Showing posts with label Agriculture in India. Show all posts
Showing posts with label Agriculture in India. Show all posts

Wednesday, July 18, 2012

फूड टेक्‍नॉलॉजीमधील पदवी अभ्यासक्रम

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्‍नॉलॉजी एंटरप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट, सोनेपत (हरियाना) येथे उपलब्ध असणाऱ्या फूड टेक्‍नॉलॉजी विषयातील पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागा - या अभ्यासक्रमासाठी एकूण उपलब्ध जागांची संख्या 120 आहे.
 
आवश्‍यक शैक्षणिक पात्रता - अर्जदारांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत 12 वीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांसह व कमीत कमी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असायला हवी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. 

विशेष सूचना - जे विद्यार्थी 2011-2012 या शैक्षणिक सत्रात वरील पात्रता परीक्षेला बसले असतील ते सुद्धा या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 

वयोमर्यादा - अर्जदारांचे वय कमीत कमी 17 वर्षे असायला हवे. 

निवड प्रक्रिया - अर्जदारांनी राष्ट्रीय स्तरावरील "एआयईईई' ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. या पात्रता परीक्षेतील पात्रताधारक उमेदवारांचा गुणांक व त्यांच्या शैक्षणिक आलेखाच्या आधारे त्यांची या अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल. 

अधिक माहिती व तपशील - अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्‍नॉलॉजी एंटरप्रेन्युअरशिप अँड मॅनेजमेंटच्या दूरध्वनी क्र. 0130-2281042, 2281044 वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.niftem.ac.in या संकेतस्थळावर किंवा admission@nifteu.ac.in. या ई-मेलवर संपर्क साधावा. 

अर्ज व माहितीपत्रक - अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 350 रु.चा "एनआयएफटीईएम'च्या नावे असणारा व स्टेट बॅंक ऑफ इंडिया ब्रॅंच एनआयएफटीईएम कॅम्प्स कुंडली (ब्रॅंच कोड 15479) यांच्या नावे असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख - संपूर्णपणे भरलेले, आवश्‍यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे व 1000 रु.च्या वर नमूद केलेल्या ड्राफ्टसह असणारे अर्ज ऍडमिशन्स सेल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्‍नॉलॉजी एंटरप्रेन्युअरशिप अँड मॅनेजमेंट, प्लॉट नं. 97, सेक्‍टर 56, एचएसआयआयडीसी इस्टेट, कुंडली, जि. सोनेपत, हरियाना 131028 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2012. 

गणित व विज्ञान विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या अथवा उत्तीर्ण होणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना फूड टेक्‍नॉलॉजी क्षेत्रातील विशेष पदवी अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा अवश्‍य विचार करावा.

फुलधारणेसाठी मॅग्नेशिअम महत्त्वाचे

मॅग्नेशिअम पिकांना चस++ या विद्राव्य स्वरूपात उपलब्ध होतो. तसेच पिकांमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण 0.1 ते 0.5 टक्का एवढे असते. नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांचा कमी वापर व मॅग्नेशिअम खतांचा कमी वापर यामुळे उत्पादनांत मोठी घट जाणवत आहे. म्हणून या अन्नद्रव्याचे पीक पोषणात योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

जमिनीमध्ये मॅग्नेशिअमची उपलब्धता - 
जमिनीच्या वरच्या भागात मॅग्नेशिअमचे सर्वसाधारण प्रमाण 0.03 ते 0.84 टक्का असते. तर रेताड जमिनीत मॅग्नेशिअमचे प्रमाण सर्वांत कमी (0.05 टक्का) तर पोयटायुक्त जमिनीत मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते. (0.5 टक्का) जमिनीच मॅग्नेशिअम विद्राव्य आणि अविद्राव्य स्वरूपात आढळतो. खनिजीय मॅग्नेशिअम व सेंद्रिय पदार्थांमधील मॅग्नेशिअम हे मॅग्नेशिअमचे जमिनीतील स्रोत आहेत. 

मॅग्नेशिअमची कमतरता लक्षणे - 
पिकांना त्यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत मॅग्नेशिअमची गरज कमी अधिक प्रमाणात असते. त्यामध्ये फुलधारणा व फळधारणा अवस्थेत झाडांना मॅग्नेशिअमची गरज जास्त असते. या अवस्थेत पिकांतील इतर अवयवांतील मॅग्नेशिअम फूल व फळ यांच्या वाढीसाठी जास्त खर्च होतो. त्यामुळे फूल व फळधारणा अवस्थेत पिकांना पुरेसे मॅग्नेशिअम उपलब्ध न झाल्यास पिकांमध्ये मॅग्नेशिअमच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात. मॅग्नेशिअमच्या कमतरतेची लक्षणे प्रथम जुन्या पानांवर दिसून येतात. मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे झाडांची पाने सुकून जातात आणि जुन्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात व कालांतराने शिरांकडील भाग पिवळा पडतो. तसेच मॅग्नेशिअमची पिकांना जास्त कमतरता झाल्यास पालाश कमतरता व मॅग्नेशिअम कमतरता यामध्ये फरक करणे अवघड होते. 

मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्यांचा अभाव जाणवतो व पाने लहान आकाराची दिसतात. काही पिकांमध्ये मॅग्नेशिअमच्या अभावामुळे जुन्या पानांच्या कडा तपकिरी रंगाच्या दिसतात. कापूस या पिकात मॅग्नेशिअमच्या अभावामुळे पानांचा रंग लाल होतो. म्हणजेच हरितद्रव्याचा ऱ्हास पानांतील इतर रंगद्रव्यांच्या विघटनाच्या तुलनेत जास्त होतो. तसेच पानांतील प्रथिनांचा ऱ्हास होतो व पाने सुकून जातात. पाने सुकून किंवा पिवळी पडणे ही प्रक्रिया ज्या पानांवर सूर्यप्रकाश जास्त पडतो. अशा भागातील पानांवर जास्त असते तर ज्या पानांवर सावली पडते ती पाने हिरवी राहतात. मका पिकात सर्वांत खालच्या पानांमध्ये पिवळसर रेषा दिसतात, नंतर संपूर्ण पानांवर पसरतात. अति मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे पानांवर डाग दिसतात. पानांची गळ होते. 

मॅग्नेशिअमचे पीक पोषणातील कार्य - 
-हरिद्रव्य तयार होण्यासाठी मॅग्नेशिअमची गरज असते. प्रकाशसंश्‍लेषण क्रियेमध्ये मॅग्नेशिअम महत्त्वाची भूमिका बजावतो. 
-पिकांमध्ये कर्बोदके, प्रथिने व मेद तयार होण्यासाठी, त्यांचे वहन व पिकांत साठा होण्यासाठी मॅग्नेशिअम उपयुक्त असते. 
-मॅग्नेशिअममुळे पिकांतील संप्रेरके व त्यांचे कार्य यांची गती वाढते. 
-पिकांमध्ये संप्रेरके व ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मॅग्नेशिअम अन्नद्रव्य महत्त्वाचे असते. 
-पिकात न्युक्‍लीक आम्ल (ठछअ) तयार होण्यास कार्य करते. 
-पिकांमध्ये ऊर्जा साठवण क्रियेमध्ये मॅग्नेशिअमची उपयुक्तता आहे. 
-पिकांतील पेशींची वाढ, पेशीभित्तका तयार होण्यास मॅग्नेशिअम महत्त्वाचे आहे. तसेच पिकांमध्ये पाण्याचे प्रमाण व संप्रेरकाचे प्रमाण संतुलित ठेवण्यास उपयुक्त असतो. 
-पिकांमध्ये लोहाचा वापर जास्त होण्यास मॅग्नेशिअम मदत करतो. 

मॅग्नेशिअम वापरण्याचे प्रमाण व पद्धत मॅग्नेशिअम जमिनीतून वापर पेरणी किंवा लागवड करतानाच 20 किलो प्रति हेक्‍टरी करावा किंवा पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये फवारणीद्वारे 0.2 ते 0.5 टक्का (20 ते 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून) वापर करण्यात यावा.

रिमोट सेन्सिंग आणि जी.आय.एस.चे महत्त्व

रिमोट सेन्सिंग (सुदूर संवेदन) ही एक कला आणि शास्त्र आहे. रिमोट सेन्सिंगमध्ये आकडेवारीच्या नोंदी, त्यांची नोंदणी करून केलेल्या मोजमापांनुसार अभ्यास केला जातो. त्यावरून माहिती तयार केली जाते. उदा. एखाद्या अंतराबाबतची माहिती. जसे मनुष्य आपल्या डोळ्यांनी दुरून पाहून एखाद्या वस्तूच्या आकारमानाचा, वजनाचा, अगर तत्सम बाबींचा अंदाज घेतो; दूरवरून येणाऱ्या सुवासिक अथवा दुर्गंधीयुक्त वाऱ्याचा श्‍वसनाने नाकाद्वारे अंदाज घेतो, दुरून येणाऱ्या आवाजाचा कानांद्वारे अंदाज घेतो... हे मानवी देहाचे नैसर्गिक संवेदन शोधणारे अवयव आहेत, ते पर्यावरणामधून बराचसा अचूक वेध घेतात, त्यामुळेच मनुष्यास नैसर्गिक संवेदना घेणारे अवयव प्राप्त झालेले आहेत. मोठ्या प्रक्षेत्रावरील, पृथ्वीवरील अभ्यासासाठी यंत्रामध्ये सेन्सॉर बसवून भौगोलिक अभ्यासासाठी त्याचा आता उपयोग केला जात आहे. अशी यंत्रसामग्री हेलिकॉप्टरवर बसवून त्याद्वारे मोठमोठ्या क्षेत्राचे नकाशे तयार करणे, तसेच पृथ्वीवरील भौगोलिक रचनांचा अभ्यास करण्याकामी माहिती गोळा करण्याचे काम केले जाते. तशाच प्रकारची कामे विमानांद्वारे आणि सॅटेलाईटद्वारे सेन्सॉरचा वापर करून बरीच माहिती मिळवली जात आहे. त्यातूनच पृथ्वीवरील वेध घेण्याचे काम आणि माहिती मिळवण्याचे काम केले जाते. पृथ्वीवरील झाडे, घरे, रस्ते, फुले अथवा तत्सम वस्तू यांच्याकडून परावर्तित होणाऱ्या पर्यावरणातून सेन्सॉर वेध घेतात आणि त्याबाबतची माहिती दुरून संकलित केली जाते. 

