाठी तेवढेच अनुदान मिळते. त्यामुळे कृषी उद्योजकांना जास्तीत जास्त लाभ होत आहे. कृषी पदवीधारकांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी या कोर्समध्ये त्यांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच व्यवसायातील बारकावे सांगितले जातात. 

संतोष गोडसे, योगेश पाटील 

उद्देश  1) कृषी विस्तार व सेवा सल्ला सुविधा मोफत देणे किंवा ठराविक फी घेऊन मार्गदर्शन करणे, निविष्ठा खरेदी करणाऱ्या शेतकरी गटांना गरजेवरती आधारित मार्गदर्शन करणे. 
2) कृषी विकासास चालना देणे. 
3) कृषी क्षेत्रातील कृषी पदवीधर, पदविकाधारक, दुग्ध व्यवसाय पदविकाधारक इ. सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय सुरू करून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक तयार करावेत. 

प्रवेश कोणाला? 
1) कृषी पदवीधर 
2) कृषी पदविकाधारक 
3) दुग्ध व्यवसाय पदविकाधारक 
4) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कृषी पदविकाधारक आणि पदवीधर. 
5) कृषी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी 

प्रशिक्षण कालावधी व अभ्यासक्रम 
ऍग्रीक्‍लिनिक व ऍग्रीबिझनेस हा कोर्स दोन महिने कालावधीचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त 500 रुपये फी आकारली जाते. 

प्रशिक्षणार्थीची प्रशिक्षणाची निवड 
ज्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घ्यायचे आहे ते विद्यार्थी आपली नावनोंदणी मॅनेज हैदराबादमार्फत नेमलेल्या संस्थेमध्ये करतात. नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलविले जाते. एका बॅचसाठी 35 विद्यार्थी निवडले जातात. 

प्रशिक्षणाचे स्वरूप - 
विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण, कृषिविषयक व्यवसायांची माहिती, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि यशस्वी व्यावसायिकांच्या उद्योगांना भेटी देऊन त्यांमध्ये व्यवसायाची गोडी निर्माण केली जाते. नंतरच्या टप्प्यामध्ये कृषी व कृषिपूरक व्यवसायांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. आपला व्यवसाय निवडण्यास सांगितले जाते. यशस्वी उद्योजकांना मार्गदर्शनासाठी बोलाविले जाते आणि त्यांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी सुरवातीपासून घेतलेले कष्ट, आलेल्या अडीअडचणींवर केलेली मात याची माहिती दिली जाते. उद्योगासाठी परवाना मिळविण्यापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतचे सर्व बारकावे सांगितले जातात. अशा उद्योजकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते. 
विद्यार्थ्यांनी व्यवसाय निवड केल्यानंतर त्यांनी जो व्यवसाय निवडला आहे त्या व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी 15 दिवस पाठविले जाते. या 15 दिवसांमध्ये या विद्यार्थ्यांनीच व्यवसायाच्या ठिकाणी स्वतः काम करायचे असते. तसेच विद्यार्थांना प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव दिला जातो. स्वतः काम केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामातले बारकावे लक्षात येतात. ज्या वेळेस आपला उद्योग सुरू होईल, त्या वेळेस जास्त अडचणींना सामोरे जावे लागणार नाही असा आत्मविश्‍वास येतो. याचबरोबरीने कच्चामाल खरेदी, साठवण, प्रक्रिया, पॅकिंग, विक्री व्यवस्था, ग्राहकांची मानसिकता, डीलर लोकांशी संवाद, जमा-खर्चाचे गणित याची माहिती मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, बारामती मार्फत हा कोर्स चालविला जातो. आतापर्यंत या केंद्रातून 318 कृषी पदवीधारक आणि पदविकाधारकांनी कोर्स पूर्ण केला आहे. त्यापैकी 160 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केले आहेत. 

