Sunday, March 18, 2012

ब्रॉयलर पक्ष्यांचे फार्मवरील व्यवस्थापन

डॉ. व्ही. डी. लोणकर, डॉ. ए. एस. कदम

पिल्लांना शेडमध्ये आणल्यानंतर प्रथम त्यांचे सरासरी वजन करून रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवावी. शिफारशीत मात्रेमध्ये औषधीयुक्त पिण्याचे पाणी पिल्लांना द्यावे. प्रत्येक पिल्लाची चोच पाण्यामध्ये बुडवून अलगद ब्रुडरखाली सोडावे. पिल्लाची चोच पाण्यात बुडवल्याने ते पाणी पिण्यास आपोआप शिकते.

एकदिवसीय पिल्लांच्या पोटात बलक आतड्यास जोडलेल्या अवस्थेत असतो. त्याचा पिल्लास खाद्य म्हणून उपयोग होतो. त्यात प्रतिबंधक द्रव्ये असल्याने पिल्लांचे पहिल्या आठवड्यात रोगापासून संरक्षणही होते. पूर्वीच्या संशोधनानुसार असे म्हटले जायचे, की पहिले 48 तास पिल्लांना खाद्य - पाणी दिले नाही, तरीसुद्धा पिल्ले त्यांच्या पोटात असलेल्या बलकाचा खाद्य म्हणून वापर करतात; परंतु सध्याच्या नवीन संशोधनानुसार असे आढळून आले आहे, की पक्ष्यांना जेवढे लवकर आपण खाद्य व पाणी देऊ, तेवढ्या गतीने बलकाचा वापर खाद्य म्हणून केला जातो. एवढेच नव्हे, तर पिल्लांना लवकर खाद्य व पाणी दिल्याने त्यांच्या वजनात वाढ होते, त्यांच्या आतड्यांची वाढ गतीने होऊन त्यांची पचनक्रिया जलद होते.

पिल्ले फार्मवर येण्याअगोदर लिटर (गादी), ब्रुडर, चीक गार्ड यांची रचना योग्य पद्धतीने करावी. याबाबतची माहिती मागील भागात दिली होती. तसेच, ब्रॉयलर प्रीस्टार्टर हे खाद्य पेपरवरती पसरून द्यावे. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याची व्यवस्था करून ठेवावी. पिल्ले आल्यानंतर प्रथम त्यांचे सरासरी वजन करून रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवावी. मागील भागामध्ये सांगितल्याप्रमाणे औषधीयुक्त पिण्याचे पाणी पिलांना द्यावे. प्रत्येक पिल्लाची चोच पाण्यामध्ये बुडवून अलगद ब्रुडरखाली सोडावे. पिल्लांची चोच पाण्यात बुडवल्याने ती पाणी पिण्यास आपोआप शिकतात.

ब्रुडर्समध्ये पिल्लांना वाढविण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी ः
1) पिल्लांना कृत्रिम दायीमार्फत त्यांच्या वाढीसाठी योग्य प्रकारे ऊब द्यावी लागते. साधारणतः दोन आठवडे उन्हाळ्यामध्ये व तीन आठवडे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पिल्लांना ऊब द्यावी, त्यानंतर ब्रुडर्स काढून टाकावेत. पिल्लांना उष्णता देताना पहिल्या आठवड्यामध्ये तापमान 95 अंश फॅ. (35 अंश से.) एवढे ठेवावे. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला तीन अंश से. (पाच अंश फॅ.) याप्रमाणे तापमान कमी करत - करत ते 70 अंश फॅ. (21 अंश से.) वर स्थिर करावे.
2) पिल्लांना प्रकाश आकर्षित करतो. हवेशीर व चांगले वायुविजन असलेल्या घरट्यामध्ये पक्ष्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण सुधारते, वाढ चांगली होते. पक्ष्यांची घरे हवेशीर असावीत; परंतु जोराचा वारा पिल्लांवर येऊ नये याची काळजी घ्यावी लागते. उबवणुकीच्या घरट्यामध्ये हवा चांगली खेळती नसेल, तर घरट्यामधील कार्बन मोनॉक्‍साईड, कार्बन डाय- ऑक्‍साईड वायूचे प्रमाण वाढते, गादी ओली होते व पक्षी निरनिराळ्या रोगांना बळी पडतात. घरट्यामध्ये अमोनियाचे प्रमाण वाढल्यास पिल्लांचे डोळे चुरचुरतात. पिल्लांना श्‍वसनसंस्थेचे रोग होतात, त्यांची वाढ खुंटते.
3) आवश्‍यकतेनुसार वाढणाऱ्या पक्ष्यांना लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा विचार करता चीक गार्ड थोडे-थोडे सरकावून उबवणुकीची जागा वाढवावी.
4) उबवणुकीच्या घरट्यामध्ये 30 ते 75 टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रता असणे आवश्‍यक आहे. घरट्यामध्ये जास्त आर्द्रता झाल्यास गादी ओली होते व

कॉक्‍सिडीऑनीसचे आजार उद्‌भवतात.
5) उबवणुकीनंतरच्या काळामध्ये घरामध्ये रात्री मंद उजेड ठेवावा. अंधारामुळे पिल्लांना घबराट होऊन ती चेंगरून मरण्याचा संभव असतो.
6) ओल्या झालेल्या गादीमध्ये हायड्रेटेड लाइम (0.4 कि.ग्रॅ. प्रति 18 चौ. फूट या प्रमाणात) आणि सुपर फॉस्फेट (एक कि. ग्रॅ. प्रति 10 चौ. फूट या प्रमाणात) मिसळावे. यामुळे गादीमधील अतिरिक्त पाण्याचे शोषण होऊन तूस कोरडे होण्यास मदत होते.

ब्रॉयलर पक्ष्यांसाठी खाद्याची व पाण्याची भांडी ः
सध्या गोल उभी टांगता येण्यासारखी खाद्य भांडी (ट्यूब फीडर्स) उपलब्ध आहेत. साधारणतः एक ते चार आठवडे वयापर्यंत एक भांडे प्रति 40 ते 50 पक्षी या प्रमाणात, तर पाच ते सहा आठवडे वयापर्यंत एक भांडे प्रति 25 पक्षी या प्रमाणात ठेवावे. खाद्याच्या भांड्यांना वर जाळी बसवलेली असते, त्यामुळे खाद्याची नासाडी होत नाही. खाद्याचे भांडे काठोकाठ भरू नये, त्यामुळे खाद्य सांडून वाया जाण्याची शक्‍यता अधिक असते. खाद्याचे भांडे नेहमी अर्धे ते पाऊण भाग एवढे भरावे. खाद्याच्या भांड्याची उंची नेहमी पक्ष्याच्या पाठीच्या उंचीएवढी टांगती ठेवावी.

पाण्याचे भांडे खाद्याच्या दोन भांड्यामध्ये समान अंतरावर गाडीच्या चाकाच्या आरीप्रमाणे ठेवावे. दोन आठवडे वयापर्यंत 100 पक्ष्यांमागे दोन लिटर क्षमतेची दोन भांडी व तीन ते सहा आठवड्यापर्यंत चार लिटर क्षमतेची दोन भांडी ठेवावीत. सध्या बाजारामध्ये स्वयंचलित घंटेच्या आकाराची (बेल ड्रिंकर) भांडी उपलब्ध आहेत. त्यांचा वापर ब्रुडिंगनंतरच्या काळामध्ये अधिक चांगल्या प्रकारे होतो.

संपर्क ः डॉ. लोणकर ः 9420243895
(लेखक कुक्कुटपालनशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120313/5723068681543923964.htm