सेन्सॉरचे 1) पॅसिव्ह, 2) ऍक्‍टिव्ह हे प्रमुख प्रकार आहेत. पॅसिव्ह सेन्सॉरसाठी बाह्यशक्तीची गरज असते. ही बाह्यशक्ती म्हणजे सूर्य. एखाद्या वस्तूवरून परावर्तित होणाऱ्या किरणांद्वारे याचे काम होते, तर ऍक्‍टिव्ह सेन्सॉर सिस्टिममध्ये स्वतःची शक्तिकेंद्रे असतात, उदा. रडार, हे काही विशिष्ट आवाजांद्वारे त्यावर पडलेल्या विशिष्ट प्रभावाचे रेकॉर्ड तयार करते. त्यामुळेच पॅसिव्ह सिस्टिम सर्वज्ञात असून, त्याचा वापर अधिक होतो. उदा. पृथ्वीच्या एखाद्या पृष्ठभागावरील पिकांचे प्रकार, झाडांचे प्रकार, गावांतील अथवा शहरांतील घरे, रस्ते इत्यादीवरून परावर्तित होणारे किरण त्याच प्रकारचे नकाशे बनवण्याकामी अथवा आकडेवारी जमवण्याकामी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. 

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील माहिती गोळा करण्याचे काम बहुतेक बरेच सेन्सॉर करतात. ती माहिती प्रामुख्याने पृथ्वीवरील परावर्तित केल्या जाणाऱ्या इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक स्पेक्‍ट्रम या किरणांद्वारे केली जाते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविधता जाणवते, त्यामुळेच परावर्तित किरणांमध्येही फरक दिसून येतो. त्यातूनच पृथ्वीवरील इमेजस्‌ तयार होतात. माणसांचे डोळे ज्याप्रमाणे मॅग्नेटिक स्पेक्‍ट्रमचा उपयोग करून वस्तू अथवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रदेश, वस्तू, घरे, झाडे, रस्ते, मोटारी इत्यादी वस्तू पाहू शकतात, त्याचप्रमाणे या सेन्सॉरची रचना केली जाते. इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक स्पेक्‍ट्रममधून गॅमा रेज -----10-14, एक्‍स रे -----10-12 ते -----10-10, अल्ट्राव्हायोलेट रेज -----10-8, इन्फ्रारेड रेज -----10-6 ते -----10-4, रडार -----10-2, एफ.एम.-1 व टीव्ही -----10 2 -----, रॉर्ट वेव्ह -----10-2, ए-एम -----10 4 वेव्हलेंग्थ मीटरमध्ये. वेव्हलेंग्थ नॅनोमीटर्समध्ये नोंदली जाते आणि 400 ते 700 वेव्हलेंग्थमध्ये आपणास दिसेल असा प्रकाश मिळत असतो. इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक स्पेक्‍ट्रम वातावरणातून सहजपणे पार होत असतात; मात्र इतर त्यातून पार होत नाहीत. 

रंगसंगतीचा अभ्यास - 
सूर्यप्रकाशाच्या किरणांच्या लांबीनुसार त्यात फरक पडतो. वातावरणातील वायूदेखील काही शक्ती (एनर्जी) साठवून ठेवतात, तसेच त्यातील काही शक्ती ते पुढे वेगवेगळ्या वेव्हलेंग्थनुसार पुढे पाठवतात. हवेत मोठ्या प्रमाणात बाष्पही असते, तेही काही प्रमाणात ही शक्ती घेते, तसेच कार्बन- डाय- ऑक्‍साईड आणि ओझोनही ही शक्ती स्वतःमध्ये साठवतात, त्यामुळेच हवेतील शक्ती साठवणारे हे बॅंड तयार होत असतात. या इलेक्‍ट्रॉनिक बॅंड म्हणजेच (विंडो) खिडक्‍या या हवेच्या आवरणात असून, त्या बॅंडपैकी काही निळ्या, हिरव्या, पिवळ्या, केशरी रंगांनी युक्त असून, त्यातूनच पृथ्वीकडे प्रकाश येतो आणि त्यातूनच पृथ्वीला ऊर्जा प्राप्त होते. याच विंडोमधून अथवा खिडक्‍यांमधून पृथ्वीवरील चित्रीकरण करण्याचे काम एअरक्राफ्टवर बसवलेल्या प्लॅटफॉर्मवरील सेन्सॉर करीत असतात. हे सेन्सॉर यापैकी एखादी खिडकी किंवा इतरही खिडक्‍यांमधून आपले काम करीत असतात. हवामानाचे रडार मात्र हवामानाच्या दृष्टीने ढगांच्या बाबतीतील माहिती घेतात, तसेच पावसाबाबतची माहिती जमवतात. ते रडार आणि त्यातील सेन्सॉर त्याचप्रमाणे बनवलेले असतात. 

वातावरणातील विंडो किंवा खिडक्‍या या निळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या बॅंडमधून दिसू शकणारी व्यवस्था करतात. मात्र, अल्ट्राव्हायोलेट बॅंडमध्ये ऑक्‍सिजन आणि तत्सम वायू असतात, त्यामुळे त्यातून स्पष्टपणे प्रकाश येऊ शकत नाही. उष्णतेच्या दृष्टीने कार्बन- डाय- ऑक्‍साईड वायू, पाण्याचे प्रमाण या सर्व बाबी असतात. 

एकूणच पृथ्वीभोवतीचे वातावरण अतिशय गुंतागुंतीचे आहे. त्यातूनच सूर्याकडून येणारी शक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत असते. मात्र, ती पृथ्वीकडे येताना वातावरणातील विविध प्रकारचा परिणाम होताना दिसून येतो आणि शेवटी हा प्रकाश पृथ्वीवर आल्यानंतर जेव्हा तो परावर्तित होतो, त्यातूनच पृथ्वीवरील परिस्थितीचे चित्रीकरण फार दूरवरूनही होऊ शकते. 

रिमोट सेन्सिंगसाठी अनुकूल आणि बिनाअनुकूल स्थिती 
विभागाचे नाव वेव्हलेंग्थ रिमोट सेन्सिंगसाठीची उपयुक्तता 
गॅमा रे 80.03 नॅनोमीटर रिमोट सेन्सिंगसाठी उपयुक्त नाही. 
एक्‍स-रे 0.03 ते 30 नॅनोमीटर रिमोट सेन्सिंगला उपयुक्त नाही. 
अल्ट्राव्हायोलेट 0.03 ते 0.4 मायक्रोमीटर्स या सर्वांचे शोषण ओझोन थर करीत आहे. 
फोटोग्राफीक अल्ट्राव्हायोलेट 0.03 ते 0.4 मायक्रोमीटर्स रिमोट सेन्सिंगसाठी उपयुक्त कॅमेऱ्याद्वारे अथवा सेन्सॉरद्वारे. 
व्हीजिबल 0.4 ते 0.7 मायक्रोमीटर्स रिमोट सेन्सिंगसाठी उपयुक्त कॅमेऱ्याद्वारे अथवा सेन्सॉरद्वारे 
निअर अँड मीड इन्फ्रारेड 0.7 ते 3.0 मायक्रोमीटर्स रिमोट सेन्सिंगसाठी उपयुक्त कॅमेऱ्याद्वारे अथवा सेन्सॉरद्वारे 
थर्मल इन्फ्रारेड <0.7 ते 3.0 मायक्रोमीटर्स रिमोट सेन्सिंगसाठी उपयुक्त मात्र कॅमेऱ्याद्वारे शक्‍य नसते. सेन्सॉरद्वारे शक्‍य आहे. 
मायक्रोवेव्ह किंवा रडार 0.1 ते 100 सेंटिमीटर्स लॅगरवेव्हलेंग्थ हे ढगामधून पास होऊ शकतात. त्याचप्रमाणे धुके आणि पावसातून पास होतात. सेन्सॉरचा वापर करून शक्‍य. 
रेडिओ >100 सेंटिमीटर्स याचा शक्‍यतो वापर रिमोट सेन्सिंगसाठी होत नाही. 