प्रकल्प अहवाल  विद्यार्थ्यांनी निवडलेल्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल त्यांनाच तयार करण्यास सांगितला जातो. यासाठी बॅंकेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन दिले जाते. बॅंकेच्या नियमानुसार अहवाल प्रत्येक विद्यार्थ्यांकडून तयार करून संबंधित बॅंकेत जमा केला जातो. सर्व कागदपत्रांच्या तपासणीनंतर संबंधिताला कर्ज मिळते. त्यानंतर सहा महिन्यांमध्ये "नाबार्ड'मार्फत अनुदान दिले जाते. 

कृषी व्यवस्थापन - उद्योजक घडविणारे शिक्षण

प्रक्रियेसाठीची पूरक धोरणे, तरुणांची वाढती संख्या व क्रयशक्ती यामुळे देशातील अन्न व कृषी उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीस प्रचंड संधी आहेत. येत्या तीन वर्षांत भारतीय अन्नप्रक्रिया उद्योगातील गुंतवणूक 181 अब्ज अमेरिकन डॉलरवरून 258 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. यानुसार 2020 पर्यंत अन्नप्रक्रिया उद्योगातील गुंतवणूक 318 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. 

देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेची अन्नाची, विशेषतः प्रक्रियायुक्त अन्नाची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत देशाच्या दरडोई उत्पन्नात आठ पटीने वाढ झाली असता, अन्नावरील खर्चात मात्र 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. कोणत्याही उद्योग - व्यवसायातील वाढ ही त्यातील संधींमधील वाढीत परावर्तित होत असते. अन्नप्रक्रिया उद्योग हे कृषी व संलग्न उद्योगांच्या वाढीचे एक प्रातिनिधिक उदाहरण मानले, तर एकंदरीत कृषी क्षेत्रातील वाढत्या संधींची कल्पना यावी. गेल्या दहा वर्षांतील व येत्या दहा वर्षांतील वाढ विचारात घेता कृषी उत्पादन, प्रक्रिया, निर्यात, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांत नोकरी - व्यवसाय व गुंतवणुकीच्या प्रचंड संधी राहणार, हे निश्‍चित. या संधी काबीज करण्यासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

खते, बियाणे, कीटकनाशक उत्पादक कंपन्या, बॅंका ते अगदी मोबाईल कंपन्यांपर्यंत बहुतेक सर्व उद्योग शेतकरीकेंद्रित होत आहेत. त्यासाठी त्यांना शेतीचे पायाभूत शिक्षण, ज्ञान असलेले व व्यवस्थापनातही कौशल्य मिळवलेले प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्‍यक असते. यासाठी कृषी, उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान आदी कृषी विषयांमध्ये पदवी व त्यानंतर व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या "ऍग्री टेक्‍नोमॅनेजर' लोकांना सध्या सर्वाधिक संधी आहेत. 

शेतकऱ्यांच्या गरजांचे आकलन कृषीचे शिक्षण घेतलेल्या मुलांएवढे इतर कुणाचे नसते, त्यामुळे बॅंक कर्ज मंजुरीपासून ते शेतकऱ्यांसाठीचे मोबाईल संदेश तयार करण्यापर्यंत सर्व कृषीसंलग्न उद्योगांत कृषी पदवीधरांचे तांत्रिक ज्ञान फार उपयुक्त पडते. शेती किंवा शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या सर्व उद्योगांची नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंतची जबाबदारी ऍग्री टेक्‍नोमॅनेजर लोकांवरच असते, त्यामुळे तांत्रिक ज्ञानाला व्यवस्थापनाची जोड असलेली व्यक्ती तांत्रिक व व्यावसायिक बाबींच्या समन्वयातून मोठे उद्दिष्ट साध्य करते. गेल्या पाच वर्षांत असे दुहेरी प्रभुत्व असलेले विद्यार्थी नोकरी, संशोधन व विकास ते स्वतंत्र उद्योग - व्यवसायांपर्यंत सर्वत्र चांगली कामगिरी करत आहेत. व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेले कृषी पदवीधर उद्योजकतेकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. 