छायाचित्रांचा अभ्यास - 
पूर्वीची छायाचित्रे ब्लॅक ऍण्ड व्हाइट प्रकारातील कॅमेऱ्यांद्वारे चित्रफितीद्वारे घेतली जात असत. उपग्रह चित्रे ही सेन्सॉरचा वापर करूनच घेतलेली असतात. स्कॅनद्वारे एका विभागाचे अथवा अनेक विभागांचे चित्रीकरण सेन्सॉरद्वारे होते, त्यामुळेच व्हिजिबल बॅंडसाठी 400 ते 700 नॅनोमीटरमधील क्षेत्रच वापरण्यास योग्य ठरते. सध्या कलर कम्पोझिट चित्रे घेण्याची कामेही रिमोट सेन्सिंगद्वारे केली जात आहेत. एखाद्याच वास्तव्याबाबतचे चित्रीकरण केल्यास ते ग्रे म्हणजेच तपकिरी रंगाने केले जाते, तर कलर कम्पोझिट हे अनेक चित्रांचे एकत्रित चित्रीकरण मोठ्या चित्राने दाखवले जाते आणि ते चित्र अनेक रंगांनी भरलेले असते. 
जेव्हा सेन्सॉरद्वारे फोटो घेतले जातात, त्यात 30 मीटर × 30 मीटरपर्यंत पिक्‍सल साइज सेन्सॉरद्वारे ते काम केले जाते. 1) स्पेक्‍ट्रो रेडिओ मीटर, 2) सिंगल आणि मल्टीचॅनेल रेडिओ मीटर, 3) फास्ट सोलर ब्लाइंड इमेज रेडिओ मीटर या तीन प्रकारांपैकी सध्या बाजारात ऑप्टो-इलेक्‍ट्रॉनिक सिस्टिमची अनेक प्रकारचे सेन्सॉर असलेली इन्स्ट्रुमेंट्‌स बाजारात आणली आहेत. 

1) सागनॅक इंटरफ्युरॉमीटर बेस्ड सिस्टिम 
2) फिल्टरबेस्ड स्पेक्‍ट्रल इमेजेस 
3) स्पेशल रेडिओ मेट्रिक सेरअप 
4) रेडिओ मेट्रिक कॅलिब्रेशन्स 
5) कम्पलिट इलेक्‍ट्रोऑप्टिकल रिमोट सेन्सिंग डेव्हलपमेंट्‌स 
6) इन्फ्रारेड स्पेक्‍ट्रो रेडिओ मीटर 
7) परफॉर्मन्स मॉडेलिंग ऑफ आय. आर. सिग्नेचर्स 
यांपैकी शेतीतील पिकांच्या बाबतीत अभ्यासासाठी इन्फ्रारेड स्पेक्‍ट्रो रेडिओ मीटरचा वापर करतात. 

जी.आय.एस. : 
जी.आय.एस. म्हणजेच जिऑग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिम. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या घटकांच्या अभ्यासासाठी, मोजमापासाठी आणि वर्गवारीसाठी संगणकप्रणालीवर आधारित तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामध्ये कॉमन डेटाबेसचा वापर केला जातो. त्यामध्ये आकडेशास्त्राचा वापर करून वेगवेगळे नकाशे बनवण्याचे काम केले जाते. उदा. पॉप्युलेशन चॅरॅक्‍टरीस्टिक्‍स, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटीज (संधी) आणि वनस्पतींचे प्रकार यांचा समावेश होतो. उपलब्ध डेटाबेस आणि नकाशांचा त्यात वापर केला जातो, त्यामुळेच खासगी आणि सरकारी उद्योगांत त्याचा वापर प्रभावीपणे केला जात आहे. त्यामुळेच इतर डेटाबेसपेक्षा ही वेगळी प्रणाली आहे. त्यातूनच एखाद्या घटनेचा वेध घेणे अथवा अनेक घटनांचा वेध घेण्याचे, माहिती देण्याचे काम करणे सोपे जाते. 
नवनवीन धोरणे आखण्यासाठी जी.आय.एस.चा वापर वाढत आहे. 

रिमोट सेन्सिंगद्वारे बराच डेटा इमेजेस फॉर्ममध्ये गोळा करण्याचे काम केले जाते. त्याच इमेजेसवरून पुढे त्याचे विश्‍लेषण करून, वर्गवारी करून आणि त्यांच्यातील विविधता अभ्यासून जी.आय.एस.कामी त्याचा वापर केला जातो. त्यातूनच पुढे रिमोट सेन्सिंग आणि जी.आय.एस.ची सॉफ्टवेअर बनवली जातात. नासामध्ये अशा सॉफ्टवेअरचा वापर अधिक केला जात आहे. इंडियाना या अमेरिकेतील विद्यापीठात विद्यार्थ्यांना या सॉफ्टवेअर वापराबाबत शिक्षण देण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासच "युनिव्हर्सिटी इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी सर्व्हिसेस' या नावानेही आता संबोधले जात आहे. 

जी.आय.एस.चा वापर कंपनी क्षेत्रात आणि सरकारी क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात प्रामुख्याने विकासाच्या बाबतीतील तुलनात्मक अभ्यास करणे, एखाद्या मेंटेनन्सबाबतची माहिती संकलित करणे आणि त्यातील उणिवा शोधणे, रस्त्यांचा प्रभावीपणे वापर करणे, व्हेजिटेशनबाबत माहिती उपलब्ध करणे, पाण्याचा वापर, लाइटचा वापर, कम्युनिकेशन सिवेज इत्यादीबाबतची माहिती उपलब्ध होत आहे. रिमोट सेन्सिंगचे काम 1800च्या दरम्यान एरिअल फोटोग्राफी करून सुरू झाले. 1900च्या सुरवातीस एअरबलूनचा उपयोग वाऱ्याची दिशा आणि वेग मोजण्यासाठी प्रथम करण्यात आला. 

अपोलो स्पेसक्राफ्टद्वारे 1969 मध्ये पहिली इमेज स्पेसमधून घेण्यात आली. उपग्रहाद्वारे पहिले पृथ्वीचे चित्रण घेण्यात आले. सध्याच्या छायाचित्रे 1000 × 1000 पिक्‍सल स्केलपर्यंत मोठी बनवता येतात. सध्याच्या जे.पी.ई.जी. 2000 नुसार छायाचित्रे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी बनवता येतात. हवामानशास्त्रात उपग्रहाद्वारे पृथ्वीचे छायाचित्र घेण्याचे काम करून ढगांचे प्रमाण, ढगांची जाडी, हवेची दिशा, हवेचा दाब, ढगांचे तापमान इत्यादी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध केली जात आहे. 

Tuesday, July 10, 2012

20 गुंठ्यांतील शेवग्याने दिले लाखाचे उत्पन्न

अनेक शेतकरी प्रगतिशील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहून प्रेरणा घेतात व आपल्यासाठी नवे असलेल्या पिकाचा प्रयोग करून पाहतात. अर्थात यश-अपयश या पुढील गोष्टी असतात. मात्र प्रयत्नवादातून काही ना काही अनुकूल असे पदरी पडू शकते. सांगली जिल्ह्यातील कुंडल (ता. पलूस) येथील सूतगिरणी कामगार शहाजी लाड सांगली येथील एका सूतगिरणीमध्ये सुमारे 22 वर्षे नोकरीस होते. गिरणी बंद पडल्यानंतर ते आपल्या गावी कुंडलला परतले. वडिलोपार्जित त्यांची तीन एकर शेती पलूस परिसरात ती आहे. संपूर्ण जमीन खडकाळ स्वरूपाची आहे. या ठिकाणी शेती विकसित करण्यासाठी प्रथम त्यांनी कूपनलिका व विहीर खोदून पाण्याची सोय केली. 

साधारणपणे 20 ते 25 वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्तीच्या काळातील आयुष्य निवांत जगण्याची इच्छा बहुतेकांना असते. लाड यांनी मात्र शेतीतच आपले जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. मुलगा व पत्नीचीही त्यांना साथ मिळाली. 

लाड यांनी वास्तव्यासाठी शेतातच घर बांधले आहे. त्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन केला आहे. त्या गटाचे लाड सदस्य आहेत. या गटाद्वारे चर्चासत्रे, शेतीच्या विविध योजनांची माहिती याची चर्चा होत असे. त्यातूनच शेवगा शेतीची माहिती लाड यांना मिळाली. पूर्वी शेताच्या बांधावर किंवा घराच्या परसात शेवग्याचे झाड अशी संकल्पना होती. खुद्द लाड यांचीही अशीच धारणा होती. मात्र सातारा जिल्ह्यातील खंडाळा- पारगाव परिसरातील एका प्रयोगशील शेतकऱ्याची शेवगा पिकाची यशकथा त्यांच्या पाहण्यात आली. तेथे जाऊन त्यांनी लागवड, पिकाचे संगोपन या विषयी माहिती घेतली. त्यातून हे पीक फायदेशीर ठरेल असे वाटल्यानंतर त्याची लागवड करण्याचा निर्णय पक्का केला. 

शेवगा पिकाचे नियोजन 
लाड यांच्याकडे ऊस, हळद अशी पिके आहेत. उसाचे उत्पादन तसे कमी म्हणजे एकरी 35 ते 40 टनांपर्यंतच. त्यांची एकूण शेती तीन एकर. त्यामुळे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने काही नव्या पिकाची वा प्रयोगाची गरज होतीच. 