कृषी पदवीनंतरच्या व्यवस्थापन शिक्षणामध्ये मार्केटिंग, फायनान्स, प्रॉडक्‍शन यांमध्ये सर्वाधिक संधी आहेत. याशिवाय कृषीतील विविध क्षेत्रांनुसार रिटेल, सप्लाय चेन, फॉरेस्ट्री, कार्बन ट्रेडिंग, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, फूड क्वालिटी, पॅकेजिंग, लाइव्हस्टॉक, पेस्टीसाइड, फूड - वॉटर मॅनेजमेंट यामध्येही व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. 

कृषी व संलग्न तांत्रिक विषयांतील पदवीधरांसाठी विविध विद्यापीठे, शासकीय व खासगी संस्थांमार्फत वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थापन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मुंबई विद्यापीठ, गुजरातमधील आनंद कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम, अहमदाबाद), वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट, मिटकॉम यासह अनेक संस्थांमार्फत विशिष्ट विषयात प्रावीण्य मिळून देणारे व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवले जातात. विद्यार्थ्यांनी पदवीनंतर आपले पायाभूत ज्ञान व आवडीनुसार व्यवस्थापन शिक्षणाची दिशा निश्‍चित केल्यास फायदा होतो. संबंधित शिक्षण संस्थांच्या संकेतस्थळांवरून या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती मिळू शकते. 

दुर्गम भागात दूध संघ उभारून मिळविले "समाधान'

छोट्या जमिनी व डोंगराळ भागांचा तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी. अशा भागात खासगी दुग्ध संघ उभारणे म्हणजे आव्हानच. त्यातच अन्य संघांशी स्पर्धा सोपी नाही. मात्र, तालुक्‍यातील वडगावच्या एका जिद्दी युवकाने सर्व आव्हाने पेलत दुग्ध व्यवसाय फायद्यात नेला. त्यासाठी बांधलेली सूत्रे, व्यवस्थापन व शेतकऱ्यांशी साधलेला समन्वय हे घटक यशाला पूरक ठरले. 
राजकुमार चौगुले 
कोल्हापूर जिल्हा म्हणजे ऊस व दुग्ध व्यवसायाचं आगार. मात्र, जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावड्यासारखे डोंगराळ तालुके, संपर्काच्या अडचणी यामुळे या भागात पूरक व्यवसाय उभारून तो नावारूपाला आणणं जिकिरीचं काम. सहकाराची गंगा वाहत असताना स्पर्धेला तोंड देऊन खासगी दूध संघ चालविणं हे सोपं काम नाही. मात्र, दांडगा जनसंपर्क व इच्छाशक्तीच्या जोरावर पस्तीस वर्षांच्या युवकाने हे आव्हान पेललं, ते यशस्वीही करून दाखविलं. ऍड. राहुल दिनकरराव पाटील - थोरात हे या जिद्दी युवकाचं नाव. शाहूवाडी तालुक्‍यातील वडगाव (थोरातांचं) या केवळ बाराशे लोकसंख्या असणाऱ्या दुर्गम गावचे ते रहिवासी. तब्बल दोनशे पन्नास दुग्ध संस्थांच्या एकत्रीकरणातून "समाधान मिल्क आणि प्रॉडक्‍ट्‌स' हा खासगी संघ त्यांनी उभारला. सहकाराच्या गंगेत तो आदर्शवत ठरला आहे. सहकारी दूध संघांच्या उणिवा दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा भाव मिळवून देणे, हे प्रमुख सूत्र संघाने राबविलं. यामुळेच जिल्ह्यातील बड्या संघांच्या स्पर्धेतही हा संघ टिकून आहे. 