मुलगा वैभव परिसरातील साखर कारखान्यात नोकरीस आहे. त्याला मदतीला घेतले. शेवगा पिकासाठी वीस गुंठे जमीन निवडली. जमिनीची नांगरट व चांगली मशागत केली. तीन फूट अंतराच्या सऱ्या सोडल्या. सप्टेंबर- ऑक्‍टोबर 2011 च्या पहिल्या आठवड्यात या क्षेत्रात कांदा लावला. एका आठवड्याने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून आणलेल्या कोइमतूर जातीच्या शेवग्याच्या बियाण्यांची टोकण केली. दोन झाडांतील अंतर पाच फूट व दोन ओळींतील अंतर सहा फूट ठेवले. आठ ते दहा दिवसांत बियाण्यांची उगवण झाली. गरजेप्रमाणे पाण्याच्या पाळ्या दिल्या. तीन महिन्यांनी कांद्याचे पीक काढले. त्या वेळी शेवग्याच्या झाडाची उंची साडेतीन फुटाच्या आसपास होती. फुटवे वाढावेत यासाठी शेंडा खुडण्यात आला. 

खत व्यवस्थापन 
शेवगा पिकाला रासायनिक खतांपेक्षा जैविक खतांवर भर दिला. शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ याचे मिश्रण करून कुजवून स्लरी तयार केली. दर पंधरा ते वीस दिवस या प्रमाणे ही स्लरी पाण्याद्वारे किंवा झाडाभोवती गोलाकार पद्धतीने दिली. पीक संरक्षणात कडुनिंबावर आधारित कीडनाशकाचा वापर केला. 
मार्केटिंग सुमारे साडेचार महिन्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनास सुरवात झाली. शेंगांनी लगडलेली झाडे पाहून लाडही भारावले. एकेका झाडाला सत्तर ते ऐंशीपर्यंत शेंगांची संख्या होती. शेंगांची लांबी तीन ते चार फुटांपर्यंत होती. रंगही हिरवा होता. परिसरातील इस्लामपूर, सांगली, कऱ्हाड, विटा येथील बाजारात सौद्याद्वारे शेंगाची विक्री होत होती. गोणपाट जमिनीवर अंथरून त्यात या शेंगा बांधल्या जात होत्या. चाळीस ते पन्नास किलोचे पॅकिंग तयार केले जात होते. सुरवातीला शेंगांचा दर प्रति किलो 20 रुपये होता. मध्यंतरी तो तीस रुपयांपर्यंतही गेला. सध्याही एवढाच मिळत आहे. सरासरी दर 23 रुपये मिळाला. स्थानिक बाजारात लाड यांच्या घरातील महिला सदस्यांनी शेंगांची विक्री केली. मंडईत प्रति तीन ते चार शेंगांना 10 रुपये या भावाने आठवडा बाजारात 50 ते 60 किलो शेंगा विकल्या जात. वाहतूक, विक्रीसाठी लागणारा वेळ व तुलनेत विकला जाणारा माल हे गणित परवडणारे नव्हते. यासाठी सौद्यातच शेंगा विक्रीला प्राधान्य दिले. काही वेळा व्यापाऱ्यांनी जागेवरही खरेदी केली. 

धान्य महोत्सवातही सहभाग 
सांगलीच्या कृषी विभागातर्फे शेतकरी ते थेट ग्राहक असा धान्य महोत्सव झाला. तेथे शेंगा विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. 

जमाखर्च (रुपयांत) 
मशागत- 1000 
बियाणे- 1500 
खते, कीडनाशके- 3750 
स्लरी - 1000 
भांगलण व काढणी - 2300 
आंतरमशागत - 1000 
वाहतूक - 3000 
बारदान खर्च - 450 


एकूण- 14,000 रु. 

एकूण हंगामात लाड यांना प्रति किलो सरासरी 23 रुपये दर मिळाला. एकूण क्षेत्रातून चार टनांपर्यंत माल निघाला. साधारणपणे 96 हजार रुपये मिळाले. कांद्याच्या आंतरपिकातून 16 हजार रुपये मिळाले. एकूण एक लाख 12 हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले. उत्पादन खर्च 14 हजार रुपये वजा जाता 98 हजार रुपये नफा मिळाला. युवा शेतकरी रवींद्र लाड, कृषी विभाग यांचेही सहकार्य लाड यांना या प्रयोगात मिळाले. 

यांत्रिकीकरण 
लाड ज्या गटाचे सदस्य आहेत त्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 14 छोटे पॉवर टिलर खरेदी केले आहेत. त्याद्वारे शेवगा तसेच ऊस शेतीतील आंतरमशागत केली जाते. त्याद्वारे भांगलणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. 
लाड यांना शेवग्याच्या खोडवा राखायचा आहे. जमिनीपासून एक फूट अंतरावर जेथून फुटवे फुटले आहेत त्यापासून थोड्या अंतरावर फांद्यांची छाटणी त्यांना करायची आहे. मात्र खोडवा पिकातून अपेक्षित उत्पादन मिळेल काय या विचारात ते आहेत. त्यासाठी ते सल्लाही घेणार आहेत. 

लाड यांच्या शेती नियोजनातील वैशिष्ट्ये- 
आंतरपिकातून मुख्य पिकातील उत्पादनखर्च कमी करणे 
रासायनिक खतांचा मर्यादित वापर 
जैविक स्लरी देण्यावर भर 
यांत्रिकीकरणाला सुरवात 

संपर्क - शहाजी लाड- 9975111300 
वैभव लाड- 9623443824 


Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120706/5554582116795004730.htm

Thursday, July 5, 2012

ओळख पेटंट कायद्याची

भारतामध्ये पेटंटचा कालावधी हा 20 वर्षापर्यंत मर्यादित आहे, ज्या तारखेस आपण पेटंटसाठी अर्ज करतो, त्या तारखेपासून हा कालावधी गृहीत धरतात. जर एखाद्या संशोधकाने केलेला शोध त्याने पेटंटसाठी केलेल्या अर्जाआधीचा प्रसिद्ध झाला असेल, तर असा शोध वा संशोधन पेटंटसाठी अपात्र ठरते. म्हणजेच संशोधकाने केलेल्या संशोधनाबद्दल वा शोधाबद्दल विशेषाधिकाराच्या अर्जापूर्वीच ते कुठेही प्रसारित करू नये. ज्या तारखेस आपण पेटंटसाठी अर्ज करतो, त्याच तारखेपासून पेटंट मिळाल्याची तारीख ग्राह्य धरण्यात येते. 

जागतिकीकरणाच्या युगात बुद्धिमत्तेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण आपल्या स्थावर मालमत्तेचे संरक्षण करतो, त्याचप्रमाणे बौद्धिक संपदा अधिकारान्वये बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करणे आवश्‍यक आहे. बुद्धीचे रूपांतर संपत्तीत करणे म्हणजेच बौद्धिक स्वामित्वाचा अधिकार. या अधिकारासाठी जागतिक व्यापार परिषदेने नियम तयार केले आहेत. यामध्ये जीआय, कॉपीराइट, औद्योगिक आरेखन, गुपित माहितीबाबत संरक्षण व पेटंट यांचा अंतर्भाव होते. संशोधक विविध बाबींवर संशोधन करीत असतात. त्याचा फायदा देशाला आणि पर्यायाने समाजातील सर्व घटकांना होत असतो. संशोधकाने केलेल्या संशोधनाचे अधिकार संशोधकाकडेच राहावेत हे अभिप्रेत आहे. यासाठी बौद्धिक स्वामित्व हक्कात योग्य वेळेत पेटंट मिळविण्यास अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. 

पेटंट म्हणजेच एखाद्या वस्तूचा वा शोधाच्या विशेषाधिकार शासनातर्फे काही विशिष्ट कालावधीपुरता एखाद्या संशोधकास वा संस्थेला दिला जातो. या विशेषाधिकारात एखादी वस्तू तयार करण्यासाठी, तिचा वापर करण्यासाठी किंवा विक्रीसाठी काही अधिकार संबंधित देशाद्वारे दिले जातात. परंतु हे अधिकार मिळविण्यासाठी काही विशिष्ट गोष्टीची प्रतिपूर्तता करावी लागते. या अधिकारान्वये इतर व्यक्ती विशेषाधिकार मिळालेल्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय पेटंटचा वापर वा विक्री करू शकत नाही. परंतु असा विशेषाधिकार काही कालावधीपुरताच मर्यादित असतो. कायद्यान्वये विशेषाधिकाराचा हक्क हा संपत्ती हक्कासारखाच आहे. त्यामुळे तो इतर व्यक्तींना भेट म्हणून देता येऊ शकतो किंवा त्याचा अधिकृत परवानाही संबंधित व्यक्ती इतरांना देऊ शकतो. कायद्यान्वये एखाद्या वस्तूसाठी मिळालेला विशेषाधिकार हा प्रादेशिक असतो, त्यामुळे तो संबंधित देशापुरताच मर्यादित असतो. 

पेटंट कायदा ः 
ब्रिटिश राजवटीपासून भारतात पेटंट कायदा अस्तित्वात आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर न्यायमूर्ती राजगोपाल अय्यंगार यांच्या अध्यक्षतेखाली 1957 मध्ये समिती स्थापन झाली. या समितीने सप्टेंबर 1959 मध्ये सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने पेटंट कायदा 1970 अस्तित्वात आला. त्यामध्ये जागतिकीकरणाच्या अनुषंगाने वेळोवेळी बदल करण्यात आले. 

भारतातील पेटंटचे कार्यालयाचे मुख्य कार्यालय पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकता येथे आहे. कार्यालयीन शाखा चेन्नई, नवी दिल्ली, मुंबई येथे कार्यान्वित आहेत. पेटंट बाबतची माहितीचे कार्यालय (Patent information system) नागपूर येथे आहे. भारतातील विविध पेटंट कार्यालयांनी 2009-10 मध्ये 36812 पेटंटला मान्यता दिली. भारतीयांमध्ये पेटंट मिळविण्याच्या बाबतीत जागरूकता निर्माण झालेली आहे. 

विशेष अधिकाराचा 1970 चा कायदा हा एखादी कला, पद्धती किंवा तयार केलेली यंत्रे व उपकरणे या बाबीशी निगडित आहे. सन 1970 पासून या पेटंटच्या कायद्यात मार्च 1999, जून 2002, 2003, 2005 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. या नवीन सुधारणेची विशेष महत्त्वाची बाब म्हणजे मूळ शुल्कामध्ये करण्यात आलेली वाढ, पेटंट मिळवण्यासाठीची कालमर्यादा आणि शुल्क पद्धती जी "क्‍लेम'च्या संख्येवरती अवलंबून आहे. "क्‍लेम' म्हणजेच आपण जे संशोधन केले आहे, त्या संशोधनात नेमके आपणास कोणत्या बाबतीत अधिकार हवे आहेत किंवा संरक्षित करावयाचे आहेत, त्यास पेटंट असे म्हणतात. 

भारतामध्ये पेटंटचा कालावधी हा 20 वर्षांपर्यंत मर्यादित आहे, हा कालावधी ज्या तारखेस आपण पेटंटसाठी अर्ज करतो, त्या तारखेपासून गृहीत धरतात. जर एखाद्या संशोधकाने केलेला शोध त्याने पेटंटसाठी केलेल्या अर्जाआधीचा प्रसिद्ध झाला असेल, तर असा शोध वा संशोधन पेटंटसाठी अपात्र ठरते. म्हणजेच संशोधकाने केलेल्या संशोधनाबद्दल वा शोधाबद्दल विशेषाधिकाराच्या अर्जापूर्वीच ते कुठेही प्रसारित करू नये. ज्या तारखेस आपण पेटंटसाठी अर्ज करतो, त्याच तारखेपासून पेटंट मिळाल्याची तारीख ग्राह्य धरण्यात येते. पेटंट कायद्याचा फायदा नावीन्यपूर्ण वस्तू उत्पादनास होणार आहे. त्याचबरोबरीने संशोधनातील गुंतवणूक वाढून दर्जेदार संशोधन होईल. संशोधकाला संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी हा कायदा फायदेशीर आहे. 

पेटंट मिळविण्यासाठी महत्त्वाच्या बाबी ः 

1) नावीन्यपूर्णता : एखादा शोध जर पेटंट अर्ज करण्यापूर्वीच तो प्रसिद्ध केला असेल तर त्यास पेटंट मिळत नाही. त्यामुळे एखादा शोध हा मूलतःच नावीन्यपूर्ण असावा. 
2) नवीन शोध ः एखादा साधा शोध ही विशेषाधिकारासाठी पात्र ठरतो, क्‍लिष्ट किंवा साधेपणाशी त्या शोधाचा काहीही संबंध येत नाही, फक्त तो शोध नवीन असायला हवा. 
3) उपयुक्तता : एखाद्या लावलेल्या शोधाची उपयुक्तता ही विशेषाधिकार प्राप्त करण्यासाठी आवश्‍यक असते. त्या शोधाची व्यावसायिक उपयुक्तता असायला हवी, तसे नसेल तर त्या शोधास पेटंट मिळत नाही. 

आपल्या देशात 1) अणु ऊर्जाबाबतचे संशोधन वा शोध, 2) प्राणी किंवा वनस्पती पूर्णत: वा अंश रूपाने, 3) एखाद्या माहितीचे सादरीकरण, 4) एखादे संशोधन जे नैसर्गिक तत्त्वाच्या विरुद्ध आहे, 5) कृषी किंवा उद्यान विद्या पद्धती या बाबींसाठी पेटंट मिळत नाहीत. 

भौगोलिक मर्यादा ः 
पेटंट संदर्भात काही भौगोलिक मर्यादा आहेत. एखाद्या शोधाचे जागतिक पेटंट मिळू शकत नाही. पेटंटचे अधिकार हे सर्वस्वी प्रादेशिक असतात, जे एखाद्या देशातर्फे संरक्षित केलेले असतात. परंतु विविध देशांत पेटंटसाठी अर्ज करून ते आपण मिळवू शकतो किंवा पेटंट को-ऑपरेशन ट्रीटी (पीसीटी) अंतर्गत आपण पीसीटी समूहातील देशामध्ये पेटंट मिळवू शकतो, यात आपला वेळेचा अपव्यय कमी होतो, पैशाचीही बचत होते. प्रत्येक देशाला पेटंट देण्याचा किंवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार आहे; परंतु एखाद्या देशात एखाद्या शोधाबद्दल पेटंट मिळाले असेल तर इतर देशांत ते पेटंट मिळेलच असे काहीही किंवा एखाद्या देशाने पेटंट नाकारले तर इतर देशांत ते नाकारले जाऊ शकते असेही काही नाही. 

पेटंट मिळविण्याची कार्यपद्धती : 
1) पेटंटसाठी हिंदी/ इंग्रजीमध्ये अ-4 आकाराच्या पांढऱ्या कागदावर एका बाजूने टंकलिखित करून अर्ज संबंधित कार्यालयात तीन प्रतींमध्ये योग्य शुल्कासह सादर करावा लागतो. 
2) पेटंटसाठी अर्ज करताना त्या शोधाबद्दल प्राथमिक खुलासेवार नोंदी वा पूर्ण खुलासेवार नोंदी अर्ज सादर करावा लागतो. 
3) आपण केलेल्या अर्जाची छाननी/ तपासणी पेटंट कार्यालयाकडून करवून घ्यावी.
4) सादर केलेला अर्ज पेटंट तपासणीसाठी शासकीय गॅझेटमध्ये प्रसिद्ध करावा. 
5) आपण केलेला अर्ज ग्राह्य आहे व तो ग्राह्य असल्याची प्रसिद्धी शासकीय गॅझेटमध्ये करून घ्यावी. 
6) जर त्या पेटंटला कोणाची हरकत असेल तर त्याबाबतचा पूर्ण पाठपुरावा करावा. 
7) आपण पेटंट मिळविण्यासाठी अर्ज केला असेल तर तो आपणास परत घ्यावयाचा असेल तर त्यासाठीही पेटंट कायद्यात सोय करण्यात आली आहे. 

पेटंट अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ः 
1) प्राथमिक नोंदी असलेला अर्ज : 
प्राथमिक नोंदी किंवा टिपण हे जर संशोधन शेवटच्या टप्प्यात आले असेल तर व पूर्ण खुलासेवार नोंदी करण्यासाठी काही कालावधी लागणार असेल तर प्राथमिक नोंदीचा अर्ज पेटंट मिळविण्यासाठी कायदेशीररीत्या ग्राह्य धरला जातोच असेही काही नाही. परंतु आपला मालकी हक्क अबाधित ठेवण्यासाठी हे आवश्‍यक आहे. परंतु एक बाब लक्षात घ्यायला हवी की प्राथमिक अर्जावर कोणालाही पेटंट मिळू शकत नाही. 
2) पूर्ण खुलासेवार नोंदी असलेला अर्ज : 
पेटंट मिळविण्यासाठी खुलासेवार नोंदी असलेला अर्ज करणे अत्यंत आवश्‍यक आहे. खुलासेवार अंतिम नोंदणी अर्जात खालील बाबींचा समावेश असायला हवा. 1) शोधाचे नाव, 2) शोध कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, 3) शोधाची पार्श्‍वभूमी, 4) शोधाचा हेतू, उद्दिष्ट व 5) शोधाची संपूर्ण माहिती. पूर्ण खुलासेवार नोंदीचा अर्ज तात्पुरता अर्ज सादर केल्यापासून बारा महिन्यांच्या आत करायला हवा. परंतु प्राथमिक खुलासेवार नोंदीचा अर्ज हा अंतिम अर्ज करण्याच्या अगोदर करणे आवश्‍यक आहे असे काहीही नाही. 

पेटंट अधिकारासाठी नामनिर्देश ः 
- शोधकाच्या नावाच्या अधिकारासाठी खालील बाबींचा अवलंब करावा. 
- संबंधित शोधासाठी ज्या ज्या व्यक्तींनी योगदान दिले आहे, त्या सर्वांची नावे शोधक म्हणून द्यावीत. 
- संबंधित शोधासाठी ज्या व्यक्तींचे बौद्धिक योगदान लाभले, त्यांचेही नाव शोधक म्हणून घ्यावे. 
- ज्या व्यक्ती एखाद्या शोधाच्या बाबतीत काहीही बौद्धिक योगदान देत नाहीत, परंतु शोधाची संबंधित इतर कामे उदा. प्रयोग घेणे, ड्रॉइंग काढणे इत्यादी करतात त्याचे नाव शोधक म्हणून घेता येणार नाही. 
पेटंट कार्यालयाचे संकेतस्थळ ः http://www.ipindia.nic.in 

पेटंटला विरोध करता येतो का? 

पेटंट कायदा 1970 अन्वये पेटंटला विरोध करता येतो. पेटंट कार्यालयाने पेटंटसाठी आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर ते पेटंट देण्यायोग्य असेल तर त्या शोधाचे नाव, शोधकाचे नाव व अर्जदाराचे नाव, शोधाची संक्षिप्त माहिती, आकृती व इतर बाबी गॅझेटमध्ये भाग 3, उपभाग 2 मध्ये हितसंबंधी लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाते. मिळालेल्या पेटंटला विरोध करण्यासाठी संबंधित पेटंट कार्यालयात चार महिन्यांच्या आत अर्ज करता येतो. परंतु चार महिन्यांनंतर अजून एक महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळू शकते. परंतु मुदतवाढीसाठी चार महिन्यांच्या कालावधीतच अर्ज करता येतो. 

पेटंटचा अर्ज भरण्यासाठी मूळ संशोधकास (भारतीय व्यक्तीस) शासकीय शुल्क म्हणून 1000 रुपये भरावे लागतात, तर त्या संशोधकाने कायदेशीररीत्या नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस 4000 रुपये भरावे लागतात. नंतर अर्जदाराने संबंधित अर्जाची तपासणी करण्यासाठी 48 महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्‍यक आहे. 


Ref. link : http://www.agrowon.com/Agrowon/20120227/5516959739650561483.htm

(इफेक्‍टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स) 'ईएम'

"ईएम' (इफेक्‍टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स) हे एक परिणामकारक नैसर्गिक, सजीव जिवाणूंचा समावेश असलेले द्रावण आहे. याचा वापर शेती, कुक्कुटपालन, पशुपालन, घन कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, सेंद्रिय खतनिर्मितीमध्ये फायदेशीर दिसून आला आहे. 

ज्या जमिनीचा सामू वाढलेला आहे अशा ठिकाणी ईएम-2 या द्रावणाच्या वापरामुळे विशेषतः ऊस या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीची झाल्याचे दिसून येते. मुळांची वाढ, पेरांची संख्या, फुटव्यांची संख्या, तसेच पेऱ्यातील अंतर वाढल्याचे दिसून आले. याचे द्रावण आम्लधर्मी असल्यामुळे ठिबक सिंचन संचामध्ये अडकणारे क्षार विरघळून जातात. शेवाळ वाढत नाही. जिवाणू खतांचा ईएम-2 सोबत केलेला वापर जास्त परिणामकारक दिसून येतो. याच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये चांगल्या पद्धतीचा परिणाम दिसून येतो. रोपवाटिकेमध्ये ईएम-2 चा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते, रोपे तजेलदार होतात. 

एक लिटर ईएम-2 द्रावण प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून याचा वापर शेतीसाठी तसेच रोपवाटिकेसाठी करावा. आम्ही आमच्या केंद्राच्या रोपवाटिकेत याची फवारणी तसेच आळवणी देतो. 

फळझाडांसाठी आठवड्यातून एकदा ठिबक सिंचनातून ईएम-2 दिले जाते. यासाठी एक लिटर ईएम-2 प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून व्हेंचुरीच्या माध्यमातून द्यावे, ईएमचा वापर करताना विद्राव्य खत त्याच वेळी पिकांना देऊ नये. मोसंबी, संत्रा या पिकाला ईएमचा वापर केल्याने फुले लागण्याचे प्रमाण वाढले, फळधारणा चांगली झाली. या द्रावणाच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. सेंद्रिय घटकांच्या वाढीमुळे पांढऱ्या मुळ्या वाढतात. झाडाची अन्नद्रव्य ग्रहणाची शक्ती वाढते. पिकाची चांगली वाढ होते. फळांची गुणवत्ता वाढलेली दिसून आली आहे. काही शेतकरी केळी पिकासाठी ठिबक सिंचनातून याचा वापर करतात, त्यामुळे पिकाची एकसारखी वाढ झाल्याचे दिसून आले. 

ईएमचा वापर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर करण्यात येत आहे. यांचे चांगले फायदे दिसून आले आहेत. काही शेतकरी चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, द्राक्ष, ऊस, केळी या पिकांसाठी वापर करताहेत. 

काही शेतकरी गोठा स्वच्छता, गांडूळ खतनिर्मितीमध्ये याचा वापर करताहेत. साधारणपणे 100 लिटर पाण्यात एक लिटर ईएम-2 हे द्रावण मिसळून गोठ्यात फवारणी केली असता गोठ्यातील दुर्गंधी कमी होते. जनावरांना माश्‍या, चिलटांचा त्रास कमी होतो. गांडूळ खताच्या वाफ्यावर याची फवारणी केली असता लवकर खत तयार होण्यास मदत होते. पालापाचोळा लवकर कुजतो. 


Ref. link: http://www.agrowon.com/Agrowon/20120229/4742729865648037900.htm

बहुपयोगी वाळा लागवड

भारतामध्ये उत्तर प्रदेशात जंगलांमधून व तमिळनाडू, केरळ इ. राज्यांत वाळा लागवड करून तेलनिर्मिती केली जाते. या गवताची लागवड मृद, जल संधारणासाठी उत्कृष्ट समजली जाते. पडीक माळराने, नापिक जमिनी, जास्त धूप होणाऱ्या जमिनी इ. ठिकाणी लागवडीसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. या बहुवर्षायू, सुंदर दिसणाऱ्या गवताची मुळे काहीशी कंदवर्गीय असतात, त्यांची वाढ माती, हवामान यांच्या अनुकूलतेप्रमाणे 10-35 सें.मी.पर्यंत होते. हे गवत दोन मीटरपर्यंत वाढते. पाने अरुंद, चपटी, चकचकीत, तेलकट असतात. अनेक ताटे झुबक्‍याने एकत्र वाढतात व त्यामुळे या गवताचे बोंधे तयार होते. लागवडीनंतर झाडे एक-दोन वर्षांची झाल्यानंतर त्यांस पुष्पगुच्छ येतात. 

या बहुवर्षायू गवतास वाढीसाठी उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. 1000 ते 2000 मि.मी. पाऊस आणि 21 ते 43 अंश से. तापमानाच्या ठिकाणी, हलक्‍या ते मध्यम जमिनीत हे गवत चांगले वाढते. त्याचप्रमाणे 9.5 ते 10.5 सामू असलेल्या व भारी जमिनीत, मोकळ्या पडलेल्या, खार, चढ - उताराच्या, नदीकाठच्या, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीतही याची लागवड होऊ शकते. गवताची लागवड "स्लिप्स'पासून केली जाते. यासाठी गवताची ताटे वेगवेगळी केली जातात, त्याची वरील पाने तोडून 10 ते 20 सें.मी.ची स्लिप्स लागवडीसाठी तयार केली जातात. दोन - तीन ताटे बरोबरीने असतात, ती वेगळी करणे आवश्‍यक असते. लागवड फेब्रुवारीपर्यंत केली जाते. लागवडीसाठी सरी - वरंबे 60 सें.मी. अंतराने तयार करून सरीमध्ये 60 x 60 सें.मी. अंतराने ओळीने लागवड करावी. शेतात कुजलेले शेणखत प्रति हेक्‍टरी दहा बैलगाड्या टाकून मातीत मिसळावे. लागवडीपूर्वी शेत चांगले नांगरून तणे, काडीकचरा वेचून तयार करणे आवश्‍यक असते. पावसाळ्यानंतर लागवड करावयाची झाल्यास लागवडीनंतर लगेचच पाणी देणे आवश्‍यक असते. या गवताच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्‍यकता असते. वणवा, थंडी इ.साठी हे गवत कणखर मानले जाते. 

काढणी -
लागवडीनंतर 18 ते 24 महिन्यांनंतर वाळ्याची मुळे काढणीयोग्य होतात. मुळे हाताने अथवा नांगराने काढली जातात. काढलेल्या मुळांची माती, काडी-कचरा काढून टाकण्यासाठी पाण्यात स्वच्छ धुवावी. ताज्या मुळांमध्ये तेल कमी मिळत असल्याने मुळे वाळवूनच तेल काढण्यासाठी वापरली जातात. मुळे वाळविण्यापूर्वी त्यांचे लहान लहान तुकडे करणे आवश्‍यक असते. मुळांची काढणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते. हवामान व पीक व्यवस्थापनानुसार प्रति हेक्‍टरी 10 ते 50 क्विंटल मुळांचे उत्पादन मिळते. सरासरी प्रति हेक्‍टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळते. यामध्ये खुशीमोल, व्हेटीसेलीनॉल, युडेसॅमॉल, खुशीलॉल, खुशीन, खुशेर, खुशीऑल, व्हीटीव्हेरी हे रासायनिक घटक असतात. 

उपयोग -
पाण्याची वाफ (स्टीम डिस्टिलेशन) वापरून ताज्या किंवा वाळलेल्या मुळांपासून तेल काढले जाते. साठवलेल्या मुळांपासून चांगल्या प्रतीचे तेल मिळते, त्यामुळे काढणीनंतर चार ते सहा महिने मुळे साठवून ठेवणे आवश्‍यक असते. 

तेल ः अत्तरे, सौंदर्यप्रसाधने, उटणे, साबण आणि अन्य तेलांच्या निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. तेलामधून व्हीटीव्हेरॉल, व्हीटीव्हेरॉन इत्यादी द्रव्ये काढली जातात. तंबाखू, पान मसाला, शीतपेये यांना सुवासिक स्वाद देण्यासाठीही तेलाचा वापर होतो. 

पाने ः कोवळ्या पानांचा गुरांना चारा म्हणून आणि घोड्यांना बसण्यासाठी वापर केला जातो. झाडू, टोपल्या इ. वस्तू पानांपासून बनविल्या जातात. जास्त तापमान असलेल्या प्रदेशात पानांचा वापर कुलरमध्ये अथवा कर्टन तयार करून घरातील तापमान कमी करण्यासाठी केला जातो. लिखाणाचे किंवा प्रिंटिंग पेपर निर्मितीसाठीही पानांचा वापर होतो. 

जल-मृद्‌संधारणासाठी वनीकरण गरजेचे 
आपल्या परिसरातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालले आहे; तसेच झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाचा परिणाम वनसंपदेवर होताना दिसतो. वनांच्या कमी झालेल्या क्षेत्रामुळे ऋतुमानात बदल होत आहेत. जंगलांच्या घटलेल्या प्रमाणामुळे मातीची धूप झाली आहे, जलस्रोतांवर परिणाम झालेला आहे; माती, पाणी इ.वर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. एक सें.मी. मातीचा थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. खडकांची झीज होऊन विविध सूक्ष्मजीव, शेवाळ, नेचेवर्गीय, अपुष्प, पुष्पवर्गीय वनस्पतींच्या सहयोगाने माती तयार होते. जंगलाचे जमिनीवरील आवरण कमी झाल्याने पर्यावरणात असमतोल निर्माण झाला आहे. अन्नसाखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. रस्ते दुतर्फा, नद्याकाठ, शेते इ. ठिकाणी धुपणासाठी संवेदनशील आहेत. 
मातीच्या संवर्धनासाठी नैसर्गिक स्थिती आपण जर पाहिली तर पहिल्या पावसानंतर लगेचच गवत येते. या गवतामुळे हजारो टन मातीचे संवर्धन होते; परंतु बऱ्याचशा भूभागावर गवतही आढळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठे नुकसान होते. शक्‍यतो यासाठी प्रदेशनिष्ठ किंवा त्याच प्रदेशात मिळणाऱ्या प्रजातींचा वापर करणे आवश्‍यक आहे. परदेशातील प्रजाती वापरल्याने त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवर विपरीत परिणाम होतात, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. म्हणून वनस्पतिशास्त्राच्या आधाराने निवडक प्रजातींचीच लागवड करणे आवश्‍यक आहे. 

योग्य प्रजातींची निवड ः 
एकदल प्रवर्गातील गवत म्हणजेच तण यात काही वर्षायू आहेत, तर काही बहुवर्षायू. या गवताची लागवड बियांपासून, खोडांच्या किंवा मुळांच्या छाटांपासून केली जाते. गवतांचे मृद्‌ व जलसंधारणासाठीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 
कुश गवत ः हे गवत बहुवार्षिक असल्याने खोड ताठ आणि दांडगे असते. भुईसरपट आडवे जाणारे, अनेक खोडे या प्रजातीस असतात, त्यापासून अनेक शाखा येतात आणि आजूबाजूला नवांकुर येऊन नवीन झाडे मुख्य झाडाभोवती तयार होतात. कमी पाण्यावर येणारे हे गवत खोडाच्या किंवा मुळांच्या छाटाने लागवड करतात. 
मुंज ः हे गवत चांगले वाढते. खोड ताठ, जोरदार कांडे असणारे असते. या बहुवर्षायू गवताची लागवड बिया किंवा खोडाच्या छाटांपासून केली जाते. 
मारवेल ः या गवताची उंची 15 ते 90 सें.मी.पर्यंत वाढते. लागवड बियांपासून केली जाते. 
वाळा (खस) ः यास "व्हेटीव्हर' असेही म्हणतात. या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले मानले जाते. लागवड "स्लिप्स'पासून केली जाते. 
कुंदा ः हे गवत तीन फुटांपर्यंत वाढते. हे गवत बहुवर्षायू असून, या गवताला आडवे खोड असते. त्यापासून धुमारे निघतात आणि बियांपासून याची लागवड होऊ शकते. 
पवना ः सुमारे तीन फुटांपर्यंत वाढणाऱ्या या बहुवर्षायू गवताचे खोड मुळाजवळ जाड, भक्कम व गुळगुळीत असते. लागवड बियांपासून होते. 
शेंडा ः हे बहुवर्षायू गवत दोन फुटांपर्यंत वाढते. पवना गवतासारखे दिसणारे; मात्र खोड थोडे लवचिक असते. लागवड बियांपासून होते. 
मोशी ः डोंगर उतारावर 15 ते 50 सें.मी.पर्यंत वाढते. हे बहुवर्षायू गवत आहे. तामरट, दूर्वा, गवती चहा, सिझेनेला, जावा, बेर, कुशळी इ. गवतांचाही वापर करून मातीचे पावसाने होणारे नुकसान आपण टाळू शकतो. या गवताची लागवड बियाणे वापरून करावयाची झाल्यास भातासारखी धूळपेरणी मे महिन्यात करावी. 

पारंपरिक गवताबरोबरच गिन्नी, रोड्‌स, सिटारिया, पॅराग्रास इ. गवतांची लागवड मृद्‌संधारणाबरोबरच गुरांना चारा म्हणून केली जाते. नद्या, नाले, ओहोळ, रस्ते खचणे, ढासळणे इ.साठी बांबू फायदेशीर आहे. देशामध्ये बांबूच्या 140 प्रजाती आढळतात. यातील प्रामुख्याने आढळणाऱ्या आणि आपल्याकडे होऊ शकणाऱ्या बांबूंमध्ये कळक, मानवेल, चिवारी, मेस, कोंड्यामेस, मेसकाठी, पिवळाबांबू, बुद्धा बांबू इ.ची लागवड आपण नवीन येणारे फुटवे (कंद), बिया, खोडांचे छाट इ.पासून करू शकतो. 

गवताबरोबरच झुडपांचेही महत्त्व तेवढेच आहे. गवताच्या बरोबरीने झुडपांची लागवड केल्यास ती अधिक प्रभावी होऊन मृद्‌ व जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते. यासाठी करवंद, घायपात, निर्गुडी, अडुळसा, मेंदी, कडू मेंदी, चित्रक इ.ची लागवड आपण करू शकतो. गवत, झुडपे आणि झाडे यांच्या माध्यमातून मातीची धूप आपण थांबवू शकतो, यासाठी पूर्ण प्रजातींची निवड वनस्पती तज्ज्ञांच्या मदतीने करून घेणे आवश्‍यक असते. 

गवताची वैशिष्ट्ये ः 
गवत वर्षभर उपलब्ध होऊन वेगवेगळ्या हवामानांत गवताची वाढ होऊ शकते. जमिनीच्या वरच्या तसेच खालच्या थरात वाढ होत असल्याने माती धरून ठेवण्यास इतर वनस्पतींपेक्षा फारच मदत होऊ शकते. कमीत कमी पाण्यावर, कोणत्याही हवामानात तसेच जमिनीत गवताची वाढ चांगली होऊ शकते. फुटव्यांची संख्या खूप असते. लवकरात लवकर वाढ होते. गवताचा वाढलेला भाग जरी जनावराने खाल्ला तरी खालील भाग तसाच राहिल्याने पुढील गवताची वाढ चांगली व जोमाने होते, त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसून येते, त्यामुळे रानटी जनावरांसाठी वर्षभर खाद्य उपलब्ध होते. पर्यायाने रानटी जनावरांची वाढ चांगली होते. 


Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120325/5561109475309633307.htm

फायदेशीर अळिंबी उत्पादन तंत्र















 
अळिंबी ही विशिष्ट स्वाद व चवीसाठी फार पुरातन काळापासून सुपरिचित आहे. अळिंबीचा उपयोग प्राचीन काळापासून औषधीसाठी केला जातो. अन्नघटकांच्या पृथक्करणावरून अळिंबीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने व खनिजे असून भाजीपाल्यापेक्षा पौष्टिक असते, त्यामुळे युरोप व अमेरिकेत दररोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात अळिंबीचा वापर होऊ लागला आहे. 

महत्त्व अळिंबीचे 
अळिंबीतील उपलब्ध प्रथिनांमुळे या भाजीची चव ही मटणाच्या भाजीसारखी लागते; परंतु अळिंबी ही शाकाहारी आहे. पचनास सोपी, आहारात अतिशय सात्त्विक व पौष्टिक आहे. अळिंबीच्या प्रथिनांमध्ये लायसीन व ट्रिपटोफॅन ही महत्त्वाची अमायनो ऍसिड आहेत. तृणधान्यांत त्यांचा अभाव असल्याने अळिंबीचा वापर केल्यास हे आवश्‍यक अमायनो ऍसिड आपल्या आहारात येऊ शकतात. यात पिष्टमय पदार्थ नसतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना याचा आहार अतिशय उपयुक्त आहे. अळिंबीत प्रथिनांचे प्रमाण 2.7 ते 3.9 टक्के असून, हे भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत दुप्पट आहे. अळिंबीत शर्करायुक्त व स्निग्ध पदार्थांचे प्रमाण इतर भाजीपाला व डाळींपेक्षा फार कमी असल्याने शरीर काटक ठेवण्यास व वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे उत्तम अन्न आहे. 

ओळख 
अळिंबी ही वनस्पतीच्या राज्यातील बुरशीची एक जात आहे. इतर बुरशींप्रमाणे ती हरितद्रव्यविरहित असल्यामुळे ती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. अन्नासाठी तिला इतर सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. निसर्गामध्ये हा अन्नपुरवठा शेणखत, कंपोस्ट, कुजलेला काडीकचरा, पिकांचे अवशेष यामार्फत होतो. निसर्गात अनेक आकारांच्या व अनेक रंगाच्या अळिंबी आढळतात. यापैकी फारच थोड्या जाती खाण्यास योग्य आहेत. इतर सर्व जाती विषारी किंवा खाण्यास अयोग्य आहेत. खाण्यास योग्य जातींपैकी फक्त तीन ते चार जातींची व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यात येते. 
1) बटन अळिंबी 
2) धिंगरी अळिंबी 
3) भाताच्या काडावरील अळिंबी 
धिंगरी अळिंबी ही आपल्या हवामानाला योग्य आहे. तिच्या वाढीसाठी 22 ते 30 अंश से. तापमानाची आवश्‍यकता असते. आपणाकडे जून ते फेब्रुवारी या काळात असे तापमान असल्याने या जातीची लागवड करता येते. लागवडीसाठी कंपोस्ट, जमीन किंवा इतर कोणत्याही खास खताची आवश्‍यकता नसते. सर्वसामान्य माणसास धिंगरी अळिंबीची लागवड करणे सहज शक्‍य आहे. या अळिंबीच्या खूप जाती विकसित आहेत. पैकी राज्यात जास्त प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या जाती पुढीलप्रमाणे... 
1) प्ल्युरोट्‌स साजोर काजू 
2) प्ल्युरोट्‌स फ्लोरिडा 
3) प्ल्युरोट्‌स डवोस 
4) प्ल्युरोट्‌स प्लॅबीलॅट्‌स 
5) हिपसिझायगस अलमॅरीस 

लागवडीसाठी आवश्‍यक बाबी
लागवडीसाठी माध्यम -
 अळिंबी लागवडीसाठी तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असलेल्या वस्तू लागतात. व्यापारी तत्त्वावर अळिंबीची लागवड करण्यासाठी गव्हाचे काड किंवा भाताचे काड वापरले जाते. लागवडीच्या दृष्टीने पिकाची काढणी झाल्यास गव्हाचे काड किंवा भाताचे काड पावसात भिजू देऊ नये, ते सुरक्षित ठिकाणी साठवावे. 

जागेची निवड - अळिंबीची लागवड करण्यासाठी ............अन्न, वारा, पाऊस लागणार नाही, अशी विटांची किंवा साधी बांबूच्या तक्‍क्‍यांपासून तयार केलेली झोपडीसुद्धा वापरता येते. 

लागवडीसाठी आवश्‍यक वातावरण - लागवडीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी तापमान 22 ते 30 अंश से. व आर्द्रता 65 ते 75 टक्के असणे आवश्‍यक आहे. 
लागवडीसाठी साहित्य - चालू हंगामातील गव्हाचे किंवा भाताचे काड 
- 150 गेजच्या प्लॅस्टिक पिशव्या (35 x 55 सें.मी.) 
- अळिंबीचे बेड ठेवण्यासाठी लाकडी रॅक्‍स 
- अळिंबी स्पॉन 

लागवडीची पद्धत 
चालू हंगामातील पावसात न भिजलेले गव्हाचे काड लागवडीसाठी घ्यावे. गव्हाच्या काडाचे चार ते पाच सें.मी. लांबीचे तुकडे करावेत. गव्हाचे काड पाण्यात भिजवण्यासाठी प्रथम ते पोत्यात भरून पोते दहा तास पाण्यात भिजत ठेवावे. भाताचे काड असेल तर चार ते पाच तास भिजवावे. गव्हाच्या काडाचे पोते पाण्यातून काढून घेऊन पोत्यातील जास्तीचे पाणी निचऱ्याद्वारे काढून घ्यावे. हे भिजलेले गव्हाचे काड लागवडीसाठी वापरण्यापूर्वी निर्जंतुक करणे आवश्‍यक आहे. काड निर्जंतुक तीन पद्धतीद्वारे केले जाते. 

1) गरम पाण्याद्वारे, 2) वाफेद्वारे, 3) रसायनाद्वारे. 
काड निर्जंतुकीकरणासाठी कुठल्याही एका पद्धतीचा वापर करावा. गरम पाण्यातून काड निर्जंतुक करण्यासाठी काडाचे पोते 80 अंश से. तापमानाच्या गरम पाण्यात एक तास बुडवावे व नंतर ते पोते थंड होऊ देऊन त्यातील जादा पाणी काढून घ्यावे. वाफेद्वारे काड निर्जंतुक करण्यासाठी ऑटोक्‍लोव्हचा वापर करावा. रासायनिक पद्धतीद्वारे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कार्बेन्डाझिम व फॉर्म्यालीनचा वापर करतात. रासायनिक पद्धतीद्वारे निर्जंतुकीकरणाची पद्धत सोपी व सहज करता येण्यासारखी आहे; परंतु या पद्धतीमध्ये शिफारशीप्रमाणे रसायनाचा वापर करावा. रासायनिक पद्धतीमध्ये 100 लिटर पाण्यात 7.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम व 50 मि.लि. फॉर्म्यालीन टाकून द्रावण तयार करावे. या द्रावणात काडाचे पोते 12 ते 14 तास भिजू घालावे. त्यानंतर पोते काढून यातून जादा पाणी निचऱ्याद्वारे काढावे व दुसऱ्या दिवशी बेड भरावेत. बेड भरण्यापूर्वी वापरावयाची प्लॅस्टिक पिशवी (150 गेज - 35 x 55 सें.मी.) दोन टक्के फॉर्म्यालीनच्या द्रावणात निर्जंतुक करून घ्यावी. अळिंबीचे बेड भरताना निर्जंतुक केलेल्या काडाचा थर प्लॅस्टिक पिशवीमध्ये दोन ते तीन इंच द्यावा व यावर स्पॉन बेड रिंग पद्धतीने टाकावे. यानंतर यावर परत दोन ते तीन इंच जाडीचा थर द्यावा व परत यावर अळिंबीच्या स्पॉनची रिंग करावी. अशा प्रकारे चार ते पाच थर अळिंबीच्या स्पॉनचे द्यावे. एका बॅगसाठी गव्हाच्या काडाच्या दोन टक्के अळिंबी स्पॉन वापरावा व एक टक्का डाळीचे पीठ वापरावे. मशरूम स्पॉन व डाळीचे पीठ एकत्र मिसळून वापरावे. पिशवी भरल्यानंतर दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे. या पिशवीला निर्जंतुक केलेल्या टाचणीने वा सुईने छिद्रे पाडावीत. पिशवी भरल्यानंतर पिशव्या खोलीत रॅकवर ठेवाव्यात. खोलीतील तापमान 22 ते 30 अंश से. व आर्द्रता 65 ते 75 टक्के राहील, यासाठी जरुरीप्रमाणे हवेत व जमिनीवर पाणी फवारावे. मशरूम बॅग भरून ठेवल्यानंतर 12 ते 14 दिवसांनंतर बॅगमध्ये अळिंबीची पांढरट वाढ दिसून येते. ही वाढ दिसल्यानंतर बेडची प्लॅस्टिक पिशवी काढून घ्यावी व बेड रॅकमध्ये तसाच ठेवावा. या बेडवर दुसऱ्या दिवसापासून सकाळ, दुपार व संध्याकाळ पाण्याची फवारणी करावी. बेडवरील प्लॅस्टिक पिशवी काढल्यानंतर चार ते पाच दिवसांत बेडवर कोंब दिसून येतात व नंतर तीन ते चार दिवसांत पूर्ण अळिंबी दिसून येते. 

काढणी 
अळिंबीचा पहिला बहर येण्यासाठी 24 ते 25 दिवस लागतात. अळिंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी छाटणी करावी. काढणीअगोदर एक दिवस पाणी बंद करावे व काढणी करून बेडवरील पातळ थर खरडून काढावा व नंतर बेडवर सकाळ - संध्याकाळी पाणी फवारावे. पहिल्या काढणीनंतर आठ ते दहा दिवसांनी दुसरी काढणी सुरू होते. दुसरी काढणी झाल्यावर आठ ते दहा दिवसांनी तिसरी मशरूमची काढणी येते. अशा प्रकारे 40 ते 45 दिवसांत मशरूमची काढणी तीन वेळेस होते व अशा प्रकारे भरलेल्या एका बेडपासून एक ते 1.25 किलो ओली अळिंबी मिळते. काढलेली 
अळिंबी स्वच्छ करून 100 ग्रॅम, 200 ग्रॅम वजन करून छिद्रे असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांत भरून ती विक्रीसाठी पाठवावी. 

असे तयार होतात विविध खाद्यपदार्थ  
धिंगरी अळिंबी रेफ्रिजिरेटरमध्ये तीन ते चार दिवस चांगल्या स्थितीत राहू शकते. उन्हात किंवा ड्रायरमध्ये वाळवून हवाबंद पिशवीत ठेवता येते. वाळल्यामुळे वाळलेली अळिंबी खाण्यासाठी वापरताना कोमट पाण्यात 15 मिनिटे भिजत ठेवावी. भिजल्यानंतर वजनात पाच ते सहा पट वाढ होते. यापासून पुलाव, सूप, करी, भजी, ऑम्लेट इ. खाद्यपदार्थ तयार करता येतात. 

संपर्क -7350013147
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, जालना येथे विषय विशेषज्ञ आहेत.)
 


Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120505/5044815957409018415.htm