प्रतिकूल परिस्थितीतून उभारणी शाहूवाडी तालुका म्हणजे छोट्या जमिनी व डोंगराळ भाग, त्याचा विकास जिल्ह्याच्या अन्य तालुक्‍यांच्या मानाने कमी आहे. तालुका ठिकाणापासून पंधरा किलोमीटरवरील वडगाव हे राहुल यांचं गाव. त्यांनी मुंबईत वकिलीची पदवी घेतली. सुमारे पाच वर्षे प्रॅक्‍टिसही केली. या क्षेत्रात नाव कमविण्याची संधी त्यांना होती; मात्र आपल्या भागासाठी दुग्ध व्यवसाय अधिक प्रभावी ठरेल, या उद्देशाने त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित केलं; पण सहकारी दुग्ध संघांचं प्राबल्य असणाऱ्या या भागात खासगी दुग्ध संघ उभा करायचा म्हणजे दिव्य आव्हान होतं. अपेक्षेप्रमाणे मोठा विरोध झाला. राहुल यांनी जिद्द सोडली नाही. वकिलीच्या माध्यमातून जोडलेल्या माणसांचा उपयोग त्यांना दुग्ध व्यवसायासाठी झाला. राहुल यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी राजकीय असली तरी त्यांनी स्वतःला राजकारणापासून अलिप्तच ठेवलं. सहकारी संघांच्या खाबूगिरीचा अभ्यास केला. अनेक संघ बॅंकेप्रमाणे शेतकऱ्यांच्या दुधाच्या रकमेतील काही भाग विविध निधीच्या नावाखाली कापून घेतात, यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. सर्वच्या सर्व रक्कम शेतकऱ्यांना दिली तर त्यांचा फायदा होऊ शकतो, हे सूत्र मनात पक्कं केलं. डोंगराळ गावांमध्ये व्यवसाय करणं आव्हानाचं होतं; मात्र प्रभावी जनसंपर्काच्या माध्यमातून राहुल यांनी वाड्या-वस्त्यांवरही संपर्क साधला. हे काम सुमारे पाच ते सहा महिने सुरू ठेवलं. विविध प्रयत्नांतून एक सप्टेंबर 2009 ला दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली. चांदोली धरण ते शित्तूर या सुमारे सव्वाशे किलोमीटर परिसरातील गावांतून दुग्ध संकलनास प्रारंभ केला. सुरवातीला साडेसातशे लिटर दूध संकलनावरून सुरवात झाली. टप्प्याटप्प्याने हे संकलन नऊ हजार लिटरवर पोचलं आहे. शाहूवाडी, पन्हाळा व शिराळा तालुक्‍यात आता "समाधान' दूध संघाच्या दोनशे अठ्ठेचाळीस दुग्ध संस्था आहेत. अगदी वीस लिटर दूध संकलनाकरिताही संस्था आहे. दुर्गम भागातील दूधही घ्यायचं, या जिद्दीने परवडत नसतानाही काही संस्था उभ्या राहिल्या. त्यातूनच समाधान संस्थेत वीस लिटरपासून साडेपाचशे लिटरपर्यंत दूध संकलन केलं जातं. डोंगराळ भाग असल्याने नामवंत जातींच्या जनावरांची उपलब्धता या भागात नाही. "गवळाट' या स्थानिक जातीच्या म्हशीचं दूध जास्त प्रमाणात येतं. 

असं आहे व्यवस्थापन 
सहकारी दूध संघाच्या धर्तीवर समाधानचं काम चालतं. प्रत्येक दुग्ध संस्थेत मिल्को टेस्टर, वजन काटा, कॅन आदी सुविधा आहेत. वडगाव येथील मुख्य संकलन केंद्रासह दुग्ध संस्थांमध्ये 42 कर्मचारी आहेत. काही कर्मचाऱ्यांना दुधाच्या संकलनावरही पैसे दिले जातात. संघात संकलन अधिकारी, सुपरवायझर, पशुवैद्यकीय अधिकारी अशांसह अकाउंट, तांत्रिक विभाग आहेत. प्रत्येक विभागात स्वतंत्र तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक आहे. संघाची चार व भाड्याने घेतलेल्या अठरा वाहनांच्या माध्यमातून दररोज वडगाव येथील मुख्य संकलन केंद्रावर दूध संकलन केलं जातं. संध्याकाळी व सकाळचं दूध एकत्र करून दुसऱ्या दिवशी दुपारी ते विक्रीसाठी चितळे दूध संघ व अन्य ठिकाणी पाठविलं जातं. दूध आल्यानंतर त्याचं वजन केलं जातं. फॅट तपासणीनंतर डंप टॅंकमध्ये ओतलं जातं. थंड पाण्याच्या युनिटच्या साहाय्याने प्लेटच्या माध्यमातून दूध थंड केलं जातं. योग्य तापमानात थंड झाल्यानंतर ते स्टोअरेज टाकीत नेलं जातं. साडेपाच हजार लिटरच्या दोन स्टोअरेज टाक्‍या यासाठी बसविण्यात आल्या आहेत. यातून दूध थेट टॅंकरमध्ये भरलं जातं, तेथून बाहेर रवाना केलं जातं. 

ओव्हरहेडची रक्कम हाच "नफा' 
दूध विक्रीतून शेतकऱ्यांच्या पैशांव्यतिरिक्त लिटरला चार ते पाच रुपये ओव्हरहेडची रक्कम मिळते. ही रक्कम हाच नफा समजून संघाचं कार्य चालतं. लिटरला चार रुपये रक्कम गृहीत धरली, तर त्यातून एक रुपया वीस पैसे वाहतुकीसाठी, साठ पैसे प्रोसेसिंगसाठी, ...............पंचवीस पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी, ............एक रुपया दहा पैसे शेतकऱ्यांच्या बोनससाठी खर्ची पडतात. शिल्लक राहिलेले नव्वद पैसे ते एक रुपया हाच निव्वळ नफा, हे व्यवसायाचं सरळ सूत्र असल्याचे राहुल यांनी सांगितले. अन्य संघ आर्थिक वर्षाचा बोनस शेतकऱ्यांना देतात. हा संघ पूर्ण वर्षाचा म्हणजे गेल्या दिवाळीपासून ते या दिवाळीपर्यंत असा बोनस देतो. खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं हा विचार असतो. सायंकाळी उशिरापर्यंत दिवसाच्या खर्चाचा तपशील येतो. दुधाचं संकलन किती झालं, वाहतूक खर्च किती झाला, याचा विचार केला जातो. खर्चात बचत हा नफा वाढविण्याचा मोठा मार्ग आहे, असं सूत्र स्वीकारलं असून, सुुमारे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक या व्यवसायासाठी झाली आहे. 


दूध संकलन केंद्रावर सीसीटीव्हीची नजर सर्व काम चोख व्हावं यासाठी मुख्य संकलन केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यांना "इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी' असल्याने संस्थेत दूध संकलन कसं चालले आहे, याचं परीक्षण करता येतं. दूध संकलन केंद्राबरोबरच अकाउंट विभागातही कॅमेरे बसवले आहेत. 

अशीही कल्पकता 
राहुल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचं राजकीय वलय मोठं आहे; पण त्यांनी दुग्ध व्यवसायाला राजकारणाची किनार आणली नाही, हे त्यांचं मोठं यश आहे. त्यांचा एक किस्सा खूप मजेदार आहे. दूध संकलन केंद्राच्या एका गावामध्ये राजकीय गट - तट मोठे आहेत. गावातील सर्व लोक राहुल यांना मानतात; पण गावातील विरोधकांच्या गल्लीत जाऊन आम्ही तुम्हाला दूध देणार नाही, असा प्रवाह या गावचा होता. यामुळे या गावात चार ठिकाणी चार दुग्ध संस्था राहुल यांनी काढल्या आणि गावचं दूध संकलन केलं. राजकारणामुळे दुधाचं संकलन बंद होऊ नये यासाठी राहुल यांनी लढविलेली ही युक्ती निश्‍चितपणे व्यावसायिकदृष्टीला प्राधान्य देणारी ठरली. 

संपर्क ऍड. राहुल पाटील - थोरात - 9325901717
मु.पो. वडगाव (थोरातांचं), ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर